©दिविजा

Submitted by onlynit26 on 11 June, 2019 - 01:36

©दिविजा

" विराज, पत्रिका पाठवल्या का रे?"
" हो आई सगळ्यांना व्हाट्सअप्प केल्या."
" मलाही पाठवून ठेव, महीला ग्रुपवर पाठवायला."
" आई , मला हे पटत नाहीये गं, आता या वयात माझा बारसं करतेस ते."
" तू गप्प बस, तू लहानपणी सारखा बोलायचास की माझा बारसं झालं नाही, तेव्हा परिस्थितीमुळे नाही जमले रे म्हणून आता तुझी इच्छा पूरी करणार आहे."
यावर विराज काही न बोलता कामाला लागला. किर्तीला हसताना पाहून तो अजूनच शरमला.
विराज आणि किर्तीचे आठ दिवसापूर्वीच बडोद्याला लग्न झाले होते. त्यानंतर ते सर्वजण पुण्याला परतले होते. पुण्याला आल्या आल्या प्रमिलाजींनी वेगळाच थाट मांडला होता. कुलदैवताचे दर्शन झाल्यावर विराजचं बारसं करायची घोषणा केली तेव्हा साऱ्यान्याच आश्चर्य वाटले. प्रमिलाजींसमोर बोलायची कोणाची हिंमत नव्हती. किर्तीला हसूच आवरत नव्हते.
जेव्हा सर्वांना आमंत्रणे गेली तेव्हा नातलग आणि मित्रपरिवारात एकच खळबळ उडाली. घरातील सगळ्यांनाच फोन येऊ लागले. विराज आणि वसंतराव यांनी आपले फोन बंद करून ठेवले. पाहूणे-सोयरे संशयितपणे विचारू लागले. शेजारच्या काकू दोन तीन वेळा घरी फेरी मारून गेल्या. प्रमिलाजी कडक स्वभावाच्या असल्याने त्यांना थेट कोणी विचारले नाही. आमंत्रित मात्र पत्रिकेत लिहिलेल्या ' नवीन बाळाच्या बारश्याला यायचे हं' या शब्दांचा अर्थ काढत बसले. लोकांना विचार पडला 'नवीन बाळ' कुठून आले? प्रमिलाजींनी एखादे बाळ दत्तक घेतले असावे असा समज करत लोकं कुजबूजत राहीली.

बारश्याचा दिवस उजाडला. विराज खूपच टेंशनमध्ये होता. किर्ती मात्र त्याला चिडवून हैराण करत होती. बारसं घरीच असल्याने सजावटीसाठी प्रमिलाजी खास लक्ष देत होत्या. वसंतराव आपल्या सूनेसोबत बाकीच्या तयारीला लागले होते. विनिताही आपल्या छोट्या मुलासोबत आली.
" बरं झालं माझं बारसं लहानपणी झालं, नाहीतर आज पाळण्यात झोपावे लागले असते " तिने आल्या आल्या विराजला चिडवायला सुरुवात केली.
" ताई , एका बाळाच्या बारशाला पाळणा नाही आहे काही, चांगला मोठा झोपाळा आणलाय" असे बोलून किर्ती हसू लागली.

हळूहळू पै पाहुणे ,शेजारी यायला सुरुवात झाली. हळू आवाजात साउंड सिस्टीम पण लावली गेली. आमंत्रित लोकांना बाळ मात्र कुठे दिसत नव्हते. विराज तयार झाला. त्याला लग्नातही एवढी धाकधूक वाटली नव्हती तेवढी आज वाटत होती. सगळी तयारी झाली. मुख्य हॉलमधे प्रवेश करताना प्रमिलाजी विराजच्या कानात काहीतरी पुटपुटल्या. त्याचवेळी विराजचा चेहरा आनंदाने फुलून गेला. भीती आणि लाजेचे सावट दूर सरले.
"विराज आपल्या बाळाला आण." असे प्रमिलाजीनी म्हणाल्याबरोबर विराजने मोरपंखी साडी नेसलेल्या किर्तीला अलगद उचलले. तिला काहीच समजेना. हळूहळू तो तिला हॉलमध्ये सजलेल्या झोपाळ्याकडे घेऊन जाऊ लागला.
" विराज काय करताय हे?"
" विशेष काही नाही, बाळाला उचलून घेतलंय."
उपस्थित लोकांना काहीच कळत नव्हते. वसंतराव आणि विनिता बघतच राहीले. विराजने किर्तीला झोपाळ्यात आणून बसवले. ती लाजेने चूर झाली होती.
प्रमिलाजी आपल्याकडे माईक घेत बोलू लागल्या.
" तुम्हाला हे सारं बघून आश्चर्य वाटले असेल. मी जेव्हा पहिल्यांदा आई झाले तेव्हा माझं वय पंचवीस होते. मातृत्वाचे क्षण अनुभवत असतानाच विराजच्या जन्माने मी अठ्ठाविसाव्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाले आणि आज वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी तिसऱ्यांदा आई झाली आहे. त्याच बाळाचे आज नामकरण होणार आहे." त्या किर्तीकडे हात दाखवत म्हणाल्या.
सगळेजण प्रमिलाजींच्या बोलण्याने अचंबित झाले. आजपर्यंत कोणी आपल्या सुनेचा बारसं केलं नसेल. लग्नानंतर मुलीचे नाव बदलण्याच्या पारंपारिक विधीला एका चांगल्या विचाराची जोड देऊन प्रमिलाजी एक आदर्श पायंडा घालू पाहत होत्या. जमलेले लोक त्यांचे पुढचे बोलणे ऐकू लागले.
" लग्न लागल्यानंतर किर्ती जेव्हा आईच्या गळ्यात पडून रडत होती. तेव्हा त्यांच्यातील बोलणे मी ऐकलेय. माझ्या कडक स्वभावामुळे लग्नानंतर आपल्या मुलीचे सासरी कसं होईल? तिला नीट नांदवतील का? तिला काही त्रास तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न त्या माऊलीच्या आसवात होते. किंबहुना प्रत्येक मुलीच्या आई-वडीलांच्या मनात अशी काळजी दाटलेली असते. त्याचवेळी मी ठरवले. किर्तीला आपली मुलगी म्हणून वागवायचे. सासूबाईचा हक्क तर सगळेच गाजवतात , म्हटलं सूनेची आई होऊन बघू आणि नव्या घरी बावरलेल्या या बाळाचे बोट पकडून तर बघू." त्यांना पुढे काही बोलता येत नव्हते. किर्ती केव्हाच प्रमिलाजींच्या कुशीत शिरली होती. हा कौतुक सोहळा अहमदाबादवरून तिचे आई वडील व्हिडीओ कॉलवरून पाहत होते. प्रमिलाजी आपल्या द्वितीय कन्येच्या डोळ्यातील कौतुक मिश्रीत भाव निरखित होत्या...
इथे विराज ताटातील तांदुळात 'दिविजा'हे मघाशी आईने कानात सांगितलेलं नाव कोरत होता.

समाप्त..

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन दशरथ राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - डोंबिवली (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
दिनांक - ०१.०६.२०१९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

<<<दिविजा म्हणजे काय अर्थ?
Submitted by ॲमी on 20 June, 2019 - >>
संस्कृत मधे द्विज असा शब्द आहे ज्याचा अर्थ होतो 2 वेळा (दुसरा) जन्म घेणारा. त्याच शब्दाचे स्त्रीरूप असावे

Pages