जंगल तयार करायची मियावाकी पद्धत

Submitted by हर्पेन on 10 June, 2019 - 02:34

हवामान बदलाचे दुष्परिणाम हे आता दूर कुठे तरी हिमालयात हिमनद्या वितळाताहेत, उत्तर / दक्षिण ध्रूवावरचे हिमनग सुटून निघत आहेत असं काहीतरी केवळ वाचायची गोष्ट राहिली नाही. लेहला झालेली ढगफुटी, केदारनाथ प्रलय, अशा केवळ फिरायला जायच्या ठिकाणांच्या ठिकाणी घडणार्‍या गोष्टींसोबतच, मोठ्या भूस्खलनामुळे सह्याद्रीच्या कुशीतील माळीण सारखे आख्खेच्या आख्खे गाव नाहीसे होणे, पुण्यासारख्या उत्तम हवामानाकरता प्रसिद्ध असलेल्या शहराचे ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलेले तपमान असे आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपले आहेत. मागे एकदा, भविष्यात पिण्याच्या पाण्यावरनं युद्धं होतील असे मी जेव्हा वाचले तेव्हा माझ्या हयातीत काही असे होत नाही म्हणून मी माझी समजूत काढलेली जी खोटी ठरण्याची वेळ आलेली आहे.

ह्या सगळ्या मानव निर्मित / मानवी हस्तक्षेपामुळे होणार्‍या नैसर्गिक घडामोडी चालू असताना आपल्या देशातली स्थिती माध्यमांवर नजर टाकता तरी अशी भासते की जगात जास्त महत्वाचे काही असेल तर ते म्हणजे नटनट्यांचा एअरपोर्ट लूक, कोणत्या क्रिकेटवीराला किती जाहिराती मिळतात आणि त्यामुळे त्याची ब्रँड व्हॅल्यु कशी वधारते आहे आणि राजकीय घडामोडी. राजकीय घडामोडी तर 'अराजकी'य होत चालल्या आहेत. एखाद्या सरकारने केलेले काम चांगले आहे की नाही हे ते सरकार कोणत्या पक्षाचे आहे ह्यावर ठरते. सर्वसाधारणतः आपल्याकडच्या बहुतेक शहरी माणसांचा समज असा असतो की कर भरला म्हणजे आपले काम / कर्तव्य संपले बाकी जे काही करायचे आहे ते त्या भरलेल्या करांच्या बदल्यात सरकारने करावे. सरकारला (स्थिर असेल तर / तरीही) लोकांना चटकन दाखवायला सोपी पडतील अशी कामे करण्यात रुची असते. शाश्वत विकास वगैरे गोष्टी बोलाची कढी म्हणून च राहतात. ह्या सगळ्यात पर्यावरणाबाबत आपण काहीतरी करायची वेळ आलेली आहे असे वाटत असतानाच माझ्या वाचनात आले मियावाकी पद्धतीने बनवता येणार्‍या जंगलाबाबत.

मियावाकी प्रकारच्या जंगलाचे कमीत कमी शब्दात वर्णन करायचे झाले तर ते असे असेल.
जैवविविधता राखून स्थानिक झाडे जवळजवळ लावणे. ह्याने होणारे फायदे असे मातीतून घेत असलेल्या पोषणाबाबत परस्परपुरक वातावरण आणि झाडे जवळजवळ लावल्याने वाढीच्या बाबतीत (जमीनीवर फांद्यांची आणि खाली मुळांची वाढ) स्पर्धा केल्याने होणारी जलद वाढ. दावा असा आहे की हे जंगल, आपण लावलेल्या सहा इंच ते दोन फूटी रोपांना वणवा, चराई पासून जपले आणि पाणी घालत राहिले तर केवळ तीन वर्षात १०-१२ फुटांहून जास्त उंच वाढते आणि पाण्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण होते.

मला मिळालेली बहुतांश सर्व माहीती https://www.afforestt.com/ ह्या वेब साईटवरून मिळवलेली आहे. भारतात सर्व प्रथम शुभेंदू शर्मा नावाच्या एका इंजीनियर ने तो त्यावेळी काम करत असलेल्या एका जपानी ऑटो उत्पादक कंपनी करता त्यांच्या आवारात अशा प्रकारचे जंगल तयार केले; त्यानंतर ह्या पद्धतीमुळे तो इतका प्रभावित झाला की त्याने ती नोकरी सोडून स्वतःच एक कंपनी स्थापन केली ज्यायोगे तो आज अनेक ठिकाणी अशा प्रकारचे जंगले तयार करण्याचे काम पैसे घेऊन करतो अर्थात तरीही ज्याला कोणाला स्वतः चे स्वतः हे काम करण्याची ईच्छा आहे अशा लोकांकरता अत्यंत सुलभ प्रकारे वर्णन केलेली माहीती ह्याच वेबसाईटवर दिलेली आहे. https://www.dropbox.com/sh/4l3sqwd3b9j3pmq/AAAa6kbi3r7yY9QnDgrnj5BMa?dl=0 इथुन ती डाऊनलोड देखिल करता येऊ शकते.

माझ्या पाहण्यात आलेला मियावाकी बाबतचा पहिला व्हिडिओ
https://youtu.be/jf3YXoMZ76o

आणि अलीकडेच पाहण्यात आलेला हा एक व्हिडिओ
https://youtu.be/j7PbJYJXRuI

हे पाहून काय करायचे असते ते अधिक चांगल्या प्रकारे कळू शकेल.

मियावाकी पद्धती ने तयार केलेले आणि पारंपारिक पद्धती ने तयार केलेले जंगल यामधला फरक उलगडून दाखवणारा हा अजून एक व्हिडियो

https://youtu.be/BXsBfo3GVG4

मी ही ठरवले आहे की आपणही हे करून बघायला हवे. माझ्याकडे ज्यावर असे जंगल तयार करता येईल अशी जमीन आहे फक्त २ गुंठे त्यामुळे आणि त्याव्यतिरिक्तही, 'पण' ने सुरु होणारे अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि नेहेमी प्रमाणे बापूंना आठवले. गांधीजी, त्यांच्याकडे एखाद्या उपक्रमाबाबत 'हे कसं होईल' वगैरे शंका घेऊन कोणी माणूस आला की म्हणायचे 'करके देखो'

मी माझ्याकडे असलेल्या (फक्त २ गुंठे) जागेत असे जंगल तयार करू शकलो तरी त्याचा वातावरणावर खूप मोठा प्रभाव पडणार आहे असे काही नाही पण आपल्याकडे रामाच्या सेतूला मदत करणार्‍या खारीची गोष्ट, खुलभर दुधाची कहाणी अशा अनेक गोष्टींनी प्रेरित होऊन ही हिंमत एकवटत आहे. नेहेमी प्रमाणेच माझ्या अनेक वैयक्तिक उपक्रमांना देता तशा शुभेच्छा द्याल अशी आशा आहे.

लावू पहात आहे अशी झाडे निवडण्याकरता माझ्या एका मैत्रीणीची व्यावसायिक मदत मिळाली आहे. सर्व झाडे अर्थात च देशी असणार आहेतच पण त्यातही अशी काही निवडली आहेत ज्यामुळे पक्षी , कीटक, फुलपाखरे अशा निसर्ग साखळी तील सर्व घटकांना पोषक असे पर्यावरण तयार होईल.

झाडांबाबत अधिक माहिती खालील वेब साईटस् वरून मिळवता येईल. (विशेषकरून भारतीय झाडांकरता पहिल्या दोन वेब्साईट अधिक उपयुकरता)

https://indiabiodiversity.org/
http://www.flowersofindia.net/
http://tropical.theferns.info/

आपल्या मायबोलीवर अनेक निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी मंडळी आहेत; असेही अनेक जण आहेत ज्यांच्याकडे भरपूर जमीन आहे; काहीजण शहरातील थोडीफार मोकळी जागा असलेल्या सोसायटीत रहात असतील त्यासर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवावी म्हणून हा खटाटोप.

तर मंडळी चला जंगल तयार करू या.

तळटीप - मियावाकी जंगलासंदर्भात वेळोवेळी वाचनात आलेल्या बातम्या देखिल ह्याधाग्याखाली संकलित करुया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाडे लावण्याची कोणतीही पद्धत असू द्यात त्याला जास्त किंमत देण्याची गरज नाही .
काही गोष्टी महत्त्वाच्या आहे ज्या परिसरात झाडे लावणार आहोत झाड सुधा त्याच परिसरातील असावे .
अमेरिकी चे झाड भारतात नको आणि भारतातील अमेरिकेत नको .
नैसर्गिक रित्या उत्क्रांत झालेलं च झाड लावणे
कलम नको आणि हायब्रीड पण नको.
स्वतः झाड लावावे ते वाढवावे आणि नंतर निसर्ग कसा धोक्यात आहे ह्या वर बोलबच्चन द्यावे .
वांझोटी निसर्ग प्रेम दाखवायची गरज नाही

Ecological society is taking up restoration project at panshet and looking for volunteers. This would be a good experience.
They have a meeting in society office on 17th June 6:30 pm at society's office. Please do join if interested in working.

B-2, Jayanti Apartments, Senapati Bapat Road, Near Ratna Hospital, Pune, Maharashtra 411016
Contact # 99105 30519

IMG_7665 (1024x768).jpg

हर्पेन, ही आमच्या इथे गेल्या वर्षी लावलेली आणि पहिल्या हिवाळ्यातून तगलेली मियावाकी पद्धतीने लावलेली झाडे. जमिनीची धूप होवू नये म्हणून तिथे असलेले गवत आणि क्लोवर तसेच ठेवलेय. ही झाडे ४' अंतरावर लावलेत आणि दोन ओळीतील अंतर साधारण ६' आहे. इथे नेहमीच्या पद्धतीने झाडे लावताना हे अंतर साधारण २०' किंवा जास्त असते. रस्त्याच्या कडेला असलेली मोठी झाडे अशीच नेहमीच्या पद्धतीने लावलेली आहेत.

काल सहज गंमत म्हणून काही वीडियो बघत होते तर त्यात जंगल निर्मिती बद्दल खुपच रोचक माहिती मिळाली. कदाचित इकडे उपयोग होईल म्हणून लिंक नमूद करते.
https://youtu.be/7kHZ0a_6TxY
आणि हां अजुन एक..
https://youtu.be/Un2yBgIAxYs

झाडाझुडपांचे प्रयोग आणि अनुमान लगेच निघत नाहीत, तीस वर्षांनी त्यातला फोलपणा लक्षात येतो.
नगरपालिका कुणाचे मत घेऊन ती झाडे लावतात रस्त्याकडे मग कुणाचे विरुद्ध मत येते. पण वेळ गेलेली असते.
----
कुंपणाचा खर्च एकदम परवडत नसेल तर तात्पुरती हद्द आखली जाते. नंतर एकेक भाग काढून तार/भिंत बांधावी.

धन्यवाद श्री अरे आहेस कुठे सध्या!

सुश्या- हो बहुतेक

रॉनी, नानबा यांनी लिहिलेली पोस्ट वाचली असेल तर आज मिटींगला जरूर जा/ संस्था खूप चांगली आहे आणि प्रत्यक्ष काम करणारीही. त्यांच्या सोबत काम करताना भरपूर शिकायला मिळेल.
धन्यवाद नानबा.

स्वाती २ - मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन. बर्फातला आख्खा एक हिवाळा काढलाय ह्या झाडांनी म्हणजे मोठीच मजल पार पाडली आहे.

रागिणी - रोचक व्हिडियो धन्यवाद शेअर केल्याबद्दल

Srd - नोंद घेतली आहे . धन्यवाद

हरपेन, तुम्ही चांगला उपक्रम राबवत आहात, तुम्हाला शुभेच्छा. मियावाकी पद्धत नवीन असल्यामुळे त्याचे फायदे तोटे काय आहेत येवढ्यात कळणार नाही पण त्या निमित्ताने लोक झाडे लावत असतील तर त्याचे स्वागत करायला हवे.

तुम्हाला परत एकदा मनापासून शुभेच्छा!!

प्रश्न:
कृपया मार्गदर्शन करावे की कोणती झाडे / वृक्ष आहेत जी भरभर वाढतात आणि ज्यांना फार देखभालीची
नंतर गरज पडत नाही?

सर्वसाधारणपणे सहज उपलब्ध होणाऱ्या आणि भरपूर प्रमाणात प्रसार करता येऊ शकणाऱ्या बिया जर suggest केले तर अति उत्तम.

पावसाळ्यात थोडीफार तरी जमीन सुजलाम-सुफलाम करण्याचा संकल्प आहे.

तुम्हीही स्वतः प्रयत्न करून शुभ कार्यात सामील व्हा.

हे कुणा दुसऱ्यासाठी नव्हे आणि social media वर सेल्फी साठी तर अजिबात नव्हे.

धन्यवाद साधना, मियावाकी पद्धत नवीन म्हटले तर आहे म्हटले तर नाही कारण मियावाकी यांनी नवीन कसलाही शोध न लावता केवळ निसर्गाच्या निरिक्षणातून ही तयार केली आहे आणि त्यात निव्वळ स्थानिक झाडांचीच नैसर्गिक random लागवड करायची आहे.

vichar पावसाळ्यात थोडीफार तरी जमीन सुजलाम-सुफलाम करण्याचा संकल्प आहे.
>>> खूप चांगला विचार Happy

खरेतर आपल्याकडच्या बहुतेक सर्व स्थानिक वनस्पती लवकर वाढ होणार्‍या असतात. त्यातून मियावाकी पद्धतीने लावल्यास अजूनच बरे राहील असे वाटते. पण त्यातही मला माहित पडलेली झाडे खालील प्रमाणे

कडू लिंबू / निंबोणी - Azadirachta indica - http://tropical.theferns.info/viewtropical.php?id=Azadirachta+indica
शिरीष - Albizzia lebbeck - http://tropical.theferns.info/viewtropical.php?id=Albizia+lebbeck
शिवण - Gmelina arborea - http://www.flowersofindia.net/catalog/slides/Gamhar.html

Shirish ghetana savdhan.
Ek khara Shirish ani gulabi fulancha khota Shirish (non native)
Same with many trees including Ashok

हो नानबा, म्हणूनच मी शास्त्रीय नाव आणि website ची लिंक दिल्ये, मी दिलेला शिरीष बरोबर /भारतीय/ स्थानिकच आहे ना

वेल्कम विचार.
उपयुक्त बेवसाईटची नावे वरती मूळ लेखातही वाढवली आहेत.

@हर्पेनकाका
तुम्ही दिलेल्या लिंक्समधुन खुपसारी नवीन माहिती मिळाली.

तुम्ही करत असणार्या वैयक्तिक उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल. मदतीची गरज पडल्यास नक्की कळवा. Happy

हर्पेन, उपक्रमाकरता मनापासून शुभेच्छा!

नानबा, सावधान कशासाठी? non native झाडांच्या रोपणाचे काही तोटे असतील तर कृपया माहिती द्या.

धन्यवाद गजानन,

non native झाडांचे तोटे भरपूर आहेत.
आपण आपल्याकडे सामाजिक वनीकरणाअंतर्गत अनेक अस्थानिक / एग्सॉटिक झाडे लावली होती त्यांची वाढ झपाट्याने होते हा एक फायदा सोडला तर त्यांचा दुसरा काहीही उपयोग होताना दिसत नाही. पर्यावरण म्हणजे नुसती झाडे नव्हे तर त्यासोअबत बनणारी एक परिसंस्था (इकोसिस्टीम). एग्सॉटिक झाडांना आपल्या इथले कीटक, माश्या, फुलपाखरे, पक्षी असे कोणीही रहाण्याकरता / खाण्याकरता म्हणून स्विकारत नाहीत. अशी झाडे ही मग केवळ प्राणवायु तयार करण्याचे साधन बनून राहतात. शिवाय अशा वनस्पतींची संख्यात्मक वाढ रोखण्याकरता आवश्यक घटक आपल्या कडच्या परिसंस्थेत नसल्यास ह्यांची अनिर्बंध वाढ होते. आसपास निरिक्षण केले असता ऑस्ट्रेलियन सुबाभूळ , कॉण्ग्रेस गवत ई. अनेक उदाहरणे तुला सापडतील. गुलमोहर आपल्याकडच्या साहित्यात स्थान मिळालेला वृक्ष आहे पण त्याला पक्षी / कीटकांनी थारा दिलेला नाही (म्हणजे त्याच्यावर थारा घेतलेला नाही Happy ) तसेच नैसर्गिक आपत्ती सदृश्य स्थितीत जसे की वादळ वारे / दुष्काळ वगैरे अशी झाडे तोंड देऊ शकत नाहीत आणि लवकरच बळी पडतात.

त्यामुळे आता परत सगळे जग स्थानिक वाणांच्या मागे जात आहे.

आम्ही डोंगरावर वृक्षलागवड सुरु करायच्या अगोदर वनखात्याच्या अधिकाऱ्याबरोबर बोललो होतो. त्याने अगोदर सुबाभूळ आणि निलगिरी ही झाडे काढायला सांगितली होती. आणि गम्मत म्हणजे आम्ही आठवी नववीला असताना आम्हीच ही झाडे शाळेने सांगितली म्हणून लावली आहेत.

तसेच सप्टेंबर-ऑक्टोंबर मधे जी घाटात, रस्त्याच्या कडेला सोनकी सारखी पिवळी फुले दिसतात ती मुळ आपल्याकडील नसुन त्यांनी चराईच्या गवतावर परिणामी किटकांच्या जीवन चक्रावर बराच परिणाम केला आहे असं ऐकिवात आले होते. कॉन्ग्रेस गवतासारखे त्यांचेही निर्मुलन लवकर होत नाही.

हर्पेन जरा अवांतर....
आत्ता शांकदांबरोबर बोलत होतो तेंव्हा विषय निघाला की प्रत्येकाच्या पत्रिकेत जशा अनेक गोष्टी असतात तसे आराध्यवृक्ष असाही प्रकार असतो. मी पत्रिका मानत नाही तरी आईला विचारले तर तिने माझा आराध्यवृक्ष आंबा असल्याचे सांगीतले. आणि कोरफडही. तेंव्हा माझ्या मनात पहिला विचार हा आला की डोळसपणे जे वृक्षलागवड करत आहेत त्यांचे कौतुकच आहे पण ही चळवळ अजुन प्रसारीत करण्यासाठी जर या पत्रिकेतल्या आराध्यवृक्षाची मदत घेतली तर? पत्रिकेत आहे म्हणून लोक काहीही करता. लाखाचा हिरा घालतात, दान करतात, कुठले कुठले खर्चिक विधी करतात. मग त्यांना समस्येवर उपार म्हणून विधिंबरोबरच पत्रिकेतला आराध्यवृक्ष जोपासायला सांगणारा कुणी भेटला तर हे लोक त्यासाठी जंगलच जंगल जोपासतील. नको म्हटले तरी कुणी ऐकणार नाही. ही आपली शशांकदांबरोबर बोलताना मनात आलेली कल्पना आहे फक्त. होऊही शकेल असं. पत्रिकेवर विश्वास असलेल्या लोकांचे काही सांगता येत नाही हो. निसर्गाचे संवर्धन झाल्याशी मतलब Lol
(आता जरा अंधश्रध्देला हातभार लावल्यासारखे होईल पण आजची जंगलांची परिस्थिती पहाता चालून जाईन तेवढे.)

शाली,
आराध्यवृक्ष नको. जे काही संवर्धन होईल ते हळू हळू झाले तरी चालेल पण ते समजून उमजून डोळसपणे व्हावे. नाहीतर पुन्हा मोजकेच वृक्ष आराध्य म्हणून बाकीचे निशिद्ध असेही व्हायचे.

गजानन,
परके झाड हे त्या भागातील पर्यावरणाचा परंपरेने भाग नसल्याने, जैविक साखळीत त्याचा फारसा उपयोग नसतो. झाडे ही त्या परीसरातील किटक, पशू-पक्षी, माणसे या सगळ्यांच्याच जगण्यात महत्वाची भूमिका बजावतात. जीवो जीवस्‍य जीवनम्‌ या नियमाने चालणारी अन्नाची साखळी सुरु रहाण्यासाठी स्थानिक झाड आवश्यक. स्थानिक झाड एकदा नीट रुजले की त्याची फार काळजी घ्यावी लागत नाही. त्यांच्या गरजा स्थानिक पर्यावरणाशी सुसंगत असल्याने फारशी काळजी न घेताही स्थानिक पर्यावरणात ही झाडे दीर्घजीवीही असतात. त्यांचे जीवनचक्र स्थानिक ऋतूंशी सुसंगत असल्याने योग्य काळात नवी पालवी, फुले, फळे, पानगळ होते. योग्य काळात त्यांची पाने, फळे, फुलांमधील मध वगैरे मधून इतर जीवांना अन्न मिळते. रहाण्यासाठी, प्रजननासाठी निवारा उपलब्ध होतो.
परके झाड कितीही मोहक वाटले तरी स्थानिक पर्यावरणाशी ते सुसंगत नाही . स्थानिक 'अ' झाडावर वाढणारे किटक परक्या 'ब' झाडावर वाढत नाहीत, पर्यायाने पक्षांच्या अन्न साखळीचा प्रश्न उद्भवतो. हे असे सगळ्याच बाबतीत होते. त्याशिवाय स्थानिक वनस्पती एकत्र वाढताना एकमेकांना पुरक अशी देवाणघेवाण होत असते. एका स्थानिक झाडावरचे परोपकारी किटक, पक्षी दुसर्‍या स्थानिक झाडावरील त्रासदायक किटकांना खातात आणि जीवनचक्र सुरळीत रहाते. परके झाड लावले तर हे घडत नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक स्थानिक झाडाचीच निवड करावी.

धन्यवाद स्वाती! तुम्ही म्हणताय ती शक्यता लक्षातच आली नाही. ती वेगळीच समस्या निर्माण व्हायची.

नाहीतर पुन्हा मोजकेच वृक्ष आराध्य म्हणून बाकीचे निशिद्ध असेही व्हायचे.>>>>

ही मुळ नक्षत्रवनाची संकल्पना आहे. त्यात प्रत्येक नक्षत्राचे एक झाड आहे आणि अशी 27 झाडे आहेत. प्रत्येकाने आपण कुठल्या नक्षत्रावर जन्मलो हे पाहून त्याप्रमाणे झाडाची जोपासना करायची ही कल्पना आहे. या 27 झाडांमधली बहुसंख्य झाडे आपली नेहमीची आंबा, वड,पिंपळ, जांभूळ, शमी, खैर वगैरे उपयोगी झाडे आहेत. खूप ठिकाणी नक्षत्रवने तयार केलेली आहेत.

शालीच्या आयडीयास अनुमोदन.
बाकीच्यांचे एक्सपर्ट ओपिनियन ही लय भारी.

इकोसिस्टीम मध्ये मधमाश्यांची भूमिका सर्वांत महत्त्वाची (परागीभवन).

तेंव्हा कृपया असे काहीही आपण होऊ देऊ नये ज्यामुळे त्यांसी त्रास होईल.

जसे की काही नतद्रष्ट फांदी कापून टाकतात जर मधमाशांनी पोळं बनवायला सुरवात केली तर.

Pages