बिल्डींग..

Submitted by माउ on 31 May, 2019 - 17:57

रोज वळताना दिसत रहाते
ती पडायला आलेली बिल्डींग..
कोप-यावर शांतपणे उभी असलेली..
भेगाळलेल्या राखाडी भिंतीवर पडलेल्या चिरा
मनात ठेवून पाहत असते ती
समोरच्या धावत्या जगाकडे

सुनसान पार्कींग लॉट आठवत बसतो
तो पहिला दिवस..ताज्या रंगाचा वास..
नवीन को-या गाड्या आणि न उघडलेले बॉक्सेस..
नंतर दररोज होणारी गाड्यांची वर्दळ
आणि सामानाच्या पिशव्या..
घुमणारे बोल आणि कधीकाळी रंगलेला गप्पांचा अड्डा..
चोरून आणलेल्या बाटल्यांसोबत...

कठडा पडलेल्या अव्यक्त पाय-यांना आठवत असतात
वर खाली धावत जाणारी पावले..
सणांच्या दिवशी नटलेल्या मुली..
आणि रेशमी पदराचे पाय-यांना हळून झालेले स्पर्श
पावसात एखादी चुकून पाहिलेली मिठी
आणि उघड्या खिडक्यांमधून सताड शिरणारा समुद्रावरचा वारा

आजही त्या फ्लॅट्स च्या खिडक्या उघड्या आहेत सताड
आजही शिरतोय वारा भसकन
उडवून जातो कट्ट्यावर, भिंतींवर, रिकाम्या कपाटावर
आणि जुन्या कॅलेंडर वर बसलेली धूळ..
खिडक्या पाहत राहतात बाहेर
एप्रिल ची वाट बघत ..
जेव्हां फुलतो तो एक लांबवर असलेला सोनसळी बहावा
आणि त्यानंतर दोन दिवसांनी येते ती तारीख
बिल्डींगच्या ओपनिंग ची...

-रसिका

Group content visibility: 
Use group defaults

खरंच छान लिहिलंय. अगदी कळकळीने, मनापासुन.
पण कविते ऐवजी लघुलेख छान झाला असता असं वाटतं.
जमलच तर Same topic वरती एक लेख लिहा....तो ही वाचायला नक्कीच आवडेल.

छान वर्णन.
पण शेवटी नाही कळला. जुनी पडायला आलेली बिंल्डिंग आणि ओपनिंगची तारीख?

खूप सुंदर!
पुण्यात मेहेंदळे गॅरेजवरून कलमाडी हायस्कूलकडे येताना डाव्या बाजूला अश्शीच एक बिल्डिंग आहे. उजाड, तरी घराच्या खिडक्या सताड उघड्या. बंगला आहे कदाचित, लक्षात नाही, पण पार्किंग आहे खाली असं वाटतंय. तिकडे बघताना कसंतरीच वाटतं. खिडक्या का उघड्या आहेत हेच कळत नाही.

खूप सुंदर!
पुण्यात मेहेंदळे गॅरेजवरून कलमाडी हायस्कूलकडे येताना डाव्या बाजूला अश्शीच एक बिल्डिंग आहे. उजाड, तरी घराच्या खिडक्या सताड उघड्या. बंगला आहे कदाचित, लक्षात नाही, पण पार्किंग आहे खाली असं वाटतंय. तिकडे बघताना कसंतरीच वाटतं. खिडक्या का उघड्या आहेत हेच कळत नाही.>

वाह! मी फक्त कल्पनेच्या आधाराने लिहिलंय....