मी पाहीलेली काही लग्ने..

Submitted by अजय चव्हाण on 31 May, 2019 - 04:07

खरंतरं लग्नासारख्या कार्यक्रमाला जाणं मला खरचं खुप कंटाळणवाणं वाटतं पण काय करणार ना ?कधी कधी नाईलाजाने जावचं लागत. तर असो,देवाच्या कृपेने अफाट मित्रपरिवार,भरपूर नातेवाईक आणि खुपच ओळखी असल्याने दरवर्षी किमान डझनभर आग्रहाची निमंत्रणे येतात अगदी "अज्जु तु जर लग्नाला नाही आलास ना तर जीव जाईपर्यंत मार खाशील" अशा प्रेमळ धमक्याही येतात, आग्रह मोडता येत नाही किंवा बर्याचवेळा कर्तव्य म्हणून जावचं लागतं.आतापर्यंत किमान मी पन्नास एक लग्नाला हजेरी लावली असेल..ते ही अगदी नागपूरपासून रत्नागिरी,कोल्हापूर,सातारा,सांगली,चाळीसगाव,जळगाव,परभणी,बीडपर्यंत किंबहुना ह्या लग्नांमुळेच माझा अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्र पाहून झालाय आणि बर्याच प्रकारची,वेगळ्या रितीची लग्नेही पाहण्यात आली आहेत तर काही लग्नांचा अनुभव तर अचाट आहे. त्यातलेच काही अनुभव इथे शेअर करतोय...

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अशाच एका खास मित्राच्या लग्नाला पारनेरला गेलेलो.
लग्न दुपारी दोनला असल्यामुळे, मी मुंबईहून पहाटेच लवकर निघालो आणि बरोबर 11 वाजता तिथे पोहचलो.
नाश्तापाणी वैगेरे उरकून बरोबर एक वाजता मी तयार होऊन बाहेर पडलो.बाहेर मोठ्या पटांगणांत भव्य मंडप घातलेला, समोरच्या स्टेजवर राजा-राणी खुर्च्या पाठीमागे बदामाच्या आकारात लिहलेली नवरा-नवरीची नावे, उजव्या कोपर्यात रूखवत आणि त्याचबाजूला,फ्रिज टि.व्ही, गॅसशेगडी,कपाट,हंडा-कळशी,टाकी वैगेरे वैगेरे आहेराचं सामान व्यवस्थित मांडून ठेवलेलं.पाहुण्यांना बसायला चक्क भारतीय बैठकीची व्यवस्था केलेली, इतकं मोठं लग्न असून खुर्च्या का ठेवल्या नसतील ह्या प्रश्नाचं उत्तर मला तरी सापडलं नाही.मी गुपचुप एका कोपर्यात उभा राहून निरीक्षण करत होतो.लोक हळूहळू येत होती आणि जागा पकडून बसत होती,सुमारे पावणेदोनच्या सुमारास तिथला कुणीतरी नेता आला आणि तो आला म्हणून फटाकांच्या माळी वैगेरे स्वागतपर फोडण्यात आल्या मग माईकवर सो काॅल्ड कार्यवाहक असणार्या एका पोर्याने साहेब आल्यावर अदबीने स्वागत करून साहेबांच्या हाती माईक दिला मग साहेबांनी लग्न लागायच्या आधीच वधुवरांना शुभेच्छा दिल्या व संसाराविषयीचे चार सल्ले देऊन साहेब भाषणाला उभे राहीले, तंटामुक्ती गावापासून ते अगदी सुलभ शौचालयावर तब्बल अर्धा तास भाषण देऊन साहेब निघून गेले,मग काही छोट्या मोठ्या सदस्यांची व महत्वाच्या माणंसांची स्वागतपर शाल-फेटा देऊन आदर सत्कार करण्यात आला मग त्यांची छोटेखानी भाषणे व आभारप्रदर्शने वैगेरे वैगेरे झाली.मला नेमकं कळेचना लग्नाला आलोय की कुठल्या जाहीर सभेला? म्हणून दोनदा तिनदा इतर लोकांना विचारलं तर लग्न इथेच आहे अशी त्यांनी गळ्यावर बोट ठेऊन माहीती दिली. साडेचारला एकदाचे वधु वर आले आणि जवळपास तासभराने लग्नाचा कार्यक्रम आटपला..लग्न लागताना काही लोक चक्क जेवणाचं ताट घेऊन अक्षता टाकत होते. माईक कुठल्यातरी सुजाण नातेवाईकांने हातात घेतला व "ज्या कुणालाबी आहेर द्यायचा व फोटो काढून घ्यायचा असेल तर त्यांनी लाईनत उभै राहावे" अशी घोषणा केली.. घोषणा झाल्या झाल्या स्टेजच्या कडेला लेफ्ट राईट ही भलीमोठी रांग लागलेली.कुणाच्या हातात पाकीटं,कुणाच्या हातात हंडा कळशी आणि त्यात कहर म्हणजे प्रेझंट केलली पाकीट लगेच तिथल्या तिथे फोडल्या जाऊन "अमक्याकडून अमक्या रकमेचा आहेर" अशी माईकवर जाहीर माहीती पुरवली जात होती.अरे काय हे?? लग्नात मानपान होताना पाहीलेत पण कमी आहेर देणार्यांचा जाहीर अपमान होताना पहिंल्यादाच पाहीलं होतं.

_________________________________________________

गेल्याचवर्षी कोल्हापूरजवळ अजुन एका मित्राचं लग्न होतं..खरंतर हा जो माझा मित्र आहे ना तो एक नंबरचा भामटा आहे पण मित्र आहे म्हटल्यालावर चलता है..तर आमच्या ह्या भामट्या मित्राने शक्कल लढवून पुण्याहून मुंबई,नगर,पुण्यातल्या लोकां-नातेवाईकांसाठी कोल्हापूरला जाण्यासाठी दिडच बसेस ठेवलेल्या..दिड ह्यासाठी म्हणालो कारण दोन बसेसपैकी अर्धीबस तर ह्याच्याच कुंटुंबाने भरलेली त्यात ह्यांचे सामान वैगेरे पण होतं.
असो कोल्हापूरपासून सुमारे 15 किमी अंतरावर आम्ही एका गावाच्या वेशीवर पोहचलो मस्त सुंदर कमानीवर "भामटे" नाव लिहलेलं..गावाचं नावच वाचूनच माझ्या मित्राला भामटेपणा वारसाहक्काने कुठुन मिळालायं हे लक्षात आलं.आता गावातील लोकच भामटे आहे की, फक्त माझा मित्रच अपवाद आहे की,मित्र भामटा असणं आणि त्याच्या गावाचं नाव भामटे असणे हा योगायोग आहे की आणखी काय ते काही माहीत नाही.

असो लग्न तर व्यवस्थित,पार पाडलं म्हणजे पारनेरला झालं तसं इथे कुणी दिलेला आहेर जगजाहिर करणारं नव्हतं...कसलाबी दंगा न्हाई येकदम शिस्तीत.. (शिस्तीत म्हणजे सावकाश- गडबड न करता/होता).भुक खुप लागलेली त्यात कोल्हापूर म्हटल्यावर काहीतरी चमचमीत तिखट खायला मिळेल अशी अपेक्षा असल्यामुळे आडवा तिडवा हात मारण्याचा माझा मनसुबा होता.
एक्साईटेड होऊन मी रांगेत उभा राहीलेला..एका कोपर्यात टेबलावर ताट वाटी चमचे वैगेरे मांडलेले. जवळ गेलो तर पाहतो तर काय ताट वाटी चमचे तसेच धुवुन न विसळता ठेवलेले...मी तिथल्याच एका कॅटरेर बाईला पुसुन द्या म्हणून सांगितल तर तिने असं काही माझ्याकडे पाहीलं जणू काही तिला मी भलतचं काही पुसायला सांगितलय..मी गुपचूप परत पाठीमागे जाऊन रांगेत उभा राहिलो..मी पाहतोय काही बाया पैठणीच्या पदराने ताट-वाटी नीट पुसुन स्वतःला वाढून घेतायेत..काही गावातल्या बायकांनी चक्क ताट वाटी पुसण्यासाठी स्पेशल फडकं,रूमाल आणली होती...माझ्याकडचा रूमाल घाम पुसून पुरता मळलेला त्याच रूमालाने पुसुन त्याच ताटात जेवण्याची हिंमत माझ्याच्याने झालीच नसती.मी ताट हातात घेऊन हातपंख्याने वारा द्यावा तसा फिरवू लागलो,माझ्या पाठीमागे उभा असलेल्या आजीबाई हा प्रकार पाहत होत्या बहुतेक त्यांना माझी अडचण कळली होती त्यांनी माझ्याकडून ताट मागितलं..आपल्या नऊवारीच्या गर्द हिरव्या पदराने ते ताट पुसु लागल्या,पुसुन झाल्यावर मी ताट घ्यायला हात पुढे केला तर "मी माझं वाढून घेते,बरं झालं पोरा तु थोडं सुकवून ताट दिलं,मला नीट दिसत नाय ..सुखी राहा"

इतकं म्हणून त्या पुढे गेल्यासुद्धा..मी अवाक होऊन फक्त पाहतच राहीलो..धन्य हे लग्न आणि धन्य त्या आजी..
-----------------------------------------------------------------------------

मागे एकदा माझा खास मित्र "अश्विन" हयाच्या गावी कोकणात गेलेलो.तर आठ दिवसाच्या मुक्कामात अश्विनच्या गावातला मित्र "बाबू" ह्याची नि माझी छान गट्टी जमलेली तर ह्या बाबूच्या बहिणीच लग्न पोलादपूरजवळच्या एका गावात होतं...अख्खी वाडी लग्नाला जाणार होती मग आम्ही गावात एकटं राहून काय करणार म्हणून आम्हीपण जायचा निर्णय घेतला..लग्न मुलाकडे असल्यामुळे नवरीसकट आम्ही निघालो...संध्याकाळी पाच चा मुहुर्त आणि परत हळदही त्यादिवशीच लागणार होती म्हणून सकाळी लवकरच पोहचायचं होतं..साडेनऊच्या दरम्यान आम्ही पोहचलो..नवरीकडच्या पाहुण्यांची सोय त्यांच्याच कुठल्यातरी नातेवाईकांकडे(वरच्या वाडीत) केलेली आणि लग्न नवरदेवाच्या घराच्या (खालची वाडी) अंगणात होतं..आल्या आल्या नाश्ता पाणी झाल्यानंतर..नवर्याकडचे लोक आले हळदीचा कार्यक्रम आटपून परत गेले...नवरी ओल्या हळदीवर तशीच बसून आहे...बाकीचे लोक टाईमपास करतायेत..मुंबईहून आलेली लोक रानात जाऊन करवंद आणि आंबे गोळा करतायेत..कसलीच धामधूम नाही एकदम शांत..खालच्या वाडीत (नवरदेवाच्या) घराकडे थोडी धामधूम दिसतेय..भोंग्यावर खालच्या नि वरच्या वाडीत ऐकू जाईल इतक्या मोठ्यांने लग्नाची गाणी लावलीत..शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्हीप्रकारच्या जेवणाची सोय होती..तत्पूर्वी त्यांच्या रिवाजाप्रमाणे वाडीतल्या देवाला मेंढा कापायचा असतो आणि ह्याच कापलेल्या मेंढ्याचं मटण जेवायला होतं.. साडेबारा दरम्यान शाकाहारी जेवणं वरच्या वाडीत आलं...मी शाकाहारी असल्यामुळे अश्विनला माझ्याबरोबर दोन घास खाऊन घे असं सुचवलं पण पठ्ठयाला भरपेट मटण खायचं होतं म्हणून त्याने नकार दिला.. मी मस्त भरपेट जेऊन घेतलं आणि ओसरीवर ताणून देणार इतक्यात मांसाहारी जेवणाची सोय खालच्या वाडीत केली आहे आणि सगळ्यांना तिथे बोलवलं आहे..असा निरोप घेऊन कुणीतरी आलं..भरउन्हांत आणि ते ही कोकणात, सकाळच्या फक्त अर्ध्या प्लेटवर पोह्यांवर असणार्या आणि आता मनसोक्त हवं तितकं मटण खायला मिळणार ह्या आशेवर असणार्या पोरांच्या पोटात कावळे ओरडून पोटातून बाहेर पडू पाहत होते आणि अशावेळी निरोप आल्यावर घाई न केली तर नवलचं..सगळेच आम्ही खालच्या वाडीत गेलो..पाहतो तर काय मेंढा अजुन कापलाच नव्हता..कसलीतरी पुजा चालू होती..मग अर्ध्या तासाने तो कापला मग साफ तुकडे वैगेरे करायला पाऊण तास आणि शिजेपर्यंत तब्बल दोन अडीच तास खर्ची गेले...
तोपर्यंत पोर आणि तमाम मांसाहारी लोक खोळबंलेली..एकदाचं मटण शिजलं..नवरीकडच्या पाहुणेमंडळीच्याआधीच वाडीतली माणसं जेवायला बसली इतकचं नाही तर काही बाया जेऊन झाल्यावर सोबत आणलेल्या भांड्यातून मटण घरी घेऊन जात होत्या..
दोन तीन पंगती उठल्यानंतर ह्यांचा नंबर लागला..सगळे जेवायला बसले..परातभर भात घेऊन त्याच परातीत उघडा हात घालून त्याच हाताने थोडा थोडा भात घेऊन एक बाप्या वाढत होता..आणि त्यानंतर मटणाचा रस्सा वाढायला एक बाप्या...सुख्या मटणाचे मोजून फक्त दोन हाडूक प्रत्येकाच्या ताटात उघड्याच हाताने टाकणारा एक बाप्या आणि ते ही फक्त एकदाचं..नंतर फक्त रस्सा नि भात..मी अश्विनच्या तोंडाकडे पाहीलं..अगदी दीनवाणं वासरू झालं माझं बाळं..आणि त्याचवेळी का कोण जाणे माझ्या मनात "कोकणची माणसं, साधी भोळी" हे गाणं वाजू लागलं..

_______________________________________________________________

टीप: मी महाराष्ट्रातल्या तमाम भागांचा,जिल्ह्यांचा तिथल्या चालीरिती,परंपराचा आदर करतो..कुठल्याही भागातल्या लोकांचा, तिथल्या संस्कृतीचा,रूढींचा अनादर किंवा अपमान करण्याचा कोणताच हेतू लिखाणामागे नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.
हा लेख केवळ लेख म्हणून वाचावा ही नम्र विनंती..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि आहेर जाहीर करायची पद्धत पहिली आहे , आमच्या कोलेज जवळ एक कार्यालय कम lawn होते , तिकडे अशीच मोठी मोठी लागणे लागत , आणि आजुबाजूच्या ८ १० बिल्डींग्स ना कोणी काय आहेर केला ते कळात असे

ही पध्दत बहुतेक नगर पुण्यातल्या काही खेड्यात असावी...असा कयास आहे....रच्याकने तुमचं काॅलेज पुण्या-नगरात आहे का??

प्रेझंट केलली पाकीट लगेच तिथल्या तिथे फोडल्या जाऊन "अमक्याकडून अमक्या रकमेचा आहेर" अशी माईकवर जाहीर माहीती पुरवली जात होती. >> सांगलीला आजोळी ही पध्दत सर्सास पाहिली आहे. त्यात अपमान वगैरे काही नसतो. तसे आहेर करणार्‍याला ही वाटत नाही व बाकीच्या वर्‍हाडाला ही वाटत नाही. Happy

मी आताच्या लग्नात जेवत नाही .
कारण आपण स्वतःच जेवण घेणे आपल्या विचारात बसत नाही . कोण्ही तरी जेवण आग्रह करून वाढलं पाहिजे असे माझे मत आहे

<<कोण्ही तरी जेवण आग्रह करून वाढलं पाहिजे असे माझे मत आहे>>
हे फक्त लग्नातच का एरवीहि?
आमच्याकडे लग्नाचे जेवण सुद्धा बरेचदा बफे असते. कधी कधी टेबलावर सर्व पदार्थ मधे आणून ठेवले असतात, ज्याला जे हवे ते त्याने हवे तितके घ्यावे. तर पुष्कळदा दोन तीन पदार्थांपैकी काय खाणार हे निमंत्रणपत्रिकेतच विचारले असते जे महिनाभर आधी सांगावे लागते, नि तेच मिळते! जेवणात निरनिराळे आग्रह हा प्रकार फक्त भारतातून आलेल्या ज्येष्ठ नातेवाईकांना असतो.
त्यामुळे एक दोनदा भारतातून आलेले काही लोक समोर भरपूर अन्न पडले असता उपाशी बसले होते! मग कुणितरी एक ताट भरून आणून त्यांच्यासमोर ठेवले नि त्यांनी ते जगावर उपकार केल्यासारखे करत उष्टावले.
एकूण जेवणापेक्षा भेटीगाठी, नाच, गाणी, मित्रांची (विनोदी?) भाषणे हेच.

बाकी लग्नात गोंधळ, उशीर हे भारतातल्यासारखेच. एका लग्नात कार्यक्रम अगदी ठरलेला होता. एक तास लग्न मग अमुक वाजता जेवण, मग नाच गाणी नि रात्री बाराला हॉल परत करायचा. पण लग्नच ते, उशीर होत गेला, मग घाबरून जाऊन यजमानांनी भटजींना विचारले, एका तासा ऐवजी ४५ मिनिटात आटपणार का? मग जरा वेळाने अर्ध्या तासात आटोपाल का? असे विचारले. शेवटी भटजींनी वैतागून सांगितले तुम्ही असे करा - बाकीचे कार्यक्रम करा. नवरा बायको हनिमून करून परत आल्यावर मी घरी येऊन पाच मिनिटात लग्न आटोपतो.

छान मजेशीर किस्से आहेत.
माझीही खूप ईच्छा आहे ते जाहीर आहेर वाले लग्न बघायचे. पण मुंबईत असे पाहण्यात येत नाही. आणि लग्नासाठी दूरगावी जाणे मला पचत नाही. मुळात मला लग्नच जमत नाही. पण तरीही आजवर बरीच लग्ने केली आहेत ते निव्वळ आईच्या प्रेमळ धमकीमुळे.. बाळ ऋन्मेष, तू लोकांच्या लग्नाला नाही गेलास तर तुझ्या लग्नाला कोण येणार. आणि मग वयात आल्यावर त्या धमकीचे रुपांतर लालूचमध्ये झाले.. बघ एखादी पसंत पडली तर सांग .. तू नुसते बोट दाखव.. ... नॉस्टॅल्जिक केले या लेखाने.. जमल्यास सविस्तर लिहीन..

१५ वर्षापूर्वी आम्ही अमरावतीला एका लग्नाला गेलो होतो तेथेही आहेर माईकवर सांगायची पद्धत होती. माझ्या बाबांनी नवरीमुलीला हंडा आहेर दिला तेव्हा माईकवाले 'बाळाराम पाटील गुंडा' असे ओरडू लागले. आम्ही सगळे शाॕक.. नंतर समजले की त्यांच्याकडे हंड्याला गुंडा म्हणतात Lol

काहि ठिकाणी पाकिट वैगरे कारभार नसतोच , वर्हाडी मन्डळीतलाच एकजण रितसर टेबल-खुर्ची मान्डुन बसलेला असतो समोर वहित तो आहेर लिहुन घेतो आणि शेजारी उभा असलेला नाव आणि रक्कम जाहिर करत असतो.
बर्‍याच ठिकाणी भान्डयाचा आहेर आणु नये अस पत्रिकेत व्यवस्थित छापलेल असत ( छुपा अर्थ असा की पैसेच द्या!)
अमेरिकेत आमच्या देसि नेबरने त्याच्या मुलाचे रिसेप्शन केले त्यात इव्हाईट मधेच ऑनलाइन गिफ्ट अमाउन्ट द्यायची लिन्क होती.

अमेरिकेत रजिस्ट्री प्रकार असतो. नवरा नवरीला एक्झॅक्ट्ली काय पाहिजे, कुठे मिळते, केव्हढ्याला हे सगळे लिहीले असते. त्यातलेच एक परवडेल ते द्यायचे. तरी नको असलेल्या गोष्टी आल्या तर त्या टाकून देताना किंवा दुसर्‍या कुणालातरी देऊन टाकताना, नवरा बायकोस संकोच वाटत नाही. उलट हे काय असे वाटते! विकत आणल्याची गिफ्ट रिसिटहि जपून ठेवली असते किंवा अहेरासोबतच जोडली असते, म्हणजे वाटले तर त्यांनी बदलून घ्यावी वा परत करावी!

तसेच लग्नाला जेवायला किती लोक येणार नि काय खाणार हे आधीपासून सांगून ठेवावे लागते. म्हणजे दीडशेचा आकडा असेल तर जास्तीचे आयत्या वेळी फार तर फार चार पाच. त्याहून जास्त आले, तर ज्यांच्याबरोबर आले त्यांच्याबद्दल इतर बायका दोन तीन वर्षे कुत्सित बोलत बसतात!
उषावहिनींचा सल्ला या सारख्या ठिकाणी हमखास तक्रार असते मला लग्नाला बोलावले नाही - हे योग्य आहे का? आम्ही अहेर केला नाही तर चालेल का?

सगळा नुसता धंदा! प्रेम, भावना वगैरे काही नाही!

मुलाचे रिसेप्शन केले त्यात इव्हाईट मधेच ऑनलाइन गिफ्ट अमाउन्ट द्यायची लिन्क होती.>>>> आमच्या डायरेक्टरला एका लग्नाचे आमंत्रण आले आहे यु के ला. त्या इन्विटेशन मधे गिफ्ट देण्यासाठी लिंक आहे. आणि आम्ही लहान मुलांना जेवण देणार नाही आहोत असंही लिहिलंय Lol
आम्ही वाचुन शॉक झालो. Happy

माझं बालपण खेड्यात गेले .तेव्हा लग्न म्हणजे एक मोठा सोहळा च असायचा .
मुलीच लग्न असेल तर चुलीला सरपणासाठी जळण जमा करण्यापासून सर्व काम सर्वजण मिळून करत म्हणजे मित्र मंडळी आणि घरातील सर्व चुलते वैगेरे,शेजारी हे सर्व स्वतः सहभागी असतं .
झाडाची फांदी तोडणे त्याच्या dhaplya पाडणे ते वाळव ने
इत्याती
तेव्हा जेवणात भात,आमटी,आणि शिरा हे पदार्थ असायचे मग सर्व बायका मिळून तांदूळ निवडून ठेवत .
लग्नाची वेळ ही 5 आणि 6, च्या मध्ये असायची जेवण ही लग्न लागल्या नंतर खुल्या मैदानात असतं पत्रावळी वर .वाढणारे सुधा मित्र मंडळी ,शेजारी हेच असत सर्व जन मिळून काम करत असत अगदी मनापासून .
मेल्याल्या माणसा च्या मैतीला आणि लग्नाला क्षत्रू असेल तरी जायचच असे विचार करणारी त्या वेळची लोक होती.
आता formality म्हणून लोक हजेरी लावतात जिव्हाळा कमी झालाय आणि दिखावटपणा वाढलाय

लेख आणि प्रतिसाद मजेशीर आहेत Lol

हंड्याला गुंडा म्हणतात हे भारी Rofl

> पाकीट लगेच तिथल्या तिथे फोडल्या जाऊन "अमक्याकडून अमक्या रकमेचा आहेर" अशी माईकवर जाहीर माहीती पुरवली जात होती. > ही पद्धत सोलापूरला आमच्या मुस्लिम घरमालकिणीच्या नातूच बारसं होतं तेव्हा पाहिली आहे. कोणालाच अपमान वाटत नव्हता त्यात.
पूर्वी पाकीटात घालून कॅश देत होते ते बरं होतं. आता उगाच १५ घड्याळ आणि २५ गणपती जमा होतात Sad

सांगलीला आजोळी ही पध्दत सर्सास पाहिली आहे. त्यात अपमान वगैरे काही नसतो. तसे आहेर करणार्‍याला ही वाटत नाही व बाकीच्या वर्‍हाडाला ही वाटत नाही. >> अगदी अगदी.. प्रत्येकाच्या मर्जीनुसार आहेर असतो. माईकवर नाव पुकारलं अमुक-तमुक पावणा लग्नात आला हे सर्वांना समजतं आणि लगेच काढता पाय घेता येतो हा साधा-सरळ हिशेब असतो. हे मान-अपमान पुणे-मुंबईत पहायला मिळतात.. अगदी लग्नघरातील नसलेली माणसे मुद्दाम आहेर घेणार्‍या व्यक्तीच्या आजु-बाजुला रेंगाळुन कोण काय गिफ्ट देतंय हे बघत बसतात आणि गिफ्टच्या खोक्याच्या आकारावरुन देखील इज्जत काढत बसतात. Uhoh

>>>>आहेर लग्नमंडपातच माईकवर जाहीर करणं हे काहीही आहे. Lol
लग्नांचे किस्से भारी आहेत.
पोलादपुर जवळ कुठल्या गावी गेलेलात?>>>>>>>>>

नाणेघोळ पोस्ट पितळवाडी..

>>>१५ वर्षापूर्वी आम्ही अमरावतीला एका लग्नाला गेलो होतो तेथेही आहेर माईकवर सांगायची पद्धत होती. माझ्या बाबांनी नवरीमुलीला हंडा आहेर दिला तेव्हा माईकवाले 'बाळाराम पाटील गुंडा' असे ओरडू लागले. आम्ही सगळे शाॕक.. नंतर समजले की त्यांच्याकडे हंड्याला गुंडा म्हणतात>>>

हे भारीय .....

पितळवाडी>>> ओके.
पितळवाडीच्या वर हळदुले आणि केवनाळ्यात आमचे नातेवाईक आहेत.