पुढचं पाऊल

Submitted by onlynit26 on 30 May, 2019 - 00:45

पुढचं पाऊल

ती जेव्हा दुधाचा ग्लास घेऊन आत आली तेव्हा तो खुर्चीवर डोळे मिटून होता.
तिच्या बांगड्यांच्या आवाजाने तो जागा झाला.
" आज श्रीरंगराव पैसे घेऊन येणार होते."
" हो, पण बाबांना नाही जमले, त्यांचा मघाशीच फोन आलेला."
" जमले नाही म्हणजे? त्यांनी तसं कबूल केलंय." असं बोलून त्याने मोबाईल हातात घेतला.
" अहो, प्लीज बाबांना फोन नका करू." असे बोलेपर्यंत त्याचे बोलणे सुरू झाले. सासऱ्यांच्या वयाचा मान न राखता तो फोनवर रागारागाने बोलत होता.
बोलणे आटोपल्यावर तिने आणलेला दुधाचा ग्लास उडवत तो खोलीबाहेर निघून गेला. ती मात्र शरीराचं मुटकुळं करून तशीच पलंगावर बसून राहिली. खरंतर तिलाच स्वत:ची लाज वाटत होती. एका बापाने मुलीच्या सुखासाठी हुंडा द्यायचे कबूल करायला नको होते.

काही दिवसांनी तिला भेटायला आलेल्या मैत्रिणी लवबाईट्स वरून चिडवत होत्या. ती मात्र देहावरील घाव आणि मनातील भाव लपवत राहिली. लग्नानंतरचा सहवास दूरच केवळ सासरच्या माणसांचा वनवास तेवढा ती भोगत होती. वरकरणी खुश असल्याचे भासवत असलेली ती, तिची खास मैत्रीण नलूच्या नजरेतून मात्र सुटली नव्हती.

मैत्रिणी गेल्यावर तिला खूप एकटं वाटू लागले. कबूल केलेला हुंडा न दिल्यामुळे ती आई वडीलांकडे जाऊ शकत नव्हती की त्यांना एक फोनही करता येत नव्हता. हुंडा दिल्याशिवाय सासू सासऱ्यांना मुलीच्या घरी यायला जावयाने मज्जाव केला होता.

काही दिवसांनी एक घटना घडली, अचानक तिच्या सासऱ्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला. पैसे नसल्यामुळे त्यांच्यावर चांगले उपचार होत नव्हते. त्यात नवऱ्याचा तुटपुंजा पगार. तो परत तिच्या मागे हुंड्याच्या पैशाचा तगादा लावू लागला. सासूरवाडीला निरोप पाठवला. तिला माहीत होते, बाबांनी लहान तोंडी घेतलेला घास त्यांना झेपणारा नाहीये.

सासऱ्यांच्या पायाला तेल लावून ती हॉलमध्ये बसली असताना बाहेरून नलू येताना दिसली. तिला खूप बरे वाटले. भर उन्हात चेहऱ्यावर पाण्याचा शिडकावा बसावा तसे वाटून गेले. नलूला पाणी देत इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. नलू तिच्या माहेरकडची असल्यामुळे नवऱ्याचे कान त्या दोघींच्या बोलण्याकडेच होते. नलूला ते अपेक्षित होते. जाताना तिने माधवीच्या हातात एक चिटोरे कोंबले आणि निघून गेली. ते चिटोरे माधवीच्या मनाला पालवी देण्याला कारणीभूत ठरले. त्यात शेजारच्या घरातील वायफायचा पासवर्ड होता आणि शेजाऱ्यांशी त्याबाबत नलूने बोलणेही केले होते. माधवी आता नलूशी संपर्क साधू शकत होती. दुसऱ्या दिवशी तिने व्हाट्सएप डाऊनलोड केले आणि तब्बल दोन महिन्यांनी ती आपल्या आई वडिलांशी बोलली. व्हिडीओ कॉलने त्यांना पाहू शकली. हे सारं नलूमुळे घडत होते. अडचण संपली नसली तरी माधवी आणि तिचे आई वडील एकमेकांना पाहू शकत होते. आईने माधवीला खूप समजावले, धीर दिला. माधवीच्या डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते. बराच वेळ चाललेले संभाषण दरवाजा ठोठावण्याने थांबले. माधवीने लगेच व्हाट्सएप अनइंस्टॉल केले आणि वायफाय बंद केले. दरवाजात नवरा उभा होता. तो लगेच तिचा मोबाईल शोधू लागला.
" तुझा मोबाईल कुठेय? कोणाशी बोलत होती? " त्याच्या थेट प्रश्नाने ती मनातून घाबरली. पण तसं चेहऱ्यावर न दाखवता ती म्हणाली.
" कोणाशी बोलू?"
" उद्या बाबांसोबत तुला शेजारच्या गावात जायचे आहे. तिथे एक वैद्य आहेत , त्यांच्याकडे बाबांच्या पक्षाघातावर इलाज करायचा आहे. त्यामुळे ते बरे होईपर्यंत तुला तिथेच थांबावे लागेल."
" अहो पण, मी त्यांच्या सोबत एकटी कशी राहू?"
" तुझ्या बापाने हुंडा दिला असता तर ही वेळ आलीच नसती." असे बोलून त्याने जोराने दार आपटत निघून गेला.

नवऱ्याने सोडलेल्या नवीन फर्मानामुळे माधवीवर आभाळच कोसळले. आताच कुठे आई वडिलांशी हितगूज चालू झाले होते. मनाला एक प्रकारची उभारी मिळाली होती. ती ज्या गावी जाणार होती. तिथे एक त्यांच्या मालकीचे छोटंसं शेतघर होते आणि काही शेतजमीन. तिथून जवळच पक्षाघातावर प्रभावी इलाज करणारा शंक्या वैद्य राहत होता. एवढी माहिती तिला शेजाऱ्यांकडून मिळाली. त्याच रात्री तिने नलूला इन्स्टाग्राम मेसेजेसवरून सर्व सांगितले. हे नलूचे प्लान बी होते. माधवीच्या नवीन छळाबद्दल ऐकून नलूलाही वाईट वाटले.

त्याचदिवशी दुपारी माधवी, श्रीपतराव आणि श्रीकांत शेजारच्या गावात जायला निघाले. माधवीला त्यांच्या शेतातल्या घरात सोडून ते दोघे वैद्याकडे गेले.
मागची पडवी, जेवणाची खोली आणि मधला भाग असे बऱ्यापैकी घर होते. तिने घराची साफसफाई करायाला सुरुवात केली. बाजूलाच असलेल्या छोटखाणी विहिरीतून पाणी आणले. तासाभरात तिचे बरेचसे काम उरकले.
थोड्याच वेळात सासरे आणि नवरा घरी आले. मागाहून एक पोरगा घरातील सामान घेऊन आला. माधवीला भराभर सूचना देत श्रीकांत निघून गेला. उरले फक्त माधवी आणि सासरे. अंधार पडला तसा तिच्या मनात एक भीती दाटली. सासऱ्यांना औषध देऊन माधवी स्वयंपाकाला लागली. काहीवेळाने मागच्या दारी दबक्या पावलांनी येणारी नलूही दिसली. तिचा भाऊ तिला माधवीच्या सोबतीला सोडून गेला होता. माधवीला ते खरंच वाटत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी सासरे उठायच्या अगोदर नलू निघूनही गेली. पण हे सगळे सासऱ्यांपासून लपले नाही. तिसऱ्या रात्री त्यांनी नलूला तिथे पाहिले. ते काहीच बोलले नाही. माधवीकडे एकवार पाहत अंथरुणावर जाऊन पडले. त्या दिवसापासून नलू रोज येऊ लागली. माधवी सासऱ्यांची मनापासून करत असलेली सेवा आणि शंक्या वैद्यांच्या औषधाची मात्रा लगेच लागू पडली. श्रीपतरावांची प्रकृती झपाट्याने सुधारली. माधवीला सासऱ्यांचा धीर मिळू लागला.
दोन महिने झाले तरी श्रीकांत फिरकला नव्हता. घरातील सामान आणि जवळचे पैसेही संपत आले होते.
" बाबा, पंधरा दिवस झाले , हे इकडे फिरकले नाहीत." श्रीपतरावांच्या हातावर रात्रीच्या वेळेच्या गोळ्या देत माधवी म्हणाली.
" तो आता नाही येणार".
" म्हणजे ?"
" पोरी, आपले गावातील घर जप्त झालंय. श्रीकांत मुंबईला गेलाय."
" काय ? "
" हो पोरी, माझ्या दोन पोरींच्या लग्नासाठी बँकेजवळ आपले घर गहाण ठेवून कर्ज घेतले आणि दोन्ही पोरींना बक्कळ हुंडा देत उजवले. त्यावेळी आम्हाला वाटले श्रीकांतच्या लग्नात हुंडा घेऊन कर्ज फेडता येईल. तुझ्या बाबांचे सरकारी नोकरीत असलेला हूद्दा आणि खातं पाहून आम्हाला भरपूर हुंडा मिळेल हा अंदाज लग्नानंतर फोल ठरला. "
" बाबा, आमचे बाबा एक प्रामाणिक अधिकारी होते. त्यामुळे पगारा व्यतिरिक्त एकही पैसा कधी घरात आला नाही. रिटायर्ड झाल्यावर मिळलेली बरीचशी रक्कम आईच्या आजारपणात संपली. खरंतर माझी या लग्नाला पसंती नव्हती पण बाबांना हे स्थळ घालवायचे नव्हते म्हणून ते हुंडा कबूल करून बसले. मी शपथ घातलीय म्हणून नाहीतर त्यांनी राहते घर विकायला काढले होते."
" नको पोरी, आपले घर गमावण्याचे दुखः मी भोगतोय. ते तुझ्या आई बाबांच्या नशिबी नको."
" बाबा हे मुंबईला का गेलेत?"
" नोकरी."
" बाबा, कधी कधी वाटते ,मी आपल्या घरात कोण आहे? तुम्ही बेटी बोलता म्हणून तरी बरं. नाहीतर मी विचार करून मेले असते."
" भरल्या घरात मरणाच्या वार्ता नको पोरी, श्रीकांतने तुला मुंबईला जाताना सांगायला हवं होते. तसं मी त्याला म्हणालो देखील. पण त्याचा तुझा आणि तुझ्या बाबांवरचा राग तसाच आहे. खरंतर त्याला मुंबईत नोकरी करणे आवडत नाही पण या सगळ्याला कारणीभूत तुम्हाला समजतो. तसा तो वाईट नाहीये गं. "
" बाबा कारणीभूत हुंडा पद्धत आहे. त्याने कित्येक संसारांची वाट लावलीय."
" खरं आहे पोरी, पण पुढाकार कोण घेणार? झोपं आता रात्र खूप झालींय".

श्रीपतराव माधवीला असे म्हणाले खरे पण तिला झोप काही येत नव्हती. तिच्या मनात चालेलेले विचार फिरून येणाऱ्या पाखरासारखे पुन्हा पुन्हा येत होते. रात्री खूप उशीरा तिचा डोळा लागला. पहाटे तिला एक स्वप्न पडले. खरंतर ते छान होतं. ती सकाळी उशीरापर्यंत तशीच झोपून राहीली. स्वयंपाक घरातील भांड्याच्या आवाजाने तिने जाग आली. ती लगबगीने उठली. सासरे चहाचे भांडे चुलीवर ठेवत होते.
" बाबा राहूद्या, मी करते. " असे बोलून ती कामाला लागली.
" अगं तुला गाढ झोपलेले पाहून उठवले नाही. मी समजू शकतो. रात्री झोप झाली नसेल."
" बाबा, मला पहाटे एक स्वप्न पडले की आपली ही जमीन फुलझाडांनी भरून गेलीय आणि दूरवर आपला ट्रॅक्टर उभा दिसतोय."
" माधवी, तुमचे स्वप्न खरे होणार आहे. तूमच्या वावरात खरंच फुलं फुलणार आहेत. मला शेती करायची खूप इच्छा आहे. आपण या दीडएकरात भागीदारीमध्ये फुल शेती करू. मार्केटची चिंता नको. माझा चुलत मामा सर्व माल घेईल." नलू एका दमात म्हणाली.
" अगं पण?" माधवी श्रीपतरावांकडे पाहत म्हणाली.
त्यांचा चेहरा काळवंडून गेला होता. त्यांना नलूची गोष्ट फारशी रूचली नसावी.
" पण बिन काही नाही."
" हे सर्व श्रीकांतला नाही आवडणार."
" का? एवढी सोन्यासारखी जमीन असताना त्यांनी मुंबईला जाता नये होतं.. " माधवी म्हणाली.
" खरं आहे, पण त्याची आई याच शेतात सर्प दंशाने गेली. तेव्हापासून त्याने शेती करायला बंदी केलीय. " नलू आणि माधवी श्रीपतरावांकडे पाहत राहील्या. माधवीला खूप वाईट वाटले. पण आपल्या कुटुंबाला सावरायचे असेल तर काहीतरी करायलाच हवं होतं.
माधवीने श्रीपतरावांकडून कशीबशी परवानगी घेऊन फुलशेती करायला सुरूवात केली. भांडवल आणि शेतकी शिक्षण घेतलेल्या नलूचे निर्णय अचूक ठरले. फुलीशेतीसोबत घेतलेले आंतरपीक फायदा करून गेले. त्यात माधवीचे कष्ट आणि मेहनत ही होतीच .

श्रीकांत वर्ष होत आले तरी गावी आला नव्हता. तो ही आपले घर सोडवायच्या इराद्याने काम करत होता. एक दिवस बँक त्याच्या खात्यात अडीच लाख रूपये जमा झाल्यावर तो हडबडला. त्याने लगेच बँकेकडे धाव घेतली. तिथे त्याला कळले कि ते पैसे त्याच्याच बायकोने म्हणजे माधवीने जमा केले होते. त्याने ताबोडतोब आपल्या बाबांना फोन लावला. बाबांशी बोलून झाल्यावर त्याने पहिल्यांदाच माधवीकडे फोन द्यायला सांगितले त्याचा फोन घेताना ती मोहरली. कानावरून मोरपीस फिरावे तसा फोनचा स्पर्श वाटला. पहिल्यांदाच तिची श्रीकांत दखल घेत होता.
"माधवी पैसे तू जमा केलेस?" त्याच्या या वाक्याने ती निराश झाली. तिला वाटले तो तिला 'कशी आहेस? असं विचारेल.
" हो."
" कुठून आणलेस?"
ती गप्पच.
"अगं मी काय विचारतोय."
तरीही ती गप्पच.
" आमच्या सारखे तुझ्या बाबांनी घर तर गहाण ठेवले नाही ना, तसं असेल तर मला हुंडा नकोय."
" मी हा हुंडा दिला नाहीये आणि बाबांनीही तसं काही केलेले नाहीये. ज्या मातीत आईंचा प्राण गेला त्या मातीने आपले कर्ज फेडलंय."
" म्हणजे ?"
" हो श्रीकांत, आपल्या जमिनीत तुम्हाला न विचारता आम्ही शेती केली. मला माहीत आहे ,त्या जमिनीत तुमच्या कटू आठवणी होत्या. पण उत्पन्नाचा दुसरा मार्ग दिसत नव्हता."

आता तो गप्प झाला होता.
" मी उद्या गावाकडे येतो." तो म्हणाला. त्याच्या थंड प्रतिक्रियेचे तिला आश्चर्य वाटले.
" माधवी मी काहीतरी म्हणालोय."
" हं."
" तुझ्यासाठी काय आणू?
" खूप सारे प्रेम." तिचा कंठ दाटून आला होता.
" हो राणी." हे ऐकल्यावर माधवीच्या स्मितहास्यावर नकळत एक अश्रू ओघळला.
आता खऱ्या अर्थाने माधवीचे पुढचे पाऊल पडले होते.

समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults