माझी सैन्यगाथा (भाग २३)

Submitted by nimita on 21 May, 2019 - 04:31

११नोव्हेंबर १९९८...अजूनही लक्षात आहे मला ती तारीख ! त्याच दिवशी DSSC मधे फील्ड मार्शल मनेकशॉ यांचं भाषण होतं. विषय होता- 'Leadership and Discipline' ..

तसं पाहता त्या कोर्सच्या दरम्यान वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज येऊन कोर्स करणाऱ्या ऑफिसर्स ना संबोधित करायचे. पण अगदी मोजक्याच वेळी आम्हां लेडीज ना पण आमंत्रित केलं जायचं. कारण मोस्टली सगळी भाषणं ही त्यांच्या अभ्यासाशी निगडित असायची. पण luckily फील्ड मार्शल मनेकशॉ यांचं भाषण ऐकायला आम्हांला सुद्धा परवानगी होती.

त्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच माझी उगीचच धावपळ चालू होती. एक वेगळाच उत्साह जाणवत होता. मी फील्ड मार्शल मनेकशॉ यांच्याबद्दल बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं - मुख्य म्हणजे प्रत्येक वेळी त्यांची फक्त आणि फक्त तारीफ च कानावर आली होती. आणि म्हणूनच आता त्यांना प्रत्यक्ष बघायची आणि ऐकायची संधी मिळाल्यामुळे मला 'कधी एकदा auditorium मधे जाऊन पोचते' असं झालं होतं.

मी अगदी सुपरफास्ट स्पीडनी घरातली सगळी कामं हातावेगळी केली आणि कॉलेज auditorium च्या दिशेनी धाव घेतली. वेळेच्या अर्धा तास आधीच जाऊन पोचले मी तिथे. ठरलेल्या वेळी आम्हांला सगळ्यांना आत सोडण्यात आलं. सगळे ऑफिसर्स आणि आम्ही सगळ्या लेडीज स्थानापन्न झालो. सभागृह अगदी खचाखच भरलं होतं. पण इतके सगळे लोक असूनही कुठलाही गलका किंवा गोंधळ नव्हता. सगळं कसं अगदी शिस्तबद्ध पद्धतीनी चाललं होतं. प्रत्येक जण अगदी आतुरतेनी मुख्य अतिथींची वाट बघत होता. पुढच्या काही मिनिटांतच माईक वरून announcement झाली ....नकळत आमच्या सगळ्यांच्या नजरा मुख्य दाराच्या दिशेनी वळल्या आणि फील्ड मार्शल मनेकशॉ यांच्या सन्मानार्थ आम्ही सगळे उभे राहिलो. पुढच्या क्षणी स्टेज च्या दिशेनी झपाझप पावलं टाकत जाणारे फील्ड मार्शल दिसले. चेहेऱ्यावर मंदस्मित ठेवून ते दोन्ही बाजूला उभ्या असणाऱ्या सगळ्या लोकांच्या शुभेच्छा तितक्याच आदरानी स्वीकारत होते .वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षीही एखाद्या तरुणाला लाजवेल अशी चपळ चाल..पण त्यातही कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही ... सगळं कसं अगदी संयत ...त्यांना प्रत्यक्ष बघितल्यावर माझ्या मनात पहिला विचार आला तो म्हणजे.."He is a 'no nonsense' man.... A true officer and a thorough gentleman." माझी अवस्था तर अगदी 'अजी मी ब्रम्ह पाहिले' अशीच झाली होती.

त्यानंतर जवळजवळ एक दीड तास ते बोलत होते आणि आम्ही सगळे ऐकत होतो. सलग इतका वेळ एका जागी उभं राहून बोलणं आणि तेही त्या वयात !!! आणि समोरचा श्रोतृवर्ग ही तसाच खास...त्यांच्यासारखाच देशभक्तीनी प्रेरित असलेला.. समोर बसलेला प्रत्येक ऑफिसर discipline आणि leadership ही दोन मूल्यं कोळून प्यायलेला असताना पुन्हा त्याच विषयावर त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्याच मूल्यांची पुन्हा नव्यानी ओळख करून देणं....त्याला पाहिजे जातीचे - ते येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे !!!!

तशा काहीशा रटाळ वाटणाऱ्या या विषयाला देखील त्यांनी इतकं इंटरेस्टिंग बनवलं. त्यांच्या अथांग अनुभवसागरातून काही निवडक अनुभव त्यांनी इतक्या खुमासदार पणे सांगितले. भाषेवरची जबरदस्त पकड आणि अफलातून sense of humour यांच्या जोरावर त्यांनी आम्हां सगळ्यांना अक्षरशः आमच्या खुर्च्यांवर खिळवून ठेवलं होतं.

मी घरून निघताना बरोबर एक नोट पॅड आणि पेन ठेवलं होतं- त्यांच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे टिपून घ्यायला ....पण ऐनवेळी मी इतकी मंत्रमुग्ध झाले की लिहिणं वगैरे सगळं विसरून गेले. पण आत्ता जेव्हा तो अनुभव तुम्हां सगळ्यांबरोबर शेअर करायचं ठरवलं तेव्हा सहज गुगल वर शोधलं आणि चक्क चक्क मला त्या दिवशीचं त्यांचं ते संपूर्ण भाषण सापडलं . नुसतं भाषणच नाही तर त्यानंतर झालेली प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण ही मिळाली मला. ते सगळं जसंच्या तसं इथे पोस्ट करते आहे.

https://drive.google.com/file/d/1bmxNWbtodUbH0DyyurFlH862yma9ngcY/view?u...

तुम्हांला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जरूर हे भाषण वाचा. मला खात्री आहे माझ्यासारखंच तुमचंही आयुष्य समृद्ध होईल.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users