दाह शमवणारा अनुभव दे एखादा

Submitted by बेफ़िकीर on 21 May, 2019 - 01:34

दाह शमवणारा अनुभव दे एखादा
तहान नसलेला अवयव दे एखादा

सर्व जाणिवा भोगांनी बोथटलेल्या
जन्म कमालीचा बेचव दे एखादा

पोचणार हा अहं नदीमध्ये बुडवू
मधेच तुटलेला साकव दे एखादा

हिरवाईची मैफिल कधीच उरकेना
निष्पर्णांसाठी उत्सव दे एखादा

जगात अन् माझ्यात वैर हे केव्हाचे
मधून जाणारा विस्तव दे एखादा

मूर्तीपेक्षा त्याला वंदन करेन मी
तुला पाहिलेला मानव दे एखादा

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाह शमवणारा अनुभव दे एखादा
तहान नसलेला अवयव दे एखादा

मूर्तीपेक्षा त्याला वंदन करेन मी
तुला पाहिलेला मानव दे एखादा

वाह! सगळेच शेर भारी! मस्त.
काही ओळींमध्ये विरोधाभास.

बेफ़िकीर जी
दाह शमवणारा अनुभव दे एखादा
तहान नसलेला अवयव दे एखादा

सर्व जाणिवा भोगांनी बोथटलेल्या
जन्म कमालीचा बेचव दे एखादा
फारच सुंदर रचना...

एखादा ऐवजी... एकदा असते तर ग़ज़ल अजुन बेलेन्स्ड झाली असती काय... अर्थ आणि गेयतेच्या दृष्टी ने...