मॅरेज Mystique ! ( भाग १९ - अंतिम )

Submitted by र. दि. रा. on 20 May, 2019 - 11:55

भाग १८ चा धागा : https://www.maayboli.com/node/70006

भाग १९ :

महाशिवरात्रीला केदारने शंकराची पूजा केली काय तर त्याचे नशीब बदलून गेले.केदारचा एकट्याचा नव्हे तर सगळ्या कर्णिक कुटुंबाचा दिनक्रम बदलून गेला.

पूर्वी अण्णासाहेब आठ वाजताच घराबाहेर पडत.आता त्यांचा दुसरा चहा दहा वाजता होऊ लागला.रेवती वेळेची पक्की म्हणून नावाजलेली होती. आता तिला सेटवर जायला चारचार तास उशीर व्हायला लागला. सुनंदाबाईना पूजा अर्चेला दोन तीन तास लागत .आता त्यांनी दहा मिनिटात पूजा करण्याचे नवीन तंत्र शोधून काढले.कर्णिकांचे घर आनंदाने ओसंडून जाऊ लागले.असेच एका सकाळी सगळे चहा पीत बसले होते रेवतीला

मीनाक्षीचा फोन आला...

“अग तुला वेळ आहे का ?मला थोडे बोलायचे आहे”

“ए बाई फॉर्मालिटी नकोत ह ! काय ते स्पष्ट बोल”

“तू यांना दोन चार दिवसासाठी इकडे पाठवशील का?”

“पाठवेन की.काय विशेष ?”

“अग अश्विनची मुंज करावी म्हणते. मी मुहूर्त बघून कळवते”

“छान आहे की .मुलाची मुंज म्हटल्यावर वडील येणार ना “

सुनंदाबाईनी रेवतीकडून फोन मागून घेतला...

“अग मिनाक्षी अश्विनची मुंज आहे म्हणून केदारला बोलावतेस आणि आम्हाला नाही बोलावणार?”

“नाही आई ,घरच्या घरी करणार आहे?”

“असे का ?अश्विन आमचा नातू आहे.आम्ही दोधे त्याच्या मुंजीला येणारच .मुहूर्त ठरला की कळव मी शिवरामला पाठवते .तो सगळी तयारी करेल “
“बर आई,या. तुम्ही सगळे या .मी लागते तयारीला .“

असे सगळे गोड गोड चालले होते .
असाच एके दिवशी सकाळी केदार बाहेर निघाला होता .अण्णासाहेब म्हणाले...

“काय जावईबापू कुठे दौरा .?”

“औषधे संपलीत .डॉकना विचारून येतो,पुढे काय करायचे?”

“तुमचे औषध आता घरीच आहे .तुम्हाला कुठेही जायची जरुरी नाही.”

“कर्टसी कॉल म्हणून तरी जातो “

“हो. हो. अवश्य जा.”
------------------------------------------------------------------------

केदार डॉ.मुतालीकांच्या समोर बसला होता .डॉक्टर म्हणाले...

“आता कसे आहे ?”

”फारच छान.थोडे डोके दुखते पण बाकी काही त्रास नाही “.

“तुम्ही गेल्यावर सायंकाळी अण्णासाहेब आले होते.मी त्यांना समजून सांगितले .त्यानाही त्याची चूक मान्य आहे.आता काही फरक पडला का?”

“फरक म्हणजे चांगलाच फरक पडलाय.मला त्यांनी आता कुटुंबात सामावून घेतलाय.”

“बरे झाले .आणि रेवतीच्या वागण्यात काही फरक जाणवतो का?”

“ मी आणि रेवती पूर्णत: एकमेकाचे झालोय.”

“अरे वा माझ्या औषधात असाही गुण आहे हे मला माहितच नव्हते”

केदारने सवयीने नाक पुसले.डॉक्टरना काहीतरी संशय आला.ते म्हणाले...

“रुमाल बघू “

केदारने रुमाल डॉक्टरना दाखवला .रूमलाला पुसटसे रक्त लागले होते.डॉक्टर म्हणाले...

“हे काय?”

“अधून मधून नाकातून रक्त येते”

“चला .आपण जीवन सरिता हॉस्पिटलमधून टेस्ट करून घेऊ”.

“मला चिठ्ठी द्या .मी टेस्ट करून येतो “

“नुसती चिट्ठी देऊन भागणार नाही. मला तिथल्या डॉक्टराबरोबर चर्चा करायची आहे.चला “.

-------------------------------------------------------------------

केदारला ओपीडीमध्ये बसायला सांगून डॉक्टर डीनना भेटायला गेले.अर्ध्या तासाने एक सिस्टर येऊन म्हणाली...

“केदार रानडे?”

“ह,मी “

“चला “

सिस्टर त्याला घेऊन वार्ड मधल्या एका स्पेशल रूममध्ये आली , कॉटकडे निर्देश करीत म्हणाली

“झोपा “ जाता जाता ती म्हणाली

”Blood sample घ्यायला येतील पडून रहा” .बऱ्याच वेळानंतर दोन मुली आल्या ,ब्लड घेऊन गेल्या. नंतर काही वेळाने मावशी आल्या. त्याला गाऊन दिला म्हणाल्या...

“हे घाला “

केदार म्हणाला...

“मला admit केलंय का ?”

“हो “

“admit करायची काय गरज आहे ? टेस्ट करून मी गेलो असतो “

“ह्या मेंदूच्या टेस्ट फार वेळ काढू असतात. दिवसभर तुम्ही कुठे बसणार ?तुमच्या बरोबर पण कोणी नाही.इथे तुम्हाला आराम तरी भेटेल.तुमचा नंबर आला की वार्डबॉय तुम्हाला घेऊन जाइल.तवर आराम करा.”

नंतर मध्येच एक डॉक्टर आले त्यांनी बीपी चेक केले.तुम्हाला काही अलर्जी आहे का असे काही प्रश्न विचारले .बघता बघता केदारची दहा बारा पानांची फाईल तयार झाली.हॉस्पिटलचा चहा नाश्ता आला त्यात अर्धा पाऊण तास गेला. पाच वाजले तेव्हा रेवती घाबरलेल्या अवस्थेत आली म्हणाली...

“केदार,अचानक काय झाले तुला ?”

“मला कुठे काय झालय.टेस्ट करायच्या आहेत म्हणून डॉक्टर मला इथे सोडून गेले.टेस्ट वगैरे सगळे झाले.आता सोडतात का बघू.”

“नाही,डॉक्टर आता इथे येणार आहेत .मग काय ते कळेल’”

थोड्याच वेळात डॉ.मुतालिक आले ते म्हणाले...

“केदारच्या टाळूच्या आत मेंदूवर एक पुटकूळी उठली आहे.ती ठसठसली की त्यांना कळ येते .ती चिघळली की रक्ताचा थेंब नाकातून बाहेर पडतो.आता ऑपरेशन करून ती काढून टाकली की ते मोकळे होणार.”

“ऑपरेशन करावे लागेल?औषधाने बरे होणार नाही का?”

“मी antibitics दिले होते.त्याचा तात्पुरता उपयोग झाला .पण त्याचा इफेक्ट संपताच दुखणे सुरु झाले.”

रेवती काळजीत पडली काय निर्णय घ्यावा हे तिला समजेना .डॉक्टर म्हणाले...

“हे ऑपरेशन अगदी किरकोळ आहे.काळजीत पडावे असे त्यात काही नाही.सगळे मिळून अर्धा तास लागेल.”
रेवती, “काय करूया रे केदार”

“आपण कुठे काय करणार आहोत .ऑपरेशन तर ते करणार आहेत”

“that is the spirit मग मी सांगू त्यांना तयारी करायला ?”

“इतक्या तातडीने करावे लागणार आहे?”

“तशी काही इमर्जन्सी नाही .पण उद्या ब्रेन स्पेशालीस्ट डॉ झुत्शी इथे दुसऱ्या एका ऑपरेशनसाठी येणार आहेत .तर त्यातच हे ऑपरेशनही होऊन जाईल .नाहीतर पुन्हा डॉक्टरांची appointment घ्या .ऑपरेशन थीएटर बुक करा, हे सगळे प्रोसिजर करावे लागणार.”

“ठीक आहे .उद्याच करा.”

डॉक्टरांनी तयारी करायच्या सूचना दिल्या .तयारी म्हणजे काय तर डोक्याचे मुंडण करणे,एनिमा देणे एवढेच. रात्री काहीही खाऊ पिऊ नका अश्या सूचनाहीलगेच सुरु झाल्या. अश्विन बाहेरून पळत पळत घरी आला आणि म्हणाला...

“आई न्यूज लाव.बाबाच्या ऑपरेशन बद्दल सांगताहेत. मीनाक्षीने घाई घाई ने टीव्ही लावला .सगळ्या बातम्या झाल्यावर पुन्हा ठळक बातम्या आल्या...

”सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री रेवती कर्णिक यांचे पती केदार रानडे यांच्या वर जीवन सरिता हॉस्पिटल मध्ये मेंदूची शस्त्रक्रिया होणार आहे.ही शस्त्रक्रिया ख्यातनाम ब्रेनसर्जन डॉ.विक्रम झुत्शी करणार आहेत . शस्त्रक्रिया किरकोळ स्वरुपाची आहे.”

मिनाक्षी अश्विनला म्हणाली...

“काहीच नीट सांगितले नाही की रे”

“तेवढच सांगताहेत.”

मीनाक्षीने लगेचच रेवतीला फोन लावला...

“अग हे ऑपरेशन चे काय सांगताहेत”.

”हो ना. याच्या मेंदूवर बारीक पुटकूळी उठली आहे.ती ऑपरेशन करून काढून टाकणार आहेत.ऑपरेशन उद्या सकाळी करायचे ठरले आहे”.

”यांना काही त्रास होत होता का ?”

“डोक दुखतंय म्हणायचा .इतक सिरिअस असेल असे वाटले नाही “

“तू काही काळजी करू नको.मी लगेच निघतेय.”

“ह.ये .तुझ्याशी बोलले .बर वाटले बघ.”

“मग सवत असणे सोयीस्कर आहे की नाही? टेन्शन अर्धे अर्धे वाटून घेता येते”.

त्याही परिस्थितीत रेवतीला हसू आले. नंतर अण्णांचा आणि इतरांचे फोन येतच राहिले.आता हॉस्पिटलमध्ये येऊ नका हे सांगण्यातच रेवतीचा अर्धा तास गेला.फोन मधून उसंत मिळाल्यावर ती म्हणाली...

“केदार तुला इतका त्रास होता आणि तू काहीच बोलला नाहीस?”

“अग इतका काहीच त्रास नव्हता.तेवढ्या पुरती कळ यायची नंतर काहीच नसायचे “
रेवती खिन्न मनाने केदारच्या शेजारी बसून राहिली.केदार तिचा हात हातात घेऊन म्हणाला...

“रेवा तू दुर्लक्ष केलास म्हणून ऑपरेशनची पाळी आली असे काही नाही .तू अजिबात काळजी करू नकोस.तू आता घरी जा .आणि सकाळी ये.”

‘ए नाही ह.मी आता तुझ्या जवळ थांबणार “

“उद्यापासून रोजच थांबावे लागणार आहे.आज मी ओके आहे.”

पण रेवती हलायचे चिन्ह दिसेना.असा कसा हलगर्जीपणा झाला असे काहीतरी पुटपुटत राहिली .केदार सिस्टरला म्हणाला...

“अहो ही बघा, घरी जात नाही .आणि मला झोपूही देत नाही”

सिस्टर हसायला लागली ,ती म्हणाली “दिदी तुम्ही खरच जा.आम्ही आहोत ना.आणि तसेही मी त्यांना आता झोपेची गोळी देणार आहे. शांत झोपतील ते”.

मोठ्या नाईलाजाने रेवती घरी गेली.

-----------------------------------------------------------------------------------

सकाळी दहाच्या आधीच रेवती आणि मिनाक्षी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या .त्या दोघी केदारच्या रुममध्ये गेल्या तर रूम रिकामी .रेवतीने nursing stand वर चौकशी केली .नर्स म्हणाली...

“त्यांना ऑपरेशनला नेलंय”.

“ऑपरेशन तर दहा वाजता होते ना.मग इतक्या लवकर कसे नेले”.

“जे पहिले ऑपरेशन होते ना त्या पेशंटला व्होमिटिंग झाले म्हणून यांना पहिले नेले”.

त्या दोघी passage मधल्या बाकावर बसल्या .रेवतीचे जास्तच काळजी करणे आणि मीनाक्षीचे समजूत काढणे सुरु होते.मिनाक्षी म्हणाली...

“अग दोन तास झाले अजून कसे आणले नाही?”

दोघी nursing stand वर गेल्या .रेवतीने विचारले...

“अजून ऑपरेशन झाले नाही का?”

“ऑपरेशन केंव्हाच झाले .”

“मग अजून खोलीत का आणले नाही ?”

“रिकव्हरी रुममध्ये ठेवले आहे .डॉ झा जाताना त्यांना पाहून जातील.मग वर आणतील. “.

दोघी रिकव्हरी रुममध्ये गेल्या.अजून केदार trolley वरच झोपला होता. रेवतीने हाक मारली

“केदार बर वाटतय का?”

केदारने डोळे उघडून त्यांच्याकडे पहिले ,त्याच्या चेहेऱ्यावर हास्य उमटले तो थोडा वेळ त्यांच्याकडे पाहत राहिला नंतर त्याने डोळे मिटून

घेतले.रेवतीने वार्डबॉयला विचारले “अजून भूल उतरली नाही का?

”भूल उतरली तरी पाचसहा तास ग्लानी असते “

थोडा वेळ त्या तशाच उभ्या राहिल्या .तिथे बसायला बाक किंवा स्टूल काहीच नव्हते..वार्डबॉय म्हणाला...

“तुम्ही वर थांबा .पंधरा वीस मिनिटात घेऊन येतो.”

त्यादोघी पुन्हा वर येऊन कॉर्रीडोरमध्ये बसल्या. तासाभराने दोघा वार्डबॉयनी केदारला रुममध्ये आणले .हळुवारपणे ट्रोलीवरुन कॉटवर शिफ्ट केले .सिस्टरने बीपी ,पल्सचे मोनिटर जोडले .दोघी रुममध्ये गेल्या रेवतीने हाक मारली “केदार.” आत्ताही मघासारखेच झाले .त्याने डोळे उघडले, दोघीकडे पाहून हसला. थोड्या वेळाने डोळे मिटून घेतले. रेवती सिस्टरला म्हणाली...

“ तो भुकेने व्याकुळ झाला असेल .काल त्याने काहीही खाल्ले नाही”

“अजून एक तासाने त्यांना दोन चमचे पाणी पाजायचे .अर्धा तास थांबायचे .पाणी पचले तर पातळ खीर,पेज असे काहीतरी देऊ या”
वार्डचे इन्चार्ज डॉक्टर आले.त्यांनी केदारला तपासले सगळ्या मोनिटरवरून नजर फिरवली.रेवतीकडे पाहून म्हणाले “ठीक आहे .“

“पण तो बोलत नाही.”

“सर्जरीचा ताण असतो .औषधाचा इफेक्ट असतो.थोडा वेळ वाट पाहूया.”
डॉ.निघाले. रेवती त्यांच्या बरोबर चालत निघाली तिने विचारले...

”ऑपरेशन व्यवस्थित झालेय ना.?”

“ब्रेन सर्जरी आणि इतर सर्जरी या मध्ये थोडा फरक आहे. उदाहरणार्थ जठराचे ऑपरेशन करून अल्सर्स झालेला भाग काढून टाकला,तर जठराची क्षमता कमी होते .अशा वेळी आम्ही पेशंटला सांगतो कमी जेवा.हलके पदार्थ खा.म्हणजे जठरावरचा लोड कमी ठेवा .पण मेंदूच्या बाबतीत तेवढेच पुरत नाही. कारण मेंदूच्या प्रत्येक भागाचे कार्य वेगवेगळे असते. खराब झाल्या मुळे जो भाग काढून टाकला जातो त्या भागाचे कार्य बंद पडू शकते .”

रेवतीने विचारले...

“केदारच्या मेंदूचे कोणते कार्य बंद पडेल असेल ?”

“त्यांना जाग आल्यावर आणि ते बोलतील तेंव्हाच ते नक्की कळेल .पण अंदाजाने असे वाटते की त्यांना एक्विलीब्रीयमचा प्रॉब्लेम येइल.त्यांना तोल सावरायला जमणार नाही.”

“किती दिवस ? का कायम ?”

“बरेच दिवस.आपण लगेचच उपचार सुरु करणार आहोत.फ़िजिओथेरेपी सुरु करणार आहोत.आणि मेंदूच्या इतर सेल्स ते काम शिकून घेतात.तुम्ही इतकी काळजी करू नका”.

रेवतीला थकल्यासारखे झाले .मीनाक्षीने तिला अधार देऊन बाकाकडे नेले .आणि बाकावर बसवले. दोघी नि:शब्द बसून राहिल्या.अतिश्रमाने रेवतीला झोप आली. ती बाकावरच लवंडली.मीनाक्षीने बाजूला सरकून तिला पाय पसरायला जागा दिली. कॉरीडॉर मधून शर्मिष्ठा येताना मीनाक्षीला दिसली .शर्मिष्ठाच्या बोलण्याने रेवतीची झोपमोड होइल या शंकेने मिनाक्षी उठून तिला सामोरी गेली.तिने काय काय घडलंय ते शर्मिष्ठाला सांगितले.दोघी मिळून केदारच्या खोलीत गेल्या.सगळे मॉनिटर संथ लयीत सुरु होते.केदार अजूनही झोपेतच होता.दोघीही कॉट जवळ उभ्या राहिल्या. इकडे रेवतीला स्वप्न पडले की ती व मिनाक्षी केदारला चालायला शिकवत आहेत.केदार वॉकर घेऊन उभा आहे .त्याच्या समोर दोघी उभ्या राहून त्याला चीअर अप करत आहेत.रेवती म्हणते...

“ये केदार ये “ तिकडे मिनाक्षी म्हणते...

“माझ्याकडे ये “ केदार बावरतो आणि वॉकर टाकून उलट बाजूला पळून जातो .रेवती खडबडून जागी झाली .ती हाका मारायला लागली “मीना ,मीनाक्षी कुठे आहेस तू.”

तिचा आवाज ऐकून त्या दोघी पळत बाहेर आल्या....

“ए काय झाले .का घाबरलीस तू?”’

“अग मला फार विचित्र स्वप्न पडले.”

“ टेन्शन घेतेस म्हणून स्वप्न पडते . शांत हो”

थोड्या वेळाने रेवती म्हणाली...

“आपण घरी गेल्यावर तू केदारला भद्रावतीला चल असे म्हणू नकोस”

“पण त्यांना जर भद्रावतीला सोयीस्कर वाटत असेल तर येऊ दे ना “

‘”तो विषयच काढायचा नाही .म्हणून तुला आत्ताच सूचना दिली.”

“मी त्यांना आग्रह करणार नाही. फक्त एकदा ........”

“तेच सांगते आहे मी की ......”

शर्मिष्ठाने हस्तक्षेप करत म्हटले...

“ए बायानो, हा वाद घालायची ही वेळ आहे का?तुम्ही दोघी दमला आहात आणि तुमचा संयम संपला आहे. तुम्ही आधी कॅन्टीनमध्ये जाऊन चहा घेऊन या.निघा”

आपली चूक रेवतीच्या लक्षात ती म्हणाली...

“चल. चहा घेऊन येऊ ”

दोघीजणी कॉरिडोरमधून लिफ्ट कडे गेल्या .त्या लिफ्टची वाट पाहत होत्या तोच केदारच्या खोलीतून सिस्टर बाहेर आली ती मोठ्या ने म्हणाली...

“डॉक्टर ही इज सिंकींग “

केबिनमधून डॉक्टर पळत बाहेर आले आणि केदारच्या खोलीत शिरले .सगळे मॉनिटर स्थिर झाले होते.डॉक्टरनी स्टेंथास्कोपने चेक केले .सगळे शांत झाले होते.

तिघीच्या कडे पाहत ते म्हणाले...

”नाही.काही उपयोग नाही “.

--------------------------------------------------------------------------------------------------

केदारच्या आकस्मिक निधनामुळे कर्णिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला .गेले एक वर्ष त्यांनी टेन्शनमध्ये काढले होते.
केदार माणूस म्हणून खूप चांगला होता तरी तो नवरा म्हणून तिला तोलामोलाचा वाटत नव्हता.शर्मिष्ठा आणि सुनंदाबाईनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण तिने केदारचा स्वीकार करायला नाराजी दर्शविली .

पण डॉ.मुतालीकनी अण्णासाहेब आणि रेवतीला बोलावले होते , ते म्हणाले की...

“तुमच्या व्यक्तिगत जीवनात ढवळाढवळ करण्याचा मला अधिकार नाही.किंवा रानडेंची बाजू मांडायची माझी ड्युटी नाही.फक्त एका मुद्ध्याकडे तुमचे दुर्लक्ष झाले आहे तो तुमच्या निदर्शनास आणावा म्हणून मी तुम्हाला बोलावले आहे.जेंव्हा केव्हा रेवतीला खरे लग्न करायचे असेल तेंव्हा तुम्ही रानडेचे काय करणार आहात ?त्यांना घटस्पोट देणार? घटस्पोटाच्या अर्जात कारण काय देणार? रेवतीला जर केदार रानडे यांच्याशी संसार करायचा नसेल तर तुम्ही त्यांना आत्ताच तुमच्या आयुष्यातून दूर करावे. त्यांचा मानसिक छळ करण्याचा तुम्हाला अधिकार नाही.
डॉ .मुतालीकानी हा मुद्दा उपस्थित केल्यावर अण्णासाहेबांनी केदारशी सलोख्याने वागायला सुरुवात केली.महाशिवरात्रीला शंकराची पूजा करत असताना एका क्षणी रेवतीला केदारच्या प्रेमाची उत्कट जाणीव झाली , त्या नंतर कर्णिकच्या घरात सुख ओसंडून वाहत राहिले.
महिन्या भरातच केदारचे निधन झाले आणि कर्णिकांच्या घरावर शोककळा पसरली .अण्णासाहेबांनी केदारचे दिवसकार्य सगळे रीतसर केले.रमाकांत अश्वीनला घेऊन आला होता.मुंजीसाठी उत्सुक अश्विनला उत्तरकार्याचे सोपस्कार करावे लागले.आज शेवटचे कार्य उदकशांत पार पडले. मिनाक्षी आणि आश्विन जायला निघाले .अण्णांनी गाडीची व्यवस्था केली होती.सुनंदाबाई म्हणाल्या तुला काहीही अडचण आली तर तुला माहेरचे दरवाजे कायम उघडे आहेत.रेवतीने तिच्या हातात एक लिफापा ठेवला .

”हे काय?”

‘”घरी गेल्यावर उघड “
पण मिनाक्षीने लगेचच उघडून पहिले .वीस लाखाचा चेक होता....

”अग कशाला हे. मागे दिलेस तेही अजून शिल्लक आहेत.”

”मिनाक्षी मी तुझ्यावर फार अन्याय केला..त्याची भरपाई होऊ शकत नाही.पण तू चेक घेतलास तर तू मला क्षमा केलीस असे मी समजेन .“
तिने चेक पर्समध्ये ठेवला.आईअण्णाना वाकून नमस्कार केला. ती आणि अश्विन भद्रावतीला रवाना झाले.

------------------------------------------------------------------------------------

केदारच्या निधनाला महिना होऊन गेला.अण्णासाहेब निराश मन:स्थितीत हॉलमध्ये बसले होते.पार्टनर गावडे आले अण्णासाहेबांच्या जवळ बसले .म्हणाले

” किती दिवस असे दु:खात राहणार .केदार गेला ही गोष्ट जीवाला चटका लावणारी आहे पण जगरहाटी आहे.उद्योग धंद्याचे बघायला पाहिजे” “येतो.सोमवारपासून साइटवर येतो “

“आणि रेवतीचें काय ?तिने तर स्व:तला कोंडूनच घेतलय .इतके दु:ख करणे चांगले नाही”.

“तिला दु:खाबरोबरच पश्चातापाची भावना आहे.आपणच याला कारणीभूत आहोत असे तिला वाटते .”

“आता विषय निघाला म्हणून विचारतो तेंव्हा सिलीचुंगला काय घडले?”.’

”जेंव्हा रेवती शुटींगसाठी सिलीचुंगला गेली होती तेंव्हा ती आणि युवराज एकमेकांच्या प्रेमात पडले.भूवालानाही रेवती सून म्हणून पसंत होती.महिन्याभरातच भूवालानी आम्हाला वाचासंकल्प कार्यक्रमासाठी बोलावले.वाचा संकल्प म्हणजे वधुवरांची एकमेकांना पसंती आणि पत्रिकेचे गुणमेलन. या कार्यक्रमासाठी आम्ही गेलो. पण राजगुरू ,भुवाल आणि युवराज यांच्यात भर दरबारात वादावादी झाली. त्यांचे संभाषण सिलीची भाषेत असल्याने आम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे ते समजले नाही. पण अंदाजाने लक्षात आले की पत्रिका जमत नाही म्हणून राजगुरू लग्नाला मान्यता देत नाहीत आणि युवराज रेवती बरोबर लग्न ठरवावे म्हणून आग्रही आहेत. पण भूवालानी नकार जाहीर केला .सुनंदाला फारसे काही वाटले नाही . कारण तिला राजघराण्याशी संबंध नको होते पण मला फारच वाईट वाटले कारण हे लग्न झाले असते तर आमच्या आर्थिक व्यवहारात जास्त विश्वासाहर्याता आली असती.

तरीही निघताना भुवाल म्हणाले...

“लग्न योग नाही पण आपले आर्थिक व्यवहार असेच सुरु राहतील.”

“अच्छा.म्हणून रेवतीच्या लग्नाचा विषय बंद पडला”.

“आपल्याकडे विषय बंद झाला पण सिलीचुंगला सुरूच राहिला”

“ म्हणजे ? “

“म्हणजे पंधरा दिवसांनी मला भूवालांच्या दुभाष्याचा फोन आला .तो म्हणाला रेवतीशीच लग्न करणार म्हणून युवराज हटून बसलेत.म्हणून राजगुरुनी तोडगा सुचवलाय की रेवतीचे नाममात्र लग्न तिच्या एखाद्या चाहत्याशी करून द्या.त्या नंतर तिला युवराजांशी पुनर्विवाह करता येइल.कारण त्यांच्या पद्धती प्रमाणे पुनर्विवाहात पत्रिका पाहत नाहीत. काय करयचे असे मी रेवतीला विचारले पण तिला काही हा तोडगा पटला नाही .सुनंदाने तर कडाडून विरोध केला.आणि भूवालांचे तर सारखे फोन वर फोन येत होते.शेवटी जग्गुला म्हटले बघ एखादा मुलगायोग योगाने त्याला केदार भेटला . तो केदारचा फोटो घेऊन आला. मोठ्या मुश्किलीने मी रेवतीला तयार केले आणि सुनंदाचा विरोध डावलून कसे बसे लग्न पार पाडले”.

“बरोबर. आता मला लिंक लागली.पण त्यानंतरही रेवती आणि युवराज यांचे लग्न का नाही झाले ? ”

“सगळे सविस्तर सांगतो.रेवतीचे नाममात्र पण विधीपूर्वक लग्न झाल्याचे मी भूवालाना कळवले पण तीन महिने ते गप्पच राहिले.तीन महिन्यांनी मला दुभाष्याचा फोन आला .पार्टनर मी देवाशप्पथ तुम्हाला सांगतो त्याचे बोलणे ऐकून मला शंभर विंचू चावावेत अशा वेदना झाल्या”.

”बाप रे. असे काय म्हणाला तो “

“त्याने मला विचारले,ज्या माणसाबरोबर रेवतीचे लग्न झाले तो वारला का ?कारण रेवतीच्या पत्रिकेत वैधव्य योग आहे . हे ऐकून मला गरगरायला लागले.आपल्या हातून भयानक पाप घडलंय हे माझ्या लक्षात आले.रेवतीला हे काहीही कळता कामा नये अशी खुणगाठ मी मनाशी बांधली .हे सगळ एकट्याने सोसायचे असे मी ठरवले.मी खाजगी गुप्तहेरला कामाला लावले .केदारची सगळी माहिती काढली .तो जिवंत आहे ,तो नोकरी करतोय आणि बायको मुलात खूष आहे हे कळल्यावर मी सुटकेचा निश्वास सोडला आणि भूवालाना तसे कळवून टाकले.”

“अहो अण्णासाहेब, हे प्रकरण तिथेच संपवायचे.म्हणजे पुढचे काही झाले नसते “

“माझ्या कडून मी तिथे संपवले होते.पण दुसराच एक गुंता निर्माण झाला होता.”

“म्हणजे काय झाले होते?”

“आमच्या विश्वासू नोकर मंडळींनी रेवतीच्या लग्नाची बातमी हळू हळू लिक केली. सिने इंडस्ट्रीत एक बियाणी नावाचे बडे प्रस्थ आहे .त्यांनी रेवतीला बोलावून विचारले तू लग्न केलेस ते ठीक आहे . पण ते चोरून का ठेवलेस ? त्यामुळे तुझ्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण होतो .तू पत्रकार परिषद घे आणि लग्न डिक्लेअर कर”.

जग्गू आणि रेवती माझ्याकडे आले .मी त्यांना सांगितले तो विवाहित आहे आणि तो पत्रकार परिषदेला येऊ शकणार नाही.झाले रेवती आणि जग्गुची माझ्या समोरच झकापक्की सुरु झाली.रेवती म्हणाली तू नीट चौकशी का केली नाहीस. माझ्यासाठी बिजवर का आणलास ? .जग्गू म्हणाला वो शादीशुदा है ये बात उसने मुझे बतायी नही. उसने मुझे फसाया है मै तो उसे कोर्टमे खिचुंगा.

मी दोघांना शांत केले आणि यातून मी मार्ग काढतो असे सांगून प्रकरणावर पडदा टाकला. मला वाटले जग्गू शांत होईल. पण दुसरे दिवशी तो परस्पर केळकर वकिलांचे कडे गेला आणि केस करायचीच म्हणून हाटून बसला.केळकर म्हणाले केस करायला जग्गुला अधिकार नाही .आम्हा कर्णिका पैकी कोणीतरी फिर्यादी म्हणून उभे राहिले पाहिजे. .

“बर.पण केस करायची होती तर रेवतीने केदारच्या शाळेत जाऊन फार्स करायची काय आवश्यकता होती’”.

”एकातून दुसरे निष्पन्न व्हावे आणि लांबड लागावी असा प्रकार झाला.आम्हा तिघांची केळकर वकीलाबरोबर मिटिंग झाली .त्यात असे ठरले की केदारने, पहिले लग्न झाले असताना फसवून दुसरे लग्न केले या मुद्द्यावर केस करायला नको.कारण तो आरोप फार गंभीर आहे. आणि केदारला शिक्षा होईल रेवतीलाही मन:स्ताप सहन करावा लागेल .त्यापेक्षा नांदवत नाही असा साधा दिवाणी खटला करावा.एक दोन तारखा चालवून खटला परत घ्यावा असे ठरले .केळकर म्हणाले न्यायमूर्तींनी परवानगी दिली तर तिथेच पत्रकार परिषद घेऊ. जग्गूला हा पर्याय मान्य झाला .कारण कोर्टकेसमुळे चांगली पब्लिसिटी मिळणार होती..

“ते बरोबर आहे पण रेवती भद्रावतीला केदारच्या शाळेत का गेली?”

“हा ते राहिलेच.वकील म्हणाले केस करण्यापूर्वी नोटीस द्यावी लागते . मी नांदण्यासाठी अमुक तारखेला आले होते पण तुम्ही मला हाकलून दिले वगैरे .रेवती रविवार बघून त्याच्या घरी गेली .पण तो ऑफिसला गेलेला .त्यामुळे रेवतीलाही मिटिंगमध्ये जावे लागले’’.

“किती कॉम्पलीकेशन झाली .अण्णासाहेब तुम्ही म्हणून इतके निभावलेत.”

“सुनंदाचा कडाडून विरोध ,रेवतीचे मारून मुटकून सहकार्य .कुठे बोलायची चोरी.घरात नोकराचा वावर त्यामुळे सगळ गुपचूप करायचे.मला इतका त्रास झाला.”

“पण अण्णासाहेब ,जेंव्हा केदारचा फोन आला की मी तुमच्याकडे राहायला येतोय तेंव्हा तुम्ही त्याला सांगायचे की आम्ही केस परत घेतोय तुला येण्याची आवश्यकता नाही.”

“मी केदारला येऊ दिले त्यालाही राजगुरू कारणीभूत आहेत .कारण रेवती केदारचे लग्न झाल्यानंतर चार महिन्यांनी युवराज राजगुरुना म्हणाले तुमचे भविष्य फुसके निघाले. रेवतीशी लग्न होउनही केदार सुखरूप आहे? मला राजगुरूचा फोन आला की त्यांचे लग्न झाले पण त्यांचे एकत्र राहणे नाही.त्यामुळे माझे भविष्य खोटे ठरले.तुम्ही केदारला घरी रहायला बोलवा..मी त्यांना सांगितले माझा भविष्यावर विश्वास नाही आणि आता मला कसलाच प्रयोग करायचा नाही. केदार भद्रावतीला सुखरूप आहे आणि तिथेच राहू दे. नंतर भूवालांचे फोन सुरु झाले .काही करून केदारला ठेऊन घ्या.मी त्यांना सांगितले रेवती आणि सुनंदा तयार नाहीत. पण काही दिवसांनी कोर्टकेस झाली आणि केदारने स्व:त होऊनच यायचा निर्णय घेतला .तो येतोय म्हटल्यावर मी नकळत निर्णय घेतला की येऊ दे ,.भूवालाची भुणभुण तरी थांबेल.”

“आणि सुनंदाबाई तयार झाल्या?”

मी तिला सांगितले की...

"आपण त्याला येऊ नको असे म्हटले तर contempt of the court होईल”.

“आता एकच शंका राहिली की केदार इथे राहायला यावा अशी तुमची मनोमन इच्छा होती ,पण तुम्ही त्याच्याशी अगत्याने वागत नव्हता .रेवतीपण त्याला टाळत होती .वाहिनी तर उघड उघड राग करायच्या असे का ?”

”आम्ही जे वागत होतो त्यामागे प्रत्येकाचे वेगवेगळे लॉजिक होते.मी त्याला एक प्रकारे घाबरत होतो.त्याच्या समोर मला अपराधी वाटायचे .मला वाटायचे की तो मला जाब विचारेल .मला त्याच्याशी शक्यतो संवाद नको असायचा.रेवतीचे युवराजावर प्रेम होते.केदारशी प्रेमाने वागणे म्हणजे युवराजांशी प्रतारणा असे तिला वाटे.आणि आपण केदारशी जवळीक दाखवली तर आपल्याला तो आवडला असा त्याचा गैरसमाज होइल म्हणून ती तुटक वागत होती.सुनंदा जे वागत होती त्याला कारण म्हणजे आपली मुलगी चुकीचे वागली पण त्याला कारणीभूत केदार आहे .म्हणून तिचा केदारवर राग.पण नंतर केदारच्या सालस ,निर्लोभी सहनशील स्वभावाची ओळख पटल्यावर ती रेवतीला म्हणाली केदारला नवरा म्हणून स्विकारायला काय हरकत आहे .तिने आणि शर्मिष्ठाने रेवाच्या मनात केदार बद्दल प्रेम निर्माण केले.”

“फार विलक्षण आहे.पण शेवट इतका दु:खद व्हायला नको होता.”

”कडू बिया रुजवल्या तर फळही कडूच येणार . आणि राजगुरू जे म्हणाले की तिच्या नशिबात वैधव्य आहे ते खरे ठरले “

----------------------------------------------------------------------------------

अण्णासाहेबाना भूवालाचा फोन येतो .दुभाषा बोलत होता .

“भूवालाचा आपल्याला संदेश आहे.”

“सांगावे “

“आपल्या जामातांच्या निधनाचे दु:खद वृत्त समजले.भूवालाना शोक झाला.”

“भूवालानी सहानुभूती दाखवल्याबद्दल आभारी आहे “

“या घटनेला एक महिना होऊन गेला.भूवालानी आपणास वाचा संकल्प साठी निमंत्रित केले आहे”.

“रेवती अजूनही शोकाकुल आणि पश्चातापदग्ध आहे.सद्य स्थितीत ती येऊ शकत नाही .क्षमा असावी.”

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

|| समाप्त ||

Group content visibility: 
Use group defaults

नाही आवडली....काहीपण आहे...
मला वाटलं की केदार तिकडे राहायला जाईल आणि रेवती आणि तिच्या वडिलांना जगणं नको करून ठेवेल... लग्न केलं ना, आता निभाव म्हणून....
पण इकडे वेगळं च! सवती काय, प्रेमं काय, निधन काय...फलतुपणा

काय हे.
म्हणजे कथा चांगली आहे पण केदार ला असं मारल्याबद्दल, रेवती केदार ला नवरा बायकोच्या नात्यात एकत्र आणल्याबद्दल मला कथेचा खूप राग आला आहे.

आधी केदार मरणार असं वाटलं होतं, पत्रिकेची जरा शंकाही आली होती.
शेवट खूप घाईत उरकल्यासारखा वाटला. काही गोष्टी नाही पटल्यात...
पण एक आवर्जून सांगेन, अशा प्रकारची कथा मी पहिल्यांदा वाचली. धागेही सगळे जुळून आलेत.
पुलेशु!

र. दि. रा.,
अहो काय असं केलं राव, अतिशय छान वळणं घेत थोडी आश्वासक, थोडी रटाळ, थोडी इंटरेस्टींग असलेली कथा एकदम केदार ला मारुन का संपवली ? मला रावसाहेब आठवलेत एकदम.... माणसं कश्याला मारता ओ, नशीब की त्ये पोरं नाय मारलं तुमी.. पण त्ये म्हातारं बाप होतं की ओ मारायला... शेवट थोडा वेगळा असता तर खरच अजुन मजा आली असती.
एनीवे, तुम्ही खुप छान लेखन करु शकता, तेव्हा तुमच्या पुढील लेखनास शुभेच्छा !!

पहिल्या 2 भागात कथा एकदम वेगळ्या उंचीवर होती..हळू हळू ग्राफ हलू लागला.. शेवट तर अगदीच न पटण्यासारखा.. माधवी आणि रेवती एवढ्या एकमेकांना सांभाळून घेतील हे तर अजिबात पटत नाही..तसच नाम मात्र लग्न झालेलं असताना केदार मुंबईत राहिल्यावर जाब न विचारता तसाच राहतो..त्याला स्वताच्या घराची ओढ दिसत नाही..इकडे त्याची बायको एका दिवसा साठी रहायला येते तेव्हा पण काही हितगुज न करता निघुन जाते..तिच रेवती बरोबर चांगल गुळपिठ जमलेल दाखवलं ..तेव्हा वाटलं की काहितरी रहस्यमय प्रकार असेल..पण शेवट अगदीच नाही पटला.. विशेषतः त्यांच्या नात्याची गुन्तवळ झाली

शेवट नाही आवडला खूप घाईत उरकल्यासारखा वाटला. काही गोष्टी पटल्या नाहीत...
पण पुढे तुमचे लेखन वाचायला आवडेल... पुलेशु!

मला तरी पटला शेवट, पण जरा गुंडाळ्ला गेला. यापूर्वी सुध्दा अनेक कथा-कादंब-यात वैधव्य्/विधूर योग टाळण्यासाठी एखाद्या गरीबाचा बळी दिला जाई. ऐस्वर्याचे सुध्दा मंगळामुळे झाडाशी लग्न केले होते म्हणे. ख.खो.दे.जा.

हां भाग जरा विस्तारुन अजुन तिन चार भाग वाढले असते तर कथा अजुन रोचक बनली असते असे वाटते.. तरीही इतके नियमित भाग लिहून तुम्ही ही कथा खरेच पूर्णत्वास नेली ह्याबाबत खुप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन !

लवकरच नवीन कथा येवू द्या आता.
छान लिहिता आपण.

मायबोलीकर वाचक मित्रांनो,

मायबोली वर मी मॅरेज Mystique ही दीर्घकथा क्रमश: प्रसारित केली. आपण सर्वांनी प्रत्येक भागाला चांगला / परखड प्रतिसाद दिला. त्यामुळे मला हे सर्व भाग लवकर लवकर प्रसारित करण्यास प्रोत्साहन मिळाले. मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे.

काही वाचकांना केदारचे गुळमुळीत वागणे आवडलेले नाही. केदार एका सार्वजनिक संस्थेत नोकरीस आहे. चेयरमन पासून सगळ्यांच्या चुकांचे खापर त्याच्यावर फोडले जाते. आणि तो ते सहन करतो. तो चांगला शिकलेला आहे. छान व्यक्तिमत्व आहे, पण अंगी धडाडी नसल्यामुळे तो मागे पडला आहे. स्वतःच्या चुकांबद्दल तो जास्तच अपराधी होऊन जातो. असा स्वभाव असल्याने तो अण्णांना खडसून खडसून जाब विचारू शकला नाही.

काही वाचकांना कथेचा शेवट ( केदारचा मृत्यू ) आवडलेला नाही. त्यांची ही प्रतिक्रिया रास्तच आहे. पण ह्या दीर्घ कथेचा जो गाभा आहे ( म्हणजे रेवतीच्या पत्रिकेत वैधव्य योग असणे ) त्याला अनुलक्षून केदारचा मृत्यू अपरिहार्य आहे. या बद्दल मी वाचकांची क्षमा मागतो.

मायबोलीचे व सर्व वाचकांचे पुन्हा एकदा आभार.

आपला,

रमेश दि. रामतीर्थकर. ( र. दि. रा. )

सॉरी शेवट नाही आवडला. आणि दिप्ती नवल/अमोल पालेकरच्या पिक्चरची अशीच स्टोरी होती तो ही नव्हता आवडला. सुरुवात वाचून काहीतरी वेगळं वाचायला मिळेल म्हणुन नेटाने वाचलेली खरतरं.

Chan Katha hoti. Shewat wegla jhala pan kathe madhe ase hone swabhawik. Ya kathecha saglyat strong point mhanje tumhi khup regular parts taaklet. Anek Katha mahine mahine yet nahit .Dhanyawad..

Pages