लेखाच्या शीर्षकातून जो अर्थ ध्वनित होतोय तो या लेखाचा विषय बिलकूल नाही ! ‘नोटा’ या मराठी शब्दाशी आपल्याला इथे काहीही कर्तव्य नाही. इंग्लिश लघुनाम NOTA यावर हा लेख आहे. या लेखात ‘नोटा’ हा जो मतदानाचा एक पर्याय आहे, त्याचा उहापोह करीत आहे. एखाद्या मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवारांपैकी आपल्याला जर कोणीच पसंत नसेल, तर “वरीलपैकी कोणीही नाही” अर्थात ‘नोटा’ हा पर्याय आपण निवडू शकतो. गेल्या काही वर्षांपासून हा पर्याय भारतात लागू केला गेला. त्याचा वापरही काही मतदार करीत असतात. या विषयावर अनेक माध्यमांत बराच काथ्याकूट झालेला आहे. हा पर्याय योग्य का अयोग्य याबाबत अनेक मतांतरे आहेत. लोकशाही व्यवस्थेत ती जरूर असावीत. पण नोटामागची जी वैचारिक पार्श्वभूमी आहे त्याबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटले आहे. म्हणून मी या विषयावरचे काही संदर्भ चाळले आणि माहिती करून घेतली. त्यातील काही भाग मला रोचक व रंजक वाटला. त्याचा लेखाजोखा इथे सादर करीत आहे.
आता खालील मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतो:
१. नोटा आणि जागतिक परिस्थिती
२. नोटा आणि भारतीय निवडणूक आयोग
३. नोटा आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग
४. नोटा, न्यायालये आणि कायदा
५. नोटा आणि विनोद
६. नागरिकांच्या सूचना
नोटा आणि जागतिक परिस्थिती
नोटाचा वापर हे एक प्रकारचे नकारात्मक मतदान आहे. त्यामागची कारणे व्यक्तिगत असतात. तसेच त्याद्वारे एखाद्या नागरिकाचा व्यक्त होण्याचा मूलभूत हक्क जपला जातो. भारतात हा पर्याय २०१४मध्ये मतपत्रिकेत समाविष्ट झाला. पण त्यापूर्वी तो जगातील १३ देशांत वापरात आहे. त्यातील काही प्रमुख देश असे: ग्रीस, युक्रेन, स्पेन, द.कोरिआ, कोलंबिया आणि बांगलादेश. अमेरिकेत फक्त नेवाडा राज्यापुरता हा पर्याय लागू आहे.
मतदानादरम्यान इच्छुक मतदार हा पर्याय वापरून त्यांचा हक्क बजावतात. जेव्हा मतमोजणी होते तेव्हा नोटाच्या मतांचा अर्थ कसा लावायचा याचे नियम मात्र देशागणिक वेगवेगळे आहेत. त्यातील काही असे:
१. भारत आणि नेवाडा: समजा जर मतमोजणीत ‘नोटा’ला सर्वाधिक मते मिळाली तर ती वगळून प्रत्यक्ष उमेदवारांतील सर्वाधिक क्रमांकाची मते मिळवणाराच विजयी ठरतो.
२. कोलंबिया : इथे मात्र मतमोजणीत ‘नोटा’ला सर्वाधिक मते मिळाली तर ती निवडणूक रद्द होते. नंतर जेव्हा फेरनिवडणूक होते तेव्हा आधीच्या उमेदवारांना पुन्हा तिथे उभे राहता येत नाही
३. इंडोनेशिया : येथील स्थानिक निवडणुकांत हा पर्याय विशिष्ट परिस्थितीत दिलेला आहे. जर एखाद्या मतदारसंघात फक्त एकाच उमेदवाराचा अर्ज आला असेल तर तो बिनविरोध निवडला जात नाही. तर त्याला ‘नोटा’ या काल्पनिक पर्यायाशी लढावे लागते ! आता जर त्या उमेदवारास नोटापेक्षा जास्त मते मिळाली तरच तो विजयी होतो. मात्र नोटाची मते जास्त असल्यास निवडणूक रद्द होऊन फेरनिवडणूक होते. इथे मागच्या ‘पडलेल्या’ उमेदवारास पुन्हा उभे राहता येते.
४. स्पेन: इथे काही पक्ष ठराविक जागांवर उमेदवार न देता त्या जागा ‘रिक्त जागा’ म्हणून निवडणूक लढवतात. त्यांचा याबाबत उद्देश काहीसा वेगळा आहे. काही अतिभ्रष्ट लोकांना उमेदवारी दिल्यास ते निवडणुकीसाठी गैरमार्गाने पैसे जमवतात. ते टाळण्यासाठी असे केले जाते. तिथल्या काही नगरपरिषद निवडणुकांत अशा रिकाम्या जागा ठेऊन काही राजकारण्यांना प्रतिनिधीगृहापासून लांब ठेवले गेले. स्पेनची नोटाची नियमावली काहीशी संदिग्ध वाटते. मला ती व्यवस्थित समजलेली नाही.
नोटा आणि भारतीय निवडणूक आयोग
आता या विषयाचा भारतातील इतिहास जाणून घेऊ. तसे पाहता नकारात्मक मतदानाची एक सोय आपल्याकडे १९६१च्या एका कायद्याने अस्तित्वात आहे. त्याला ४९-O नियम म्हणतात. यात इच्छुक मतदार निवडणूक अधिकाऱ्यास एक अर्ज भरून देतो आणि त्यात “मला कोणालाही मत द्यायचे नाही”, असे प्रतिपादन करतो. यातून तो आपला हक्क बजावतो. मात्र या पद्धतीचा मोठा तोटा म्हणजे या मतदाराचे असे ‘मत’ गुप्त राहत नाही.
त्यामुळे मतदानाची गुप्तता राखली जाईल आणि नकार पण नोंदवता येईल, अशी पद्धत शोधण्याचे प्रयत्न चालू होते. त्यांचाच एक भाग म्हणून एका नागरी संघटनेने (PUCL) २००४मध्ये सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्याची यथावकाश सुनावणी झाली. अखेर २०१३मध्ये न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला असा निर्देश केला की मतदान यंत्रातच नोटाची सोय करण्यात यावी. त्यास अनुसरून २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकांपासून हा नवा पर्याय उपलब्ध झाला. मात्र नोटाच्या (सर्वाधिक) मतांचा आणि निवडणूक निकालाचा सध्या काहीही संबंध नाही. निकाल देताना नोटाची मते ही ‘अवैध’(invalid) धरली जातात. ती ग्राह्य न धरता प्रत्यक्ष उमेदवारांत सर्वाधिक मते मिळवणाराच विजयी ठरतो त्यामुळे नोटा हा केवळ निषेध व्यक्त करण्याचा एक मार्ग ठरतो. भविष्यात या कायद्यात कोलंबियाप्रमाणे काही सुधारणा व्हाव्यात अशी नोटा-समर्थकांची इच्छा आहे.
नोटा आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग
२०१८मध्ये या राज्य आयोगाने गेल्या २ वर्षांतील स्थानिक निवडणूक निकालांचा अभ्यास केला. त्यातून काही दखलपात्र निष्कर्ष मिळाले. बोरी, मानकरवाडी आणि अन्य काही ग्रामपंचायत निकालांत नोटालाच सर्वाधिक मते मिळालेली होती. एका निवडणुकीत तर नोटाची मते ही विजयी उमेदवाराच्या तब्बल पाचपट अधिक होती आणि हा उमेदवार सरपंच झाला. यावर आयोगाने सखोल विचार केला. नोटा प्रथम आलेला असताना देखील दुसऱ्या क्रमांकाची (कितीही कमी टक्केवारी असली तरी) मते मिळवणारा जेव्हा विजयी ठरतो तेव्हा नोटाच्या मूलभूत संकल्पनेलाच धक्का बसतो, असे आयोगाचे मत झाले. त्यावर विचारविनिमय होऊन ६/११/२०१८ रोजी या आयोगाने एक नवा अध्यादेश जारी केला (https://mahasec.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Order%20of%20NOTA.pdf).
त्यानुसार नोटाच्या नियमात अशी सुधारणा झाली:
१. हा आदेश महाराष्ट्रातील सर्व म.न.पा., न.परिषदा आणि न.पंचायतीना लागू आहे.
२. प्रथम निवडणूकीत नोटाला सर्वाधिक मते मिळाल्यास ती निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घेण्यात यावी.
३. या फेरनिवडणूकीत आधीच्या ‘पडलेल्या’ उमेदवारांना पुन्हा उभे राहता येईल
४. आताच्या निवडणूकीत जर पुन्हा तसाच निकाल लागला तर मात्र नोटाखालोखाल मते मिळवणाराच विजेता ठरेल.
महाराष्ट्राच्या पाठोपाठ हरयाणा आयोगाने देखील तसाच आदेश जारी केला आहे. या आयोगांनी एक पाउल पुढे टाकले आहे खरे. पण, जर का फेरनिवडणुकीत सर्व पक्षांनी पुन्हा तेच उमेदवार ठेवले तर मात्र यातून काय साध्य होईल? पहिल्या निवडणुकीत ‘नोटा’ असे मत देणारे मतदार याखेपेस काय निर्णय घेतील? असे प्रश्न मनात येतात.
नोटा, न्यायालये आणि कायदा
महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्य आयोगांच्या आदेशांवर माध्यमांतून बरीच चर्चा झाली. केंद्रीय आयोगाने नोटाबद्दल अशी सुधारणा केलेली नसताना देखील दोन राज्य आयोग असे धाडशी पाउल कसे उचलू शकतात, यावर कायदेपंडितात बराच खल झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय आयोगाने जारी केलेल्या ‘नोटा’ला घटनात्मक वैधता नक्की किती आहे, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. जर नोटा आणि फेरनिवडणूक हा निर्णय पूर्णपणे राबवायचा असेल तर त्यासाठी १९५१च्या लोकप्रतिनिधी कायद्यातच दुरुस्ती करावी लागेल, असेही मत व्यक्त झाले आहे. यासंदर्भात न्यायालये आणि निवडणूक आयोग यांची अधिकारक्षेत्रे नक्की कुठपर्यंत आहेत, यावर अधिक विचारविनिमयाची गरज आहे.
नोटा आणि विनोद : एक किस्सा
इंगलंडमध्ये टेरी मार्श या उमेदवाराने नोटा-नियमातील एक त्रुटी दाखवून देण्यासाठी एक विनोदी प्रकार केला. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्याने प्रतिज्ञापत्र करून स्वतःचे नाव बदलून घेतले. आता त्याचे नवे नाव होते – None Of The Above !! मतपत्रिकेत नावे घालताना त्याचे Above हे आडनाव धरले गेले आणि त्याला उमेदवार-यादीत अग्रस्थान मिळाले. मग निवडणुका झाल्या. मतमोजणी झाली. त्यात हे महाशय अवघी ०.३% मते मिळवून शेवटच्या स्थानावर फेकले गेले. पुढे त्याने जाहीर मुलाखत देऊन त्याची भूमिका विशद केली. त्याला ते पद मिळवण्यात अजिबात रस नव्हता. पण कुठल्याही व्यक्तीने त्याच्यासारखे नाव बदलून NOTA असे करू नये, याबाबत कसलाही नियम अस्तित्वात नव्हता. गमतीचा भाग म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाला NOTA असे नाव नोंदवता येणार नाही असा अध्यादेश त्यापूर्वीच अस्तित्वात होता ! कुठलेही कायदे वा नियम बनवताना प्रशासनास किती बारकाईने विचार करावा लागेल हा संदेश या प्रकरणा तून मिळाला.
नागरिकांच्या सूचना
आपण वर लेखात पाहिले की भारतात तूर्त नोटाचा उपयोग निषेध व्यक्त करण्यापुरताच आहे. मात्र नोटा संकल्पनेचे अंतिम उद्दिष्ट हे लोकांना चांगले प्रतिनिधी निवडता यावेत असे आहे. ते साध्य करायचे असल्यास अन्य काही देशांप्रमाणे आपल्याला पुढची पाउले उचलावी लागतील. अनेक जागरूक नागरिकांनी यादृष्टीने सरकारदरबारी सूचना दाखल केल्या आहेत. त्यातील काही निवडक अशा:
१. नोटाची मते सर्वाधिक किंवा एकूण मतांच्या विशिष्ट टक्के >> फेरनिवडणूक.
२. नोटापुढे ‘हरलेल्या’ सर्व उमेदवारांना पुढील ६ वर्षे ती निवडणूक लढवण्यास बंदी
३. सदर फेरनिवडणुकीत ‘नोटा’चे बटण यंत्रावर नको.
४. सदर फेरनिवडणुकीचा खर्च याआधी हरलेल्या उमेदवारांच्या पक्षाकडून घ्यावा.
५. माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांची मते:
एखाद्या निवडणुकीत जिंकलेल्याची मते आणि हरलेल्याची मते यांच्यातील फरक जर नोटाच्या मतांपेक्षा कमी असेल >>> फेरनिवडणूक, आणि
सर्वाधिक मते मिळालेल्याला जर ती एकूण मतांच्या १/३ पेक्षा कमी असतील >>> फेरनिवडणूक.
६. ओ.पी.रावत ( माजी मुख्य निवडणूक आयुक्त) :
“नोटा संबंधित नियमांच्या सुधारणा (फेरनिवडणूक, इ.) वेगाने झाल्या पाहिजेत. एखाद्या मतदाराचे ‘मतदान-आयुष्य’ साधारण ४०-५० वर्षे इतके असते. तेव्हा त्याला त्याच्या हयातीतच काही तरी सकारात्मक बदल दिसले पाहिजेत. ‘लोकशाही’ पद्धतीने १०० वर्षे वाट बघून चालणार नाही !”
७. जगदीप चोक्कर (संस्थापक, लोकशाही पुनर्निर्माण संघटना, ADR) :
“ जेव्हा एखाद्या लोकसभा मतदारसंघात ‘नोटा’ मते सर्वोच्च येतील, तेव्हा आम्ही न्यायालयाचे दरवाजे लगेच ठोठावणार आहोत, जेणेकरून या नियमांच्या सुधारणा लवकर व्हाव्यात”.
*****
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला मुक्तपणे व्यक्त होण्याचा हक्क असतो. मतदानासंदर्भात या हक्काची जपणूक नोटामुळे होते. नागरिकांच्या जनहित याचिकेतून सुरवात झालेली नोटाची चळवळ आज हळूहळू प्रगती करीत आहे. संबंधित कायद्यात सुधारणा होण्यासाठी नागरिकांनी बहुमूल्य सूचना केलेल्या आहेत. त्यावर निवडणूक आयोग, न्यायालये आणि सरकार भविष्यात कसा विचार करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
*************************************************************************
टीप: या लेखातील माहितीचे संकलन जालावर सहज उपलब्ध असलेल्या स्त्रोतांतून केले आहे. त्यात काही त्रुटी अथवा २०१९ मधील ताज्या घडामोडींचा अभाव असू शकेल. जाणकारांनी पूरक माहितीची भर प्रतिसादातून जरूर घालावी ही विनंती.
मस्त लेख
मस्त लेख
मी यंदा मतदान केले नाही. नोटा करावे की नाही या संभ्रमात होतो. नोटाबद्दल योग्य माहीती मिळाली. धन्यवाद
खुप चांगली आणि नविन माहिती
खुप चांगली आणि नविन माहिती मिळाली. धन्यवाद!
छान लेख!
छान लेख!
नोटासमोर हरलेल्या उमेदवारास पुढील सहा वर्ष निवडनूक लढवण्यावर बंदी असायलाच हवी. नोटाला मिळालेल्या मतांवर जर काही ठोस कार्यवाही होत असेल तरच मतदार नोटाचा पर्याय वापरतील. अन्यथा मतदानाच्या दिवशी मतदान न करता सहलीला जाणे आणि नोटा वापरणे एकच होईल.
वरील सर्वांचे आभार.
वरील सर्वांचे आभार.
शाली, सहमत.
छान माहिती. नोटा या
छान माहिती. नोटा या पर्यायाच्या वापराबद्दल सर्वसामान्य मतदारामध्ये अजूनही म्हणावी इतकी जागरूकता नाही. त्यातच निवडणुक निकालावर त्याचा न होणारा परिणाम यामुळे त्याच्या वापरातील फोलपणा लक्षात येतो. पण या लेखात इतर देशातील नोटा पर्यायाबद्दल व त्याच्या नियमांबद्दल दिलेली माहिती रंजक वाटली. भारतातील काही व्यक्ती व संघटना या पर्यायाचा वापर निवडणुकीत अधिक प्रभावी कसा करता येईल या संदर्भात नक्कीच प्रयत्न करत असतील या बद्दल खात्री आहे. या व्यक्ती व संघटनांच्या कार्याला व प्रयत्नांना यश मिळून नोटाच्या प्रभावी वापरामुळे व सजग मतदारांमुळे भारतीय लोकशाहीमधून गुंड, भ्रष्टाचारी, जातीयवादी विचारसरणीच्या उमेदवारांचे उच्चाटन होईल तो भारतीय लोकशाहीसाठी व भारतीय नागरिकांसाठी सुदिन असेल.
चांगली माहिती. २०१४च्या
चांगली माहिती. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत 60 लाख लोकांनी नोटा वापरला होता.
यावेळेस बघायचे. बहुधा त्यात वाढ होईल.
माझ्याही ज्ञानात भर पडली नोटा
माझ्याही ज्ञानात भर पडली नोटा विषयी.प्रत्येक लिखाण प्रगल्भ असते. तुमचे रिसर्च वर्क सुंदर आहे . खूप धन्यवाद...
कोलंबिया, इंडोनेशिया,स्पेन आपल्यापेक्षा बरे आहेत.
नोटा , राईट टू रीकॉल, पक्षांतर कायदा, राजकीय पक्षांना मिळणा-या देणग्या बाबत पारदर्शकता आणि त्यावर GST , खूप प्रवास बाकी आहे . तिकिट वाटपात निवडणूक जिंकण्याची क्षमता एवढेच पाहिले जाते. पूर्वी गुणी उमेदवार गरीब असला तरी तिकीट मिळायचे सद्या तसे होताना दिसत नाही म्हणून कार्यकर्ते डावलून निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या बाहूबलींना तिकीट दिले जाते. या मुळे पुन्हा राजघराणी उदयाला येताहेत. त्यांचे सुभे भारतभर आहेत.
वरील सर्वांचे आभार.
वरील सर्वांचे आभार.
नरेश, दत्तात्रय : समर्पक प्रतिसाद !
अतीशय ऊपयुक्त माहिती.
अतीशय ऊपयुक्त माहिती.
आपली लोकशाही व्यवस्था अजूनही पौगंडावस्थेत आहे. जस जसे मतदार अधिक जागरूक व सक्षम होतील तस तसे 'नोटा' चा वापर हा पर्याया कडून योग्यतेकडे होईल अशी आशा आहे.
NOTA is more of bottom up approach to disruption/evolution, where the 'exceptions' are rooted out.
What our Democracy needs however is more fundamental and top down approach of constituational ammendments to qualify candidates based on certain minimum accepted norms, i.e. min education, relevant experience, criminal background check, and proposed manifesto.
तोपर्यंत तरी 'ऊपलब्ध' ऊमेदवार यादीतून निवडणे एव्हडेच हाती आहे.
योग्य, धन्यवाद व सहमती.
योग्य, धन्यवाद व सहमती.
माझं असं स्पष्ट मत आहे कि
माझं असं स्पष्ट मत आहे कि ज्या मतदार संघात एकूण न झालेलं मतदान + नोटा ला पडलेली मत यांची टक्केवारी ५०% पेक्षा कमी असेल तिथल्या सर्व उमेदवारांना अपात्र म्हणून जाहीर करण्यात यावं आणि त्यांना त्या मतदार संघातून पुन्हा कधीही लढण्याची परवानगी नसावी. त्यांची इच्छा असल्यास ते इतर मतदार संघातून ५ वर्षांच्या अंतराने निवडणूक लढाऊ शकतात.
याचे फायदे असे:
१) उमेदवार स्वतः जाऊन आपल्या मतदार संघातल्या लोकांना मतदान करायला सांगतील, आणि मतदानाची टक्केवारी सुधारेल. आणि इतकी कठोर शिक्षा असेल तर उमेदवारी जबाबदारीने दिली जाईल आणि घेतली जाईल.
२) लोक मतदान करायला जातील, त्यातल्या ५०% लोकांनी जरी जुजबी राजकीय माहिती घ्यायला सुरवात केली आणि जर १% लोकांनी अभ्यासपूर्ण मतदान केलं तरी चांगले उमेदवार निवडून यायला मदत होईल.
त्या बरोबर एकाच मतदार संघातून एका व्यक्तीला सलग २ पेक्षा जास्त वेळा निवडणूक लढवता येणार नाही असा नियम केला तर नवीन नेतृत्व पुढे यायला वाव मिळेल. आपोआप घराणेशाहीला आळा बसेल. कारण बाप आणि मुलगा वेगवेगळ्या मतदार संघातून लढतील. आणि ज्या मतदार संघातून तुम्ही निवडून जाल त्या मतदार संघापासून तुम्हांला दार ५ वर्षासाठी ७.५ वर्षे लांब राहावे लागेल. असा नियम करावा. म्हणजे सगळे बालेकिल्ले नष्ट होतील.
खग्या, चांगल्या सूचना.
खग्या, चांगल्या सूचना.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नोटाची देशभरातील मते ही एकूण मतांच्या १.०४ % होती. (२०१४मध्ये हा आकडा १.०८ % होता).
यावेळी सर्वात जास्त अशी मते (२.०८%) आसाम व बिहारमध्ये पडली.
खग्या , पोस्ट आवडली . अस
लेख माहितीपूर्ण आहे
खग्या , पोस्ट आवडली . अस काहितरी झालं पाहिजे. वर्षानिवर्षे तेच ते चेहरे नकोसे झालेत
https://maharashtratimes
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/tha...
एक बातमी.
जि प निवडणूक २०२०
जि प निवडणूक २०२०
नोटाची मते : बातमी
https://www.loksatta.com/maharashtra-news/nota-play-crucial-role-in-13-s...
भारतातील मतदान प्रक्रियेच्या
भारतातील मतदान प्रक्रियेच्या इतिहासासंबंधी अनिल वळवी (महाराष्ट्राचे सहमुख्य निवडणूक अधिकारी) यांचा एक माहितीपूर्ण लेख इथे.
https://www.aksharnama.com/client/article_detail/5798
त्यातील हे रोचक:
१९५२ आणि १९५७मध्ये झालेल्या लोकसभेच्या पहिल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात प्रत्येक उमेदवाराला एक स्वतंत्र मतपेटी राखून ठेवण्यात आली होती. प्रत्येक मतपेटीवर संबंधित उमेदवाराचे चिन्ह चिकटवण्यात आले होते. मतदाराने पूर्व-मुद्रित मतपत्रिका आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या मतपेटीत टाकायच्या होत्या.
NDR व NEW या दोन संस्थांनी
NDR व NEW या दोन संस्थांनी 2018 ते 2022 या काळातील भारतातील विविध निवडणुकांच्या मतदान टक्केवारीचा तुलनात्मक अभ्यास करून खालील माहिती दिली आहे:
या कालावधीत दीड कोटी भारतीयांनी नोटाचा पर्याय निवडलेला आहे. त्यापैकी सर्वाधिक जण महाराष्ट्रातील आहेत( ७ लाख ४२ हजार).
(बातमी : छापील सकाळ, ६/८/२२).
मस्तच
मस्तच
म्हणजे फक्त एक टक्काच लोक
म्हणजे फक्त एक टक्काच लोक तिरंग्याचा आणी संविधानाचा अपमान होउ देत नाहित
भारतीय निवडणुकांच्या मतमोजणी
भारतीय निवडणुकांच्या मतमोजणी संदर्भातील काही रंजक माहिती असल्याने इथे लिहितो.
लोकसभा आणि राज्यसभेच्या मतमोजणी नियमांमध्ये एक गमतीदार फरक आहे तो पाहू.
१. लोकसभा निवडणुकीत (फेरमोजणी करूनही) जर दोन उमेदवारांना सर्वोच्च आणि सारखीच मते मिळाली तर मग त्यातला विजेता ठरवण्यासाठी उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी खोक्यातून काढायची पद्धत नियमात आहे. निवडणूक अधिकारी त्या दोघांची नावे दोन चिठ्ठयांवर लिहून खोक्यातून एक चिठ्ठी काढतो. ज्याची चिठ्ठी बाहेर येईल तो विजयी ठरतो.
२. पण राज्यसभेला कशी गंमत आहे पहा. इथे दोघांपैकी ज्याच्या नावाची चिठ्ठी खोक्यातून बाहेर काढली जाईल तो पराभूत समजला जातो ! याच नियमाचा आधार घेऊन नुकत्याच हिमाचल प्रदेशातून झालेल्या राज्यसभा निवडणुकीत हर्ष महाजन विजयी घोषित केले गेले आणि सिंघवी पराभूत.
३. याच संदर्भात एक अत्यंत दुर्मिळ शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे आणि त्या संदर्भात अद्याप निवडणूक नेमका कायदा किंवा नियम नाही. जर तीन उमेदवारांना सर्वोच्च आणि समान मते मिळाली तर काय करायचे यावर अजून विचार झालेला नाही.
काही दुरुस्त्या सुचवितो.
काही दुरुस्त्या सुचवितो.
१. दोन्ही चिठ्ठ्यांवर भाजपा उमेदवाराचे नाव लिहीतात.
२. दोन्ही चिठ्यांवर विरोधी पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवाराचे नाव लिहीतात.
३. अशा दुर्मिळ घटनेत.... भाजपा प्रवेशासाठी जो उमेदवार तयार असेल त्याची निवड करावी.
तिघेही उमेदवार पक्ष प्रवेशासाठी राजी असतील तर जास्त काळा पैसा ज्या उमेदवाराने गोळा केला आहे त्याला विजयी जाहिर करावे. येथे बनवाबनवीला काही संधी नाही. पक्ष प्रचारासाठी कार्यकरणारी ED शाखे कडे पासवर्ड प्रोटेक्टेड रेकॉर्ड असते. काळापैशाचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठीच नोटाबंदीचा मास्टर स्ट्रोक होता.