महामानव - गौतम बुद्ध

Submitted by Asu on 18 May, 2019 - 08:12

सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मी केलेल्या कवितेचे सौंदर्य, माझे मित्र श्री.लिलाधर कोल्हे सरांच्या या सुंदर चित्राने द्विगुणित केले आहे.
गौतम बुद्धांच्या या शांत मुद्रेतून माझी कविता आपणाला जाणवते का?....बघा!

*महामानव - गौतम बुद्ध*

महामानवा, वंदन तुजला पवित्र बुद्ध पौर्णिमेला
मानवाचे दुःख हरण्या अवतार प्रकटला भूतला ||धृ||

दुःखाच्या अंधारात उगवला
शशी, चंदन-शीतल मायेचा
कपिलनगरी लुंबिनी गावी
सिद्धार्थ जन्मला पुनवेला ||१||

वैशाख पुनव पावन झाली
बुद्ध पौर्णिमा म्हणती तिला
मायादेवी मयंक प्रसवली
राजा शुद्धोधना, शाक्यकुला ||२||

राजमंदिरी, नगरी नगरी
हर्षफुलांचा वर्षाव जाहला
राजस तेजस बाळ गौतम
महालात, वैभवी वाढला ||३||

राज नगरी फिरत असता
कुबडा रोगी तया भेटला
जरामरण पाहून जीवनी
मनात गौतम हळहळला ||४||

पुत्र राहुल पत्नी यशोधरा
संसार संपन्न परित्यागिला
राज्य दारा पुत्र त्यागुनि
तप केले दुःख हरण्याला ||५||

आत्मज्ञानाचा बोध होता
पवित्र पिंपळ सळसळला
बोधगया तीर्थक्षेत्री तपाने
गौतमातून बुद्ध प्रकटला ||६||

सत्य अहिंसा अस्तेय मानले
मदिरा, व्यभिचार निषेधिला
पंचशीलाची शिकवण देऊन
मोक्षाचा जगा मार्ग दाविला ||७||

कुशीनगरी महानिर्वाण केले
तेही वैशाख शुद्ध पौर्णिमेला
ज्ञान रूपी प्रकाश पसरूनी
भवांबरी शशी अस्त पावला ||८||

जन्म, ज्ञान, महानिर्वाण झाले
एकाच या पवित्र तिथीला
त्रिवार दैवी चमत्कार घडला
वंदन बौद्ध धर्मसंस्थापकाला ||९||

विश्वशांतीचा संदेश देण्यां
अणुस्फोटातही तू हसला
ध्यानस्थ असुनि धरतीवरी
आभाळछत्रीतही तू दिसला ||१०||

प्रा. अरूण सु. पाटील (असु)
(दि.18.05.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults