उघडे ठेवा दार मनाचे

Submitted by निशिकांत on 14 May, 2019 - 00:45

कुंद हवा, जळमटे लोंबणे
लक्षण असते बंद घराचे
स्वच्छ मोकळे जगण्यासाठी
उघडे ठेवा दार मनाचे

घरास पडदे अन् आडपडदे
जगात माझ्या मीच एकटा
विभक्त जगतो, मला न कोणी
मी मोठा अन् मीच धाकटा
जीवन झाले उदासवाणे
एकएकटे गुदमरायचे
स्वच्छ मोकळे जगण्यासाठी
उघडे ठेवा दार मनाचे

मनास येते किती उभारी!
खळखळणारी नदी पाहता
छोट्याशा परिघात तुंबले
जीवन झाले डबके आता
"अवघे विश्वचि घर माझे" या
संस्कृतीस का मिरवायचे?
स्वच्छ मोकळे जगण्यासाठी
उघडे ठेवा दार मनाचे

अंतरात डोकाउन बघता
काळोखाचा ठसा गर्दसा
शोधशोधुनी कुठे दिसेना
अंधुकसाही एक कवडसा
बोगद्यात या असाच जगलो
श्वास घ्यायचे, सोडायाचे
स्वच्छ मोकळे जगण्यासाठी
उघडे ठेवा दार मनाचे

काय लिहावे आत्मचरित्री?
मी, माझी बायको, अन् मुले?
समासही पण पुरून उरतो
नसता दुसरे कुणी आपुले
लिहावयाचे म्हणून लिहितो
आणि शेवटी फाडायाचे
स्वच्छ मोकळे जगण्यासाठी
उघडे ठेवा दार मनाचे

विभक्त जगणे नकोच देवा
पुनर्जन्म दे रे! पक्षाचा
एकएकटे जीवन त्यजुनी
बनेन हिस्सा सदा थव्याचा
निर्मनुष्य का बेटावरचा
सॉक्रॅटिस मी बनावयाचे?
स्वच्छ मोकळे जगण्यासाठी
उघडे ठेवा दार मनाचे

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users