मातृत्वाचा पान्हा मनातून फुटतो .....

Submitted by श्यामा on 13 May, 2019 - 08:31

मातृत्वाचा पान्हा मनातून फुटतो
नसत दर वेळी आवश्यक
प्रसवकळा सोसण आणि स्तनांच पाझरण
ममतेने काठोकाठ भरलेल मन असल की होता येत आई.
कधी क्षणभरासाठी कधी आयुष्यभरासाठी...

बाळाला नाहू माखू घालणारी आई
अभ्यासासाठी बडबड करणारी आई
लेकराच्या ओढीन गडावरुन देह लोटणारी हिरकणी आई
त्याच ओढीने 6.47ची लोकल पकडणारी चाकरमानीही तिच्यासारखीच....आई...

नवरयाचा डब्बा, सासूच औषध
नणदेचा वाढदिवस, इस्त्रीवाल्याचे पैसे
या सा-याचा हिशोब ठेवणारी घरादाराची आई
शिक्षणाच अमृत लेकींपर्यंत पोहोचाव म्हणून झेललेल्या
शेणगोळ्यांचा हिशोब न ठेवणारी सावित्री तर सा-या जगाची आई...

न उजवलेली कुस घेउन डॉक्टरकडे फ़े-या मारणारी आई होण्याआधीची आई...
तर एखाद्या अनाथाला हृदयाशी कवटाळून मातृत्व उपभोगून घेणारी नंतरची आई...

आई नसताना लेकीच्या ताटात नकाशेदार पोळ्या वाढणारा बाबाही आई...
आणि मैडमचा तान्हुला कुशीत जोजवणारी मोलकरीण बाईही आई...
आयुष्याचे उरलेले सारे क्षण
सहज नातवाच्या नावे करणारी आजी तर मोठीवाली आई ...

भटक्या बेघर कुत्रामांजराची काळजी घेणारी आई...
हजारो अनाथाना घर देणारी कारुण्य'सिंधू' आई..

आई होण्याचा नसतो काही एकच ठराविक मार्ग
हा तर मायेचा ठेवा... जो साम्भाळायचा ज्याने त्याने
ज्याच्या त्याच्या परिने ..

आईपणाच्या मनभर शुभेच्छा. .

मुग्धा समर्थ पाण्डेय उर्फ श्यामा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults