माईच ज्योत होती

Submitted by निशिकांत on 12 May, 2019 - 10:25

( आजच्या मातृदिनानिमित्त. )

परवाच मी माझी एक "आई" ही कविता फेसबुकवर/व्हाट्सॅपवर पोस्ट केली होती जिला भरभरून प्रतिसाद मिळाला. मी बालपणी आईबद्दल वाचलेला एक किस्सा खाली देत आहे.
१) एक मुलगा आणि मुलगी एकमेकाच्या खूप प्रेमात पडलेले असतात. प्रियकर लग्नासाठी मुलीला अर्जव करत असतो. मुलगी त्याला म्हणते तू तुझ्या आईचे काळीज मला आणून दे तुझे माझ्यावरील प्रेम सिध्द करण्यासाठी. नंतर आपण लग्न करू या. प्रेमात वेडा झालेला मुलगा घरी जातो आणि आईचा खून करून तिचे काळिज सोबत घेऊन घाईघाईने प्रेयसीकडे जायला निघतो. रस्त्यात तोल जाऊन पडतो आणि आईचे काळिज पण रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात पडते. मुलगा स्वतःला सावरत उठण्याचा प्रयत्न करत असताना पडलेल्या आईच्या काळजास वाचा फुटते आणि ते मुलाला विचारते "बाळा तुला जास्त लागले तर नाही ना? ही गोष्ट काल्पनिकही असेल कदाचित. पण आईविषयी बरेच कांही सांगून जाते.

समईत देवघरच्या आईच वात होती
ओजास पसरणारी माईच ज्योत होती

पाऊल उचलले मी पहिले जगात जेंव्हा
आई जणू खुशीचा साक्षात झोत होती

संगीत पाठ पहिला ऐकून तृप्त झालो
झोपेत गुंगताना ती गीत गात होती

निजता कुशीत रात्री गोष्टीस सांगताना
स्वप्ने मला उद्याची ती दाखवीत होती

स्वतःस विसरली ती बाळास पोसताना
गाठी न पीळ कोठे, रेशीम पोत होती

खडतर प्रपंच सारा, खडबड असून तळवे
पाठीवरी मुलायम फिरवीत हात होती

नाभीत जन्मलेला ब्रह्मा उदास आहे
सांगा घरी तयाच्या आई घरात होती?

वैकुंठ नको मजला दे येरझार जगती
शतजन्म जीवनाचे आईच गीत होती

ना गाईले कधीही भारूड वेदनांचे
अश्रूस लपवणारी ती खास प्रीत होती

वृक्षास आज आहे एकांत वेदनांचा
पचवून दु:ख जगणे रक्तात रीत होती

ज्यांनी तिला बघावे, सारे उडून गेले
जोडून हात जगली ती शांत शांत होती

"निशिकांत" माय तुजला बघते वरून आहे
तूज ठेच अन् तिच्या रे! सिसकी उरात होती

निशिकांत देशपांड मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users