© सकलोज फेणी

Submitted by onlynit26 on 10 May, 2019 - 02:53

© सकलोज फेणी
सखाराम मेरेकर साजगावातील प्रसिद्ध व्यक्ती. पण सगळ्यांसाठी तो 'सकलो' होता. अतिशय हुशार म्हणून त्याची ख्याती. जणू प्रति बिरबलच. काही लोक त्याच्याकडे आपली समस्या घेऊन यायचे आणि तो तिचे निरसन करायचा. त्याचे खरे आडनाव सावंत पण त्याचे आजोबा सदाशिवराव यांना मेरेकर हे आडनाव गावकऱ्यांनी बहाल केले.
काजूचा मोसम सुरू झाला काय सकल्याला फुरसत नसायची. लोक काजू जमा करायचे तर हा बोंडूच्या मागे असायचा. अगदी मोकाट सुटलेल्या गुरांसारखा कोणाच्याही कुंपणात शिरायचा. त्यासाठी त्याला लोकांनी मुभा दिली होती. त्याला फक्त बोंडू हवे असायचे. काजूला तो हात देखील लावत नसे. त्यांने तेवढा लोकांचा विश्वासही संपादन केला होता. प्रत्येकाच्या बागेतून बोंडे गोळा करणे देखील कष्टाचे काम होते. गोळा केलेली बोंडे एका ठिकाणी गोल आकाराच्या छोट्याशा दगडी हौदात कुजत ठेवायला लागायची. त्या हौदाचा शोधही त्यानेच लावला. १० वर्षापूर्वी टेंबावर त्याच्या जमिनीत जुन्या काळातला बुजलेल्या अवस्थेत असलेला हौद साफ करून तिथे आपले प्रोडक्शन युनिट तयार केले. याकामी तो कोणाचीही मदत घेत नसे. कुजलेले बोंडू सकाळीच जाऊन पायाने तुडदावायचा. त्याच्या पायांना कुजलेल्या काजूच्या बोडांचा वास यायचा. घरी आला की तो वास घरातल्यांनाही असह्य व्हायचा. ते त्याच्या आसपासही फिरकत नसायचे. मोसमातले हे चार महीने सकलो बाहेरच्या पडवीत झोपायचा. खरंतर त्यालाही वासाने झोप लागत नसायची. पण हे चार महीने काम करून तो साऱ्या वर्षाची कमाई करून जायचा. ते चार महीने सगळे सहन करायचा. तुडदावून झाल्यावर निघालेल्या रसाची भट्टी लावायचा. मग तयार झालेला पेटता माल घेवन घरी यायचा आणि त्याचा साठा करायचा. पेटता माल म्हणजे काजूच्या रसाचे उकळून उर्ध्वपतन झाल्यावर जे पहिले पाणी यायचे ते पाणी सकलो बोटावर घेवन पेटवून बघायचा , रॉकेलासारखे पेटलेले पाणी बाजूला करायचा. तो जळजळीत कडक माल चांगल्या किंमतीला विकला जायचा. पिणारा पण घोटताना कसेतरीच तोंड करून पोटात ढकलायचा आणि मग हवेत तरंगायचा. पहिल्या धारेचा तो माल सकलो घरात एका कनगीमध्ये लपवून ठेवायचा. पुढे जशी मागणी येईल तशी एक एक बाटली काढून विकायचा. ही गोष्ट फक्त त्याला आणि त्याच्या बायकोलाच माहीत होती.
सकल्याचे अगदी गेल्या दहा वर्षापासून अगदी बरे चाललेले. पंचक्रोशीत त्याच्या मालाला जाम उठाव होता. त्याची ही काजू फेणी 'सकलोज फेणी' या ब्रॅन्डनेमने तळीराम गोठात प्रसिद्ध होती. सकलो मागणी नुसार सगळीकडे माल पोचवायचा. त्याचे नेटवर्क एकदम मजबूत होते पण हे कोणाला तरी पाहावले नाही. नाही म्हटले तरी त्याच्या सारखे अशा प्रकारचे धंदे करणारे कित्येक जण होते. कोणीतरी पोलीसांना हे सगळे कळवले आणि ती गोष्ट सकल्याच्या कानावर आली. त्याचे नेटवर्क आणि लोकसंपर्क खूप चांगला असल्यामुळे एका बाटलीच्या मोबदल्यात लाख मोलाची टिप मिळाली होती. हे सगळे कसे निस्तरायचे तेच सकल्याला कळत नव्हते. त्याला स्वत:लाच स्वत:साठी आता बिरबल बनण्याची गरज होती. ऐन हंगामात या चिंतेने पोखरला गेला. ते मे महीन्यातले दिवस होते. तीन महीने राबून बरेच अमृत गोळा केले होते. ते पकडले गेले तर माल जप्त होईलच वर दंडही भरावा लागेल. विचार करून डोक्याचे भुस्काट व्हायची पाळी आली. एवढ्या मालाचे करायचे काय? सगळा माल जप्त झाला तर नेहमीची गिऱ्हाईके पण तुटणार होती आणि धंदाही चौपट होणार होता. त्याला त्या रात्री झोप काही लागली नाही. डोळ्यासमोर त्याने तयार केलेला माल दिसत होता. पहाटे केव्हातरी त्याचा डोळा लागला तो एक यशस्वी बेत आखूनच.
दुसऱ्या दिवशी सकल्याने दोन वेळा आंघोळ केली कारण पायाला येणारा वास कमी व्हायला हवा होता. बेत आखल्याप्रमाणे एका दिवसात सकल्याने सगळा माल गायब केला. बरोबर दोन दिवसानी त्याच्या घरी ११ वाजताच्या सुमारास साध्या वेशातले पोलीस आले. सकल्या मागच्या पडवीत मातीची भिंत घालत होता. गाऱ्यातील माती मळून भिंतीचे थर चढवत होता. सकल्याला आधीच बातमी लागलेली असल्यामुळे कोण जरी अनोळखी माणूस आला तरी सावध राहत होता. ते आलेले पोलीस चार जण होते. ते पोलीस आहेत हे त्याने अनुभवातून ओळखले. ते चारही जण येऊन आतल्या पडवीत बसले. सकल्याने त्यांना पाणी दिले. त्यामधल्या एकाने एक फॉर्म काढून माहीती विचारायला सुरूवात केली. सकल्याने मुलाला सकाळीच मामाकडे पाठवून दिले होते. शिवाय बायकोला तोंड उघडायचे नाही अशी तंबी दिली होती. कारण कोणी बोलत असताना तिला मध्येच बोलायची सवय होती.
" नाव काय तुमचे?" त्या माणसाने माहीती विचारायला सुरूवात केली.
"सखाराम साबाजी सावंत"
"कामधंदा?"
"शेतीवाडी हा आणि मजुरेक जातंय."
"मूलं किती?"
"एक पोरगो हा. तो आता मामाकडे गेलो हा."
"घरात तुमच्या व्यतिरिक्त कोण कोण असतात?"
"कोण नाय बॉ"
त्या माणसाने अजून बरेच छोटे मोठे प्रश्न विचारले. नंतर त्यामधल्या एका माणसाने सकल्याकडे हाताने बाटलीची खुणा करत ते आहे का विचारले.
"श्या बुवानू , असला काय आमच्याकडे नाय, भलत्याच ठिकाणी इलास तुम्ही." असे सांगत आपल्या कामाला निघाला.
पण आलेली माणसे हार मानणारी थोडीच होती. सकल्याला घोळात घेऊ लागली. पण सकल्या ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करीत राहीला. त्यांना काहीच कळायला देईना. शेवटी त्यानी आपली ओळख दाखवली. घराची झडती घ्यायची आहे असे सांगीतली.
"घेयनास बापडे झडती, कर नाय तेका डर खेका?" कमालीच्या आत्मविश्वासाने डायलॉग फेकत सकल्या परत गाऱ्यातली माती मळू लागला.
पोलिसांनी घराची झडती घ्यायला सुरूवात केली. सकल्याची बायको थोडी घाबरली पण तसं ती दाखवत नव्हती. पोलीसांनी तिला पण प्रश्न विचारून भंडावून सोडले. पोलीसानी पूरे घर धुंडाळून काढले. हाताला काहीच सापडले नाही. ही तपासणी तासभर चालली. साधी जीएम क्वार्टरची बाटली देखील तपासात आढळली नाही. पोलीस हैराण झाले. तितक्यात सकल्याला त्याचा मुलगा येताना दिसला. सकल्याचे पाय मातीच्या गाऱ्यातच डगमगू लागले. त्याच्या पायाला चिकटलेली मातीही सुटली. मुलाला जर पोलीसांनी प्रश्न विचारले आणि तो जर काही बोलला तर आता पर्यंत आपल्या पक्षात झुकलेली तपासणी बिघडू शकते. सकल्याच्या खाणाखुणा मुलापर्यंत पोहोचायच्या आधी एका पोलीसाने नुकत्याच आलेल्या मुलाला प्रश्न विचारायला सुरूवात केली. तसं त्याच्या मुलाला फारशी माहीती नव्हती. तरीपण न जाणो कधी काही पाहिले असेल आणि पोलीसांना बोलेल. या भीतीने सकल्या चिंतेत पडला. पण एखाद्या अभिनेत्याला लाजवेल असा अभिनय करत चेहऱ्यावर ती चिंता दिसू दिली नाही. मातीच्या गाऱ्यातून बाहेर पडत आपल्या मुलाला उचलून घेतले. त्याची प्रेमाने चौकशी केली. मुलगा काही वेळ अचंबित झाला कारण याअगोदर आपल्या बापाने असे कधी केले नव्हते. तशातच त्याला पोलीसही प्रश्न विचारत होते मुलगा काहीच बोलत नव्हता. पुरता गोंधळून गेला होता. किंबहूना त्याला ते प्रश्नच कळत नव्हते.
"तुझ्या बाबांकडे कधी बाटली पाहीली होतीस का?" असा सोपा प्रश्न मुलाला विचारला.
"होय." असे तो छोटा मुलगा

सकल्याचा तोल सुटला. मुलाला खाली सोडून मातीच्या पायाने त्यांच्या मागे मागे कधी फिरू लागला याचे भान देखील त्याला राहीले नाही.
मुलगा पोलिसांना मागच्या पडवीत घेऊन आला. हे पाहून सकल्या खालीच बसला. त्याला काय करावे सुचत नव्हते. मुलाला काही सुचना करायला गेला असता तर पोलिसांना संशय आला असता. मुलाने कोंबडीच्या घूडाकडे बोट दाखवले. घुड मोठा होता. घुडाच्या तोंडावर जाऊन आत पाहीले तरच आतले सर्व दिसणार होते. आपल्यापैकी घुडात आत वाकून बघणार कोण? यातच त्या पोलीसांची पाच मिनिटे गेली. शेवटी एक तयार झाला. गुडघ्यावर बसत घुडात तोंड घालून आत बॅटरी मारली. त्या आत बसलेली बोचकारी कोंबडी त्याच्या अंगावर धावली. अनपेक्षित हल्ल्यामुळे पोलीस घाबरला. पण त्याला आत बाटलीसारखे काहीतरी दिसले. सकल्याच्या मदतीने त्यांनी कोंबडीला बाहेर काढून आतली बाटली काढली. पण ती रॉकेलची निघाली हे पाहून पोलीस खूप निराश झाले.
पोलिसांना हात हालवीत परत जावे लागले. सकलो मात्र मनात गाजरं खायला लागला. त्याच्या बायकोने पण बरेचसे सांभाळून घेतले होते. तिने हल्लीच अजय देवगनचा " दृश्यम " पिक्चर पाहीला होता. त्यामुळे नवऱ्याचे काम माहीत असून देखील आपल्या शब्दावर ठाम राहिली. ऐनवेळी मुलाच्या आगमनाने दोघांच्या काळजाचे ठोके चुकले होते.
"तुया कसो काय मधीच इलस रे, मामान सोडल्यान कसो?" सकल्याने मुलाला विचारले.
"बाबानू मामा मागसून डूकराचा मटान घेवन येतहत, माका बोलले तू पुढे चल, म्हणान मिया इलय." मुलाने असे म्हणाल्याबरोबर सकल्या तोंडाला पाणी सुटले. तिथेच बसून पोराचे मुके घेऊ लागला.
सगळे गेल्यावर सकल्याच्या बायकोने हळूच विचारले .
"काय ओ, सगळी दारयेची क्याना खय दडवलास? "
"ह्या बघ, तुका पुढे भाताचे चार गोटे खावचे हत ना , मग ता सोडून काय ता इचार, ता राज हा. तसाच ऱ्यवांदे." सकलो एवढे बोलून आपल्या कामाला लागला. बायको मात्र नवरा काही सांगत नाही म्हणून पिरपिरत राहीली. सकल्या एका लयीत माती मळू लागला. खुप खुश होता. एकतर मोठ्या संकटातून सहीसलामत सुटला होता शिवाय मेहूना डूकराचे मटन घेऊन येत होता. सकल्याची बायको मात्र धुमसत राहीली. इतक्यात मागच्या पडवीत काहीतरी पडल्याचा आवाज झाला, ती मागच्या पडवीत धावली. बघते तर नुकत्याच घातलेल्या भिंतीचे वरचे दोन थर (पारे) सकल्याच्या अंगावर कोसळले होते. त्यातून सकल्या कसातरी बाहेर पडत होता. भिंतीत लपवून ठेवलेली लहान लहान कॅन्स सगळीकडे पसरली होती. त्याच्या बायकोला नवऱ्याची आयडीया समजली.
हे पाहून सकल्याची बायको हसत सुटली
" वायच जर पोलीस थांबले आसते तर, तुमची पाटलन काय धुवच्या लायकेची ऱ्हवली नसती, स्वताक काय दृश्यम मधलो ' विजय साळगांवकार' समाजतास काय?"
हे ऐकून सकल्या पण डोकं खाजवीत हसत सुटला.
"हसतास काय, तुमची 'सकलोज फेणी' गोळा करा." त्याची बायको हसत हसत म्हणाली. हे सर्व त्याचा मुलगा बाहेरून पाहतच होता. त्याला ही बापाची मस्करी करायची लहर आली.
" बाबानू, ते बघा परत पोलीस येतहतं." हे ऐकून सकल्याची तात्पुरती का होईना तारांबळ उडाली आणि तिघेही हसत सुटले..

समाप्त...

लेखक
श्री नितीन दशरथ राणे
९००४६०२७६८

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे कथा, आधी कुठे प्रकाशित केली होती का तुम्ही, वाचल्यासारखी वाटत आहे, खासकरून शीर्षक ओळखीचं वाटत आहे Happy

https://www.maayboli.com/node/65275

Submitted by निलुदा on 10 May, 2019 - 04:23 >>>>. या धाग्यातील स्टोरीची सुरवात वेगळी आहे आणि वरील स्टोरीची सुरुवात वेगळी एन्ड मात्र सेम. Happy तिथे

निलुदा >> तुम्ही पाठवलेल्या लिंक वर हीच कथा आहे पण ती पूर्ण मालवणीत आहे .. आणि मी आज ती कथा मराठी प्रमाण भाषेतून लिहिलेली पोस्ट केलीय.