माझी सैन्यगाथा (भाग २२)

Submitted by nimita on 8 May, 2019 - 08:25

ठरल्याप्रमाणे आम्ही चार पाच मैत्रिणी मिळून एक दिवस केत्ती ला जायला निघालो. रानी अम्माच्या मते आम्हाला साधारण अर्धा पाऊण तास लागणार होता केत्ती ला पोचायला , पण त्या दिवशी आम्ही ज्या मैत्रिणीच्या कार मधून जाणार होतो ती स्वतः एक कमर्शियल पायलट आहे. आणि गंमत म्हणजे ती कार ला पण विमान समजूनच चालवते... आम्ही ज्या स्पीडनी रस्त्यावरचे चढ उतार आणि वळणं मागे टाकत जात होतो ते बघताना एक दोन वेळा मला खरंच विमानात बसल्यासारखं वाटलं होतं. तेव्हा एक मजेशीर विचार मनात आला..महाभारतात जसा धर्मराजाचा रथ जमिनीपासून दोन बोटं वर- हवेत- चालायचा तशीच आमची गाडी पण बहुदा हवेतच चालली होती !! शेवटी एकदाच्या आम्ही सगळ्या सुखरूप पणे आमच्या इच्छित स्थळी पोचलो. पण अपेक्षेपेक्षा लवकरच..त्यामुळे ते ठराविक दुकान अजून उघडलं नव्हतं. मग थोडा वेळ तिथेच जवळपास रेंगाळत आजूबाजूचं निसर्गसौंदर्य माझ्या कॅमेरात साठवून घेतलं

काही वेळानी त्या दुकानाची मालकीण आली आणि आम्ही सगळ्या तिच्या मागोमाग दुकानात शिरलो.माझ्या एक दोन मैत्रिणी अगदी पूर्ण तयारीनिशी आल्या होत्या...म्हणजे अगदी त्यांना कुठल्या रंगाची साडी हवी आणि तिच्यावर कोणतं डिझाइन , आणि त्याची रंगसंगती सुद्धा बरं का! हे सगळं तिला समजावून सांगण्यात त्या busy झाल्या. मला तसाही साड्या वगैरे मधे फारसा इंटरेस्ट नव्हता त्यामुळे मी त्या दुकानातल्या इतर वस्तू न्याहाळत फिरत होते. माझ्या अपेक्षेप्रमाणे तिथे टेबल लिनन ची खूप व्हरायटी होती...आणि बेड लिनन पण ! इतकं नाजूक भरतकाम ..किती सुबक आणि देखणं !! आणि तितकंच सफाईदार पण...म्हणजे जर नीट लक्ष देऊन बघितलं नाही तर एखाद्याला 'कपड्याची सुलट आणि उलट बाजू कोणती ?' हा प्रश्न पडावा.त्यातलं एक बेड स्प्रेड आणि एक टेबल रनर मला फार आवडले.. त्याबद्दल विचारलं तेव्हा असं कळलं की ते 'by order' कोणीतरी बनवून घेतले होते.. मन थोडं खट्टू झालं, पण मग मी अगदी तसंच माझ्यासाठी सुध्दा बनवायला सांगितलं. त्यावर ती दुकानवाली म्हणाली," आत्ता वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे मॅम. तुमची ऑर्डर पूर्ण व्हायला पाच सहा महिने तरी लागतील..सध्या साड्यांच्या खूप ऑर्डर्स आहेत ना,त्यामुळे!" हे ऐकल्यावर तर माझा मूडच गेला. एकदा वाटलं की ऍडव्हान्स देऊन ऑर्डर बुक करावी...पण पाच सहा महिने !! का कोण जाणे पण मी ठरवलं की नंतर परत एकदा येऊन ट्राय करायचं..

पण ती 'नंतर' ची वेळ काही आली नाही आणि त्यामुळे माझं परत केत्ती ला जाणं झालंच नाही. असो!!! माझ्या Must Buy लिस्ट मधली एक वस्तू जरी राहून गेली असली तरी Must See मधे केत्ती च्या समोर ✔️ लागल्यामुळे मी त्यातच समाधान मानून घेतलं.

आता लिस्ट मधे पुढचं नाव होतं 'तिरुपुर' ! हे एक छोटंसं गाव (म्हणजे तेव्हा तरी छोटंसं होतं ) आहे ..कोईम्बतूर च्या जवळ.....hosiery च्या कपड्यांसाठी प्रसिद्ध ! म्हणजे अगदी तान्ह्या बाळाच्या अंगड्या-टोपड्या आणि nappies पासून ते मोठ्या माणसांच्या ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टस पर्यंत ...सगळं काही आहे इथे. त्याचबरोबर पायपुसणी, सतरंज्या, कार्पेट्स, बेड साईड मॅट्सची पण खूप व्हरायटी मिळते. थोडक्यात काय तर hosiery चं one stop shop आहे तिरुपुर ! आणि दुधात साखर म्हणजे...सगळ्या वस्तू अगदी whole sale rate मधे.. फक्त तुमच्याकडे वेळ आणि patience हवा !!

एका रविवारी आम्ही तिघंही (मी, नितीन आणि ऐश्वर्या) सकाळी लवकर निघून तिरुपुर ला पोचलो. तिथल्या त्या whole sale market मधे गेल्यावर माझी अवस्था तर अगदी 'घेता किती घेशील दो करांनी' अशी झाली होती. खरं म्हणजे, मी जेव्हाही कोणतीही खरेदी करायला जाते ना तेव्हा नेहेमी माझी शॉपिंग लिस्ट माझ्याकडे तयार असते. आणि मी फक्त त्या लिस्ट प्रमाणेच शॉपिंग करते. उगीचच -'आवडलं म्हणून...स्वस्त वाटलं म्हणून...' अशी कारणं देत जास्तीचं कोणतंही सामान मी कधी घेत नाही. पण त्या दिवशी मात्र मी स्वतःच माझा नेहेमीचा निर्धार गुंडाळून ठेवला आणि अक्षरशः अधाश्यासारखी शॉपिंग केली. त्यात मुख्यत्वे ऐश्वर्या साठी कपडे आणि घरासाठी कार्पेट्स वगैरे यांचा समावेश होता. त्यानंतर तिथे आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना आम्ही अगदी आवर्जून तिरुपुर ला घेऊन गेलो.

एकदा रानी अम्माशी बोलताना कळलं की 'दिल से' सिनेमातल्या 'छैंय्या छैंय्या..' या गाण्याची शूटिंग निलगिरी टॉय ट्रेन वर झाली आहे आणि त्यात जो रेल्वे ब्रिज दाखवला आहे तो वेलिंग्टन मधेच आहे. त्या दिवसांत ऐश्वर्या (माझी मुलगी) शाहरुख खान ची जबरदस्त फॅन होती..मग काय , एक दिवस आमची वरात त्या ब्रिजच्या दिशेनी निघाली.

आम्ही ब्रिज बघून घरी आलो पण 'तिथे शाहरुख खान दिसला नाही' म्हणून ऐश्वर्या मात्र खूप निराश झाली.

वेलिंग्टन मधला तो एक वर्षाचा काळ अशा बऱ्याच आठवणींनी आणि अनुभवांनी समृद्ध झाला होता असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण त्या सगळ्या आठवणींत एक अतिशय स्पेशल, अविस्मरणीय असा अनुभव मला मिळाला... आणि तो म्हणजे फील्ड मार्शल सॅम मनेकशॉ यांना 'याचि देही याचि डोळा' बघायची आणि त्यांचं भाषण ऐकायची सुवर्णसंधी मिळाली मला!!!

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
थॅन्क्स.
केत्ती बद्दल माहित नव्हते.