लावला ना अजुन प्रत्यंचेस माझा बाण मी

Submitted by सुप्रिया जाधव. on 8 May, 2019 - 01:54

मत्सराने पेटते अन् राख होते... जाण मी !
फक्त ह्यासाठीच ठरते दुर्गुणांची खाण मी ?

एवढ्यासाठीच केवळ ताणतो आहेस ना ?
लावला ना अजुन प्रत्यंचेस माझा बाण मी

मोडतो आहेस जी कैफात ती आठव जरा
घेतली होतीस जी शुध्दीमधे ती आण मी !

पानगळ पाहून माझी हिणवतो आहेस का ?
फुलवण्यामध्ये तुला कुर्बान केले न्हाण मी

निखळले कोठे स्वतः, भिरकावतो आहेस तू
विश्व होते भोवती केले तुझ्या निर्माण मी

वल्गनांची फौज आलेली मला नमवायला
परतली जाणून हे... त्यांच्याहुनी वरताण मी

गुंतला श्वासांत त्याच्या... हो म्हणूनच थांबले
त्यागला असता कधीचा अन्यथा हा प्राण मी

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Bhari

निव्वळ अप्रतिम !! _/\_

वल्गनांची फौज आलेली मला नमवायला
परतली जाणून हे... त्यांच्याहुनी वरताण मी>> जे बात !!

गुंतला श्वासांत त्याच्या... हो म्हणूनच थांबले
त्यागला असता कधीचा अन्यथा हा प्राण मी>> खूपच मस्त

मोडतो आहेस जी कैफात ती आठव जरा
घेतली होतीस जी शुध्दीमधे ती आण मी ! >> हे विशेष आवडले

कोणते कोणते आवडले म्हणून सांगू ? सग्गळेच एकसे एक आहेत !!

वाह मस्तच.
या गझलेत वापरलेले शब्द खणखणीत वाजणारे आहेत. एक नाद आहे. आणि हे शब्द ताणलेल्या धनुष्याची जी उपमा वापरली आहे शीर्षकात त्याला पूरक आहेत. आवडले