शेतकऱ्याची आखजी

Submitted by Asu on 7 May, 2019 - 00:39

पाटील परिवाराकडून सर्व आप्तेष्टांना, मित्र परिवारास आणि रसिकांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

शेतकऱ्याची आखजी

आली आखजी आली
आली दुष्काळ्या पावली
स्थिती अशी केविलवाणी
पिऊ अश्रूंचेच पाणी

सासरच्या रगाड्यात
बाळी माझी पिसावली
माहेरच्या सावलीला
लेक माझी आसावली

लेक माहेरी आणाया
कुणी धाडा रे मुऱ्हाई
चार दिस लाडाचे
भोगू द्या माझ्या बाई

भरा घागर पितरांची
घरी नसेना का दाणा
रीण काढून धन्याचे
तेल तूप घरी आणा

तळा सांजऱ्या करंजा
झोका निंबोणीले बांधा
रोज कोरडी भाकर
आज गोड धोड रांधा

जरा विसरा संसार
घरी गोकुळ भरवा
चार दिस सुखाचे
बाकी आयुष्य वणवा

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

छान!

असु तुमच्या कवितांना वास्तवाचा स्पर्श आणि आपुलकीचा गंध मला जाणवतो.
हि कवितासुद्धा सुंदरच आहे.पण आखाजी हा शब्द माझ्यासाठी नविन आहे,आखाजी म्हणजे काय?प्लीज सांगाल. Happy

खान्देशात अक्षय तृतीयेला आखाजी म्हणतात. लग्न झालेल्या स्त्रिया आखाजीला माहेरी येतात. कांदा हे प्रमुख पीक, जर कांद्याला चांगला भाव असेल, तर अक्षय तृतीयेला लोक सोनं, कपडे खरेदी करतात. नाहीतर गोडधोड करूनच दिवस भागवला जातो.
अनेक बाया आखाजीपर्यंत आंबा खात नाहीत.

आवडली कविता! गावच्या मातीचा वास आहे.

<<अनेक बाया आखाजीपर्यंत आंबा खात नाहीत.<<
होय, आधी आखाजीला पितरांना अर्पण करुनच आंबे खायला सुरुवात करायची अशी पद्धत आहे.

https://www.maayboli.com/node/43064