मर्म - २ (अंतिम)

Submitted by ऑर्फियस on 4 May, 2019 - 22:16

बाबुअण्णाला आता रंगरंगोटी करायला जायचे होते. "शिरपतराव" बाबुअण्णा खुशीत आला की श्रीपतीला शिरपतराव म्हणत असे. "आज आमी रात्री उशीर येनार. आज कलेजी आना आनि मस्त जिरं काळीमिरं लावा" बाकी जोडीला रात्रीच्या जेवणाला काय काय आणायचं याच्या सुचना देऊन बाबुअण्णा निघून गेला. श्रीपती तयारीला लागला. एव्हाना दुकानात इतर माणसं आली होती. काम सुरु झाले होते. बाबुअण्णा परतला तेव्हा श्रीपतीने टेम्पो मालाने गच्च भरून तयार ठेवला होता. त्याने पाहिले बाबुअण्णाने केस काळे करून मिशा कोरल्या होत्या. काळ्याही केल्या होत्या. बाबुअण्णाने सर्व माल नीट भरला आहे याची खात्री केली. दुकानात जाऊन ठेवणीतले कपडे घातले आणि तो निघाला. आता वेळ दवडण्यास अर्थ नव्हता. रिसॉर्टला जायला दुपार उलटून जाणार होती. दुपारचं जेवण रस्त्यातच कुठेतरी ढाब्यावर करावं लागणार होतं. बाबुअण्णा टेम्पोत चढायला पुढे आला. त्याने एक पाय वर ठेवला आणि श्रीपतीला हाक मारली. हे नेहेमीचेच होते. श्रीपतीने मागुन बाबुअण्णाच्या प्रशस्त बुडाला टेकू देऊन वर ढकलले तेव्हा तो आत गेला. बाबुअण्णा आत जाताना टेम्पो किंचित हादरल्यासारखा झाला. खरं तर बाबुअण्णा एकटाही चढु शकत असे पण त्याला खुप धडपडावे लागत असे. राकेश रायचंदला देखिल हे माहित होते. त्याने आपल्या सिक्युरिटीला सूचना देऊन ठेवल्या होत्या. बाबुसेठला टेम्पोत बसताना आधार द्यायच्या. आणि त्यावर बाबुअण्णाची मनसोक्त थट्टाही केली होती. टेम्पो सुरु झाला आणि बाबुअण्णा रिसॉर्टच्या मार्गावर लागला. पहिला सिग्नल लागला आणि बाबुअण्णाला "तो" दिसला. रस्ता क्रॉस करत होता. हाच तो मुलगा ज्याने मेधाची छेड काढली होती आणि बाबुअण्णाने त्याला काठीने झोडपून काढले होते. कॉलेजातलं पोरगं होतं. त्याचेळी त्याचंही नेमकं लक्ष बाबुअण्णाकडे गेलं. त्याच्या डोळ्यात भीती दिसली आणि गडबडीने त्याने रस्ता ओलांडला. टेम्पो पुढे निघाला. पण आता बाबुअण्णाचे विचारचक्र सुरु झाले होते. साल्याला जन्माचा धडा शिकवायला पाहिजे होता. हे नुसतं मारणं काही खरं नाही. पोलिसात देण्यात तर अर्थच नाही. टेम्पोच्या भरधाव वेगात बाबुअण्णाचे विचारही भरधाव सुटले.

त्याला नेहेमिचा सिनेमा डोळ्यासमोर दिसु लागला. त्याने एका हिन्दी सिनेमात पाहिले होते. हिरो कुणालाही लाथाबुक्क्यांनी बडवत नाही. त्याला माणसाच्या शरीरातील मर्मस्थानं माहिती असतात. तिथे दाबलं की मानुस लुळा पडतो. आणि ती विद्या ज्याला माहित असेल तो त्याला बरं करु शकतो नाहीतर माणुस कायमचा लुळा. साला अशी विद्या आपल्याकडे पाहिजे. मेहनत काही नाही. पोलिस बिलिस काही नाही. एक बोट दाबायचं आणि माणसाला कायमचं लुळं पाडायचं. मग आपण ती विद्या मेधालाही शिकवू. असं बराचवेळ काहीबाही रंगवत बाबुअण्णाचं विचारचक्र चाललं. त्याला अचानक ब्रेक लागला तेव्हाच जेव्हा त्याला बाजुच्या कारमध्ये एक टंच मुलगी दिसली. एकटीच गाडी चालवत होती. मिडी घातला होता आणि गोर्‍यापान मांड्या दिसत होत्या. आजचा दिवस एकंदरीत चांगलाच होता. बाबुअण्णाची आता त्या कारशी आपला टेम्पो समांतर ठेवण्याची धडपड सुरु झाली. तेवढाच नजरेला शेक. बराच वेळ त्याने आपला टेम्पो बरोबर ठेवला होता पण नंतर त्या बयेने गाडी उजवीकडे वळवली. "हॅट..." बाबुअण्णा वैतागला. साला ह्या बाया असे कपडे घालणार आणि मग यांच्यावर बलात्कार होणार नाय तर काय होणार? आपली मेधा कसे अंगभर कपडे घालते. तिचे नख तरी दिसेल का? त्याला पुन्हा मेधाची चिन्ता वाटु लागली. आजकाल त्यांच्या कॉलेजने कसलातरी सर्वे करायला काढला आहे. या मुली कुठे कुठे त्यासाठी भटकत असतात. कॉलेजवाल्यांना काय अक्कल? आजकाल पुरुषांची नजर किती वाईट झालीय. बाबुअण्णाच्या अचानक लक्षात आले त्या बयेच्या नादात आपण नेहेमिचा ढाबा ओलांडून पुढे आलो. तो आणखि वैतागला. त्या बयेमुळे आता जेवणाचे वांधे. नेहेमिच्या ढाब्यावर मस्त तळलेले झिंगे मिळत. शेंगदाण्यासारखे खात खात जायचे. पण आता शक्य नाही. बाबुअण्णाने वळवुन एका हॉटेलसमोर टेम्पो थांबवला. टेम्पोतुनच त्याने पोर्‍याला हाक मारून चिकन मुगलाई आणि पराठ्याची ऑर्डर दिली. ते पोर म्हणत होते "अंदर आओ ना सेठ अपना सब इंतजाम है" त्याने अंगठा तोंडाकडे नेला. त्याच्या चेहर्‍यावर बेरकी भाव होते. बाबुअण्णाने नकार दिला. त्या पोराला काय माहित आपल्याला टेम्पोत चढताना टेकू लागतो. उगाच एकट्याला धडपडावे लागेल. आणि तत्त्व म्हणजे तत्व. दारु पिऊन गाडी चालवायची नाही.

चिकन मुगलाई चांगलं होतं. बाबुअण्णाने पुन्हा एक डिश मागवून पोटाला तडस लागेस्तोवर ते चापलं आणि पैसे देऊन पुन्हा त्याचा टेम्पो भरधाव सुटला. दुपारची उन्हं उताराला लागताना तो रिसॉर्टेच्या जवळ आला. रिसॉर्ट मुख्य रस्त्यापासून थोडं आतल्या बाजुला होतं. आणि या रस्त्याला बरीच झाडं झुडपं होती. आत आलं कि कुठल्यातरी वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटत असे. गर्दझाडीच्या सावलीने आणि हवेने सुखावलेला बाबुअण्णा वेग कमी करून टेम्पो हाकु लागला. आणि थोड्याचवेळात राकेश रायचंदचं टुमदार रिसॉर्ट समोर दिसु लागलं. टेम्पो मागल्या बाजुला न्यायचा होता. त्याप्रमाणे अगदी हळुहळु त्याने टेम्पो मागच्या रस्त्याला घ्यायला सुरुवात केली. त्याची नजर अचानक समोर गेली आणि त्याच्या पोटात खड्डाच पडला. गेटमधून मेधा बाहेर पडत होती. केस विस्कटलेले, अवतार झाला होता. चेहर्‍यावर चीड...बाबुअण्णाला क्षणभर काही कळेचना. पण त्याला दोन अधिक दोन चार करायला वेळ लागला नाही. त्याचं सारं अंग थरथरु लागलं. कपाळावरची शीर थडथाड उडु लागली. म्हणजे माझ्या सोज्वळ पोरीला राकेश रायचंदने...शी...! त्याच्या डोळ्यात लालबुंद जाळ पसरला. तो धडपडत उठला .." ए हरामखोर..साल्या दोस्ताच्या पाठीत सुरा खुपसतोस...सोडणार नाय तुला...कापून काढीन...." बाबुअण्णा जोरात ओरडला. तो ओरडला खरा पण प्रत्यक्ष त्याच्या तोंडातून "अ‍ॅअ‍ॅअ‍ॅअँ ऑऑऑऑ..र्र र्रर्र्.." असे निरर्थक चित्रविचित्र शब्द बाहेर पडले. त्याच्या शरीराची उजवी बाजु अचानक लुळी पडल्यासारखी झाली. त्याला उठता येईना. चेहरा वेडावाकडा होऊ लागला. पण त्याला बाहेर येण्यासाठी उठता येईना. उजव्या हातही उचलता येईना. कुणाला हाक मारावी तर तोंड वाकडे झालेले. बाबुअण्णाने कसोशीने धडपड सुरु केली पण उपयोग झाला नाही. तो आतमध्ये तसाच निपचित पडला.

....मेधा वैतागुन बाहेर पडली होती. खरं तर सर्वेसाठी हा एरीया तिचा नव्हताच. पण तिची जिवलग मैत्रिण निशाने तिला आज येथे येण्यासाठी गळ घातली होती. निशाला अचानक काही काम निघाले होते. मेधा तयार तर झाली. पण ती या भागात कधीच आली नव्हती. नेमकं रिक्षावाल्याने भर उन्हात खुप आधीच उतरवले होते. म्हणाला जवळच आहे. आणि एवढी पायपीट झाली. घामाच्या नुसत्या धारा वाहिल्या. केसांची वाट लागली. जाईपर्यंत नुसता अवतार झाला होता. आणि त्यात कळस म्हणजे ज्याच्याशी बोलायचे तो राकेश रायचंद आज आलाच नव्हता. व्हॉट नॉनसेन्स! यायचं नाही तर निदान कळवायचं तरी. एवढी अपॉईंटमेंट घेतली होती. बरं आत जाऊन त्याच्याबद्दल विचारलं तर त्या सगळ्या बाया काही न बोलता एकमेकींकडे पाहात खिक्क करून हसल्या त्याने तर मेधाच्या डोक्यात तिडीक गेली होती. मग त्या सेक्रेटरी बयेने सांगितलं की वडीलांची तब्येत अचानक बिघडली म्हणून साहेबांनी येणं रद्द केलं होतं. हा राकेश रायचंद काळा कि गोरा हे ही मेधाला माहित नव्हतं पण तिने मनातल्या मनात त्याला शिव्या घातल्या. आता अंधार पडायच्या आत लवकर रिक्षा मिळावी म्हणून मुख्य रस्त्याकडे येण्यासाठी तिची पावले वेगाने पडू लागली. एकंदरीत आजचा दिवसच वाईट होता....

ऑर्फियस

पहिला भाग
https://www.maayboli.com/node/69818

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पहिला भाग खुप मोठा वाटला म्हणून दुसरा केला. पण या पुढे कथा मोठी झाली तरी एकाच भागात टाकावी असं वाटतंय.

माफ करा! हा नक्की अंतीम भाग आहे? कथा जरा आणखी फुलवायला हरकत नव्हती, त्यामुळे मला शेवट जरा विस्कळीत वाटतोय. पहील्या भागाच्या तुलनेत फारशी पकड घेत नाही.

ऑर्फिअस
आपण छान लिहिता
फक्त ही कथा २ भागात नको होती
सलग वाचताना तिचा परिणाम मस्त जमलं असता

> पण या पुढे कथा मोठी झाली तरी एकाच भागात टाकावी असं वाटतंय. > स्क्रोल डाऊन करत ४-५ पानं यापेक्षा जास्त मोठे लेख, कथा एकाच भागात टाकू नये हे मा वै म....

अरे मस्तच!
पहिला भाग वाचुन बांधलेल्या सगळ्या अंदाजांना तडा. आवडलीच.
लिहित रहा.

आवडली कथा

पहिला भाग वाचुन बांधलेल्या सगळ्या अंदाजांना तडा. +१

पण या पुढे कथा मोठी झाली तरी एकाच भागात टाकावी असं वाटतंय ह्या बाबत 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' ही उक्ती अंमलात आणावी.

आवडली कथा.

शेवट संक्षिप्त केलात हे आवडलं .
पुढील लेखनाला शुभेच्छा>>+१

मस्त! आवडली कथा
पहिला भाग वाचुन बांधलेल्या सगळ्या अंदाजांना तडा. +१