जंतर मंतर

Submitted by चैतन्य दीक्षित on 3 May, 2019 - 07:46

तिन्हिसांजेला कळून येइल
गडद्द काळी होइल रात्र
तुझ्याच अर्ध्या कथानकातिल
पहाट होइल सुदुष्ट पात्र!

मंतरल्या डोळ्यांत तिच्या बघ
वश झाल्यागत उठून बस तू
जार तिचा उगवेल दिवस मग
खडा पहारा भोगिल वास्तू!

तुझ्या मनाची विहीर गहिरी
गिळून टाकिल रहाट, कळशी
मध्याह्नीच्या मस्तकातुनी
उठेल ढळती बारिक कळशी!

पुनश्च झाडांच्या फांद्यांतुन
सोनेरी पाडीत सावल्या
दबा धरुन बसलेली, कातर
तिन्हीसांज आणील बाहुल्या.

लळा गळ्याशी येण्याआधी
पुढील अर्धे लिहायला घे
पहाट पुन्हा येण्याआधी
अपूर्ण कळशी भरायला घे!

~ चैतन्य

Group content visibility: 
Use group defaults