©जिजी

Submitted by onlynit26 on 3 May, 2019 - 00:55

©जिजी

" ते काही नाही, आपण दुसरीकडे राहायला जायचे." मनोज बेडरूमचे दार लावल्यावर म्हणाला.
" अरे पण बाबांचा काय त्रास आहे तुला? अक्षता त्याची समजूत काढत म्हणाली.
" तू बघतेस ना, मला प्रत्येक गोष्टीवरून बोलत असतात. आता मी काही लहान आहे का?" मनोज अजून वैतागलेलाच होता.
" तुला काय वाटते, माझी आई मला काही बोलत नाही? तिचा रोज फोन असतो मला. हे कर. असं कर ,तसं कर. कसं आहे ना मनोज, आपल्या आई वडीलांना जोपर्यंत आपण आई वडील होऊन एका आईबापाची काळजी काय असते ती आपल्याला कळत नाही तोपर्यंत ते आपल्याशी असच वागतात." अक्षता म्हणाली.
" असं काही नसतं, म्हणजे आपल्याला मुलं झाली कि ते बोलणार नाहीत का आपल्याला?" मनोज चेहरा उडवत म्हणाला.
" खरं तर ते वावगं असं काहीच वागत नाही आहेत. फक्त तू समजून घ्यायला कमी पडतोयस."
" ये, हे जास्त होतयं हा, म्हणजे मला काहीच कळत नाही. तुम्हालाच सगळं कळतं."
" असं नाही तू बाप झाल्यावर तुला कळेल."
" हं " मनोजने तुच्छतापूर्वक हूंकार भरला.
अक्षताला कळून चुकले कि आता मनोजला जास्त बोलून काही उपयोग नाही.
ती कुस बदलून झोपेची आराधना करू लागली.

तिला झोप काही येत नव्हती. मनोजचे बाबांच्या स्वभावाचे दर्शन तिला लग्नाच्या दिवशीच आले होते. त्याच दिवशी तिने त्यांना आपले बाबा मानले होते. तो प्रसंग आजही जशाचा तसा तिला आठवत होता.
लग्न लागून गेले होते. अक्षता रिसेप्शनसाठी तयार होत होती. थोड्यावेळाने ती बाहेर येणार होती इतक्यात तिचे बाबा तिला बोलवायला आले. तिला एका बाजूला घेतले.
" अगं अक्षू , तू तूझं एटीएम कार्ड आणलयं का?"
" हो, आहे माझ्या पर्समध्ये. का ? काय झालं?"
" बेटा लग्नात माणसे वाढल्यामुळे जेवनाचे बजेट वाढले आहे, त्यामुळे जास्तीचे पैसे लागणार आहेत."
" पण बाबा माझ्या खात्यात जेमतेम दोन हजार असतील ओ."
" हो काय. बघतो कायतरी. " असं बोलून ते घाईघाईत तिथून निघाले. बाबांच्या चेहऱ्यावरील काळजीचे तिने सावट तिने जवळून पाहिले.
ती हतबल झाली होती. ती आपल्या खोलीकडे परतली. काही तयारी बाकी होती.
थोड्यावेळाने तिचे सासरे -जिजी तिला भेटायला आले. त्यांनी ती स्टेजवर जाण्यासाठी बाहेर पडत असतानाच तिच्या हातात एक लिफाफा ठेवला.
" बाबा काय आहे हे."
" काही पैसे आहेत, ते तुझ्या बाबांना दे."
" नाही बाबा, मी नाही घेऊ शकत हे पैसे."
" बेटा तूच घेऊ शकते, तुझे मानी बाबा ते कधीच घेणार नाहीत म्हणून तुझ्याकडे देतोय. मघाशी मी त्यांना म्हणखलो देखील कि हॉलचे जादा लागलेले पैसे मी भरतो, पण ते ऐकले नाहीत म्हणून तुझ्याकडे देतोय"
" पण बाबा?"
" बेटा मी तुमचे बोलणे ऐकलेय. एका बापाची काळजी मी समजू शकतो. नाही म्हणू नकोस. हवंतर मैत्रिणी कडून घेतले असे बोल." असे बोलून जिजी तिथून निघून आले.

सासूबाई लग्नापूर्वीच सोडून गेल्यामुळे आता साऱ्या घराची जबाबदारी अक्षतावर पडली होती. कुटुंब जरी लहान असले तरी सगळ्या जबाबदाऱ्या अक्षतालाच पार पाडाव्या लागत होत्या. जिजी मनोजच्या काहीश्या मनमानी स्वभावामुळे काळजीत असायचे.
आता लग्न होऊन जेमतेम चार वर्षे झाली होती आणि मनोज स्वतंत्र राहायचे म्हणत होता. अक्षताचे मन याचा विचारही करू शकत नव्हते. अशी गोष्ट मनोज करत होता.

अशातच एक सुंदर गोष्ट मनोज आणि अक्षताच्या जीवनात आली. अक्षताला दिवस गेले होते. सगळ्यांनाच आनंद झाला. सासरे तर अक्षताला जपायला लागले. अक्षताला वाटायचे ते आईच्या मायेने सासूबाईंचीच भूमिका पार पाडत आहेत. पण हे सारे मनोजला उमगत नव्हते. त्याला बाबांचा हस्तक्षेप नको होता. एक दिवस तर त्याने कहरच केला.
" तुम्ही आमच्यामध्ये नाक खूपसू नका, तिला माहीत आहे मूल कसं वाढवायचं ते." मनोज असं म्हणाल्यावर बाबा काही न बोलताच तिथून निघून गेले.
अक्षताला खूप वाईट वाटले. मनोजचा खूप राग आला. अक्षता बाबांच्या खोलीत आली तेव्हा जिजी बॅग भरताना दिसले. तिच्या काळजात धस्स झाले.
" बाबा, काय करताय हे."
" काही नाही पोरी. आक्काकडे चार दिवस राहून येतो. तिथून आपल्या गावच्या घरी पण जातो, मला तेवढाच बदल आणि तुम्हालाही."
" बाबा, आम्हाला काहीच अडचण नाहीये, तुम्ही हवे आहात आम्हाला."
" अक्षू, मला ना आता खूप जगलोय असं वाटू लागलंय. आता फक्त नातीचे तोंड पाहीले कि मरायला मोकळा"
" बाबा, काय बोलताय हे? " असे बोलून त्यांच्या तोंडावर हात ठेवला.
" देशील मला नात?"
" हो , पण नातच का? नातू का नको?"
" मनोजला म्हातारपणी कोण पाहील गं? नातू मनोजसारखा वागला तर? मला आज वाटतंय, आम्हाला एक मुलगी हवी होती. "
" मग मी कोण आहे? किती विचार करता बाबा. मी समजावते मनोजला. तो जे आज वागला ते चूकीचे आहे."
" नको समजावू, त्याचे म्हणणे बरोबर आहे. त्याला फक्त माझे बोलणे नकोय. तुला माहीत आहे, हाच मनोज लहाणपणी मी गोष्ट सांगितल्या शिवाय अजिबात झोपत नसायचा. माझा आवाज, माझी बडबड त्याला कायम हवी असायची. खूप हळवा होता तो. नंतर इंजिनिअरिंगसाठी बाहेर राहीला तो पूर्ण बदलूनच गेला. घरी आल्यावर घुम्यासारखा असायचा. आम्हाला उलट उत्तरे द्यायचा. त्याची आई हार्ट पेशंट त्यात याचे हे वागणे, यामुळे तिचे दुखणे बळावत गेले. तिने तसं बोलूनही दाखवलं. आपला मनोज बदललाय. मी त्याला समजावून सांगायचो. तो तेवढ्या पूरते ऐकायचा. याच्या अशा वागण्याचा धसका घेऊन कि काय.. तिने राम म्हटला. तो त्यावेळी पुण्यात होता. नंतर त्याचे लग्न करताना वाटले तुला आम्ही फसवत तर नाहीये ना?
अक्षू एक विचारू? "
" हा बाबा , विचारा."
" तुझ्याशी तरी नीट वागतो का?"
" हो." तिच्या अस्पष्ट हो ने जिजी काय समजायचे ते समजले. इतक्यात अक्षताचा मोबाईल वाजला. मनोजचाच फोन होता. बाबांना इलेक्ट्रीसिटीचे बिल भरायला सांगण्यासाठी कॉल केला होता.

'तुझ्याशी तरी नीट वागतो का? ' हे सासऱ्यांचे वाक्य तिच्या कानात दिवसभर घुमत राहीले.

जिजी दुसऱ्या दिवशीच आक्का (त्यांची बहीण ) कडे निघून गेले. अक्षताला मनोजमधला फरक जाणवला. तो खूश होता. अक्षता मात्र अपराधी भावनेत होरपळत होती. अक्षता आपले मन आपल्या आईकडे मोकळे करायची. या सगळ्या प्रकारात तिला खूपच त्रास झाला होता. मनोज विरोधात ती एक ही शब्द काढू शकत नव्हती. शिवाय समजावण्याचा पलीकडे त्याचे वागणे गेले होते. तिची आई समजूत काढायची. शिवाय पोटात एक जीव वाढत होता. त्यासाठी तरी तिला खूश राहायचे होते.

एक मनोज ऑफिसमध्ये गेला असताना जिजींचा फोन आला. अक्षताला खूप बरे वाटले. ते गावी गेल्यापासून काहीच खूशाली समजली नव्हती.
" बाबा कसे आहात."
" मी मस्त मजेत आहे. मनोज कसा आहे?" मनोजचे त्यांच्याविषयी वागणे माहीत असूनही त्यांनी मनोजची विचारणा केल्यावर परत एकदा अक्षताला जिजींविषयी आदर वाढला.
" तो बरा आहे?"
" तू? आणि आमची छकूली कसे आहात?" ते लाडात येऊन म्हणाले. मुलामुळे गावी जाऊन राहावे लागले याबद्दल त्यांच्या मनात तीळमात्रही तक्रार दिसत नव्हती.
" मी बरी आहे आणि छकुलीची हालचाल वाढलीय."
" अरे वा, मजा आहे एका माणसाची."
" कसली मजा बाबा? तुमची खूप आठवण येतय ."
" पोरी माझी कसली आठवण काढतेस? माझ्या नातीला जप. मी तुझ्या आईला यायला सांगितलंय."
" कुठे?"
" तुमच्या घरी. तुझी काळजी घ्यायला."
" बाबा." तिचा कंठ दाटून आला होता. जिजीनी स्वतःच्या मालकीचे घरही मनोमन दोघांना देऊन टाकले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी विषय बदलून अक्षताला हसायला भाग पाडले. अशा त्यांच्या मनोज नसताना तासनतास गप्पा चालायच्या. अक्षतासाठी जिजी हे आई, बाबा, मित्र सारं काही तेच होते. चार दिवसांनी अक्षताची आई तिच्याकडे राहायला आली. दिवसांमागून दिवस गेले. अक्षताच्या ओटीभरण कार्यक्रमासाठी जिजी आले. तिला खूप आनंद झाला. ती माहेरी जायला बाहेर पडली तसे तेही गावी जायला निघाले. मनोजने एका शब्दाने त्यांना अडवले नाही. फक्त जाण्यापूर्वी तो एक मात्र बोलून गेला.
" बाबांना एकटे राहायचा सराव होतोय ते बरंच आहे" अक्षताच्या जवळ पूटपुटलेले वाक्य जिजींनी ऐकले होते. ते काहीच बोलले नाही. मनोजने मागच्या महिन्यातच घर बुक केले होते ते अक्षता आणि त्यांना दोन दिवसापूर्वी कळाले होते. अक्षता आतून तुटून गेली होती. तिला वेगळे राहायचे नव्हते. जिजींनी त्यांच्या नातीसोबत काही क्षण घालवावेत असे वाटत होते. जिजींना नवीन घरात घेऊन जाण्याविषयी मनोजकडे बोलायला ती घाबरत होती. मागे एकदा असचं तिने विषय काढला होता तेव्हा मनोज तिला खूप बोलला होता.

काही दिवसांनी अक्षताच्या उदरी एक सुंदर मुलगी जन्माला आली. सर्वप्रथम तिने जिजींना कळविले. जिजी धावत मुंबईला आले. तिला, इवलासा जीव उचलून घेतलेले जिजींचे हात थरथर कापताना दिसले. जिजींची तब्येत खालावली होती. ते खूपच थकले होते. बोलताना धाप लागत होती.
" बाबा, तुम्हाला बरं नाहीये का?"
" अगं, जरा खोकला झालायं." खोकल्याची उबळ आली तसे बाजूला झाले..
बारसा अक्षताच्या माहेरी झाला. बारश्यापर्यंत थांबून जिजी गावी निघून गेले.
थोड्या दिवसानी अक्षता घरी आली. ती उर्वीच्या बाललीलांमध्ये रंगून गेली. जिजींशी फोनवरील बोलणे कमी होऊ लागले. एक दिवस जिजींचा फोन आला पण लाईनवर जिजी नव्हते तर जिजींच्या गेल्याची बातमी होती. अक्षता जाग्यावरच कोसळली. तिने स्वतःला सावरून मनोजला कॉल केला. लगेचच सगळे गावी जायला निघाले.

सर्व अंत्यविधी सोपस्कार आटपून मनोज घरी आला. आंघोळ करून झाल्यावर शेजारच्या माईंनी लाल मिरचीची चटनी आणि उकडीचा करडा भात खायला दिला. सारे काही शांत होते. फक्त माईंची तेवढी जिजींच्या चांगुलपणाविषयी बडबड चालू होती. कधी नव्हे ती छोटी उर्वी खूप रडत होती. अक्षता तिलाच थोपवत होती. इतक्यात मनोजने जोरात हंबरडा फोडला. ताटातील भात मिरचीच्या चटनीसोबत बकाबका खात तो रडू लागला. त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता. माई त्याला पोटाशी धरून सांत्वन करू लागली.
" अक्षता ,आपल्या अगोदर बाबाच आपल्याला सोडून वेगळे राहायला गेले गं."
असे बोलून ओक्साबोक्शी रडणारा मनोज अक्षताला वेगळाच भासला. अक्षता मनोजजवळ येऊन त्याला धीर देऊ लागली. बापाचा आवाज ऐकून की काय छोटी उर्वी रडायची थांबली होती. तिने नकळत मनोजचे एक बोट पकडले. त्याने चमकून छोट्या जीवाकडे पाहिले. आपणही असे जिजींचे बोट पकडून बालपण मिरवले असेल आणि त्याबदल्यात त्यांना काय दिले? एकाकीपण ? त्याला परत एकदा हूंदका आवरेणासा झाला.
" अक्षू मला बाबा हवे आहेत गं , मी त्यांना कधी समजूच शकलो नाही." एका मुलीचा बाप एखाद्या लहान मुलासारखा रडू लागला. त्यांना इकडेतिकडे शोधू लागला. जिजी मात्र केव्हाच स्वतंत्र राहायला गेले होते .

समाप्त..
© या लघुकथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन दशरथ राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - बदलापुर (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
दिनांक - ०३.०५.२०१९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नितीन छान कथा.. अगोदर चांगला असलेला मनोज शिक्षणासाठी बाहेर गेल्यावर असा का चेंज होतो? इथे काहि कधेचा ट्विस्ट होता का? बदलाचं कारण कळायला हवं होतं म्हणजे त्याचं ते वडिलांबरोबरचं वागणं पटलं असत.
कथा छान असतात तुमच्या ...सगळ्याच ..अगदि सर्वसामान्यांमधील लोकांच्या.. Happy

Pages