जोडीदार

Submitted by VB on 1 May, 2019 - 02:15

प्रियाचा आज ऑफिस मध्ये पहिला दिवस होता. मनात धाकधूक होतीच. आत्तापासून खरे अर्थाने आयुष्याला सुरुवात होणार होती, सो, बरीचशी हुरहूर सुद्धा वाटत होती. नुकतीच टी. वाय ची परीक्षा दिली होती, रिझल्ट पण लागायचा बाकी होता अजून, पण तिच्या पप्पांच्या ओळखीने काही स्ट्रगल न करता नोकरी मिळाली होती, सो खूप खुश होती ती.
पहिला दिवस असल्याने, पप्पा आले होते सोबत. ऑफिस दाखविले, तिच्या मॅनेजरशी स्वतः बोलले अन मगच गेले ते. जोवर पप्पा सोबत होते, प्रिया खूप उत्साही होती, पण ते गेल्यावर थोडी कावरी बावरी झाली ती. तिची बॉस खूप छान होती , अगदी पहिल्या भेटीत आवडली ती प्रियाला. पहिले काही दिवस फक्त ट्रेनिंग घ्यायचे होते अन मग हळूहळू कामाला सुरुवात. छान वाटत होते प्रियाला, त्यात ती तिथे वयाने सगळ्यात लहान असल्याने, सगळेच जपत असत तिला.
दिवस जाऊ लागले, तशी प्रिया स्थिर झाली तिथे, चांगलाच जम बसला तिचा. तिचा खोडकर, हसरा स्वभाव, सगळ्यांशी आपुलकीने वागणे, त्यामुळे लवकरच सगळ्यांची लाडकी झाली होती ती.
सगळे म्हणजे ती ज्या डिपार्टमेंट मध्ये ज्यांच्यासोबत काम करायची ते अन जे दुसऱ्या डिपार्टमेंटचे होते ते पण. त्यांच्यांतला एक अमित होता. त्याला आवडली होती प्रिया, अगदी पहिल्या भेटीत.जरी त्याने तसे कधी बोलून दाखविले नाही, तरी ते जाणवे. म्हणतात न की खरे प्रेम असले की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला ते आपल्या डोळ्यात दिसते, अगदी तसे. सुरुवातीला प्रियाला काही जाणविले नाही, पण हळूहळू त्याच्या भावना लक्षात येऊ लागल्या होत्या तिला. तरी कधीही तीने त्याला जाणवू दिले नाही की तिला ते कळलंय. तिची काळजी घेणे, तिला काही हवे नको बघणे, तिचे मूड स्विंगस सांभाळणे. सगळे काही करायचा तो तिच्यासाठी, अन तेही अगदी हळुवारपणे. त्याचे तिच्यावर ओझे होणार नाही असे. प्रियालाही तो खुप आवडायचा, पण तिची बंधने तिला माहीत होती. प्रेमात  पडण्याची मुभा तिला नव्हती. सो, कितीही इच्छा असली तरी ती त्याच्याशी थोडे अंतर ठेवूनच वागे.
पण म्हणतात न की बंधनात अडकेल ते प्रेम कसले? प्रेम तर बस होऊन जाते, आपल्याही नकळत आपण त्याचे होऊन जातो. असेच झाले होते तिचे, तिला कळलेच नाही कधी ती अमितवर जीवापाड प्रेम करू लागली. तिने न सांगता न बोलता त्याला कळे, अन त्याचे तिला. बरेचदा ती विचार करी की हे नक्की प्रेम की आकर्षण? काही असले तरी आपल्याला वाहवत जायचे नाही हे नक्की, असे तिने स्वतःच ठरवले होते.
त्यातच एक दिवस असा उगवला. प्रियाला एक महत्त्वाचा रिपोर्ट बनवायचा होता, त्यात तिची मॅडम देखील रजेवर होती. प्रियाला उशिरापर्यंत थांबायची सवय नव्हती. ,पण आज त्याला पर्याय नव्हता.  संध्याकाळ होऊ लागली तसे एकेक जण घरी जायला लागले. अमितचे ही काम झाले होते,  पण प्रिया एकटी थांबणार म्हटल्यावर, काही न काही निमित्त काढुन थांबला तो. आता बऱ्यापैकी उशीर झाला होता, अन उरले होते फक्त अमित अन प्रिया. अजून बावचळली ती, घाबरली देखील. त्यामुळे कामाला अजूनच उशीर होत होता. काय करावे काही कळत नव्हते. तितक्यात अमित आला तिथे, तिचा हात हातात घेऊन, तिला शांत करत , तिला आश्वस्त केले त्याने की तो आहे, थांबलाय तिच्यासाठी. काय  नव्हते त्या स्पर्शात. सगळेच तर होते, मी आहे, सदैव तुझ्यासाठी, तुझ्या करिता अन बरेच काही. हा, जर काही नव्हते त्यात तर ती वासना. अचानक सारे बदलले. क्षणापूर्वीची सगळी भीती निघून गेली होती.  तेव्हा त्याच्या डोळ्यात पाहता क्षणी तिला जाणविले की तो अगदी तसाच आहे, जश्या जोडीदाराची स्वप्ने बघितली होती तिने. अन आज तिचे ते स्वप्न पूर्ण झाले होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन्या, मला वाटते तुम्ही गल्ली चुकलात

ही कथा वेगळी आहे, अन खूप आधी पोस्ट केलीये. पण बहुतेक कुणाला आवडली नाही☺️

चालायचे, तसेही मी काही लेखिका नाही न की माझ्यात काही लेखन कौशल्य आहे. कधी कधी क्षणात जे सुचते अन हाताशी वेळ असेल तर ते लगेच उतरवते,

VB.खरंच कि मी गल्ली चुकलेच होते.ती कथा ह्याच कथेचा पुढचा भाग आहे.हे आता नीट वाचल्यावर कळतंय.आहे न् पुढचा भाग?
तुम्ही लिहीत चला. मला आवडेल वाचायला. पु.ले.शु!

चांगले लिहीलेत Happy

ते 'जोडीदार' च्या ऐवजी मी सारखे ' चौकीदार' च वाचतेय. Lol

आभारी आहे सर्वांची☺️

ती कथा ह्याच कथेचा पुढचा भाग आहे.हे आता नीट वाचल्यावर कळतंय.आहे न् पुढचा भाग?>>> नाही, खरंतर माझ्या ज्या काही थोडया फार कथा आहेत त्यातील बऱ्याचशा कथा प्रिया अन अमितच्या आहेत

ते सर्व एकेक क्षण होते, त्यामुळे कुठलीच कथा क्रमशः किंवा भाग नाही.

ओह... अमित आणि प्रिया या ची एक गोष्ट आधी वाचली आहे तुम्हीच लिहिली आहे म्हणून ही वाचल्यासारखी वाटत होती.
सोबत.

च्रप्स Happy

दिपक ०५ , गूढ शुभांगी, - Thanks Happy

चालायचे, तसेही मी काही लेखिका नाही न की माझ्यात काही लेखन कौशल्य आहे. कधी कधी क्षणात जे सुचते अन हाताशी वेळ असेल तर ते लगेच उतरवते,>>>>>>>>>>

लिहत राहा आणि तुम्ही छान लिहतायेत..लोकांना आवडो वा नावडो ..
पण लिहा.. तुम्हाला लिहायला आवडत ना मग बसं झालं...पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत. .

अजय चव्हाण , Thanks ☺️

जर काही मनी आले तर उतरवते मी , फक्त सगळे इकडे टाकत नाही