घालीत गस्त आहे

Submitted by निशिकांत on 1 May, 2019 - 01:20

(कामगार दिनानिमित्त लिहिलेली गजल)

दिन रात राबतो मी थकलोय त्रस्त आहे
भडकून भूक पोटी घालीत गस्त आहे

ना संघटन तयाचे वाली तया न कोणी
अपुल्याच मायदेशी झाला परस्त आहे

विकण्यास घाम आहे कवडीत मोल त्याचे
अब्रू खरीदण्याला मंडी समस्त आहे

घेवून फास मेला चिठ्ठी खिशात होती
"सारे महाग येथे मरणेच स्वस्त आहे"

बाळास पाजण्याला पान्हा कसा फुटेना?
आयोग बसविलेला लिहितोय दस्त आहे

दौतीत घाम अमुचा त्यांचे नशीब लिहिण्या
उगवेल भाग्य त्यांचे अमुचाच अस्त आहे

त्यांना बहार बागा आम्हा स्मशान थडगे
निवडुंग भोवताली आयुष्य त्रस्त आहे

निवडून कोण आले? आम्हास काय त्याचे?
कमळात मिसळलेला दिसतोय हस्त आहे

आता तरी कळू दे "निशिकांत" सार तुजला
तुलनेत तू तयांच्या जगतोस मस्त आहे

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकण्यास घाम आहे कवडीत मोल त्याचे
अब्रू खरीदण्याला मंडी समस्त आहे

बाळास पाजण्याला पान्हा कसा फुटेना?
आयोग बसविलेला लिहितोय दस्त आहे

दौतीत घाम अमुचा त्यांचे नशीब लिहिण्या
उगवेल भाग्य त्यांचे अमुचाच अस्त आहे>>अगदी अगदी!

वास्तव! सगळेच शेर भारी!