फ्रेंच फ्राईज - कलपकाकांचा सर्जिकल स्ट्राईक

Submitted by मकरंद गोडबोले on 1 May, 2019 - 01:16

खानकाकांकडे आतंकवादी येतात, ही कलपकाकांची खात्रीच होती. वास्तविक खानकाकांनी तसा सोसायटीतल्या कुणालाच कधीच त्रास दिला नव्हता. म्हणजे नळावरची म्हणता येतील, इतकी काही माफक भांडणे सोडली, तर त्यांनी कधीच सोसायटितल्या कुणाशी साधे भांडणही केले नव्हते. अर्थात आता नळावरून भांडण व्हायचे दिवस गेले. नळकोंडाळे असा गोंडस शब्द असलेले रणांगण आता दिसत नाही. वास्तविक याला जळभूमी असे म्हणायला हवे. कोंडाळे कसले. रणांगणाला, रथकोंडाळे म्हटले तर कसे वाटेल? साक्षात वीरश्रीनी भरलेले, भावी योद्ध्यांना गर्भातच जलव्यूह भेदण्याचे नामी शिक्षण देणारी ही शिक्षणसंस्था घराघरात नळ आल्यामुळे पार कोलमडून पडली आहे. मराठी भाषेतील प्रतिशब्द आणि अपशब्द अशी दोन समर्थ अस्त्रे वाढवण्याचे काम आता संपुष्टात आले आहे. अस्सल प्रतिभा इथे फुल्ल सुटलेल्या नळासारखीच वहात असते, ती त्या बिचाऱ्या नुसत्याच उभ्या नळासारखी बंद पडलेली आहे. नल दमयंती हे लेखकाला, मराठी आईला तिच्या मुलानी सकाळी सकाळी केलेल्या, "आई, नळ…." या गजराला, ती "दम येते" हे उत्तर देते, याच्या वरूनच सुचले असावे. (लेखकाच्या प्रेमापोटी, अस्ले फालतू विनोदही सहन करावेत)
पण मराठी भाषा रांगडी करणाऱ्या सर्व शब्दांचे दालन प्रगल्भ करणारी, आणि कुठलेही सोशल मिडियाचे आस्तित्व नसताना बायकांना वेळ कुठे आणि कसा घालवायचा, याचा प्रश्नही पडू न देता, सरबत्ती नावाचा खास पुरुषांसाठी राखून ठेवलेल्या अस्त्राचा सरेआम सर्रास सराव उघडपणे करता येईल अशी ही स्पेशल जागा होती. कुठल्याही राष्ट्राचे, अशा न्यूक्लिअर टेस्ट करू नका, असे इथे येउन म्हणायचे धडस नव्हते. भारतानी वाळवंटात काय पोखरलं असेल, असे इथे रोज सांस्कृतिक पोखरण होते. (करा सहन) असा हा असोसल मिडिया आता आस्तित्वात नाही. निदान शहरात तरी नाही.
पण तरी पाणी हा विषय सोसायट्यांनी हातचा राखून ठेवला आहे. आता फ्रेंच फ्राईजमधे दोन इमारतीच त्यांच्या दोन वरच्या टाक्या, आणि त्यासाठी दोन पंप आहेत. हे दोन्ही पंप चालू करणे हे वाचमन नावाच्या इसमाचे काम आहे. हा इसम, शेजारी असणाऱ्या दोन बटणातले ए विंगच्या पंपाचे बटण हे जाणून बुजून आधी चालू करतो, हे भांडणाचे कारण होउ शकते का? तरी, बी विंगचे म्हणणे असे आहे, की त्यांच्याकडे मुद्दाम पाणी उशीरा सोडले जाते. आता सेक्रेटरी बी विंगीच आहे. जलनिस्सारण मंत्री पण बीविंगी. तरीसुद्धा त्या लोकांचे असे म्हणणे असते. हा मुद्दा मूलतः कुणाच्या डोक्यातून आला, याची आता गरज नाही, इतकी आता बीविंगनी या मुद्द्याला आपलेसे केले आहे. आपल्याला काहितरी कमी आहे, हे खरोखर कमी असण्यापेक्षा, नुसती भावना महत्वाची. त्यातून सोसायटितले एकमेव सर्टिफाईड अल्पसंख्यांक हे खानकाकासुद्धा बीविंगीच होते. त्यामुळे या युद्धात त्यांनी हिरिरिनी भाग घेतला होता. (ती कथा परत कधितरी). या प्रकरणात, दोन्ही टाक्यांवर, इंपर्स-नल पंच उभे करुन, त्यांच्यासमोर वेळ घेतली असता, बी विंगची टाकी दोनदा अर्धा मिनिट आधी भरली, तरी हे मुद्दामून कसे बरोबर याच वेळेला एविंगवाल्यांनी कट करून जमवून आणले, आणि पंपाच्या स्पिडशी काहीतरी चाळे करून आत्ताच नेमका तो पंप जोरात पाणि कसे फेकतो, आणि रोज कसा त्याचा अगदी बैलगाडी स्पिट असतो, असे त्यांच्यावर आरोप केले गेले. आणि हा मुद्दा अजून न सुटताच राहिला आहे. अधून मधून याच्यावर भांडण होते. त्यापेक्षा गंभीर आणि अटितटिची लढाई, ही लिफ्ट या मुद्द्यावर लढली गेली. खालच्या चार मजल्यांचे म्हणणे……
कळले असेलच तुम्हाला. सगळिकडे होत असतीलच. या लढाया. तर अशा किरकोळ लढाया सोडल्या तर खानकाकांनी कधीच कुणाशी स्पेशल वेगळे असे भांडण केले नव्हते. पण या लढाईत, खानकाका आणि कलपकाका यांचे मात्र खास स्पेशल भांडण झाले होते. ते ईतके गाजले की, नेहमी अशी भांडणे मागल्या दारानी स्वयंपाकघरात मिटतात, आणि खीर किंवा नारळी भात याच्या देवाण घेवाणिवर बायका शिताफिनी नवऱ्यांचे तह घडवून आणतात, हे सुद्धा यावेळी झाले नव्हते. या भांडणानंतर तर कलपकाकांची पक्की खात्री होती की खानकाकांकडे आतंकवादी येतात. मागच्या ईदला, त्यांनी तावरे काकांना पटवून, फक्त सोसायटिचे हित लक्षात ठेवून खानकाकांच्या घरात प्रवेश केला होता. आणि केवळ नाईलाज म्हणून शीरकुर्मा आणि बिर्याणि चापून आले होते. अर्थाच त्यांचे लक्ष त्या शीरकुर्म्याच अजिबात नव्हते, तर घरात कुणि अातंकवादी नाही ना याच्याकडे होते. त्यांना कुणिच न सापडल्यानी, त्यांना चरफडत परत जावे लागले होते. जायच्या आधी केवळ वेळ काढावा म्हणून त्यांनी चार पाच वेळा शीरकुर्मा चाखला होता.
पण या ईदला भांडणाच्या जोरावर, त्यांना पक्की खात्री होती की खानकाकांकडे आतंकवादी येणारच, याची. यावेळी तावरेकाकांनी यातले नवे मुद्दे समजून घ्यायला पूर्ण नकार दिला होता, वर त्यांनीच खानकाकांना ईदच्या दुसऱ्या दिवशी ब्लॅक डॅनियलचे आमंत्रण दिले होते. तसे कधी दारू न पिणारे खानकाका, तावरे काकांकडे ब्लॅक डॅनियल मात्र नियमितपणे घ्यायचे.
तावरे काका यांचेशी युती न झाल्यामुळे कलपकाकांना जग्गूशी युती करावी लागली होती. जग्गूला तयार करणे फार अवघड होते. एकतर त्याचे खानकाकांच्या बिर्याणी आणि शीरकुर्म्याशी अतूट नाते होते. फक्त तो लाजेकाजेस्तव ईदला जात नसे. दुसऱ्या दिवशी जात असे. त्याचे हेच वर्तन ओळखून, हा माणूस राष्ट्रवादी (पक्ष नव्हे वृत्ती) असणार, हे ओळखून त्यांनी त्याच्या राष्ट्रवादाला साकडे घातले, आणि त्याला तयार केले. अर्थात कलपकाकांची जशी तावरेंशी नाळ जुळते, तशी काही जग्गूशी नाही जुळत. पण इतके जोखमिचे काम करायला कुणितरी जवळ पाहिजे ना. म्हणून जग्गू तर जग्गू. ईदच्या रात्री हा हल्ला करायचा असे ठरले होते. सगळा हल्ला कसा करायचा, हे कलपकाकांनी नीट ठरवलेले होते. पुढची बैठकिची खोली सोडली, की आत स्वयंपाकघर येते. तिथे फ्रिज आहे, ही मोलाची माहिती कलपकाकांनी पुरवली. त्यानंतर बोळ असून त्या बोळितून तिन्ही शयनकक्षांना जाता येते. कलपकाकांची खात्री होती की त्यातले उजवीकडच्या शयनकक्षातच आतंकवादी असणार म्हणून. जग्गूला त्यांनी उरलेली दोन्ही शयनकक्षे बघायला सांगितली, आणि स्वतःकडे, मुख्य शयनकक्ष ठेवले. हे आतंकवादी आपल्याला गंडवायला बैठकिच्या खोलित सुद्धा झोपू शकतात हे कलपकाकांनी जग्गूला सांगितले. त्यामुळे सावधानता बाळगायची नितांत गरज होती.
तसा त्यांचा पिलान सोपा होता. रात्री ईदला चांद बघून जेवणे झाली की खानकाकांकडे सगळे दमणूक झाल्यामुळे लगोलग झोपतात. त्यामुळे त्यांना गाढ झोपेत जायला दोनेक तास देउन, मुख्य दरवाजावर सरळ हल्लाबोल करायचा, आणि मग एकेक खोली तपासून आतंकवादी शोधून काढायचे. आणि त्यांना शोधून शोधून….. नंतर काय करायचे हा प्रश्नच होता. आणि त्याचे उत्तर दोघांकडेही नव्हते. पण आपण आतंकवादी शोधले तर आपल्याला भांडणात खोयी हुई ईज्जत परत मिळेल असे मात्र या दोन्ही एविगिंना वाटत होते. त्यामुळे आतंकवादी मिळाले तर काय करायचे, अशा फालतू उत्तरे नसलेल्या प्रश्नांना त्यांनी फार थारा दिला नाही. खानकाकांच्या मुख्य दरवाजाच्या किल्लिचा छाप मिळवणे ही जबाबदारी अर्थातच जग्गूकडे होती. त्याचे सख्खे मित्र नाना बलकवडे, यांच्याकडेच तर खानकाकांच्या किल्ल्या असायच्या. त्यामुळे जग्गूने ही कामगिरी चोख बजावली होती.
ईदला खानकाकांकडे सगळा परिवार जमा होतो. चांद बघून जेवण करून सगळे निघतात. तरी जायला बारा साडेबारा होतातच. आपला हल्ला साधारण तीन वाजायच्या आसपास करुया, असे दोघांचे ठरले. खानकाकांच्या चुलतबंधुंचे दोन्ही चिरंजीव यावेळी आले होते. शाळेकडून क्रिकेट खेळणारे या दोन्ही बंधूंनी, सोसायटिच्या टिमची जी वासलात लावली होती, त्यावरुन तावरे काकांनी खरेच हे आतंकवादी असतील याची खात्री पटली. दोन गाड्यांचे मागे बघायचे कान यशस्वीरित्या तोडून, काही सायकली इतस्ततःवून, लिफ्ट ही केवळ खाली वर करणारी एक आगगाडी आहे, आणि त्याचे आपण कंडक्टर आणि ड्रायव्हर आहोत असे समजून, त्यांनी एकंदरीत बराच आतंक फैलावला होता. आपण कलपकाकांचे ऐकले नाही याचा आता तावरेंनी पश्चात्ताप होत होता. चांद बघायच्या वेळेला हे थोडे कमी झाले. नंतर बाराच्या जवळपास हे सगळे आतंकवादी खरेतर परत गेले. पण हे दाखवायचे आतंकवादी होते, खायचे….. आपले खरे आतंकवादी वेगळेच आहेत, याची कलपकाकांना पक्की खात्री होती. भांडणाचा स्वयंपाकघरातून तह झालेला नसल्यामुळे आपल्याला सरळ सरळ हल्ला करता येत नाही, आणि आतंकवाद्यांना नामोहरम करता येत नाही, याचा कलपकाकांना फार त्रास होत होता.
तरी ठरल्याप्रमाणे जग्गू कलपकाकांना, रात्री तीन वाजता, बी विंगेच्या लॉबीत भेटला. त्यानी कलपकाकांना हळूच किल्ली काढून दाखवली. कलपकाकांनी सुखानी मान डोलावली. आणि दोघांनी दबकत दबकत लिफ्टचे बटण दाबले. लिफ्टनी जोरात आवाज करून स्वतःचा या दबकण्याशी काही संबंध नाही हे दाखवले. दोघांनी घाबरून इकडे तिकडे बघितले. पण या आवाजाचे कुणालाच काही पडलेले नव्हते. वर जाताना परत लिफ्टनी यथेच्च आवाज केला. उतरताना परत तिनी, “द डोअर्स आर क्लोजिंग…..” वगैरे मंत्र म्हटलेच. अर्थाच याचा कुणालाच काही त्रास झाला नाही. हे दोघेच प्रत्येक आवाजाला घाबरत होते. खानकाकांच्या मजल्यावर, दोघेही उतरले. जग्गूने अगदी विश्वासानी खिशातून किल्ली काढली. आणि ती दाराला लावली. किल्ली अगदी सहज फिरली, आणि दार उघडले. त्यानी उघडताना आवाज केलाच. त्यामुळे दोघे परत थबकले. पण कुणिच उठले नाही. मग मात्र ठरल्याप्रमाणे जग्गू उजविकडच्या शयनकक्षात गेला. तिथे फक्त झरीनच आहे याची खात्री करून तो बाहेर आला. बाहेर आल्या आल्या त्याला, चप्प, भुर्रर्र, ओस्स असे विचित्र आवाज यायला लागले. त्या आवाजाच्या दिशेनी जग्गू जायला लागला….
त्याला जे दृश्य दिसले ते पाहून जग्गूला आपल्याला फसवले गेले आहे हे कळले. त्याला बराच राग ही आला. याचा वचपा कसा काढायचा हे त्याला कळेना. मग एकदम त्याने घराबाहेर जाउन दार बंद करून घेतले आणि जोरदार बेल वाजवली. तिच्यावरचा हात सोडलाच नाही.
रागावून खानकाकी बाहेर आल्या, आणि बाहेरचे दृश्य बघून काही वेळ चकीत झाल्या आणि मग हसत सुटल्या. तोवर खानकाका ही बाहेर आले. ते कलपकाकांना बघून आधी चिडले. पण कलपकाका, एका हातात बिर्याणिचे पातेले, तोंडात कोंबून भरलेली बिर्याणि, तोंडातून बाहेर आलेले शीरकुर्म्याचे ओघळ, आणि टेबलावर ठेवलेले शीरकुर्म्याचे पातेले बघून त्यांना काय कळायचे ते कळलेच, आणि ते मनापासून हसत सुटले. वर, खानकाकूंनी, “बैठिये चाचा, मै मायक्रोवेव्ह करके देती हू” असे म्हणून कलपकाकांना खुर्चित बसवले. खानकाकांनी दार उघडून जग्गूला आत घेतले. आणि हसत हसत, दोघांबरोबर परत टेबलावर बसले. ओशाळलेले कलपकाका, खानकाकांच्या या कृतिने भारावून गेले, आणि कुठलिही अनबन मनात न ठेवता, टेबलावर बसले. त्यांनी ही तहाची कलमे मंजूर केली.
अशा रितिने खानकाकांच्या घरातल्या आतंकवाद्यांचा कलपकाकांनी फडशा पाडला. चक्क.

Group content visibility: 
Use group defaults