आई, जपेन तुज प्राणाहूनी माझ्या...जन्मी जे ह्या राहिलेच ना...

Submitted by दत्तप्रसन्न on 29 April, 2019 - 20:49

करशील ना गं उपकार आई
ऋण काही ते फेडावया?
फिरोनि अजुनी जन्म घेऊ
आपण दोघे एकदा

होईन मी बाप तुझा बघ
हट्ट सारे पुरवावया
जपेन तुज प्राणाहूनी माझ्या
जन्मी जे ह्या राहिलेच ना

पाठीवरी बैसवूनी अलगद
रांगीन मी घोडा तुझा
पैंजणांचा नाद छनछन
होईल घरभर आपुल्या

सांगीन तुजला गोष्टी मजेशीर
चिऊच्या आणि काऊच्या
भरवीन हाताने घास माझ्या
जन्मी जे ह्या राहिलेच ना

देत राहीन संस्कार सर्वही
मागील जन्मी जे दिलेस मला
होशील हळूहळू मोठी जशी तू
होत जाईन गं मी सखा तुझा

वाहीन मी तो भार अवघा
सुखात तू राहण्या सदा
झेलीन तवश्रू ओंजळीत माझ्या
जन्मी जे ह्या राहिलेच ना

भेटेल तुज राजकुमार जेंव्हा
म्हणशील "बाबा थांब आता"
समजून घेईन मी सुद्धा मग
भावना तुझिया प्रीतीच्या

राहिलो जरी अलिप्त परी मी
धावुनी येईन संकटा
घाव झेलीन हासूनी निरंतर
जन्मी जे ह्या राहिलेच ना

सर्व सुरळीत तव पाहुनी घडी ती
उमजेन मी शहाणा तसा
समजेन माझ्या वार्धक्य खुणाही
सहज निवृत्ती घ्यावया

होशील पुन्हामग माउली तू माझी
वृद्धबाळा सांभाळावया
फेडू कसे मी तुझे ऋण सांग आता
ह्याही जन्मी जे राहिलेच ना

Group content visibility: 
Use group defaults

अप्रतिम !!!!!
खूप सुंदर व्यक्त केल्या आहेत भावना!!!

धन्यवाद!
आईस जाऊन २ वर्ष झाली, पण ती नाही असं अजूनही खरं वाटत नाही, तीचा पातळ आवाज, कातर स्पर्श जाणवत राहतो.
कॅन्सर सारख्या असह्य आणि वेदनादायी आजाराशी जवळ जवळ वर्षभर ज्या हिमतीने आणि हसतमुख राहून तीने सामना केला त्याला तोड नाही.
आई फार सुंदर कविता करायची, तो तिचा गूण तसा तिने लपवूनच ठेवला होता, मला तितकं चांगलं लिहता येत नाही, पण, तीच्या नुसत्या आठवणीने आतमध्ये खूप समाधान मिळाल्याचा अनुभव येतो, म्हणून सुचेल तसं लिहतो आणि तिलाच ते मनोभावे अर्पण करतो.

सर्वांचे मनापासून आभार! तुमच्या प्रतिक्रियांमुळे माझे भाव आई पर्यंत पोचतात असे मला वाटते.

होईन मी बाप तुझा बघ
हट्ट सारे पुरवावया
जपेन तुज प्राणाहूनी माझ्या
जन्मी जे ह्या राहिलेच ना>>>> ओह! किती सुंदर कल्पना.
खुप सुंदर कविता. आवडली.

होईन मी बाप तुझा बघ
हट्ट सारे पुरवावया
जपेन तुज प्राणाहूनी माझ्या
जन्मी जे ह्या राहिलेच ना>>>> ओह! किती सुंदर कल्पना.
खुप सुंदर कविता. आवडली.

सर्वांचे मनापासून आभार!

मला कविता लेखनाचा कोणताही पूर्वानुभव नाही, आईला कॅन्सरच निमित्त झालं आणि त्यातच २ वर्षांपूर्वी तीचं निधन झालं. ते दुःख उरामध्ये इतकं साठून राहिलं कि तिच्या आठवणीतूनच आपोआप सुचलेल्या काही कवितांच्या योगे ते बाहेर पडत असावं. आता ह्या कविता नुसत्या कविताच राहिल्या नसून माझ्या आणि आईच्या अंतरंग संवादातील एक अतिशय तरल असा दुवा झाल्या आहेत.

आई आणि मी काही वर्षांपूर्वी एकदाच लोकप्रिय कवि संदीप खरेंच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि नंतर योगायोग असा कि ती गेल्यानंतरच्याच mother's day ला संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या हस्ते ह्या कवितेला पारितोषिक मिळाले. ह्या निमित्ताने आई पर्यंत हि कविता पोचली आणि तिलादेखील ती आवडली असं मी मानतो.

सुरेख

होईन मी बाप तुझा बघ
हट्ट सारे पुरवावया
जपेन तुज प्राणाहूनी माझ्या
जन्मी जे ह्या राहिलेच ना>>>> ओह! किती सुंदर कल्पना.
खुप सुंदर कविता. आवडली.
>>>> +१

आईवर आतापर्यंत वाचलेली सर्वात सुंदर कविता.
खरंच. हे असे सुचणेच किती सुंदर आहे. यापूर्वी कुणीच असा विचार केला नसेल. तुमच्या प्रतिभेला सलाम

आई आणि मी काही वर्षांपूर्वी एकदाच लोकप्रिय कवि संदीप खरेंच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि नंतर योगायोग असा कि ती गेल्यानंतरच्याच mother's day ला संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या हस्ते ह्या कवितेला पारितोषिक मिळाले. > वाह . पारितोषिक मिळण्यासारखीच कविता आहे.

होईन मी बाप तुझा बघ
हट्ट सारे पुरवावया
जपेन तुज प्राणाहूनी माझ्या
जन्मी जे ह्या राहिलेच ना>>>> ओह! किती सुंदर कल्पना.
खुप सुंदर कविता. आवडली. >>>> +१