मतदानाचा दिवस

Submitted by Asu on 29 April, 2019 - 02:54

मतदानाचा दिवस

मतदानाचा दिवस होता
पोटापाण्याचा प्रश्नच नव्हता
म्हटलं, रसना तृप्त करावी
मस्त खाऊन झोप काढावी

रात्रभर जीव तळमळत होता
निवडणूक किडा वळवळत होता
मतदानाचे काही ठरेना
कीडा मनातला तोही मरेना

रात्र विचारात अशी गुदमरली
झोपेतच पहाट सरली
उशीरा उशीरा आंघोळ केली
खाऊन पिऊन ताणून दिली

झोपेचे पण सुख कुठले !
बापूजी, स्वप्नात प्रकटले
दरडावून मला म्हणाले
मताचे दान केलेस का रे?
मतदान पवित्र कर्तव्य आपले
सत् असत् विचार करावा
त्यानंतर त्राता ठरवावा

दचकून उठत मी म्हणालो
बापू, सत् असत् समजत नाही
सत असत् अंतर हटले
बापू तुम्ही डोळे मिटले
राजकारण्यांनी तुम्हां वटले

किंमत तुमची जशी वाढली
तुमच्या नावे हुंडी काढली
ज्यांनी त्यांनी तुम्हां वाटले
गोरगरिबांचे आधार तुटले

कळवळून मग बापू बोले
पक्ष माझा कुठला नाही
पक्षविसर्जन निर्णय माझा
कुणीच त्यास नाही मानले
त्याआधीच मज वर पाठविले
बढती होऊनि वरती गेलो
वरतून फक्त बघत राहिलो

नमन माझे त्या प्रशासकाला
निर्णय घेण्यां ठाम राहिला
बढती देवून जरी हटविला
आदर्शवाद त्याचा नाही हटला

तुझा तूच निर्णय घेई
माझेच मला समजत नाही
माळ घालण्या पुरता उरलो
वाटते आता अखेर सुटलो

बापूजींचे पुसता डोळे
नेत्र माझेही झाले ओले
अश्रू पुसून तडक उठलो
मतदानास्तव पळत सुटलो.

- प्रा. अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults