ऑल इज वेल

Submitted by निशिकांत on 27 April, 2019 - 01:07

---( संगणक, मोबाईलवर प्रचलित असलेले शब्द वापरून एखादी हलकी-फुलकी कविता करावी असा विचार केला; पण विषयाच्या गांभिर्याने पाठ सोडलीच नाही. आज अनुभवतोय की कवितेवर कवीची मनमानी चालतच नाही. ती बंडखोर असते. शेवटी बनलेली कविता जी मी मूळात योजिली नव्हती; ती अशी:- )

मृत्यू हल्ली दारावरची
दाबत असतो बेल
बंडखोर मी तरी सांगतो
जगास, ऑल इज वेल

दु:ख वेदना नको नकोशा
सर्व जगाला तरी
कुरुवाळत मी जोजवल्या त्या
सख्या सोयर्‍यापरी
सर्व सुखांचा केला होता
ओ.यल.यक्स. वर सेल
बंडखोर मी तरी सांगतो
जगास ऑल इज वेल

आभासी जगतात आजही
मस्त मस्त रंगतो
सुख जे मिळते, सर्वांना मी
आनंदे सांगतो
दु:ख रडाया वापरला ना
मेसेंजर, ई मेल
बंडखोर मी तरी सांगतो
जगास ऑल इज वेल

सुखे लिहाया संगणाकवर
नाही कुठला फाँट
खाचा, खळगे, मिळतिल काटे
अशी शक्यता दाट
केले रिफ्रेश, तरी न फुलते
आयुष्याची वेल
बंडखोर मी तरी सांगतो
जगास ऑल इज वेल

जिथे आहे मी तिथे चांगला,
ड्रॅग नका ना करू
हाक मारुनी मला बोलवा
गुगल नका वापरू
असून अ‍ॅक्च्यूअल शेजारी
व्हर्च्यूअलची जेल
बंडखोर मी तरी सांगतो
जगास ऑल इज वेल

फॉरमॅटिंग या आयुष्याचे
म्हणजे मृत्यू खरा
ब्लँक संगणक पुढच्या जन्मी
जुन्या, संपती जरा
नवे कनेक्षन, नवीन मेनू
नवा सूर्य उगवेल
बंडखोर मी तरी सांगतो
जगास ऑल इज वेल

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा हा! भारीच
दु:ख वेदना नको नकोशा
सर्व जगाला तरी
कुरुवाळत मी जोजवल्या त्या
सख्या सोयर्‍यापरी

निव्वळ भारी! मस्तच!