Odd Man Out (भाग १६ ते २३)

Submitted by nimita on 26 April, 2019 - 16:10

म्हटल्याप्रमाणे साधारण अर्ध्या पाऊण तासात नम्रता परत आली.खरं म्हणजे आधीच्या प्लॅनप्रमाणे संग्राम आणि नम्रता संध्याकाळी थोडे उशिरा पार्टीला जाणार होते आणि येताना मुलींना घेऊन येणार होते.पण ऑफिसमधून संग्रामसाठी आलेला फाईल्सचा डोंगर बघून नम्रतानीच तो प्लॅन कॅन्सल केला होता. मनप्रीत ला पण परिस्थितीची पूर्ण कल्पना होती कारण तिच्या घरी पण तेच दृश्य होतं ;म्हणून तिनी आधीच नम्रता आणि संग्रामसाठी डिनर पॅक करून ठेवला होता. मनप्रीत म्हणाली,"पार्टी के बाद हम नंदिनी और अनुजा को छोडने आएंगे। उस बहाने आपके हाथकी बनी हुई कॉफी भी पी लेंगे।" थोडा वेळ - 'नवरा आणि त्याचं न संपणारं काम'- या त्यांच्या फेव्हरिट विषयावर गॉसिप करून झाल्यावर नम्रता घरी यायला निघाली. ती दाराचं कुलूप काढत असताना मागून तिला कोणीतरी हाक मारली. आवाज तिच्या ओळखीचा होता. तिनी हसत हसत मागे बघितलं आणि म्हणाली," Good evening Mrs Ghosh." मागे रस्त्याच्या कडेला त्यांच्या युनिटच्या CO ची - कर्नल घोष ची बायको उभी होती. मिसेस घोष स्वभावानी खूपच मनमिळाऊ होत्या, आणि कायम हसतमुख !

बंगाली मिठाईचा गोडवा अगदी पूर्णपणे उतरला होता त्यांच्या वागण्या बोलण्यात.. त्यांच्याकडून खूप काही शिकली होती नम्रता...आणि तेही नुसतं त्यांना ऑब्झर्व करून करूनच ..या बाबतीत ती आणि एकलव्य एकाच शाळेचे (?) विद्यार्थी होते.

"Evening walk पे निकली हैं आप ? प्लीज, अंदर आइये ना।" नम्रता त्यांच्याजवळ जात त्यांना म्हणाली." बढियासी अद्रकवाली चाय पीते हैं गार्डन में बैठके।"

त्यावर त्यांच्या नेहेमीच्या स्टाईलमधे गोड हसत त्या म्हणाल्या,"आज रहने दो, फिर कभी आऊँगी। बस तुमसे एक जरुरी काम था। मैं सोच रही हूँ की कल सुबह ग्यारह बजे AWWA की मीटिंग रखते हैं। तुम उस हिसाब से सारी तैय्यारी कर लेना। मैं रात को तुम्हे फोन करनेही वाली थी.."

नम्रतानी त्यांना परत एकदा घरात यायचा आग्रह केला , त्यावर त्या म्हणाल्या,"आता थोडे दिवस नवऱ्याबरोबर वेळ घालव... एकदा का युनिट इथून गेली की मग आपणच आहोत एकमेकींना सोबत द्यायला.. तेव्हा पाज हवा तेवढा चहा!"

त्यांच्या या अशा स्वभावामुळेच तर नम्रताला त्या आवडायच्या. त्यांचं वागणं बोलणं अगदी एका सिनियर लेडीला साजेसं होतं. आपला नवरा युनिट चा कमांडिंग ऑफिसर आहे याचा वृथा अहंकार त्यांच्या वागण्यातून कधीच दिसला नाही. याउलट CO ची बायको म्हणून त्यांची जी जबाबदारी आणि कर्तव्यं होती ती सगळी त्या अगदी योग्य रित्या पार पाडायच्या.

दुसऱ्या दिवसाच्या मीटिंग बद्दल तिला परत एकदा आठवण करून देत त्या जायला वळल्या. नम्रताही कुलुप उघडून घरात आली. मनप्रीतनी पॅक करून दिलेला डिनर स्वैपाकघरात ओट्यावर ठेवत तिनी एकीकडे चहाचं आधण ठेवलं.

संग्रामला आज आपल्याबरोबर बसून चहा प्यायला वेळ नसणार हे माहित असल्यामुळे तिचा कप डायनिंग टेबलवर ठेवत ती फक्त त्याचा कप घेऊन स्टडी रूमपाशी गेली. बंद दारावर एकदोनदा नॉक करून ती दार ढकलून आत गेली. अचानक झालेल्या या आवाजानी संग्रामनी एकदम मागे वळून पाहिलं. दारात नम्रताला बघून त्यानी तिला विचारलं,"हे काय ? मनप्रीतकडे जाणार होतीस ना ? गेली नाहीस अजून ??"

"वाह ! याला म्हणतात जीव ओतून काम करणं !!!" संग्रामला चिडवत नम्रता म्हणाली,"मी बाहेरून कुलूप लावून गेले होते म्हणून बरं.. नाहीतर माझ्या मागे कोणीतरी सगळं घर लुटून नेलं असतं तरी तुला कळलं नसतं. अर्धा तास तरी झाला असेल मी परत येऊन.. "

नम्रतानी मारलेला टोमणा ऐकून संग्राम थोडा ओशाळला.. खरोखरच कामाच्या नादात त्याला कळलंच नव्हतं ती कधी गेली आणि कधी परत आली ते. खुर्चीवरून उठून तिच्या हातातून चहाचा कप घेत तो म्हणाला," अगं, दार बंद होतं ना स्टडी रूमचं ; म्हणून मला ऐकू नाही आलं. आणि राहता राहिला घर लुटण्याचा प्रश्न...तर for your kind information..हे कॅन्टोन्मेंट आहे मॅडम.. इथे सगळे फौजी राहतात. और इतिहास गवाह है...आजतक किसी फौजी ने किसीको नहीं लूटा। तेव्हा त्या बाबतीत तू निश्चिन्त रहा. आणि समजा जरी तू म्हणातीयेस तसा एखादा चोर आलाच तरी त्याला काय मिळणार आपल्या घरात ? आपल्यासाठी सगळ्यात मौल्यवान वस्तू म्हणजे माझे युनिफॉर्म्स आणि माझी मेडल्स , हो ना?" त्याच्या या वाक्यावर उत्तरादाखल नम्रतानी पण हमी भरली..थोडं थांबून उपहासानी हसत संग्राम म्हणाला," आणि आपल्या या मेडल्समधे आपण सोडून बाकी कोणालाही कसलाही इंटरेस्ट नाहीये गं..."

त्यानी अगदी सहजपणे म्हटलं असलं तरी खरी वस्तुस्थिती हीच आहे, हे नम्रतालाही माहीत होतं.पण हे म्हणताना संग्रामच्या चेहेऱ्यावर दिसलेली ती वेदना बघून नम्रताचा जीव कासावीस झाला. त्याच्या गळ्यात आपले हात माळत ती लाडीकपणे म्हणाली," बाकीच्या लोकांचं मला नाही बाई माहीत...पण माझ्या नवऱ्याला मिळालेली मेडल्स माझ्यासाठी मात्र सगळ्यात मौल्यवान आहेत बरं का! अगदी माझ्या दागिन्यांपेक्षा सुद्धा. त्या प्रत्येक मेडल मधून त्याच्या हृदयातलं देशप्रेम दिसतं मला."

तिला हळूच आपल्याजवळ खेचत संग्राम म्हणाला,"हं, पण या हृदयात फक्त देशच नाहीये ...अजूनही कोणीतरी आहे... बघायचंय ?"

त्याच्या या धिटाईला लटका विरोध करत, त्याच्या हातांच्या विळख्यातून सुटण्याचा प्रयत्न करत नम्रता म्हणाली,"आवडलं असतं बघायला, पण काय करणार...हा चहाचा कप आहे ना मधे. आणि त्यात तुमच्या त्या 'कोणीतरी' नी प्रेमानी बनवलेला चहा पण आहे...जो आता गार होतोय; तेव्हा आधी तो कप जवळ करा...आणि सध्या तरी या टेबलवरच्या फाईल्स कडे बघा. आपलं बघणं- दाखवणं नंतर करू ..कशी वाटली आयडिया?"

"हं, not bad," एक मोठा सुस्कारा सोडत संग्राम म्हणाला,"फक्त नंतर ऐनवेळी दुसरं काही कारण नको आणू मधे . ही अट मंजूर असेल तरच आत्ता तह करण्यात येईल."

"Yes sir. मंजूर है।" म्हणत मिश्किलपणे हसत नम्रता खोलीच्या बाहेर गेली आणि तिनी दार बंद करून घेतलं.

खोलीतून बाहेर आल्यावर नम्रता काही क्षण तिथेच दाराला टेकून उभी राहिली. खरं म्हणजे संग्रामपासून दूर व्हायची तिचीदेखील अजिबात इच्छा नव्हती. पण त्यावेळी त्याचं ऑफिसचं काम वेळेत पूर्ण होणं जास्त महत्वाचं होतं. 'Romance तो क्या.....बाद में भी कर सकते हैं।' तिनी स्वतःच्या हिरमुसल्या मनाला समजावलं. तिला स्वतःचीच खूप गंमत वाटली. थोड्या वेळापूर्वी 'सुबह और शाम , काम ही काम ' करणाऱ्या तिच्या नवऱ्याबद्दल तिची तक्रार होती की 'क्यूँ नहीं लेते पिया प्यार का नाम?' आणि आता जेव्हा तिचा पिया स्वतः रोमँटिक मूडमधे आला होता तेव्हा तिनीच त्याला रिकाम्या हाती परत पाठवला होता.

डायनिंग टेबल वरचा आपला चहाचा कप उचलुन घेत ती लिव्हिंग रूम मधल्या सोफ्यावर विसावली. आज रात्रीचा स्वैपाक नसल्यामुळे तिला तसा आरामच होता. एकीकडे चहाचे घोट घेतघेत नम्रता विचार करत होती....तिला मिसेस घोषचं बोलणं आठवलं.. किती सहजपणे बोलून गेल्या होत्या त्या...'खरंच, आता हे पुढचे काही दिवस फक्त आणि फक्त संग्रामसाठी राखून ठेवायचे. जास्तीत जास्त वेळ घालवायचा त्याच्या बरोबर. तो जे म्हणेल, त्याला जसं हवं असेल तसंच करायचं.' मनातल्या मनात नम्रताची लिस्ट तयार होत होती...'त्याला माझ्या हातच्या पुरणपोळ्या खूप आवडतात..उद्याच करते...खूप खुश होईल तो माझं हे सरप्राईज बघून. आणि हो... cheezlings आणि मार्बल केक पण ...मागच्या आठवड्यात एकदा म्हणाला पण होता तो की - खूप दिवसात तू cheezlings नाही बनवलेस म्हणून- काय हे नम्रता ! अशी कशी विसरलीस गं तू ? वेंधळी कुठली!!' स्वतःलाच दटावत ती म्हणाली. शेवटी तिनी तिची फ्रिजवरची डायरी आणि पेन उचललं आणि काय काय करायचं ते लिहून काढायचं ठरवलं.. 'हो, म्हणजे काही विसरायला नको..नंतर उगीच हुरहूर लागून राहते जीवाला.' तिला मागच्या वेळचा एक प्रसंग आठवला. पुण्यात SFA मधे राहात असताना एकदा संग्राम दहा दिवसांची सुट्टी घेऊन आला होता. तो येणार आहे हे समजल्याबर नम्रताला 'काय करू आणि काय नको' असं झालं होतं. नंदिनी तर "बाबा येणार" या नुसत्या कल्पनेनीच घरभर नाचत सुटली होती. अनुजा अगदीच लहान होती तेव्हा; जेमतेम सव्वा वर्षाची असावी.ती तर तिच्या बाबांना नीट ओळखत सुद्धा नव्हती कारण अनुजाच्या जन्मापासून त्यांना दोघांना एकमेकांचा पुरेसा सहवास मिळालाच नव्हता.नम्रतानी संग्रामच्या आई बाबांना पण बोलावून घेतलं होतं पुण्यात. संग्रामसाठी तिच्याकडून ते एक सरप्राईज होतं.

खूप एन्जॉय केले होते ते दहा दिवस त्यांनी सगळ्यांनी. संग्रामच्या आईनी तर जणू सैपाकघराचा ताबाच घेतला होता. आपल्या मुलाला स्वतःच्या हातांनी वेगवेगळे पदार्थ करून खायला घालण्यात त्यांना जो आनंद आणि समाधान मिळत होतं ते बघून संग्रामचे बाबा एक दिवस नम्रताला म्हणाले होते,"थँक यू नम्रता...तुझ्यामुळे आज कित्येक वर्षांनंतर मी हिला इतकं उत्साही आणि आनंदी बघतोय. नाहीतर संग्राम NDA मधे गेल्यापासून जणूकाही तिच्या आयुष्यातला एक खूप मोठा हिस्सा हरवल्यासारखा झाला होता. ती कधी फारसं बोलून नाही दाखवत - मला त्रास होईल म्हणून- पण ती संग्रामला खूप मिस करते, त्याचे लाड करणं मिस करते. पण तुझ्यामुळे आज ती आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेतीये." त्यांचं हे असं भावुक बोलणं ऐकून नम्रताला खूपच संकोचल्यासारखं होत होतं. ती म्हणाली,"अहो बाबा, थँक यू कशाला म्हणताय तुम्ही मला. मी पण एक आई आहे. त्यामुळे मी त्यांच्या भावना समजू शकते. आणि माझ्या लग्नानंतर माझ्या बाबांची होणारी भावनिक ओढाताण मी बघितली आहे.. त्यामुळे संग्रामपासून दूर राहताना तुम्हांला काय वाटत असेल याचाही अंदाज आहे मला. आणि म्हणूनच मी तुम्हांला दोघांना इथे बोलावून घेतलं..एका दगडात किती पक्षी मारले बघा ना मी...संग्रामच्या सहवासात तुम्ही आणि आई खुश, तुम्हांला दोघांना इथे आलेलं बघून संग्राम खुश आणि माझी ही जवळची माणसं खुश आहेत हे बघून मी पण खुश!!!" तिचं हे बोलणं ऐकून तर तिचे सासरे अजूनच भारावले. तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले,"कायम अशीच खुश राहा बाळा ! तू आमच्याबद्दल इतका विचार करतेस, आमच्या सुखासाठी प्रयत्न करतेस हे बघून खरंच समाधान वाटलं.आमच्या संग्रामची निवड अगदी योग्यच आहे हे पुन्हा एकदा पटलं."

आता मात्र नम्रताचे पण डोळे भरून आले होते. पटकन आपले डोळे टिपत ती म्हणाली," तो फिर इस बात पर एक बढियासी चाय हो जाये..अद्रकवाली ?"

"जरूर, पण जर तू करणार असलीस तरच हं !" डोळे मिचकावत तिचे सासरे म्हणाले,"तुला म्हणून सांगतो- कोणाला सांगू नको बरं का- इतकी वर्षं झाली पण आमच्या होम मिनिस्टर ना चहा करणं काही जमलं नाही!" त्यांच्या या बोलण्यावर ते दोघं इतक्या जोरात खळखळून हसायला लागले की स्वैपाकघरातून त्यांच्या 'होम मिनिस्टर' स्वतःच काय झालं ते बघायला बाहेर आल्या.

जगातल्या प्रत्येक आई प्रमाणेच संग्रामच्या आईला सुद्धा त्याच्याबद्दल एकच काळजी होती....त्याच्या जेवणाची. शेवटी न राहवून त्यांनी त्याला विचारलंच,"जेवणखाण नीट असतं ना रे तिकडे? व्यवस्थित, वेळच्यावेळी जेवतोस ना रोज?"

"हो आई, अगदी मस्त तिन्ही त्रिकाळ खायला मिळतं आम्हांला.. आणि तेसुद्धा रोज वेगळा मेन्यू बरं का! बाकी सगळं तर ठीकच असतं पण आमच्या मेसच्या कुकला चायनीज कुकिंग अजिबात नाही जमत,"संग्राम सांगत होता.. नम्रताकडे बघून तो पुढे म्हणाला,"अगं, हाक्का नूडल्स मधे पण तो कढीपत्ता घालतो."

संग्रामचं हे बोलणं ऐकून नम्रतानी मनोमन ठरवलं की संग्राम परत जायच्या आधी एकदा त्याच्यासाठी चायनीज मेन्यू बनवायचा. पण आज उद्या करता करता शेवटी त्याचा जायचा दिवस येऊन ठेपला पण तिच्या चायनीजचा मुहूर्त काही लागला नाही.

आणि त्या एका गोष्टीचीच तिला खंत जाणवत राहिली...नंतर कितीतरी दिवस. एकदा सहज बोलता बोलता ही गोष्ट तिनी तिच्या एका मैत्रिणीला सांगितली..तिची शाळेपासूनची खूप खास मैत्रीण...

नम्रताचं सगळं म्हणणं ऐकल्यावर तिची मैत्रीण शांतपणे म्हणाली," त्यात एवढं इमोशनल होण्यासारखं काय आहे ? तुला जर घरी करायला जमत नव्हतं तर सरळ बाहेरून ऑर्डर करायचं होतंस ना!! " तिचं उत्तर ऐकून नम्रतानी अक्षरशः डोक्यावर हात मारला, "अगं, पण त्याला माझ्या हातचं खायला आवडतं हे माहित असताना बाहेरून कशाला मागवायचं? तसंही सध्या तो दुसऱ्यांच्या हातचंच खातोय." नम्रताला उगीचच खूप गहिवरून आलं आणि तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. पण ती मैत्रीण आपल्याच तंद्रीत बोलत राहिली," पण काही म्हण हं नम्रता; तू जरा अतीच करतेस आजकाल...जास्तच 'संग्राम,संग्राम' करतेस! जसं काही इतरांचे नवरे कधी लांब जातच नाहीत. माझा पण नवरा गेला होता मागच्या वर्षी U.S ला - मी पण राहिलेच की त्याला सोडून महिनाभर!मलाही त्याची काळजी वाटायची.पण मी केलंच ना मॅनेज ? आणि आत्ता गेलाय तरी परत येईलच ना संग्राम..तेव्हा खाईलच की तुझ्या हातचं..." तिचं हे वक्तव्य ऐकल्यावर नम्रताला तिला ओरडून सांगावंसं वाटलं...' अगं बये, U.S मधल्या A C ऑफिस मधे बसून काम करणं वेगळं आणि दुर्गम भागातल्या बॉर्डरवर एका छोट्याशा बंकर मधे राहून चोवीस तास शत्रूशी लढणं वेगळं !! आणि अजून एक महत्वाची गोष्ट विसरतीयेस तू...एकदा सीमेवर गेलेला सैनिक कधी आणि कसा परत येईल याची खात्री कोणी नाही देऊ शकत..."

पण यातलं काहीच न बोलता सरळ तिथून निघून गेली नम्रता.…तिला एक गोष्ट लक्षात आली होती..'ज्याचं जळतं त्यालाच कळतं !'

"अशी अंधारात का बसलीयेस?" संग्रामच्या या प्रश्नानी नम्रता एकदम भानावर आली. तिनी आजूबाजूला पाहिलं. खरंच अंधार पडायला लागला होता. संग्रामनी खोलीतला दिवा लावला आणि सगळ्या खिडक्यांचे पडदे बंद केले. "मुलींना घ्यायला जायचंय ना अंगदच्या घरी?" सोफ्यावर तिच्या शेजारी बसत त्यानी विचारलं. "मनप्रीत म्हणाली आहे की ते दोघं येतील मुलींना सोडायला.आपल्यासारखाच त्यांच्या घरी पण गेलाय ना फाईल्सचा गठ्ठा ! त्यामुळे आपल्याला डिनरचं जमणार नाही हे गृहीत धरून तिनी आधीच पॅक करून ठेवलं होतं आपलं जेवण." अचानक काहीतरी आठवल्यासारखं तिनी विचारलं,"तुझं काम संपलं इतक्यात?" "नाही गं! इतक्यात कुठलं होतंय !!अख्खी युनिट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायची म्हणजे केवढी तयारी लागते त्याच्यासाठी. आणि तुला तर माहितीच आहे की युनिटमधे ऑफिसर्स ची संख्या किती कमी आहे. एका युनिट मधे जेवढे ऑफिसर्स असायला पाहिजेत त्याच्या अर्ध्याहूनही कमी असतात आजकाल.त्यामुळे सगळ्यांवरच कामाचं लोड वाढलंय." संग्राम म्हणाला.

नम्रता उठली आणि संग्रामच्या सोफ्यामागे जाऊन उभी राहिली . एकीकडे त्याच्या थकलेल्या खांद्याना हलक्या हातानी चेपून देत ती म्हणाली,"हं, मधे एकदा मी एक रिपोर्ट वाचला होता याबद्दल...त्यात बरीच कारणं सांगितली होती त्यांनी ..कॉर्पोरेट सेक्टर मधल्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या, armed forces ची अवघड असणारी सिलेक्शन प्रोसेस,त्यानंतरचं टफ ट्रेनिंग, सामान्य लोकांमधली जागरूकतेची उणीव वगैरे वगैरे ! आपल्या देशाचं दुर्देव काय आहे माहितीये... प्रत्येकाला वाटतं की 'शिवाजी जन्माला यावा...पण आपल्या नाही तर शेजारच्यांच्या घरात'!! जाऊ दे, या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करून काहीच निष्पन्न नाही होणार...उगीच आपल्याला मात्र मनस्ताप !!!"

"चहा घेतोस थोडा? फ्रेश वाटेल जरा," विषय बदलत स्वैपाकघरात जात नम्रतानी विचारलं.

संग्रामचा होकार गृहीत धरत तिनी एकीकडे चहाचं आधण ठेवलं आणि ती देवापुढे दिवा लावायला गेली. थोड्याच वेळात सगळं घर धुपाच्या मंद सुगंधानी दरवळून गेलं.

दोघांचे चहाचे कप्स ट्रे मधे ठेवून नम्रता वळली तर संग्राम दारातच उभा होता- एकटक तिच्याकडे बघत- आपल्याच विचारांत असल्यासारखा.. दोघांची नजरानजर होताच तो पुढे झाला, नम्रताच्या हातातला ट्रे ओट्यावर ठेवत तिला जवळ घेत म्हणाला," दुपारी मी तुला जे काही बोललो त्याबद्दल पुन्हा एकदा सॉरी. यापुढे पुन्हा कधी अशी चूक होणार नाही याची काळजी घेईन मी..नक्की." "अरे, मी तर केव्हाच विसरले ते सगळं," त्याच्या मिठीत विसावत नम्रता म्हणाली," आणि आता तुसुद्धा ते सगळं काढून टाक बघू डोक्यातून. आता हे पुढचे काही दिवस आपण फक्त चांगल्या आठवणी क्रिएट करण्यात घालवायचे. भांडणं, रुसवे-फुगवे,गैरसमज गुंडाळून ठेवायचे आता लॉफ्टवर...काय? पटतंय ना बायकोचं म्हणणं?"

तिचा चेहेरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरत संग्राम म्हणाला," नवऱ्याचा मूड कसा ठीक करायचा हे या बायकोला चांगलंच जमतं बरं का! और इसी लिये तो हम कहते हैं... बीवी हो तो ऐसी..."हे म्हणताना त्याच्या डोळ्यांतला तो मिस्किल भाव बघून नम्रताला त्याच्या इराद्यांची कल्पना आली. हसत हसत त्याला दूर ढकलत ती म्हणाली," सगळं कौतुक आत्ताच करणार का? नंतर साठी ठेव की थोडं राखून.." "नंतर ?? म्हणजे कधी ???" तिच्या प्रश्नाचा रोख लक्षात न आल्यामुळे संग्रामनी विचारलं.त्याच्या हातात चहाचा कप देत ती पुढे म्हणाली,"मगाशी केलेला तह विसरलास वाटतं इतक्यात!"

तिच्या वाक्याचा अर्थ संग्रामच्या लक्षात येईपर्यंत नम्रता तिथून पसार झाली होती. 'कधी कधी ही असले गुगली टाकते ना...मी एकदम क्लीन बोल्डच होतो....' संग्राम मनातल्या मनात म्हणाला,' म्हणूनच मी हिच्या प्रेमात पडलो." स्वतःशीच हसत संग्राम पुन्हा स्टडी रूमच्या दिशेनी जायला निघाला. नम्रता फोनवर कोणाशी तरी बोलत होती. बोलता बोलता तिच्या तोंडून 'AWWA' हा शब्द ऐकल्यावर त्याच्या काय ते लक्षात आलं आणि तो परत त्याच्या फाईल्समधे गढून गेला.

मिसेस घोषनी सांगितल्याप्रमाणे नम्रता दुसऱ्या दिवशीच्या मीटिंग बद्दल ठरवत होती.

AWWA म्हणजे Army Wives Welfare Association ! As the name suggests, ही संस्था आर्मी मधल्या सैनिकांच्या बायका आणि त्यांच्या मुलांकरता काम करते. अगदी युनिट लेव्हल पासून ते वरिष्ठ लेव्हल पर्यंत ही संस्था काम करते.. प्रत्येक युनिट मधल्या ऑफिसर्स च्या बायका वेळोवेळी त्यांच्या युनिटमधल्या जवानांच्या बायकांना ,त्यांच्या मुलांना भेटतात..त्यांच्याशी संवाद साधतात..त्यांच्या अडचणी, त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना त्या दृष्टीनी मार्गदर्शन करतात. जवानांच्या बायकांसाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे वेगवेगळे व्होकेशनल कोर्सेस ऑर्गनाईझ करतात..अगदी ब्युटी पार्लरच्या कोर्स पासून कॉम्पुटर ट्रेनिंग पर्यंत ... दर महिन्याला होणाऱ्या फॅमिली वेल्फेअर मीटिंग मधे त्या बायकांना विविध विषयांची माहिती दिली जाते..म्हणजे अगदी मुलांच्या immunization शेड्युल पासून ते वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट स्कीम्स पर्यंत..जेव्हा जशी गरज असेल त्याप्रमाणे वेळोवेळी ही सगळी माहिती त्यांना दिली जाते. या सगळ्या बरोबरच जवानांच्या बायका आणि मुलांकरता वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम , वेगवेगळ्या स्पर्धा पण घेतल्या जातात..आणि ही सगळी धुरा सांभाळायचं काम करतात ऑफिसर्सच्या बायका..!

या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून एक खूप महत्त्वाची गोष्ट साध्य होते- आणि ती म्हणजे- युनिट मधल्या जवानांच्या बायकांच्या मनात एक विश्वास निर्माण होतो...'आपली काळजी घ्यायला, अडी अडचणीत आपल्याला मदत करायला कोणीतरी आहे' ...आणि हाच विश्वास युनिट मधल्या सगळ्या सदस्यांना एकत्र बांधून ठेवतो... देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे परिवार एकत्र होऊन एक मोठा संयुक्त परिवार बनतात - अगदी त्यांच्याही नकळत !!!

मिसेस घोष नी ही AWWA ची मीटिंग का बोलावली असेल याची कल्पना होती नम्रताला. आता लवकरच युनिट फील्ड मधे जाणार होती.त्या दृष्टीनी जवानांच्या बायकांना मार्गदर्शन करायला, त्यांच्या काही समस्या असल्या तर त्या माहित करून घ्यायला उद्याची मीटिंग होणार होती.

त्या संदर्भात संबंधित ऑफिसर आणि JCO (Junior Commissioned Officer) शी फोनवर बोलून नम्रतानी मीटिंग बद्दलची सगळी व्यवस्था केली. मिसेस घोष ना फोन करून सगळी डिटेल्स सांगितली आणि ती परत एकदा डायरी आणि पेन घेऊन तिची कामांची लिस्ट करायला बसली.

नम्रताच्या डायरी मधली लिस्ट वाढतच चालली होती....अगदी मारुतीच्या शेपटीसारखी....काय काय नव्हतं त्यात !!संग्रामच्या बरोबर पॅक करून देता येतील असे त्याच्या आवडीचे फराळाचे जिन्नस ..... फॅमिली फोटो अल्बम्स, त्याला आवडणाऱ्या जुन्या गाण्यांच्या cd चं कलेक्शन !

त्याला बरोबर घेऊन जायला लागणारे युनिफॉर्म्स आणि इतर कपडे बॉक्सेस मधून काढून नीट धुवून प्रेस करून तयार ठेवायला हवे होते . नम्रताच्या पेनबरोबरच तिचे विचारही धावत होते,'तिथे चांगलीच थंडी असणार - तेव्हा त्यादृष्टीनी पण तयारी हवी...त्याचे वुलन्स , रजई वगैरे लवकरच ड्राय क्लीन करायला द्यायला हवं, म्हणजे वेळेत मिळेल...'

अचानक नम्रताच्या लक्षात आलं की तिची अवस्था आता 'रात्र थोडी आणि सोंगं फार' अशी झाली आहे. पुढच्या साधारण महिन्याभरात संग्राम नव्या जागी जायला निघणार होता. पण म्हणायला जरी एक महिना असला तरी ते दिवस बघता बघता निघून जाणार याची तिला कल्पना होती. पाच वर्षांपूर्वी नेमकं हेच झालं होतं.संग्राम 'जाणार जाणार' म्हणता म्हणता एक दिवस अचानक तो जायची वेळ येऊन ठेपली. आणि तो गेल्यावर मग नंतरचे कितीतरी दिवस नम्रताला रुखरुख लागून राहिली होती...किती काही करायचं ठरवलं होतं तो जायच्या आधी...त्यावेळी पण अशीच एक लिस्ट बनवली होती..पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या होत्या. यावेळी पुन्हा ती चूक होऊ नये म्हणून नम्रतानी ठरवलं...उद्यापासूनच तयारीला लागायचं, म्हणजे ऐनवेळी धावपळ नाही होणार.

तिची ही विचारांची मॅरेथॉन चालूच होती तेवढयात बाहेर रस्त्यावर गाडीचा हॉर्न वाजला आणि काही क्षणांतच दारापाशी मुलींच्या बडबडण्याचे आवाज आणि त्यापाठोपाठ दारावरची बेल वाजली. "आल्या बाई एकदाच्या साळकाया माळकाया !" दार उघडायला जाता जाता नम्रता म्हणाली. तिनी दार उघडल्याबरोबर तीन वादळं धावत घरात घुसली.. नंदिनी आणि अनुजा बरोबर अंगदही आला होता. इतका वेळ शांत असलेलं तिचं घर मुलांच्या हसण्या खिदळण्यानी आणि चिवचिवाटानी भरून गेलं. मुलांच्या पाठोपाठ मनप्रीत आणि तिचा नवरा - मेजर कुलदीप- पण आत आले. एकीकडे मनप्रीत मुलांना गप्प करायचा प्रयत्न करत होती.." अंगद, चूप हो जाओ। अंकल काम कर रहे होंगे, डिस्टर्ब मत करो।" पण तिचं बोलणं ऐकायला मुलं जागेवर होतीच कुठे? जशी पळत घरात घुसली तशीच सरळ मुलींच्या खोलीत गेली.

"Good evening Mam. सर हैं घरपे?" नम्रताला हसून विश करत मेजर कुलदीप म्हणाले. "Good evening, प्लीज बैठिये ना।मैं बुलाती हूँ उन्हें।"त्यांना दोघांना बसायला सांगून नम्रता स्टडी रूमच्या दिशेनी वळली, तेवढ्यात संग्रामच बाहेर आला.मुलांचा आवाज ऐकला असावा त्यानी. त्याला येताना बघून मेजर कुलदीप उभे राहिले.. सुरुवातीचं 'हाय, हॅलो' झाल्यावर नम्रता म्हणाली,"चलिये, बाहर लॉन में बैठते हैं।" बाहेर अधून मधून छान गार वाऱ्याची झुळुक येत होती. अगदी प्रसन्न वाटत होतं. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर संग्रामनी मनप्रीत ला विचारलं," मॅम, आपने क्या सोचा है? युनिट की मूव्ह के बाद आप और अंगद कहाँ रहेंगे ? घर जाएंगे या...." त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच ती म्हणाली," ना बाबा ना....घर तो नहीं जाएंगे। SFA में ही रहेंगे। वोही बेस्ट ऑप्शन है।"

तिचं बोलणं ऐकून संग्रामनी पटकन नम्रताकडे बघितलं..ती त्याच्याकडेच बघत होती..काही न बोलता ती फक्त हसली ..जणू काही मनप्रीतनी तिच्या विचारांना दुजोराच दिला होता.

थोड्या वेळानी नेहेमीप्रमाणे संग्राम आणि कुलदीपच्या ऑफिसच्या गप्पा सुरु झाल्या; त्यामुळे त्यांना दोघांना तिथेच सोडून नम्रता आणि मनप्रीत कॉफी करायला म्हणून आत गेल्या.ओट्यावरचा डिनर चा टिफिन कॅरियर अजूनही तसाच आहे हे बघून मनप्रीतनी विचारलं," ओह, अभी तक आप लोगोंने खाना नहीं खाया ?" त्यावरून मग दोघींची 'नवरा आणि त्याचं न संपणारं काम' या विषयावर पुन्हा एकदा सखोल चर्चा झाली. बोलता बोलता नम्रतानी मनप्रीतला घरी राहायला न जाण्याचं कारण विचारलं. त्यावर ती म्हणाली," दो साल पहले जब कुलदीप व्हॅली में थे तब मैं घर ही गयी थी। शुरु शुरु में तो सब कुछ ठीक ही था। लेकिन फिर धीरे धीरे......" तिचे अनुभव ऐकताना नम्रताला थोड्याफार फरकानी स्वतःचीच गोष्ट ऐकतोय असं वाटत होतं. 'म्हणजे संग्राम म्हणतो तसे हे फक्त माझ्या मनाचे खेळ नाहीयेत...ही वस्तुस्थिती आहे...माझ्यासारखी अजून बरीच उदाहरणं आहेत 'odd man out' ची ! नम्रता एकीकडे विचार करत होती.

तेवढ्यात अनुजा आईला शोधत शोधत स्वैपाकघरात येऊन पोचली. तिच्या मागोमाग अंगद पण होताच. तिनी नम्रताला विचारलं,"ममा, अंगद आज रात को हमारे घर पे रुक सकता है?"

इतर वेळी जेव्हा ते चौघंच असायचे तेव्हा नम्रता आणि संग्राम मुलींशी शक्यतो मराठीतूनच बोलायचे. आर्मी च्या cosmopolitan वातावरणात राहिल्यामुळे आणि त्यांच्या शाळेत मराठी हा विषय नसल्यामुळे त्या दोघींचा मराठीशी फारसा संबंध यायचा नाही. अशा परिस्थितीत 'मुलींना आपली मातृभाषा यायला हवी'- हाच एकमेव उद्देश होता दोघांचा. पण घराबाहेर मात्र मराठीचा वापर ते कटाक्षानी टाळायचे...खास करून जेव्हा आजूबाजूला अमराठी लोक असायचे तेव्हा !! हा 'योग्य ठिकाणी योग्य भाषेचा वापर' आता मुलींच्याही लक्षात आला होता.

अनुजाचा प्रश्न ऐकून नम्रता काही बोलणार इतक्यात मनप्रीतच म्हणाली," लेकिन कल तो स्कूल है ना ? इसलिये आज़ तो नहीं रुक सकते। फिर कभी ...ठीक है ना ?" तिच्या या युक्तिवादावर मुलांकडे काहीच प्रत्युत्तर नसल्यामुळे दोघंही एवढंसं तोंड करून परत गेले.

थोड्या वेळानंतर - 'सकाळी शाळा आहे आणि त्यासाठी लवकर उठायचंय'- हे कारण सांगून मनप्रीतनी अंगदला मुलींच्या खोलीतून अक्षरशः ओढून बाहेर काढलं आणि ते तिघंही त्यांच्या घरी गेले.

दिवसभराच्या दंगामस्तीमुळे मुली अगदी थकून गेल्या होत्या. "संग्राम, तू प्लीज जरा बघ ना मुली झोपल्या का नाही ते...तोपर्यंत मी जेवण गरम करते," टिफिन कॅरियर उघडत नम्रता म्हणाली. तिची जेवणाची तयारी होईपर्यंत संग्रामही आलाच. "अगं, इतक्या दमल्या होत्या दोघी..दोन मिनिटांत झोपल्या सुद्धा." त्यावर नम्रता काही बोलणार इतक्यात तिच्या ओठांवर आपलं बोट ठेवून तिला गप्प करत तो म्हणाला "त्यामुळे आता आजची ही रात्र फक्त आपल्या दोघांची आहे...And I am going to make it extra special... Just wait and watch " नम्रताला लिव्हिंग रूम मधे सोफ्यावर बसवून संग्राम स्वैपाकघरात गेला. नम्रता काही न बोलता भारावल्यासारखी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. त्या क्षणी तिच्या मनात एकच विचार येत होता..' I am so lucky ..मला संग्रामसारखा नवरा मिळाला...' तिला मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एका गाण्याचे स्वर ऐकू येऊ लागले..

' प्रेमा, काय देऊ तुला ...

भाग्य दिले तू मला ..'

ती किती वेळ तशीच बसून होती तिलाही नाही कळलं. पण जेव्हा संग्रामनी तिच्या हाताला धरून तिला डायनिंग रूममधे नेलं तेव्हा समोरचं दृश्य बघून ती जणूकाही मंत्रमुग्ध झाली..

टेबल वर त्यांच्या दोघांच्या जेवणाची सगळी तयारी तर होतीच, पण त्यांच्या या डिनरला स्पेशल बनवण्यासाठी संग्रामनी त्याच्याकडून पूर्ण प्रयत्न केला होता. डायनिंग रूममधे ठिकठिकाणी कँडल्स तेवत होत्या, टेबलवर मधोमध नम्रताच्या खास आवडीची, jasmine fragrance ची कँडल सगळं वातावरण सुगंधित करत होती. Background मधे रफीच्या सुरांची मैफील सजली होती. "आवडलं का राणीसाहेबांना?" संग्रामच्या या प्रश्नानी ती भानावर आली. तिनी मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. तिला खुश करण्यासाठीची त्याची ही धडपड बघून तिचा ऊर त्याच्यावरच्या प्रेमानी, त्याच्याबद्दल वाटणाऱ्या अभिमानानी भरून आला होता. तिच्या तोंडून शब्द फुटेनात. मानेनीच होकार देत ती त्याला बिलगली. तिला खुर्चीवर बसवत तो म्हणाला," थांब, अजून पण काहीतरी आहे.." आणि पुढच्याच क्षणी तिच्या हातांत एक फुलांचा bouquet होता. त्यांच्याच बागेतली वेगवेगळी फुलं होती त्यात...लिली, गुलाब, डेलिया ... "ही फुलं कधी काढून आणलीस तू?" तिनी डोळे विस्फारत संग्रामला विचारलं. "मगाशी तू कॉफी करायला आत आली होतीस ना तेव्हा !" संग्रामचं उत्तर ऐकून नम्रता अजूनच गोंधळली," अरे, पण तेव्हा मेजर कुलदीप पण होते ना बाहेर...म्हणजे तू त्यांच्या समोरच ..."

"हॅ, काहीतरी काय! तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता तेवढ्यात मी काढून घेतली ही फुलं.. त्याच्या नकळत आणि ते सगळे गेल्यावर तू दार बंद करायला गेलीस ना, तेव्हा आत आणून ठेवली. कसं वाटलं सरप्राईज?"

"खूप छान! Thank you so much. खरंच आजची ही रात्र जन्मभर लक्षात राहील माझ्या! तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंस, thank you Sangram," त्याचे हात हातांत घेऊन त्यांवर आपले ओठ टेकवत नम्रता म्हणाली. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या हातांवरून खाली ओघळले.

तिचे अश्रू पुसून, तिला आपल्या मिठीत घेत तो म्हणाला," ये तो सिर्फ शुरूवात है। आगे आगे देखिये होता है क्या !!" त्याच्या या वाक्याचा रोख कुठे आहे हे न समजण्या इतकीही भोळी नव्हती नम्रता ! एक हलकासा सुस्कारा सोडत ती संग्रामच्या मिठीत विरघळली.

दुसऱ्या दिवशी रोजच्या सवयीमुळे नम्रताला पहाटेच जाग आली. शेजारी झोपलेल्या संग्रामची झोपमोड होणार नाही याची खबरदारी घेत ती हळूच उठून बसली, पण त्याच्यापासून लांब जायला तिचं मन अजिबात तयार नव्हतं.जेव्हापासून युनिटच्या मूव्ह ची बातमी समजली होती तेव्हापासूनच तिच्या मनावरचा तिचा ताबा जणूकाही नाहीसा झाला होता....ते राहून राहून संग्राम आणि त्याच्याबद्दलच्या आठवणींभोवतीच घुटमळत होतं. पण यात तिच्या मनाची काहीच चूक नव्हती. या सगळ्या आठवणी नम्रतासाठी lifeline च होत्या. संग्रामबरोबर घालवलेला एकेक क्षण, त्यानी उच्चारलेला शब्द न् शब्द नम्रताच्या मनात आठवणींच्या रुपात कोरला गेला होता. त्याची ती खट्याळ नजर, तो धुंदावणारा स्पर्श.....या सगळ्याची शिदोरी बरोबर घेऊनच तिला पुढची दोन अडीच वर्षं काढायची होती. आणि म्हणूनच की काय, आत्ता देखील तिच्याही नकळत ती संग्रामला न्याहाळत होती....त्याचा चेहरा आपल्या डोळ्यांत साठवून घेत होती.

पुन्हा एकदा तिचं मन आठवणींच्या रथात बसून भूतकाळाच्या सफरीवर निघालं आणि थेट पुण्याला जाऊन पोचलं - नम्रताला अजूनही तो दिवस अगदी जसाच्या तसा लक्षात होता; कारण त्याच दिवशी तिची आणि संग्रामची पहिली भेट झाली होती. भेट पेक्षा नजरभेट म्हणणं जास्त योग्य ठरेल....

स्नेहाचं- नम्रताच्या मैत्रिणीचं लग्न होतं.. स्नेहा म्हणजे तिची अगदी जीवाभावाची, शाळेत असल्यापासूनची मैत्रीण... आणि त्यांच्या ग्रुप मधलं पहिलंच लग्न होतं ते, त्यामुळे नम्रताच्या उत्साहाला अगदी उधाण आलं होतं. नवरा मुलगा हितेश हा गुजराती असल्यामुळे सीमांतपूजन झाल्यानंतर दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला होता, खूप धमाल केली होती सगळ्यांनी मिळून...दांडिया, गरबा, अंताक्षरी, dumb sharads....नम्रतानी अगदी स्वतः पुढाकार घेऊन सगळा कार्यक्रम पार पाडला होता. पण त्या गर्दीत ,तिथल्या ओळखी-अनोळखी चेहेऱ्यांत राहून राहून तिची नजर एका चेहेऱ्यावर वारंवार स्थिरावत होती. आणि गंमत म्हणजे जेव्हा जेव्हा ती त्याच्याकडे बघत होती तेव्हा त्याची नजरही तिच्यावरच खिळलेली दिसत होती. तिनी जेव्हा तिच्या मैत्रिणीला त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा कळलं की तो नवऱ्या मुलाचा मित्र आहे. बस्स्, इतकंच!

त्या रात्री कितीतरी वेळ नम्रता 'त्या' मुलाबद्दलच विचार करत होती..तिच्या मनात आलं,'आत्तापर्यंत हे असं फक्त कथा कादंबऱ्यात वाचलं होतं आणि सिनेमात पाहिलं होतं. पण असं आपल्या बाबतीत घडेल असं कधी वाटलंच नव्हतं.' पण दुसऱ्याच क्षणी तिनी आपल्या कल्पनेचा पतंग खाली खेचला...'काहीही हं नम्रता..तुला वाटतंय तसं काही नसेल...उगीच जास्त रोमँटिक व्हायची गरज नाहीये.' पण 'दिल है के मानता नहीं'..अशी अवस्था झाली होती नम्रताची....तिच्या फ्रेंड सर्कल मधे मैत्रिणींबरोबरच तिचे मित्रही बरेच होते. खूप मस्त ग्रुप होता त्यांचा...त्या सगळ्यांच्या मैत्रीच्या नात्याची वीण खूप घट्ट होती. पण आजपर्यंत कुठल्याही मित्राशी बोलताना किंवा त्याच्याकडे बघताना तिला आजच्या सारखी ती अनामिक हुरहूर कधीच जाणवली नव्हती. त्या अनोळखी मुलाची ती नजर आठवून नम्रता बसल्या जागी शहारून निघाली. त्याचं ते एकटक तिच्याकडे बघणं...इतर कोणी असता तर तिनी त्याचा चांगलाच समाचार घेतला असता; पण त्याच्या नजरेत काही तरी जादू होती...नम्रताबद्दल कौतुक होतं...आदर, सन्मान, होता..एक वेगळीच ओढ जाणवत होती तिला ...'उद्या लग्नाला पण येईलच की तो..' या विचारानी नम्रताला अचानक हुरूप आला होता.. ती अगदी अधीरतेनी दुसरा दिवस उजाडायची वाट बघायला लागली. दुसऱ्या दिवशी लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांमधे तिची नजर फक्त त्यालाच शोधत होती. पण शेवटपर्यंत तो दिसलाच नाही. नम्रताचा खूप हिरमोड झाला. काल रात्रीपासून आकाशात विहार करणारं तिचं स्वप्नांचं विमान धाडकन जमिनीवर कोसळलं होतं.'तुला म्हटलं होतं ना- जास्त रोमँटिक व्हायची गरज नाही म्हणून!! हे असं सगळं फक्त कथा कादंबऱ्या आणि सिनेमातच होत असतं... बावळट कुठली..निघाली होती one way कनेक्शन जोडायला...'तिनी स्वतःच स्वतःला दम भरला.

त्यानंतर दोन दिवस होऊन गेले.नम्रता पुन्हा एकदा तिच्या रोजच्या रुटीन मधे रुळली, पण तरीही मधूनच तिला 'ती' नजर आठवायची ,'तो' चेहरा डोळ्यासमोर यायचा.

तिसऱ्या दिवशी संध्याकाळी नम्रता डेक्कनच्या चौकातला तिचा सतार चा क्लास संपवून बाहेर तिच्या स्कूटरपाशी आली आणि अचानक तिला 'तो' दिसला ...तिच्या स्कूटर जवळच उभा होता..तिचीच वाट बघत होता बहुतेक. त्याला असं अचानक समोर आलेला बघून ती गोंधळून गेली. काय बोलावं , काय करावं काही काही सुचेना! तिची होणारी धांदल बघून त्याला मात्र खूप मजा येत असावी.. आपलं हसू लपवत तो तिला म्हणाला,"हाय, माझं नाव संग्राम आहे.आपण परवा एकमेकांना भेटलो होतो." त्याचा तो धीरगंभीर आवाज ऐकून नम्रता अजूनच दिवानी झाली..पण स्वतःला सावरून घेत ती म्हणाली,"भेटलो वगैरे नव्हतो, फक्त बघितलं होतं.."

"अच्छा ! म्हणजे तुम्ही पण बघत होतात का मला?" संग्रामनी विचारलेल्या त्या डायरेक्ट प्रश्नानी तर नम्रताच्या मनात आलं....'हे धरणीमाते, सीतामाईसारखंच मला पण तुझ्यात सामावून घे.' विषय बदलत ती म्हणाली," तुम्ही मला भेटायला आला आहात का? पण तुम्हाला कसं कळलं की मी इथे क्लास ला येते? नक्की काय काम आहे तुमचं माझ्याकडे ?"

तिची प्रश्नांची सरबत्ती मधेच थांबवत संग्राम म्हणाला," असं रस्त्यात उभं राहून बोलण्यापेक्षा आपण समोरच्या 'गुड लक कॅफे' मधे जाऊन बोलूया का?"

खरं म्हणजे नम्रता त्याच्याबरोबर जायला अगदी एक पायावर तयार होती, पण तिच्या छातीत उगीचच धडधड वाढायला लागली. तिनी घाईघाईत सांगून टाकलं," आज नाही जमणार. घरी जायला उशीर झाला तर माझी आजी काळजी करेल." तिचं उत्तर ऐकून संग्रामचा चेहेरा उतरला. ते बघून का कोण जाणे पण नम्रताला स्वतःचाच राग आला. ती गडबडीनी पुढे म्हणाली," पण आता तुम्ही एवढं इथपर्यंत आला आहात तर तुमच्यासाठी थोडा वेळ थांबीन मी.."

तिचं शेवटचं वाक्य ऐकून संग्रामचा चेहेरा परत खुलला आणि त्याला परत खुश झालेला बघून नम्रता पण सुखावली.

त्या दिवशी थोड्या वेळासाठी म्हणून त्याच्या बरोबर कॅफे मधे गेलेली नम्रता अर्ध्या पाऊण तासानी जेव्हा बाहेर आली तेव्हा अक्षरशः हवेत तरंगत होती.

विचारांच्या नादात असल्यामुळे ती घरी कधी पोचली तिचं तिलाही नाही कळलं. तिच्या चेहेऱ्यावरचं ते हसू बघून तिच्या आजीनी विचारलं सुद्धा," काय गं!आज अगदी खुशीत दिसतीयेस? नवीन राग शिकवला वाटतं क्लास मधे सरांनी?"

आजीचा प्रश्न ऐकून नम्रता भानावर आली. "हो अगं, आज खूप छान वाटतंय. काहीतरी नवीन कळलंय ना!आता कधी एकदा उद्याच्या क्लासला जातीये असं झालंय मला!" आपल्याच तंद्रीत बोलत ती तिच्या खोलीत गेली. आता खरंच तिला दुसऱ्या दिवसाचे वेध लागले होते कारण संध्याकाळी परत ती संग्रामला भेटणार होती. आजच्या भेटीत संग्रामनी तिला स्वतःबद्दल बरंच काही सांगितलं होतं..पण तिच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट होती...आणि ती म्हणजे 'संग्राम आर्मीमधे होता !'

शाळेत असताना इतिहासात शिवाजी महाराजांबद्दल नम्रता बरंच काही शिकली होती. त्यांचा मुत्सद्दी स्वभाव, दूरदृष्टी,अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, त्यांची गनिमी काव्याची युद्धनीती....या सगळ्यामुळे तिच्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर होता. आणि म्हणूनच की काय पण शाळा कॉलेज मधे असताना ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गड-किल्ल्यांवर ट्रेक्स ला जायची. त्या गडकोटांवर चढताना, तिथल्या बुरुजांवरून आजूबाजूचा प्रदेश न्याहाळताना तिला एक वेगळीच वीरश्री जाणवायची. 'एके काळी शिवाजी महाराजही या रस्त्यांवरून चालले असतील, इथल्या कातळांना त्यांचा स्पर्श झाला असेल' या नुसत्या विचारानीच तिला स्फुरण चढायचं.तिचे मित्र मैत्रिणी गमतीनी तिला म्हणायचे," तू मागच्या जन्मी 'शिवबाचा मावळा' होतीस वाटतं."

या अशा पार्श्वभूमीवर जेव्हा नम्रताला समजलं की 'संग्राम आर्मी मधे आहे' तेव्हा तिच्या आनंदाला पारावर उरला नाही... या एका गोष्टीपुढे बाकी सगळं गौण होतं तिच्यासाठी. संग्रामला होकार देण्यासाठी एवढं एकच कारण पुरेसं होतं तिला. तिनी मनोमन देवाचे खूप खूप आभार मानले. संग्रामसारखा खराखुरा सैनिक स्वतः चालत तिच्या आयुष्यात आला होता...

त्या रात्री नम्रता बराच वेळ जागी होती.... डोळ्यांसमोरून संग्रामचा तो रुबाबदार चेहेरा जातच नव्हता. संध्याकाळी त्याच्याबरोबर घालवलेला तो अर्धा पाऊण तास ती मनात rewind करून पुन्हा पुन्हा अनुभवत होती. ते रिपीट टेलिकास्ट बघताना अचानक तिला लक्षात आलं की पूर्ण वेळ फक्त संग्रामच बोलत होता, ती फक्त मंत्रमुग्ध होऊन त्याचं बोलणं ऐकत होती आणि अधून मधून त्यानी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होती. त्या पाऊण तासात संग्रामनी तिला त्याच्याबद्दल बरंच काही सांगितलं होतं- त्याच्या परिवाराबद्दल, त्याच्या शिक्षणाबद्दल, त्याच्या आर्मी जॉईन करण्याबद्दल.....बोलता बोलता तो म्हणाला होता,"आपली दोघांची ही ओळख पुढे वाढावी अशी माझी इच्छा आहे. पण त्यासाठी आपल्याला एकमेकांची पुरेशी माहिती असणं आवश्यक आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट...I don't want to rush you into this. तू तुला पाहिजे तेवढा वेळ घे. आणि तुला जो योग्य वाटेल तोच निर्णय घे.तुला माझ्याबद्दल अजूनही काही माहीत करायचं असेल तर तू अगदी फ्रँकली विचार..मला आवडेल तुझ्या प्रश्नांना उत्तरं द्यायला.." मधे काही क्षण थांबून तो मिस्कीलपणे म्हणाला," त्या निमित्तानी तरी का होईना पण तुझा आवाज तरी ऐकता येईल..कारण मगाचपासून फक्त मीच बोलतोय. तू नुसती बघत बसलीयेस माझ्याकडे," त्याचं ते शेवटचं वाक्य ऐकून नम्रता एकदम भानावर आली. खरंच होतं संग्रामचं म्हणणं. नम्रताची अवस्था अगदी 'कभी कभी' सिनेमातल्या नीतू सिंग सारखी झाली होती..तिला क्षणभर वाटलं की त्याला सांगावं...' तेरे चेहरे से नज़र नहीं हटती...' त्या नुसत्या कल्पनेनीच तिच्या गालांवर गुलाब फुलले. तिचं ते लाजणं पाहून संग्राम अजूनच घायाळ झाला. तिचं ते रुपडं डोळ्यांत साठवून घेत राहिला. काही क्षण कोणीच काही बोलले नाही.

एकमेकांशी बोलताना दोघं 'तुम्ही' वरून 'तू' वर कधी आले होते ते त्यांचं त्यांनाही नव्हतं कळलं.

अचानक नम्रताला काहीतरी लक्षात आलं आणि तिनी विचारलं," पण तुला माझं नाव कसं माहीत आणि मी रोज संध्याकाळी इथे क्लास साठी येते हे कोणी सांगितलं तुला?" त्यावर हसत हसत संग्राम म्हणाला," तुझ्या नावाबद्दल म्हणशील तर त्या संध्याकाळी कार्यालयात ज्याच्या त्याच्या तोंडी तुझंच नाव होतं, त्यामुळे मला न विचारताच कळलं होतं. आणि बाकीची माहिती ? Well, हम फौजी हैं मॅडम ...जेव्हा एखाद्या मिशन वर निघतो तेव्हा ते यशस्वी करूनच परत येतो...पण हे मिशन थोडं नाजूक होतं ना...कोणालाही संशय येऊ न देता सगळी माहिती मिळवायला थोडी मेहनत करावी लागली..गनिमी कावा वापरावा लागला ..पण शेवटी मिशन पूर्ण केलंच."

"पण अजून माझा निर्णय कुठे सांगितलाय मी! त्यामुळे सध्या तरी तुझं हे मिशन अपूर्णच आहे !" संग्रामला उगीचच छळत नम्रता म्हणाली. तिचं हे वाक्य ऐकून संग्राम चपापला.. त्यानी त्या दृष्टीनी विचारच नव्हता केला.' खरंच की, आपण तर नम्रताचा होकार गृहीतच धरलाय.. पण जर ती नाही म्हणाली तर ?'... नुसत्या विचारानीच संग्रामच्या चेहेऱ्याचा रंग उडाला....पण आपल्या चेहेऱ्यावरचं टेन्शन नम्रताला दिसू नये म्हणून तो उगीचच हातातल्या कॉफीच्या कप कड़े बघत बसला. त्याला तसा बसलेला बघून नम्रताला वाटलं, 'बिचाऱ्याला उगीच कशाला छळायचं?सरळ 'हो' म्हणून टाकावं आत्ताच'...पण लग्नाच्या दिवशी त्यानी सुद्धा तर तिला वाट बघायला लावली होती ना- आणि शेवटी तो आलाच नव्हता. त्या दिवशी नम्रताचा किती हिरमोड झाला होता. 'कळू दे त्यालाही ..वाट बघायला लागली की कसा त्रास होतो ते!जैसे को तैसा !! ' नम्रता स्वतःच्या विचारांना दुजोरा देत होती.

"आता मला निघायला हवं. नाहीतर घरी सगळे काळजी करतील," खुर्चीवरून उठत नम्रता म्हणाली. तिला असं तडकाफडकी उठून जाताना बघून संग्राम अजूनच गोंधळला.. 'माझ्या बोलण्यात काही चुकलं का? मी जरा जास्तच डायरेक्ट बोललो वाटतं.. तिला आवडलं नसेल कदाचित. माझा हा उतावळेपणा बघून जर तिनी 'नाही' म्हटलं तर??' संग्रामच्या मनात नको नको ते विचार यायला लागले. तो काही न बोलता नुसताच तिच्याकडे बघत होता.

त्याच्याकडे बघत , शक्यतो निर्विकार चेहेरा ठेवत नम्रता म्हणाली,"आपण उद्या संध्याकाळी पुन्हा इथेच भेटू. चालेल ना?जमेल ना तुला यायला ?" पण तिनी जरी कितीही प्रयत्न केला असला तरी शेवटी नम्रताच्या त्या प्रश्नात लपलेला तिचा होकार संग्रामनी अचूक हेरला.त्याचा उदास चेहेरा एकदम उजळून निघाला. अति आनंदामुळे त्याला बोलायला शब्दच सुचेनात. त्यानी नुसतीच होकारार्थी मान हलवली. नम्रताच्या मागे तिच्या स्कूटर पर्यंत जाताना त्यानी विचारलं," उद्या थोडं लवकर येऊ शकशील का, प्लीज? मला उद्या night training साठी जायचंय."

नम्रता तर एक पायावर तयार होती. शेवटी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटायचं ठरवून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला होता.

दुसऱ्या दिवशी नम्रता वेळेच्या थोडी आधीच क्लास मधून बाहेर आली. 'कधी एकदा संग्रामला भेटते आणि त्याला माझा होकार सांगते' असं झालं होतं तिला. संग्राम तिची वाटच बघत होता. आज नम्रता तिचा निर्णय सांगणार होती. तसं पाहता आज परत भेटायला बोलावून तिनी indirectly तिचा होकार कालच दिला होता. आज त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार होतं इतकंच.

पण त्याआधी तिला काही गोष्टी स्पष्ट करून सांगणं आवश्यक होतं. 'कालच्या भेटीतच तिला या सगळ्या गोष्टींची कल्पना द्यायला हवी होती , पण तिला समोर बघितलं आणि मी सगळं काही विसरलो... जे जे बोलायचं ठरवून आलो होतो, त्यातलं कितीतरी मनातच राहिलं,' संग्रामच्या मनात सकाळपासून विचारांचं द्वंद्व चालू होतं. ' पण आज मात्र तिला सगळं काही स्पष्टपणे सांगितलंच पाहिजे.....पण वस्तुस्थिती समजल्यानंतर जर तिनी नकार दिला तर?' या नुसत्या विचारानीच संग्राम अस्वस्थ होत होता. 'त्यापेक्षा आत्ता काहीच नको सांगायला..लग्नानंतर हळूहळू कळेलच की तिला सगळं...पण मग ही तर शुद्ध फसवणूक झाली....नाही नाही, नम्रताला असं अंधारात ठेवणं नाही जमणार मला ! त्यापेक्षा मनातलं सगळं आज बोलून टाकतो तिच्याशी. त्यानंतर ती जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल!!'

संग्रामचा निर्णय झाला होता..आणि म्हणूनच तो आतुरतेनी नम्रताची वाट बघत तिच्या क्लास च्या बाहेर थांबला होता. तिला बाहेर आलेली बघताच संग्राम पुढे झाला. तिची नजर त्यालाच शोधत होती. तो दिसताच तिच्या चेहेऱ्यावर हसू फुललं.पण संग्राम मात्र जरा गंभीर दिसत होता. नम्रताच्या हृदयाचा ठोका चुकला..' यानी आपला विचार तर बदलला नसेल ना?'तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली...तिनी मनोमन तळ्यातल्या गणपतीला हात जोडून प्रार्थना केली,' देवा, प्लीज असलं काही नसू दे...'

आपापल्या मनाला समजावत, धीर देत दोघं समोरच्या कॅफे मधे शिरले. आदल्या दिवशी प्रमाणेच आजही संग्रामनी नम्रताची खुर्ची मागे ओढून तिला बसायला मदत केली. 'हं, an officer and a gentleman !!!' त्याच्यावर अजूनच फिदा होत नम्रता मनात म्हणाली.

काही क्षण शांततेत गेले..कशी आणि कुठून सुरुवात करावी याच विचारात दोघंही होते. सकाळपासून संग्रामला भेटायला, त्याला आपला होकार सांगायला आतुरलेली नम्रता आता अचानक गप्प होती. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. पण शेवटी सगळा धीर एकवटून तिनी बोलायला सुरुवात केली.."तुला माझा निर्णय ऐकायचा आहे ना ? मी..." ती पुढे काही बोलणार इतक्यात संग्रामनी तिला मधेच थांबवलं आणि म्हणाला," त्याआधी मला काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. आत्ता मी जे काही बोलणार आहे ते सगळं तू प्लीज नीट ऐकून घे, त्यावर पुन्हा एकदा विचार कर आणि मग काय ते ठरव."

संग्रामचं हे असलं बोलणं ऐकून तर नम्रताचं टेन्शन अजूनच वाढलं. ती जीवाचे कान करून ऐकायला लागली. संग्राम सांगत होता," तुला तर माहितीच आहे की मी आर्मी मधे आहे. मिलिटरी लाईफ हे खूप टफ असतं...फक्त सैनिकांसाठीच नाही तर त्यांच्या परिवारांसाठी सुद्धा.. सगळ्यात महत्वाचं म्हणजे - आमच्या आयुष्याची काही शाश्वती नसते," त्याला मधेच थांबवत नम्रता म्हणाली," ती तर माझ्या आयुष्याची सुद्धा नाहीये...in fact या जगात कोणाच्याच आयुष्याची शाश्वती नसते. त्यामुळे हा मुद्दा माझ्यासाठी नगण्य आहे..." नम्रताचं इतकं स्पष्ट आणि मुद्देसूद बोलणं ऐकून संग्राम मनात आत कुठेतरी सुखावला...या एका बाबतीत पारडं त्याच्याकडे झुकलं होतं. पण तरीही अजून बरेच मुद्दे होते, त्यामुळे त्यानी पुढे बोलायला सुरुवात केली,"नोकरीच्या निमित्तानी आम्हांला दर दोन तीन वर्षांनंतर आपलं बिऱ्हाड हलवावं लागतं. त्यामुळे तुला जर एखादी नोकरी किंवा करियर करायचं असेल तर तुला ते नाही करता येणार. " नम्रताकडे उत्तराच्या अपेक्षेनी बघत संग्राम बोलायचा थांबला. काही क्षण विचार करून नम्रता म्हणाली,"हं, तू म्हणतोयस ते खरं आहे, पण माझी आजी नेहेमी म्हणते- जर आपली नियत साफ असेल ना तर देव कुठल्या ना कुठल्या रुपात येऊन आपल्याला मार्ग दाखवतोच!- आणि आपली नियत तर १००% साफ आहे..त्यामुळे यातूनही काहीतरी मार्ग निघेलच. So , not to worry."

तिचं हे बोलणं ऐकून संग्रामची एक मोठी काळजी दूर झाली होती. आपल्यामुळे नम्रताला कोणत्याही प्रकारचं compromise करावं लागू नये हीच इच्छा होती त्याची...पण तिनी किती सोप्या आणि सरळ शब्दांत त्याची ही काळजी पण दूर केली होती.हळूहळू संग्रामचा धीर वाढत होता. आता त्यानी पुढचा मुद्दा मांडायचं ठरवलं.." आम्हां मिलिटरी वाल्यांचा पगार इतर कॉर्पोरेट आणि MNC वाल्या लोकांच्या तुलनेत कमी असतो. तुला आत्ता तुझ्या बाबांच्या घरी ज्या सुखसोयी मिळतायत त्या मी सध्या नाही देऊ शकणार तुला कदाचित. पण माझ्याशी लग्न केल्याचा तुला कधीच पश्चात्ताप होणार नाही एवढी गॅरंटी मात्र मी देऊ शकतो !"

संग्रामचं बोलणं संपल्यानंतरही काही क्षण नम्रता काहीच न बोलता एकटक त्याच्याकडे बघत राहिली.तिला अशी गप्प बसलेली बघून संग्राम म्हणाला," प्लीज काहीतरी बोल ना! अशी गप्प नको बसू यार...टेन्शन येतंय मला.." भारावलेल्या स्वरांत नम्रता म्हणाली," तू किती विचार केलायस माझ्याबद्दल आणि आपल्या भविष्याबद्दल! असं असताना मला पश्चात्ताप करायची गरजच काय ? आणि तू जे सुखसोयी वगैरे म्हणालास ना....तुझी बेसिक comparison च चुकतीये....म्हणजे बघ ना- माझ्या आई बाबांच्या घरी आत्ता ज्या सुखसोयी आहेत त्या त्यांनी दोघांनी मिळून गेल्या कित्येक वर्षांच्या मेहेनतीतून उभ्या केल्या आहेत ....I am sure तेवढ्या वर्षांनंतर आपल्या घरात पण एवढ्याच - कदाचित- याही पेक्षा जास्त सुखसोयी असतील. आणि पगाराचं म्हणशील तर एका आर्मी ऑफिसरची बायको म्हणवून घेण्यात मला जे समाधान, जो अभिमान वाटेल तो माझ्यासाठी पैशांपेक्षा जास्त मौल्यवान आहे."

नम्रताची इतकी क्लिअर thought process बघून संग्राम खरंच खूप इम्प्रेस झाला होता.

"अजून एक महत्वाची गोष्ट आहे नम्रता," संग्राम तिला म्हणाला खरा, पण आधीसारखंच या बाबतीतही तिच्याकडे एखादं समर्पक उत्तर तयार असेल याची त्याला खात्री होती..

"आम्हां आर्मीवाल्यांना अधून मधून फील्ड पोस्टिंग वर जावं लागतं..सलग दोन तीन वर्षं ! आणि तेवढ्या काळात आमच्या परिवाराला आमच्याबरोबर राहायची परवानगी नसते. त्यांना वेगळं राहावं लागतं. अशा वेळी तुला एकटीला सगळं घर मॅनेज करावं लागेल..."

संग्रामच्या प्रश्नांमागची त्याची काळजी, त्याच्या जीवाची होणारी तगमग नम्रताला जाणवत होती. पण या सगळ्यातून दिसणारा त्याचा प्रामाणिकपणा तिला सगळ्यात जास्त भावला होता.

त्याच्या शेवटच्या प्रश्नावर प्रतिप्रश्न विचारत नम्रता म्हणाली," माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? तुझ्या फील्ड पोस्टिंगच्या त्या दोन तीन वर्षांत तू पण तर तुझ्या परिवारापासून लांब राहशील ना! तोही एकटा!!! का बरं?" तिच्या या प्रश्नावर नाराज होत संग्राम म्हणाला," का म्हणजे? देशासाठी, त्याच्या रक्षणासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करायची तयारी असते आमची! For a soldier - Nation comes first-always and forever ." हे बोलताना त्याच्या चेहेऱ्यावर दिसणारं देशप्रेम बघून नम्रताचा ऊर त्याच्या बद्दलच्या अभिमानानी भरून आला...तिला संग्रामच्या रुपात शिवबाचा मावळाच दिसत होता जणूकाही ....

त्याचंच उत्तर त्याच्यावर उलटवत ती म्हणाली,"जर एक सैनिक देशासाठी एकटा राहू शकतो तर मग त्याचा परिवार का बरं नाही राहू शकणार? हमारा देशप्रेम आपके देशप्रेम से कम है क्या?" हे म्हणतानाचा तिचा एकंदर आविर्भाव बघून संग्राम अगदी मनापासून हसला...मघापासून गंभीर असलेल्या संग्रामला असं मनमोकळं हसताना बघून नम्रताला देखील हायसं वाटलं. आपला मुद्दा पटवून देत ती पुढे म्हणाली,"आपल्या छोट्याशा शिवबाला मोठेपणी 'छत्रपति शिवाजी महाराज ' बनवणाऱ्या जिजाऊ पण तर एकट्याच होत्या ना...आपल्या नवऱ्यापासून दूर, समोर आलेल्या प्रत्येक संकटाशी एकाकी झुंज देत !! "

तिच्या उत्तरानी भारावून जात संग्राम म्हणाला," एखादी अवघड गोष्ट पण किती सहजपणे समजावून सांगतेस तू! तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तयारच असतं का?"

त्याचा हा प्रश्न ऐकून नम्रता खुदकन हसली आणि म्हणाली," तुला पण असंच वाटतं का? अरे, माझी आजी पण हेच म्हणते नेहेमी....तिच्या मते मी वकीलच व्हायला हवं होतं.तिला जर कारण विचारलं तर म्हणते-' समोरच्याला त्याच्याच शब्दांत पकडून गप्प कसं करायचं ते बरोबर जमतं तुला!'

आजीबद्दल बोलताना नम्रताच्या डोळ्यांतली चमक बघून संग्राम म्हणाला,"भेटायलाच पाहिजे एकदा तुझ्या आजीला. आजीचा आणि तुझा इमोशनल बॉण्ड खूप स्ट्रॉंग आहे हे लक्षात आलंय माझ्या." नम्रताची गंमत करत तो पुढे म्हणाला,"का कोण जाणे पण I am feeling a bit jealous now. मला सॉलिड कॉम्पिटिशन आहे असं दिसतंय ."

"ए, काहीतरीच काय? आजी बरोबर कसली कॉम्पिटिशन? हां, पण आमच्या दोघींचं नातं एकदम मस्त आहे. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे..मी तिला सगळं सांगते ."

"अरे बापरे ! सगळं ? म्हणजे हे पण ?" संग्रामनी हातानी त्या दोघांकडे इशारा करत विचारलं. त्याच्या प्रश्नाचा अर्थ लक्षात आल्यावर नम्रता लाजून अर्धी झाली. "काहीही काय? सगळ्या गोष्टी जगजाहीर नसतात करायच्या.." संग्रामच्या डोळ्यांत अडकलेली आपली नजर सोडवून घेत नम्रता म्हणाली.

पुढचे काही दिवस नम्रतासाठी जणू सप्तरंग लेवूनच आले होते. संग्रामला भेटायच्या नुसत्या कल्पनेनीच ती मोहरून जायची. प्रत्येक वेळी तिला त्याच्या स्वभावातला एक नवा पैलू दिसायचा. एक दिवस संग्राम तिला म्हणाला,"नम्रता, मला वाटतंय की आता आपण आपल्या दोघांच्या घरच्यांना आपल्या या नात्याबद्दल सांगून टाकावं. हे असं रोज थोड्या वेळाकरता भेटणं आणि मग दुसऱ्या दिवसाच्या भेटीची वाट बघत बसणं - मला नाही चैन पडत आता तुझ्याशिवाय! आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे- पुढच्या काही महिन्यांत माझी पोस्टींग होईल आणि मग मला इथून जावं लागेल. त्यामुळे त्याच्या आधीच आपलं लग्न झालं की मग तू पण माझ्याबरोबर नव्या जागी येऊ शकशील."

त्याचं हे बोलणं ऐकून नम्रता त्याला चिडवत म्हणाली," किती अरसिक आहेस रे तू संग्राम!! आपल्या गर्लफ्रेंडला असं प्रपोज करतात का ? छान एखाद्या रोमँटिक जागी, रोमँटिक स्टाईल मधे विचारायचं असतं लग्नाबद्दल!"

आधीचा संग्राम असता तर त्याला नम्रताचं हे बोलणं खरंच वाटलं असतं. पण आता इतक्या दिवसांच्या सहवासामुळे तो नम्रताला ओळखायला लागला होता..तिचा खोडकर स्वभाव, तिचे शाब्दिक खेळ आता त्याला समजायला लागले होते. त्यामुळे तिचा हात धरून तिला हळूच आपल्याकडे ओढत तो म्हणाला,"अजून रोमान्स सुरूच कुठे केलाय मॅडम? एकदा लग्न होऊ दे, मग कळेल तुला - खरा रोमान्स काय असतो ते!" संग्रामचा हा गुगली नम्रतानी अजिबात expect नव्हता केला....आणि तोही असा भर रस्त्यात...सगळ्यांसमोर ....त्याची ही धिटाई बघून आणि त्याहीपेक्षा जास्त त्याचं बोलणं ऐकून नम्रता लाजून चूर झाली. कसाबसा त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेत तिनी आजूबाजूला पाहिलं..'कोणी बघितलं तर नाही ना..' तिचं ते मोहक लाजरं रूप आपल्या डोळ्यात साठवून घेत संग्राम म्हणाला," हाय्, मार डाला ...आता आजच बोलतो माझ्या घरच्यांशी. कधी एकदा लग्न करून तुला बरोबर घेऊन जातोय असं झालंय मला. तू पण बोलशील ना तुझ्या घरी - का मी येऊ रीतसर तुला मागणी घालायला?"

खरं म्हणजे नम्रताची अवस्था पण काही वेगळी नव्हती. तिलाही आता संग्रामपासून लांब राहाणं अवघड जात होतं. तिनी खालमानेनीच त्याला 'हो ' म्हटलं. त्यावर संग्रामनी तिला अजून चिडवत विचारलं," कांदेपोहे करता येतात ना तुला? मग आता लाग तयारीला.. लवकरच येतो माझ्या आई बाबांना घेऊन तुझ्या घरी." त्या दिवसानंतर त्यांचं लग्न होईपर्यंतचे दोन महिने अक्षरशः पंख लावूनच उडून गेले होते. संग्रामच्या अंदाजाप्रमाणे लग्नानंतर काही दिवसांतच त्याची पोस्टींग आली आणि त्या दोघांनी पुण्याला रामराम ठोकून नव्या गावी आपल्या नव्या संसाराची सुरुवात केली. संग्रामची पत्नी म्हणवून घेताना नम्रताचा ऊर अभिमानानी भरून यायचा. संग्राम फारसं बोलून नाही दाखवायचा पण नम्रताशिवाय त्याचं पानही नाही हलायचं.त्याच्यासाठी नम्रता म्हणजे त्याची 'friend, philosopher आणि guide होती. बघता बघता बारा वर्षं झाली होती त्यांच्या लग्नाला.नंदिनी आणि अनुजानी तर त्यांच्या प्रेमाच्या नात्याला पूर्णत्वाच्या शिखरावर नेऊन ठेवलं होतं.

संग्रामला पहिल्यांदा बघितल्यापासून ते आजपर्यंतचा गेल्या बारा वर्षांचा काळ नम्रताच्या डोळ्यांसमोरून सरकत गेला..शरीरानी जरी ती आत्ता त्यांच्या बेडरूममधे संग्रामशेजारी बसली असली तरी तिचं मन मात्र त्यांच्या सहजीवनाचा प्रवास करून आलं होतं. त्या पहाटेच्या शांत वेळी शेजारी झोपलेल्या संग्रामकडे बघत असताना गतस्मृतींना उजाळा देत ती किती वेळ तशीच बसून होती, तिचं तिलाही नाही कळलं.

"अशी जर एकटक माझ्याकडे बघत बसलीस तर दृष्ट लागेल हं मला..." संग्रामच्या या मिस्किल वाक्यानी नम्रता तिच्या समधीतून बाहेर आली. तिनी चमकून शेजारी बघितलं- संग्राम तिच्याकडेच बघत होता. आपली चोरी पकडली गेलीये हे तिच्या लक्षात आलं, कॉटवरून खाली उतरत ती म्हणाली," ए, आपल्या माणसांची कधी दृष्ट नाही लागत काही ! आणि माझा नवरा आहे- मी त्याला बघीन नाहीतर अजून काही करीन- तुला काय प्रॉब्लेम आहे ?" तिचा हात धरून तिला आपल्याकडे ओढत संग्राम म्हणाला," तू केव्हापासून नुसतीच बघतीयेस - करत काहीच नाहीयेस- हाच तर प्रॉब्लेम आहे !" त्याच्या बोलण्यामागचा अर्थ त्याच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता नम्रताला.पण त्याला दूर ढकलत ती म्हणाली," आयडिया खूप tempting आहे..पण timing थोडं चुकतंय तुझं!! तुला P.T. साठी जायचंय आणि मला स्वैपाकघरात...त्यामुळे आता उठा आणि वास्तवात या!" त्यावर 'हाय्, ये बेदर्द ज़माना .." असं काहीतरी म्हणत संग्राम उठला आणि नम्रताही हसत हसत स्वैपाकघरात गेली.

तिच्या त्या दिवसाच्या कामांच्या लिस्ट मधे दोन महत्वाची कामं होती- सकाळी AWWA ची मीटिंग होती आणि आज तिनी संग्रामसाठी पुरणपोळ्या करायचं ठरवलं होतं. मनात सगळ्या कामांची प्लॅंनिंग करत ती मुलींना उठवायला गेली. मुलींसाठी ब्रेकफास्ट, त्यांचे दोघींचे डबे आणि त्यात भर म्हणून AWWA ची मीटिंग आणि पुरणपोळीचा घाट...नम्रताची थोडी धावपळच होणार होती आज. एरवी दर रविवारी ती पुढच्या आठवड्याच्या स्वैपाकाच्या हिशोबानी बरीचशी पूर्वतयारी करून ठेवायची...भाज्या कापून ठेवणं, उसळींकरता कडधान्यं भिजवून त्यांना मोड आणून तयार ठेवणं, इडली दोस्यासाठी बॅटर बनवून ठेवणं, मुलींकरता केक्स, स्नॅक्स बनवून ठेवणं वगैरे वगैरे...पण मागच्या दोन दिवसांत झालेल्या घडामोडींमुळे तिची सगळी प्लॅंनिंग गडबडली होती. काही वेळानी दोघी मुली ब्रेकफास्ट करून त्यांचे डबे घेऊन शाळेत गेल्या आणि नम्रताला थोडी उसंत मिळाली. "चला, दिवसाच्या नाटकातला पहिला अंक संपला," दोन मिनिटांसाठी सोफ्यावर बसत नम्रता म्हणाली.तेवढ्यात संग्राम P.T. हून परत आला. "उठा मॅडम, आता नवरोबा चा नंबर,"असं म्हणत ती स्वैपाकघरात शिरली.

'जोपर्यंत संग्राम ऑफिसला जात नाही तोपर्यंत पुरणपोळीची तयारी कशी करणार? त्याला सरप्राईज द्यायचंय ना!'एकीकडे बाकी कामं हातावेगळी करता करता तिच्या डोक्यात विचारचक्र चालू होती..
'छे! हे असं लपून छपून कामं करणं किती अवघड असतं ! पण नवऱ्याच्या चेहेऱ्यावर अचानक फुलणारा आनंद बघायचा असेल तर हे सगळे द्राविडी प्राणायाम करावेच लागतील नम्रताताई तुम्हाला..' नम्रतानी स्वतःलाच समजावलं. कधी एकदा संग्राम ऑफिसला जातो असं झालं होतं तिला.कधी नव्हे ती आज पहिल्यांदा ती संग्रामच्या घरातून बाहेर पडण्याची वाट बघत होती.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users