माझी सैन्यगाथा (भाग १९)

Submitted by nimita on 26 April, 2019 - 04:54

वेलिंग्टन मधला तो एक वर्षाचा कालावधी म्हणजे आमच्यासाठी एक 'holiday at a hill station' च होता असं म्हणायला हरकत नाही. इथे 'आमच्यासाठी' या शब्दातून 'मी आणि ऐश्वर्या -आम्हां दोघींसाठी' असा अर्थ अपेक्षित आहे, कारण नितीनला त्याच्या कोर्स मधून इतर गोष्टींसाठी पुरेसा वेळच नाही मिळायचा. सोमवार ते शनिवार लेक्चर्स, सबमिशन्स, exams या सगळ्यात अगदी आकंठ बुडलेले असायचे सगळे ऑफिसर्स.. बऱ्याचवेळा त्यांचा रविवारचा दिवस सुद्धा पुढच्या आठवड्यात येणाऱ्या महत्वाच्या assignments च्या तयारीतच जायचा. त्यामुळे पहिल्या काही आठवड्यांतच आम्हां समस्त महिलांना एक साक्षात्कार झाला होता...' रविवारी सुट्टी असते' ही निव्वळ एक अंधश्रध्दा आहे.

पण म्हणतात ना 'every black cloud has a silver line'...आमचे सगळ्यांचे नवरे त्यांच्या कोर्स मधे गुरफटलेले असल्यामुळे एका अर्थी आम्हां स्त्रियांना पर्वणीच होती. फक्त त्यांच्या जेवणा खाण्याच्या वेळा सांभाळल्या की झालं ! मग उरलेल्या वेळात आम्ही सगळ्या सख्या आनंदोत्सव करायला मोकळ्या!!

मग कधी एकत्र pot luck चे प्रोग्रॅम्स, तर कधी ladies club साठी एखाद्या फॅशन शो ची प्रॅक्टिस ...

सगळे ऑफिसर्स मोस्टली car pool करून कॉलेजमधे जायचे. त्यामुळे कोणा ना कोणाची गाडी असायचीच आमच्या दिमतीला.. सकाळी नवरा कॉलेज मधे आणि मुलं शाळेत गेली की दुपारच्या जेवणापर्यंत निश्चिन्ति असायची ... मग हळूहळू सगळा स्त्रीवर्ग देखील आपापल्या सख्यांसोबत नवनवीन adventures करता बाहेर पडायचा.

मी पण माझ्या मैत्रिणींबरोबर बऱ्याच उचापाती केल्या त्या वर्षभरात...त्यात वेगवेगळ्या सदरांत मोडणाऱ्या ऍक्टिव्हिटीज होत्या बरं का! त्या दिवसांत मला नवनवीन रेसिपीज गोळा करून त्या ट्राय करून बघायची फार हौस होती... त्यामुळे जेव्हा मला कळलं की एके ठिकाणी कॉंटिनेंटल कुकिंग चे क्लासेस चालतात तेव्हा लगेच मी तिकडे धाव घेतली. त्याचबरोबर एका मैत्रिणीच्या कृपेनी वेगवेगळ्या केक्स आणि डेझर्ट्स च्या पण रेसिपीज मिळाल्या.

माझी ही अन्नपूर्णेची उपासना फक्त घराबाहेरच चालू होती असं नाही हं... तर घरात खुद्द रानी अम्मा कडूनही मी काही खूप स्पेशल रेसिपीज आत्मसात केल्या... त्यातली सांबार मसाल्याची तिची रेसिपी तर इतकी हिट झाली की पुण्यातल्या माझ्या माहेरच्या मंडळींकडून माझ्या सांबारला 'अप्रतिम' अशी उत्स्फूर्त दाद मिळाली होती...वर्षानुवर्ष फक्त 'वैशाली' च्या सांबारचे भक्त असणारे पुणेकर..आणि त्यांनी रानीच्या मसाल्याला 'अप्रतिम' म्हणावं !!! मला तर अगदी जग जिंकल्याचा आनंद झाला होता तेव्हा.... कमळफुलांच्या बाबतीतही तसंच... पिढ्या न् पिढ्या कमलाबाई ओगलेंच्या मार्गदर्शनाखाली पाककला शिकूनही काही जणींना 'न जमणारी' कमळफुलं मला माझ्या रानी अम्मानी अगदी सहज करून दाखवली. मी लगेच दुकानात जाऊन कमळफुलाचा साचा घेऊन आले आणि अशा रीतीने 'प्रिया स्पेशल रेसिपीज' च्या लिस्ट मधे अजून एक नाव ऍड झालं.

ऐश्वर्याला पण रानी अम्मा खूप आवडायची. रानी घरात काम करत असताना जेव्हा जेव्हा ऐश्वर्या घरी असायची (मोस्टली शनिवार रविवार..कारण तेव्हा तिच्या शाळेला सुट्टी असायची), तेव्हा ती सतत तिच्या मागे मागे करायची. मला म्हणायची," आई, मी मोठी झाले ना की रानी अम्मा होणार," मग रानी कडे बघून पुढे म्हणायची," अम्मा, मुझे आपके जैसा झाडू-पोछा और बरतन माँजना सिखाओ ना।" खूप हसायचो आम्ही दोघी हे ऐकून! एकदा अशाच एका वेळी अचानक खूप भावुक होऊन रानी नी ऐश्वर्या ला जवळ घेतलं आणि म्हणाली," तुला कधीच असलं काम करावं नाही लागणार..खूप शिकून खूप मोठी मॅडम होशील तू!" तिचे ते आशीर्वादाचे शब्द ऐकून माझेही डोळे पाणावले.

काही वर्षांपूर्वी बेंगळुरू ला माझ्या नणंदेकडे गेलो होतो त्या वेळी पुन्हा एकदा वेलिंग्टन ला जायची संधी मिळाली. जेव्हा आमच्या घरापाशी पोचलो तेव्हा घराची साफसफाई चालू होती .आधीचा कोर्स संपून पुढचा कोर्स सुरू व्हायचा होता. घराच्या मागच्या बाजूला रानी च्या घराच्या दिशेनी जायला निघाले तेवढ्यात तीच बाहेर येताना दिसली. मी तिला लगेच ओळखलं ...मधल्या दहा बारा वर्षांत फारसा फरक नव्हता पडला तिच्यात ! आत्ताही तशीच हसतमुख होती....मी तिला विचारलं," पहचाना मुझे?" ती दोन मिनिटं माझ्याकडे आणि माझ्या मुलींकडे बघत राहिली.. मग एकदम तिचा चेहेरा उजळला. ऐश्वर्या कडे बघत म्हणाली," ये तो ऐस्वरा है ना? आप जोशी मॅडम हो!" आता तिची नजर सृष्टीवर जाऊन स्थिरावली, " जब आप यहाँ से गये तो ये आप के पेट में थी ! है ना?" इतकं सगळं लक्षात होतं तिच्या.....मी तर थक्कच झाले. कारण त्यांना तर दर वर्षी नवीन लोकांसाठी काम करायचं असतं..असं असताना तिला मी लक्षात होते, इतकंच नव्हे तर ऐश्वर्या चं नाव पण आठवत होतं.. वेलिंग्टन सोडून जम्मूला जाताना मला (सृष्टीच्या वेळी) सहावा महिना चालू होता. हेसुद्धा रानीच्या लक्षात होतं. शेवटी न राहवून मी तिला विचारलंच," इतक्या वर्षांनंतरही तुला माझ्याबाबतीत इतकं सगळं कसं आठवतंय?" त्यावर ती म्हणाली," मेनसा! दर वर्षी जेव्हा नवीन मॅडम या घरात येतात ना, तेव्हा नेहेमी मला तुमची आठवण येते. तुम्ही मला ज्या प्रेमानी आणि आदरानी वागवलंत ना, तसं खूप कमी लोकांना जमतं."

अरेच्चा, पण मी असं काय वेगळं केलं होतं? माझ्याच लक्षात नव्हतं येत..त्यावर ती म्हणाली,"सगळं सांगत बसले तर संध्याकाळ होईल, पण एकदा मी जेव्हा तुमच्या घरी कामाला आले होते तेव्हा पावसात पूर्ण भिजले होते आणि थंडीमुळे अक्षरशः थरथर कापत होते. मला तशा अवस्थेत दारात उभी राहिलेली बघून तुम्ही त्याक्षणी तुमच्या अंगावरची शाल माझ्या अंगावर घातली होती..मी आजपर्यंत ती शाल जपून ठेवलीये मेनसा.... तुमची आठवण म्हणून !"

खरं सांगायचं तर हे सगळं माझ्या अजिबात लक्षात नव्हतं. पण हे सगळं सांगत असताना तिच्या डोळ्यांत मात्र पाणी आलं होतं. आम्ही दोघीनी एकमेकींना घट्ट मिठी मारली...मधली दहा बारा वर्षं तिच्या डोळ्यांतल्या पाण्याबरोबर जणूकाही वाहून गेली होती.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली मोलकरीण मिळाली तुम्हाला, तुम्ही केलेल्याची जाणीव असणारी! नाही तर इथे बोट द्यायचा अवकाश की मोलकरणी कडेवरच येऊन बसतात Happy

सुंदर आठवणी!
राजसी, मला वाटतं की army setting मध्ये काम करणाऱ्या मदतनीसांना पण एक प्रकारची शिस्त आणि आदब असावी.