रावणास का पोसत असतो?

Submitted by निशिकांत on 25 April, 2019 - 05:53

विजयादश्मी मुहुर्तावरी
दशाननाला जाळत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

रामप्रभूंना तोंड द्यावया
समोर होता एकच रावण
हजार आता सभोवताली
लुटावयाला अमुचा श्रावण
राम व्हायचे सोडून त्याच्या
पादुकांस प्रक्षाळत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

आज जरी का कुणी लक्ष्मण
भूक लागुनी मुर्छित झाला
हनुमंताने कुठे उडावे?
संजिवनीचा शोध घ्यायला
पर्वतावरी घरे, लव्हासा
झाडे आम्ही तोडत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

सत्तांधांच्या हस्ते जेंव्हा
पुतळ्याला फुंकून टाकले
दुष्टाचे निर्दालन झाले
मनोमनी जनतेस वाटले
आजकालचा रावण येथे
जुन्या रावणा जाळत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

अनेक रावण जिवंत असुनी
मानमरातब त्यांना मिळतो
पुरुषोत्तम मर्यादित, त्याचा
म्हणे मंदिरी वावर दिसतो
रामकथेतिल आदर्शांचे
डोस जमाना सोसत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

समाज सारा राम बनावा
प्रत्त्यंचा ओढून धराया
मुठभर रावण वेचवेचुनी
बाण मारुनी नष्ट कराया
कृती न करता, समाज निर्बल
प्राक्तनास का कोसत असतो?
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाईट घडलं तरी देखील काही सुद्धा बिघडत नाही
चांगल्यावाचून जगच या काही सुद्धा अडत नाही
रावण होता म्हणूनच रामालाही अर्थ आहे
वाईटाच्या असण्याशिवाय चांगल सगळं व्यर्थ आहे

दुख आहे म्हणूनच जगात आनंदाच मोल आहे
दुख जरका संपून गेल तर आनंदही फोल आहे
त्याच दुख मला नाही म्हणून सर्व छान आहे
निरपेक्ष आनंदाच इथे कुणाला काय आहे?

आजकालचा रावण येथे
जुन्या रावणा जाळत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

वाईट घडलं तरी देखील काही सुद्धा बिघडत नाही
चांगल्यावाचून जगच या काही सुद्धा अडत नाही
रावण होता म्हणूनच रामालाही अर्थ आहे
वाईटाच्या असण्याशिवाय चांगल सगळं व्यर्थ आहे

भारीच. कशी राहीली वाचायची!
सुरेख.

सुंदर