गुरु महान

Submitted by Asu on 23 April, 2019 - 11:29

जगप्रसिध्द साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांचा २३ एप्रिल हा जन्मदिन आणि मृत्यूदिनही! हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
त्यांच्या स्मृतीला वंदन करून सर्व रसिक वाचकांना पुस्तक दिनानिमित्त-

गुरु महान

पुस्तके जगती गुरु महान
छडीविना देती अगाध ज्ञान

वेद पुराणे ही ज्ञानाची खाण
करी वारसा आम्हां धनवान

सुश्रुत आणिक चरकसंहिता
आयुर्वेदाच्या या शुद्ध सरिता

आदर्श रामायण वेड लाविते
दीपस्तंभ आम्हां मार्ग दाविते

गीता महाभारत ग्रंथ महान
जगा देती जगण्याचे भान

नामा तुकयाच्या अभंगगाथा
मार्ग दाविती वारकरी पंथा

रामदास स्वामींचा दासबोध
शब्दांमधून जगण्याचा शोध

विठ्ठल प्रभू अन् वात्स्यायन
करती निरामय कामजीवन

पुस्तकगुरु आयुष्य रक्षणा
कधी ना मागती गुरुदक्षिणा

साहित्याच्या अफाट जगती
असंख्य तारे नभी चमचमती

ज्ञानलालसेची घेऊन पणती
करू शके ना कुणी गणती

पुस्तकाविना नाही विज्ञान
गाऊ पुस्तकांना मंगलगान

वाचतील ते तरतील जगती
जाण माणसा याची महती

कथा कविता अन् कादंबरी
पुस्तकांचे अवतार कितीतरी

बांधू पुस्तकांचे भव्य मंदिर
जगणे करू आणिक सुंदर

शेक्सपियर राजा तू महान
पुस्तकदिनी तुझा अभिमान

प्रा. अरूण सु. पाटील (असु)
(दि.23.04.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वाचतील ते
तरतील जगती
जाण माणसा
याची महती >>> सुंदर! पु.ले.शु !