Odd Man Out (भाग २०)

Submitted by nimita on 22 April, 2019 - 11:25

दुसऱ्या दिवशी रोजच्या सवयीमुळे नम्रताला पहाटेच जाग आली. शेजारी झोपलेल्या संग्रामची झोपमोड होणार नाही याची खबरदारी घेत ती हळूच उठून बसली, पण त्याच्यापासून लांब जायला तिचं मन अजिबात तयार नव्हतं.जेव्हापासून युनिटच्या मूव्ह ची बातमी समजली होती तेव्हापासूनच तिच्या मनावरचा तिचा ताबा जणूकाही नाहीसा झाला होता....ते राहून राहून संग्राम आणि त्याच्याबद्दलच्या आठवणींभोवतीच घुटमळत होतं. पण यात तिच्या मनाची काहीच चूक नव्हती. या सगळ्या आठवणी नम्रतासाठी lifeline च होत्या. संग्रामबरोबर घालवलेला एकेक क्षण, त्यानी उच्चारलेला शब्द न् शब्द नम्रताच्या मनात आठवणींच्या रुपात कोरला गेला होता. त्याची ती खट्याळ नजर, तो धुंदावणारा स्पर्श.....या सगळ्याची शिदोरी बरोबर घेऊनच तिला पुढची दोन अडीच वर्षं काढायची होती. आणि म्हणूनच की काय, आत्ता देखील तिच्याही नकळत ती संग्रामला न्याहाळत होती....त्याचा चेहरा आपल्या डोळ्यांत साठवून घेत होती.

पुन्हा एकदा तिचं मन आठवणींच्या रथात बसून भूतकाळाच्या सफरीवर निघालं आणि थेट पुण्याला जाऊन पोचलं - नम्रताला अजूनही तो दिवस अगदी जसाच्या तसा लक्षात होता; कारण त्याच दिवशी तिची आणि संग्रामची पहिली भेट झाली होती. भेट पेक्षा नजरभेट म्हणणं जास्त योग्य ठरेल....

स्नेहाचं- नम्रताच्या मैत्रिणीचं लग्न होतं.. स्नेहा म्हणजे तिची अगदी जीवाभावाची, शाळेत असल्यापासूनची मैत्रीण... आणि त्यांच्या ग्रुप मधलं पहिलंच लग्न होतं ते, त्यामुळे नम्रताच्या उत्साहाला अगदी उधाण आलं होतं. नवरा मुलगा हितेश हा गुजराती असल्यामुळे सीमांतपूजन झाल्यानंतर दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला होता, खूप धमाल केली होती सगळ्यांनी मिळून...दांडिया, गरबा, अंताक्षरी, dumb sharads....नम्रतानी अगदी स्वतः पुढाकार घेऊन सगळा कार्यक्रम पार पाडला होता. पण त्या गर्दीत ,तिथल्या ओळखी-अनोळखी चेहेऱ्यांत राहून राहून तिची नजर एका चेहेऱ्यावर वारंवार स्थिरावत होती. आणि गंमत म्हणजे जेव्हा जेव्हा ती त्याच्याकडे बघत होती तेव्हा त्याची नजरही तिच्यावरच खिळलेली दिसत होती. तिनी जेव्हा तिच्या मैत्रिणीला त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा कळलं की तो नवऱ्या मुलाचा मित्र आहे. बस्स्, इतकंच!

त्या रात्री कितीतरी वेळ नम्रता 'त्या' मुलाबद्दलच विचार करत होती..तिच्या मनात आलं,'आत्तापर्यंत हे असं फक्त कथा कादंबऱ्यात वाचलं होतं आणि सिनेमात पाहिलं होतं. पण असं आपल्या बाबतीत घडेल असं कधी वाटलंच नव्हतं.' पण दुसऱ्याच क्षणी तिनी आपल्या कल्पनेचा पतंग खाली खेचला...'काहीही हं नम्रता..तुला वाटतंय तसं काही नसेल...उगीच जास्त रोमँटिक व्हायची गरज नाहीये.' पण 'दिल है के मानता नहीं'..अशी अवस्था झाली होती नम्रताची....तिच्या फ्रेंड सर्कल मधे मैत्रिणींबरोबरच तिचे मित्रही बरेच होते. खूप मस्त ग्रुप होता त्यांचा...त्या सगळ्यांच्या मैत्रीच्या नात्याची वीण खूप घट्ट होती. पण आजपर्यंत कुठल्याही मित्राशी बोलताना किंवा त्याच्याकडे बघताना तिला आजच्या सारखी ती अनामिक हुरहूर कधीच जाणवली नव्हती. त्या अनोळखी मुलाची ती नजर आठवून नम्रता बसल्या जागी शहारून निघाली. त्याचं ते एकटक तिच्याकडे बघणं...इतर कोणी असता तर तिनी त्याचा चांगलाच समाचार घेतला असता; पण त्याच्या नजरेत काही तरी जादू होती...नम्रताबद्दल कौतुक होतं...आदर, सन्मान, होता..एक वेगळीच ओढ जाणवत होती तिला ...'उद्या लग्नाला पण येईलच की तो..' या विचारानी नम्रताला अचानक हुरूप आला होता.. ती अगदी अधीरतेनी दुसरा दिवस उजाडायची वाट बघायला लागली. दुसऱ्या दिवशी लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांमधे तिची नजर फक्त त्यालाच शोधत होती. पण शेवटपर्यंत तो दिसलाच नाही. नम्रताचा खूप हिरमोड झाला. काल रात्रीपासून आकाशात विहार करणारं तिचं स्वप्नांचं विमान धाडकन जमिनीवर कोसळलं होतं.'तुला म्हटलं होतं ना- जास्त रोमँटिक व्हायची गरज नाही म्हणून!! हे असं सगळं फक्त कथा कादंबऱ्या आणि सिनेमातच होत असतं... बावळट कुठली..निघाली होती one way कनेक्शन जोडायला...'तिनी स्वतःच स्वतःला दम भरला.

त्यानंतर दोन दिवस होऊन गेले.नम्रता पुन्हा एकदा तिच्या रोजच्या रुटीन मधे रुळली, पण तरीही मधूनच तिला 'ती' नजर आठवायची ,'तो' चेहरा डोळ्यासमोर यायचा.

तिसऱ्या दिवशी संध्याकाळी नम्रता डेक्कनच्या चौकातला तिचा सतार चा क्लास संपवून बाहेर तिच्या स्कूटरपाशी आली आणि अचानक तिला 'तो' दिसला ...तिच्या स्कूटर जवळच उभा होता..तिचीच वाट बघत होता बहुतेक. त्याला असं अचानक समोर आलेला बघून ती गोंधळून गेली. काय बोलावं , काय करावं काही काही सुचेना! तिची होणारी धांदल बघून त्याला मात्र खूप मजा येत असावी.. आपलं हसू लपवत तो तिला म्हणाला,"हाय, माझं नाव संग्राम आहे.आपण परवा एकमेकांना भेटलो होतो." त्याचा तो धीरगंभीर आवाज ऐकून नम्रता अजूनच दिवानी झाली..पण स्वतःला सावरून घेत ती म्हणाली,"भेटलो वगैरे नव्हतो, फक्त बघितलं होतं.."

"अच्छा ! म्हणजे तुम्ही पण बघत होतात का मला?" संग्रामनी विचारलेल्या त्या डायरेक्ट प्रश्नानी तर नम्रताच्या मनात आलं....'हे धरणीमाते, सीतामाईसारखंच मला पण तुझ्यात सामावून घे.' विषय बदलत ती म्हणाली," तुम्ही मला भेटायला आला आहात का? पण तुम्हाला कसं कळलं की मी इथे क्लास ला येते? नक्की काय काम आहे तुमचं माझ्याकडे ?"

तिची प्रश्नांची सरबत्ती मधेच थांबवत संग्राम म्हणाला," असं रस्त्यात उभं राहून बोलण्यापेक्षा आपण समोरच्या 'गुड लक कॅफे' मधे जाऊन बोलूया का?"

खरं म्हणजे नम्रता त्याच्याबरोबर जायला अगदी एक पायावर तयार होती, पण तिच्या छातीत उगीचच धडधड वाढायला लागली. तिनी घाईघाईत सांगून टाकलं," आज नाही जमणार. घरी जायला उशीर झाला तर माझी आजी काळजी करेल." तिचं उत्तर ऐकून संग्रामचा चेहेरा उतरला. ते बघून का कोण जाणे पण नम्रताला स्वतःचाच राग आला. ती गडबडीनी पुढे म्हणाली," पण आता तुम्ही एवढं इथपर्यंत आला आहात तर तुमच्यासाठी थोडा वेळ थांबीन मी.."

तिचं शेवटचं वाक्य ऐकून संग्रामचा चेहेरा परत खुलला आणि त्याला परत खुश झालेला बघून नम्रता पण सुखावली.

त्या दिवशी थोड्या वेळासाठी म्हणून त्याच्या बरोबर कॅफे मधे गेलेली नम्रता अर्ध्या पाऊण तासानी जेव्हा बाहेर आली तेव्हा अक्षरशः हवेत तरंगत होती.

विचारांच्या नादात असल्यामुळे ती घरी कधी पोचली तिचं तिलाही नाही कळलं. तिच्या चेहेऱ्यावरचं ते हसू बघून तिच्या आजीनी विचारलं सुद्धा," काय गं!आज अगदी खुशीत दिसतीयेस? नवीन राग शिकवला वाटतं क्लास मधे सरांनी?"

आजीचा प्रश्न ऐकून नम्रता भानावर आली. "हो अगं, आज खूप छान वाटतंय. काहीतरी नवीन कळलंय ना!आता कधी एकदा उद्याच्या क्लासला जातीये असं झालंय मला!" आपल्याच तंद्रीत बोलत ती तिच्या खोलीत गेली. आता खरंच तिला दुसऱ्या दिवसाचे वेध लागले होते कारण संध्याकाळी परत ती संग्रामला भेटणार होती. आजच्या भेटीत संग्रामनी तिला स्वतःबद्दल बरंच काही सांगितलं होतं..पण तिच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट होती...आणि ती म्हणजे 'संग्राम आर्मीमधे होता !'

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users