फिके चांदणे धूसर वाटा (तोच खयाल, वेगळे वृत्त: वनहरिणी)

Submitted by माउ on 22 April, 2019 - 11:09

लवंगलता आणि वनहरिणी व्रुत्त साधारण सारखे असल्यामुळे लवंगलता मधील एक कविता वनहरिणी मधे लिहून बघितली आहे.

फिके चांदणे धूसर वाटा रात वेगळी दिसते आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी झुरते आहे

पाण्यावरती चंद्र ठिबकतो स्वप्न जागते किना-यावरी
जुळवित बसतो वेडा कोणी नि:शब्दाला धुक्याच्या तिरी
पणती होउन आस निरागस मंद देवळी विझते आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी झुरते आहे..

देहावरती आठवणींच्या कोरत येते चांदणरेषा
रात्र पोचते डोळ्यांमधुनी स्पर्शफुलांच्या अनाम देशा
ओठांवरती ओठ तिथे अन मिठी मोकळी मिळते आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी झुरते आहे..

भास कुठेसा श्वासांनाही देऊन जातो हळवे काही
तुझ्यावाचुनी देहामध्ये काळीज आता उरले नाही
तुझे बोलणे, तुझे लाजणे , तुझे हासणे, स्मरते आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी झुरते आहे..

-रसिका

Group content visibility: 
Use group defaults

पणती होउन आस निरागस मंद देवळी विझते आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी झुरते आहे..

भास कुठेसा श्वासांनाही देऊन जातो हळवे काही
तुझ्यावाचुनी देहामध्ये काळीज आता उरले नाही

सुरेख! भारीच!

>>रात्र पोचते डोळ्यांमधुनी स्पर्शफुलांच्या अनाम देशा
अगदी transport करतात या ओळी.. अतिशय सुंदर!

वृत्ताची लगावली आणि इतर माहिती द्यावी प्लिज.