उत्सर्जन

Submitted by विजयकुमार on 22 April, 2019 - 03:25

अंधारलाटा शरीरास
धडका देत असताना
गलितगात्र शरीर
वासनेचे किनारे
शोधायला लागते
वादळात भरकटल्या
नौकेसारखे.

वाळू चिकटलेले सारे
पाउलठसे मग
सारा किनारा रिता
करून
रस्ते वालुकामय करतात
अन्
गर्भगळीत समुद्र
बेवारशी खडकांना
धडका द्यायला लागतो.

जमीनीचा स्पर्श होताच
मस्यपुरुषाला पाय
फुटतात
अन्
काचवाटा तुडवत
काळे रस्ते लाल करत
तो
प्राक्तनाच्या ढगाआड लपल्या
वासनाचंद्राचे
माग काढायला लागतो.

उफाळलेल्या समुद्राची
गाज
रस्त्यारस्त्यावर आक्रोश
मांडून
काळोखथिजल्या हृदयाचा
थरकाप उडवत
विसर्जनाची तयारी सुरु करते.

काळनिद्रेत झोपल्या
काळाजांचे थरकाप उडवत
विजा कडाडू लागतात
सीमा सोडून समुद्र
जमिनीकडे धाव घेतो
निलाजरा.

अंधार दाटला रस्ता
खारट होवून
तहानेची हाव
उत्सर्जित करत असताना,
मावळत्या चंद साक्षीने
समुद्र माघार घेतो
अन्
फेस फेस होवून शरीर
विरघळते,
खवले खवले होवून चंद्र
धरणीवर कोसळतात.

विजयकुमार.........
१४.११.२००९, मुंबई

Group content visibility: 
Use group defaults