Odd Man Out (भाग २६) अंतिम भाग

Submitted by nimita on 21 April, 2019 - 01:24

संग्राम एकटाच ऑफिसमधे थांबून फाईल्स चाळत बसला होता. त्याचे CO (Commanding Officer) आपलं काम संपवून बरोब्बर वेळेत घरी जायला निघाले होते. ते गेल्यानंतर इतर ऑफिसर्स ही एक एक करून ऑफिसमधून निघाले होते. पण संग्राम मात्र उगीचच रेंगाळला होता. "सर, आप अभी तक घर नहीं गये?" संग्रामला अजूनही काम करताना बघून मेजर कुलदीपनी त्याला विचारलं. "कुछ urgent task है क्या? Should I wait ? एक साथ ही चलते हैं फिर।" त्यांनी मदतीची तयारी दाखवली."अरे नहीं । कुछ खास नहीं है। आप जाओ घर। मैं भी निकलही रहा हूँ।" असं म्हणत संग्रामनी त्यांना रवाना केलं.आता फक्त ऑफिसमधले एक दोन clerks त्या दिवशी आलेली official कागदपत्रं sort out करण्यात मग्न होते.

खरं म्हणजे संग्रामचंही सगळं काम केव्हाच झालं होतं. पण तरीही तो आज घरी जायला मुद्दाम उशीर करत होता. आणि त्याला तसंच खास कारण होतं... सकाळी जेव्हा तो त्याचा चहाचा कप ठेवायला किचन मधे गेला होता तेव्हा त्याला ओट्यावर कोपऱ्यात ठेवलेलं पुरणयंत्र दिसलं होतं.. 'अरे व्वा ! आज पुरणपोळी आहे वाटतं...' त्याला खूप आवडायची नम्रताच्या हातची पुरणपोळी...'पण आज तर कुठलाच सण किंवा काही खास occasion नाहीये !' याबद्दल नम्रताला विचारण्यासाठी तो तिला शोधत किचनबाहेर आला. पण तेवढ्यात त्याच्या डोक्यात प्रकाश पडला...'Oh yes... हा बेत खास माझ्यासाठी ठरवला असणार नम्रतानी! मला सरप्राईज द्यायचा विचार दिसतोय...म्हणूनच ते पुरणयंत्र अगदी कोपऱ्यात इतर भांड्याच्या आडोशाला लपवून ठेवलंय तिनी..मला दिसू नये म्हणून . आणि म्हणूनच मला काही सांगितलं नाहीये अजून याबद्दल. नाहीतर एरवी अगदी छोट्यातली छोटी गोष्ट पण माझ्याबरोबर share करते ती!' एकीकडे PT ला जाण्यासाठी तयार होता होता संग्रामच्या मनात विचार चालू होते..'कधी कधी वाटतं, मी खरंच तिच्या लायक आहे का? माझ्या प्रेमाखातर तिनी आजपर्यंत किती किती आणि काय काय सोसलंय. माझ्याबरोबर देशातल्या दुर्गम भागात, God forsaken प्रदेशांत राहिली. माझ्या 'असण्यापेक्षा' माझ्या 'नसण्याची' तिला जास्त सवय झालीये आता. Single handedly घर मुली आणि मी असं सगळ्यांना सांभाळते ती एकटी..पण कधीच कसलीही डिमांड नाही की कुरकुर नाही. आणि त्यात भर म्हणून मला खुश ठेवायची तिची ही धडपड ! उगीच दगदग करून घेते जीवाची..पण तसं काही म्हणालो तर म्हणते' तुला नाही कळणार ते..नवऱ्यासाठी काहीही केलं तरी त्याची दगदग जाणवत नसते बायकोला!'

खरं म्हणजे आज तिची AWWA ची मीटिंग पण आहे..मीटिंग जरी अकरा वाजता असली तरी तिला उशिरात उशिरा साडेदहा ला तरी निघावंच लागेल घरातून....त्यात अजून हा पुरणपोळीचा घाट घातलाय वेडाबाईनी...कसं जमेल दोन्ही एकदम? आणि मी याबाबतीत काही विचारू पण शकत नाहीये...कारण मग तिचं सरप्राईज नाही राहणार..' एकीकडे हे विचार चालू असतानाच संग्रामला एक आयडिया सुचली होती..जरी प्रत्यक्ष मदत करता आली नाही तरी indirectly, नम्रताच्याही नकळत तिला मदत करायचं संग्रामनी ठरवलं...आणि म्हणूनच सकाळी तो नेहेमीच्या वेळेपेक्षा लवकर ऑफिसला जायला निघाला होता. -' तेवढाच थोडा जास्त वेळ मिळेल तिला ' हा विचार करून!

ऑफिस मधून पण तो AWWA च्या मीटिंगला track करत होता. नम्रताला घरी सोडून जेव्हा गाडी परत युनिट मधे गेली होती तेव्हा ऑलरेडी पाऊण वाजून गेले होते. आणि म्हणूनच त्यानी नम्रताला फोन करून 'मला यायला उशीर होईल' असं सांगितलं होतं....

युनिट च्या मूव्ह बद्दल समजल्यापासून मागच्या दोन दिवसांत नम्रताच्या मनात चालू असलेली चलबिचल संग्रामला जाणवत होती. कधी नव्हे ते यावेळी तोसुद्धा थोडा इमोशनल होत होता. 'आजपर्यंत इतक्या वेळा आपण घरापासून लांब राहिलोय, पण कधीच अशी हुरहूर नव्हती मनात..त्यात भर म्हणून काल नम्रतानी पुण्यात न राहण्याबद्दल जे काही थोडंफार सांगितलं...ते ऐकून तर मन अजूनच सैरभैर झालंय..' हातातल्या फाईल्स उगीचच वरखाली करत संग्राम विचार करत होता. 'मी नसताना ती एकटी सगळं घर manage करते याबद्दल मला नेहेमीच तिचं कौतुक वाटतं. पण हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाहीये हे आता जाणवतंय.'

संग्रामला अचानक काहीतरी आठवलं...मागच्याच आठवड्यात त्यांचे फ्रेंड्स स्नेहा आणि हितेश त्यांच्याघरी चार दिवस राहायला आले होते. बरोबर त्यांचा पाच सहा वर्षांचा मुलगा - साहिल पण होताच. खूप एन्जॉय केलं होतं सगळ्यांनी मिळून. त्यांच्यातलं मैत्रीचं नातंही तसंच होतं ना...एक तर हितेश संग्रामचा शाळेपासूनचा मित्र आणि स्नेहा ही नम्रताची खास मैत्रीण...स्नेहा गमतीनी त्याला 'दुहेरी मैत्री' म्हणायची. नम्रताकरता तर ही मैत्री अजूनच खास होती कारण स्नेहा आणि हितेशच्या लग्नातच तर तिची आणि संग्रामची भेट झाली होती. तर एका संध्याकाळी संग्राम आणि हितेश बाहेर लॉन मधे बसून गप्पा मारत होते...क्रिकेट, राजकारण वगैरे विषय चघळून झाल्यावर त्यांच्या संभाषणाची गाडी हळूहळू 'सुखी संसार आणि समाधानी बायको यासाठी होणारी नवऱ्याची धडपड ' या रोचक विषयावर येऊन थांबली.मोस्टली हितेश च बोलत होता. त्याचं बोलणं ऐकताना संग्रामला जाणवत होतं की - या विषयावर बोलण्यासारखं आपल्याकडे फारसं काहीच नाहीये- पण हितेश मात्र अगदी भरभरून बोलत होता. "प्रत्येक रविवारी आम्ही कुठेतरी बाहेर जातो रे.." हितेश सांगत होता," आठवडाभर स्नेहा घरातलं सगळं करून अगदी कंटाळून जाते. तिला थोडा ब्रेक हवा असतो घरकामातून- खास करून स्वैपाकघरातून...त्यामुळे रविवारी चूल बंद असते आमच्याकडे !" हितेशचं स्पष्टीकरण ऐकताना संग्रामच्या डोळ्यांसमोर त्यांचे चौघांचे संडे स्पेशल लंच दिसत होते. पूर्ण आठवडा मुलींची आणि संग्रामची जेवायची एक वेळ साधणं जमायचं नाही म्हणून नम्रता मुद्दाम दर रविवारी काहीतरी स्पेशल मेन्यू प्लॅन करायची. आणि सगळे मिळून हसत खेळत, गप्पा मारत एकत्र जेवायचे. मुलींना आणि संग्रामला जरी रविवारची सुट्टी असली तरी नम्रतासाठी मात्र त्या दिवशी ओव्हरटाईम असायचा. पण हे छोटे छोटे आनंदाचे, एकत्र सहवासाचे क्षण गोळा करण्यासाठी म्हणून तिची ही सगळी धडपड असायची.

"स्नेहा नेहेमी म्हणते, घर आपलं दोघांचं आहे, त्यामुळे सगळी कामं आपण दोघांनी मिळून केली पाहिजेत.." हितेश पुढे सांगत होता," त्यामुळे महिन्याचं सामान आणायला, आठवड्याची भाजी वगैरे आणायला मला पण जावं लागतं तिच्याबरोबर. तसंही छोट्या साहिलला घेऊन ती एकटी कसं मॅनेज करणार रे! तुमच्याकडे पण असंच असेल ना?" त्याच्या या प्रश्नावर संग्रामकडे खरंच काही उत्तर नव्हतं. या सगळ्या गोष्टींसाठी त्याच्याकडे कधीच वेळ नसायचा. आणि मुख्य म्हणजे नम्रतानी देखील कधीच या सगळ्या गोष्टींसाठी त्याच्याकडून मदतीची अपेक्षा केली नव्हती. त्याला 'सहा वर्षांची नंदिनी आणि दीड वर्षांच्या अनुजा ला घेऊन पुण्याहून जम्मू पर्यंतचा ट्रेनचा प्रवास एकटीनी पूर्ण करणारी' नम्रता आठवली.

हे सगळं जेव्हा त्यानी हितेशला सांगितलं तेव्हा त्याच्या चेहेऱ्यावर झळकलेलं आश्चर्य आणि अविश्वास अजूनही संग्रामच्या लक्षात होता . "तुमचं सगळंच जगावेगळं आहे बाबा!" असं म्हणत हितेशनी अगदी शब्दशः हात जोडले होते संग्रामपुढे!

त्यावेळी संग्रामनी ते सगळं हसण्यावारी नेलं होतं, पण आज मात्र त्याला एक गोष्ट पटली होती..' नम्रता म्हणते ते खरंच आहे...We are that 'odd man out' ...आपलं खरंच सगळं वेगळं आहे..

त्या क्षणी संग्रामनी एक निर्णय घेतला आणि नम्रताच्या इच्छेप्रमाणे जम्मू मधल्या SFA साठी ऍप्लिकेशन लिहायला घेतलं.

ऍप्लिकेशन चं काम झाल्यावर तो घरी जायला म्हणून निघाला तेवढ्यात ऑफिसमधला एक क्लार्क एक फाईल घेऊन त्याच्याकडे आला. "साब, आप के लिये आर्मी हेडक्वार्टर से ये लेटर आया है।" संग्रामनी थोड्या विचारातच पत्रावरून एक नजर फिरवली.....त्यातला मजकूर वाचून तो दोन मिनिटं स्तब्ध झाला...त्यानी पुन्हा एकदा नीट वाचलं .....त्यातल्या शब्दांवरून जशीजशी त्याची नजर फिरत होती तसंतसं त्याच्या चेहेऱ्यावर हसू फुलत होतं. ती बातमी होतीच तशी....एका कोर्स करता संग्रामचं सिलेक्शन झालं होतं.

या एका बातमीमुळे आता सगळं समीकरण च बदलून गेलं होतं. आता संग्रामला युनिट बरोबर फील्ड मधे जायला लागणार नव्हतं...निदान हा कोर्स संपेपर्यंत तरी ! आणि मुख्य म्हणजे तो एक 'long course' असल्यामुळे संग्रामला आपली फॅमिली बरोबर घेऊन जायची परवानगी होती. नकळत त्याची नजर टेबलवरच्या त्या SFA च्या ऍप्लिकेशनवर गेली..सध्या तरी त्याची गरज नव्हती !

संग्रामच्या मनात नम्रताचा विचार आला..'तिला जेव्हा हे समजेल तेव्हा किती खुश होईल ती'....तो घाईघाईत तिला फोन करायला म्हणून पुन्हा टेबलपाशी गेला. पण पुढच्याच क्षणी त्यानी विचार बदलला. "छे, असं फोनवर नको...घरी जाऊन प्रत्यक्षच सांगतो तिला ! ही 'ब्रेकिंग न्यूज' ऐकल्यानंतर तिला जो आनंद होईल तो काही औरच असेल. तिचा तो खुललेला चेहेरा मला प्रत्यक्ष बघायचाय ..."

'आता कधी एकदा घरी पोचतोय' असं झालं होतं त्याला.. आजच्या पुरणपोळीची गोडी अजूनच वाढणार होती !!!

-- समाप्त --

तळ टीप - माझी ही कथा ही कोणा एका नम्रता किंवा संग्रामची नसून भारतीय सशस्त्र दलातल्या, देशप्रेमानी झपाटलेल्या तमाम सैनिकांची आणि त्याचबरोबर पडद्यामागे राहून त्यांना बिनशर्त साथ देणाऱ्या त्यांच्या परिवारांची आहे. केवळ देशासाठी आणि देशबांधवांसाठी झटणाऱ्या या लोकांच्या भावविश्वात डोकावून पाहण्याचा माझा हा प्रांजळ प्रयत्न ! या समस्त Armed Forces Family च्या ऋणातून उतराई होणं शक्य नाही,(आणि त्यांची कोणाकडून तशी अपेक्षाही नाही) पण ही कथा वाचणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींना निदान त्याची जाणीव जरी झाली तरी माझं लिखाण सफल होईल.

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान कथा, आवडली.. विशेषतः छोटे छोटे हळवे क्षण ज्यांचं तुम्ही ज्या सहजतेने वर्णन केलंय ते भावलं...
इतक्यात संपवलीत कथा??
अजून काही भाग चालले असते Happy
शुभेच्छा!

>>केवळ देशासाठी आणि देशबांधवांसाठी झटणाऱ्या या लोकांच्या भावविश्वात डोकावून पाहण्याचा माझा हा प्रांजळ प्रयत्न !
खूप प्रामाणिक प्रयत्न हा!
कथा खूपच आवडली. सैन्य कुठलाही गदारोळाचा लवलेशही न बाळगता आपली कर्तव्य चोख पार पाडतात पण त्यांच्या कुटुंबियांना देखील अनेक प्रसंगातून जावं लागतं. यातूनही संग्राम आणि नम्रता यांच्या जीवनातल्या छोट्या छोट्या सुखांना वेचून आमच्या भेटीसाठी आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
पुढील कथेच्या प्रतिक्षेत!

<<कथा खूपच आवडली. सैन्य कुठलाही गदारोळाचा लवलेशही न बाळगता आपली कर्तव्य चोख पार पाडतात पण त्यांच्या कुटुंबियांना देखील अनेक प्रसंगातून जावं लागतं. यातूनही संग्राम आणि नम्रता यांच्या जीवनातल्या छोट्या छोट्या सुखांना वेचून आमच्या भेटीसाठी आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
संपवलीत कथा??
अजून काही भाग चालले असते >> + १००

तुमच्या कथेत इतका जिव गुंतला होता की कोणी जवळचे नातेवाईक ४ दिवस आपल्याकडे राहून परत घरी गेले की कशी दोन दिवस आठवण येत रहाते तशी नम्रताची आठवण येईल.

पुढील लिखाणाला खूप खूप शुभेच्छा !

__/\__

खूप छान लिहिले आहे .नम्रता चे सरप्राइज जपण्यासाठी चाललेले संग्राम चे प्रयत्न पण आवड्ले. Happy
पुढील लिखाणासाठि मनापासून शुभेच्छा !

खूप सुंदर लिहिले आहे.
अजून काही भाग चालले असते >> + १०१
पुढील लिखाणासाठि मनापासून शुभेच्छा !>>+१