ड्रॉईंग बोर्ड !

Submitted by Charudutt Ramti... on 20 April, 2019 - 05:33

रोजवूड किंवा देवदाराचं नरम खोड घेऊन त्याच्या बुंध्या पर्यन्त लाकडाच्या शिरा आणि त्यातली लंबवर्तुळाकार वलयं (ग्रेन्स) दिसेस्तोपर्यंत अगदी गुळगुळीत चॅम्पियन कॅरम बोर्ड असावा तसा हळुवारपणे रंधकाम केलेला माझा इंजिनीरिंग चा ड्रॉईंग बोर्ड होता. करायचीच म्हंटली किंमत तर फक्त पाचसहाशेच रुपयेच भरली असती. त्यावेळी ती सुद्धा काही कमी नव्हती. पण एखादी स्त्री, “तिला तिच्या दागिन्यांच्या लॉकर मधला सर्वात आवडणारा दागिना कोणता?” हे काही फक्त केवळ त्या दागिन्याची किंमत पाहून ठरवत नसते. तो घातल्यावर तिच्यातल्या सुवासिनीचं होणाऱ्या कोडकौतुकावर तिच्या तीला संग्रहातील कोणता दागिना सर्वात अधिक आवडतो ह्यावर ती मनोमन त्या दागिन्यांची किमंत ठरवत असते. अगदी तसाच होता हा ड्रॉईंग बोर्ड माझ्याकरिता. सुंदर ललनेच्या एखाद्या दागिन्यासारखा. अमूल्य!

डाव्या हाताच्या अंगठ्याचं नख जरी त्या लालसर पांढऱ्या बोर्डवर रुतवलं जरासा जोर लावत, तरी अक्षरश: त्या नखांचे व्रण उमटतील पृष्ठभागवरती एवढा नाजूक होता तो ड्रॉईंग बोर्ड. अगदी एक समांतर असे प्रतल. त्यावर मग चार कोपऱ्याला चार अश्या स्टेनलेस स्टील किंवा स्प्रिंग स्टीलच्या क्लीपा लावून त्याच्या पृष्ठभागावर अंथरलेला, किंचित खरखरीत स्पर्श असणाऱ्या पिवळसर दुधी रंगाच्या नॉर्वे पेपरच्या शीट्स, रफ वर्क असेल तर. आणि जर फेअर असतील शीट्स तर मात्र , अगदी ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ बेबी पावडरचा तळहातावर जितका नाजूक आणि तरल असा स्पर्श असतो तसाच नाजूक स्पर्श असणारा तो शुभ्र अतिधवल स्नो व्हाईट! जरा जरी काळजीपूर्वक न वागवता इतरत्र हात लावून जर त्या स्नो व्हाईटला स्पर्श केला तरी सुद्धा त्या कोऱ्या करकरीत पेपरवर बोटांचे काळसर मळकट नकोसे ठसे उमटत असत. एखाद्या दाक्षिणात्य प्रांतात पुरातन विष्णू मंदिरातील गाभाऱ्यात गेल्यावर पुजाऱ्याने पाळावं तसं स्वच्छतेचं सोवळं पाळत हे स्नो व्हाईट आम्ही वर्ष भर वागवत असू, सेमिस्टर संपण्याच्या आधीच्या सबमिशन च्या मिनिटा पर्यंत.

ड्रॉईंग बोर्ड आणि त्या स्वच्छ पांढऱ्या शिट्सवर बोटांनी वेगवेगळ्या पद्धतीने दाब देण्याचं तंत्र वापरून चालवायच्या , एच, टू-एच, बी किंवा एच. बी. , अशी मानवी रक्तगटांना द्यावीत तशी नावे असलेल्या अप्सरा किंवा कॅम्लिन च्या त्या षट्कोनी आकाराच्या सडसडीत बांध्याच्या निमुळत्या नानाविध अश्या पेन्सिली. नुसत्या रेघां काढायच्या ( लाईन वर्क ) तऱ्हा जरी मोजल्या तरी किमान साताठ पद्धती निघतील. सॉलिड लाईन, लीडर लाईन, डॉटेड लाईन, सेंटर लाईन, प्रोजेक्शन लाईन, एक ना दोन असंख्य प्रकारच्या रेघा. प्रत्येक रेघ वेगवेगळी सौंज्ञा घेत आणि तिचे वैशिष्टय पूर्ण असे संकेत पाळत कागदाच्या प्रतलावर उतरलेली. त्यात मग मिनी ड्रॅफ्टर आणि सेट्स स्क्वेअरनी तासंतास ड्रॉईंग हॉल मध्ये छतावर भिरभिरणाऱ्या जुनाट पंख्याखाली बसून तासंतास मन लावून काढलेले ते अर्थोग्राफिक आणि आयसोमेट्रिक व्ह्यूज काढण्याचे आयुष्यातले मंतरलेले दिवस. ना कालची आठवण ना उद्याची काळजी. फक्त 'आज'चा दिवस जगायचा. हियर अँड नाऊ म्हणतात नं तसं.

मी आयुष्यात जर कोणत्या एका विषयावर अगदी सख्या मावशीवर करावं तसं (खरं तर माझं त्या वेळचं वय पाहता जिवलग मैत्रिणीवर असं म्हंटल पाहिजे) प्रेम म्हणून काही केलं असेल कुमारवयात, तर ते फक्त इंजिनीरिंग आणि मशीन ड्रॉईंग ह्या एकमेव विषयावर. बाकी गणित, अप्लाइड मेकॅनिक्स, आणि इंजिनीरिंग मध्ये शिकलेले इतर पस्तीस चाळीस विषय मात्र केवळ 'जवाबदाऱ्या' म्हणून पूर्णत्वाला नेल्या. केवळ पास होण्यासाठी. पण इंजिनीरिंग किंवा मशीन ड्रॉईंग ह्या विषयावर मात्र मी मनापासून प्रेम केलं. सचिननं त्याच्या बॅट वर जितकं प्रेम केलं असेल, हरिप्रसाद चौरासिया त्यांच्या बासरीला जितकं जपत असतील किंवा माधुरी दीक्षितची अप्सरेहून सुंदर अशी असंख्य छायाचित्रे काढणारे गौतम राज्याध्यक्ष त्यांच्या कॅमेराच्या लेन्स ला जितकं जपत होते, तितकंच किंबहुना त्याहून कितीतरी जास्त मी माझं हे मशीन ड्रॉईंगचं सगळं साहित्य इंजिनीरिंग ला असताना तिन्ही चारही वर्षं जीवापाड जपलं.

इंजिनीरिंगचा शेवटचा पेपर दिला तेंव्हा त्या ड्रॉईंग बोर्डाच्या रोजवूडचा मंद सुगंध मनात साठवत तो बोर्ड आणि माझा ओमेगाचा ब्लडरेड रंगाचा मिनी ड्रॅफ्टर, माझ्याहून चार इयत्ता मागे असलेल्या आणि नुकत्याच इंजिनीरिंग ला ऍडमिशन मिळालेल्या माझ्या एका मित्राच्या भावाला दिला. त्याला त्याच्या इंजिनीरिंगच्या अभ्यासासाठी उपयोगी पडावा म्हणून. आमच्या वेळी पद्धत होती, एकमेकांच्या जुन्या वस्तू वापरायची. पण तो बोर्ड आणि तो मिनी ड्रॅफ्टर मी काही विनामूल्य दिला नाही. त्याचा काहीतरी जुजबी मोबदला घेतला. कारण त्यावेळी साधारण नवीन वस्तूच्या निम्म्या किंवा एकत्रितीयांश किमतीत (वस्तू कशी आणि कुणी वापरली आहे ह्या वर ठरवून) ह्या अभियांत्रिकीला लागणाऱ्या शैक्षणिक वस्तूंची खरेदी विक्री करण्याचीच प्रथा होती गावात. जसं हुशार मुलांच्या नोट्स, पेपर्स, वह्या वगेरे मागून त्यानुसार अभ्यास केला जाई, तसंच हे मिनी ड्रॅफ्टर, ड्रॉईंग क्लीपा , फ्रेंच कर्व्हस , ती मोठं मोठाली लेग कॅलिपर्स (मराठीत कर्कटकं) अश्या वस्तू सुद्धा एकमेकांकडून कमी किमतीत विकत घेऊन मग शिक्षण पूर्ण करण्याची एक संस्कृतीचं होती. मी फारसा हुशार म्हणून प्रसिद्ध नव्हतो, पण माझं इंजिनीरिंग ड्रॉईंग खूप चांगलं होतं. आणि हे माझ्या मित्रांना माहिती होतं. बाकी माझे सगळे विषय सो-सोच. त्यामुळं बाकी नोट्स घ्यायला कुणी फिरकलं सुद्धा नाही. त्या मात्र रद्दीच्या भावात गेल्या.

आमच्या वेळच्या ह्या लोकल पातळी वर सुरु झालेल्या जुन्या ओ.एल.एक्स. संस्कृती नुसार जेव्हडं जेव्हडं शैक्षणिक साहित्य विकणं म्हणून शक्य होतं, तेव्हडं सगळं जुनिअर्सना विकून मी अर्थार्जना प्रित्यर्थ, वस्तू विकून आलेल्या किरकोळ मिळकती बरोबर, मुख्यत्वे वडिलांनी एक दीड महिने खर्चाला पुरेल एवढं, एक नवीन करकरीत दिलेलं नोटांचं बंडल बरोबर घेऊन घराच्या उंबऱ्या बाहेर पडलो. वडिलांनी दिलं ते बंडल दहा हजारांचं होतं. कारण पहिला पगार हाती येईपर्यँत मुंबईमध्ये पोटापाण्याची आणि निवा-याची सोय करावी लागणार होती. त्याकरिता ती गंगाजळी होती. ते वडिलांनी दिलेलं नोटांचं बंडल बॅगेत टाकलं. त्या बंडलाच्या च्या शेजारीच मी माझा चारही वर्षं वापरलेला आणि ज्युनियरला ‘न’ विकलेला, रत्नाकर बुक स्टॉल मधून सातशे पस्तीस रुपयांना घेतलेला कॅसिओचा 'एफ. एक्स. एटीटू एल. बी.' मॉडेलचा 'सायंटिफिक कॅलक्यूलेटर' मात्र बॅगेत न विसरता ठेवला. माझा सायंटिफिक कॅलक्यूलेटर मी जुनिअर ला न विकण्याचा निर्णय का घेतला ते मला आता नक्की आठवत नाही. कारण ज्या ड्रॉईंग वर मी जीवापाड प्रेम केलं त्या ड्रॉईंग चा सगळा संच मी चक्क निम्या किंवा एक त्रितीयांश किमतीत विकला पण ज्या गणिताचा मी मनापासून तिरस्कार केला तो अर्थहीन गणितीय आकडेमोड करणारा सायंटिफिक कॅलक्यूलेटर मात्र मी विकला नाही. मी त्यावेळी असा का वागलो असेन? माझ्या ह्या ‘ह्यूमन सायकॉलॉजिकल पॅराडॉक्सचं’ मलाच कधीकधी मनोमन आश्चर्य वाटतं स्वतःचच स्वतःला. आपल्याला आवडणाऱ्या वस्तू, व्यक्ती, आठवणी ह्यांच्यापासून माणूस इच्छा नसून सुद्धा कुठल्याश्या मोहापोटी, क्षणिक शोक करत आयुष्यभर त्यांच्यापासून दुरावा पत्करतो. आणि दुसरीकडे मात्र निरीच्छ वृत्तीने ‘न’ आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीचं 'लोढणं' आयुष्य भर कोरडेपणानं वागवत राहतो. इच्छा नसूनही विकलेला ड्रॉईंग बोर्ड आणि इच्छा नसूनही आयुष्यभर जवळ बाळगलेला हा सायंटिफिक कॅलक्युलेटर त्या पैकीच एक! पण का कुणास ठाऊक, तो ड्रॉईंग बोर्ड विकल्यावर मात्र मला त्या रात्री खूप एकाकी पण आल्यासारखं वाटलं. उगीचच!

मी माझं 'घर' सोडलं पोटापाण्याच्या आणि उपजीविकेच्या शोधार्थ तो दिवस सोळा जुलै. साल दोन हजार. घर सोडलं तेंव्हा आपल्याला बॅगेत काय काय भरता येत नाही? हे मला खोल अंतरी जाणून गेलं. त्यात सकाळच्या वेळी स्वयंपाकाच्या कट्ट्यावर आईने तव्यावर भाजलेल्या तो खरपूस पोळीचा खमंग हवाहवासा वास बॅगेत नाही भरता येत. किंवा उन्हाळ्यात सतरंजी अंथरून रात्रीच्या वेळेस झोपायचो मी गच्चीत. घरात उकाड्यानं तगमग व्हायची म्हणून. तेंव्हा कानात सोनी च्या वॉकमन चे इयर फोन घालून रात्री हरिहरनच्या आवाजातल्या अथवा गुलाम अली किंवा मेहदी हसनच्या गझला ऐकत असे. तेंव्हा जे ठिपूर चांदणं पडायचं आणि डोळ्यासमोर काळ्या पार्श्वभूमीवर लकाकणारं चंद्राचं बिंब दिसायचं गच्चीत. त्या कॅसेट्स येतील भरता बॅगेत पण त्या गच्चीतला तो चंद्र आणि ते ठिप्पूर चांदणं नाही भरता येत बॅगेत. तसंच बायसिंगर मेमोरियल लायब्ररीत जायचो तासंतास शनिवार,रविवार, किंवा दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत, त्या लायब्ररीत काचेच्या शेल्फला डोकं टेकून पुस्तकं च्या पुस्तकं चाळत तासंतास उभं राहायचो पायाला गोळे येईस्तोपर्यंत. त्या लायब्ररीत उभ्याउभ्यानं वाचलेल्या कथा आणि कविता त्या बॅगेत नाही भरता नाही आल्या. अश्या एक ना अनेक असंख्य गोष्टी. पुन्हा एकदा ते एकाकी पण, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींपासून दुरावलं जाण्यामुळं आलेलं.

रात्री मिरजेत "बोरिवली" कोंडुस्कर मध्ये बसलो, आणि सकाळी सकाळी कधीतरी सहा सव्वा सहा वाजता मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवलीत उतरलो. उतरून सरळ हातात ज्या कंपनीचं अपॉइंटमेंट लेटर होतं "ट्रेनी म्हणून जॉईन व्हा" असं ऑर्डर असलेलं ती फॅक्टरी गाठली. बरोबर एक वर्गमित्रही होता. त्याचं नाव सुजान. आम्ही दोघेही मुंबईत पूर्ण उपरे. आम्हा दोघांच्या कडेही ट्रेनी म्हणून रुजू होण्याचं पत्र होतं. अजून पंधरा दिवसांनी म्हणजे १ ऑगस्ट ला आम्हाला सुहास पण जॉईन करणार होता. त्याच्याकडेही त्याच कंपनीत रुजू होण्याचं पत्र होतं. पण आमची तारीख जरा आधीची होती. कारण सुजान आणि मी एकाच डिव्हिजन ला जॉईन करणार होतो आणि सुहास ची मात्र डिव्हिजन दुसरी होती. आमची टी.डी. डिव्हिजन. सुहास ची ए.डी. डिव्हिजन. अजून एक चौथा गृहस्थ होता कळपात त्याचं नाव दयानंद. त्याला आम्ही ‘दया’ म्हणूत असू. त्याला आमच्या नंतर एका आठवड्यानं जॉइनिंग करायचं होतं. आमच्या कॉलेज च्या वर्गातले आम्ही असे चौघेजण कांदिवलीतल्या एका नामांकित ऑटोमोबाईल कंपनीत अँप्रेन्टिस ट्रेनी म्हणून लेखी परीक्षेत आणि मुलाखती मध्ये पात्र ठरलो होतो. मी आणि सुजान आम्ही दोघे साधारण अडीचशे एकर परिसरात पसरलेल्या अवाढव्य कंपनीच्या गेट वरती आमचं घर सोडून आलेलं एकाकी पण उरी जवळ बाळगत उभे होतो.

वेळ सकाळची पावणे सात. जुलै महिना. मुंबईचं आर्द्र आणि दमट वातावरण सकाळ पासूनच जाणवू लागलं होतं. गेट वरच्या सिक्युरिटी गार्डांनं ‘जा आणि परत नऊ वाजता या’ असं सांगितलं. आम्ही दोघेही सात ते नऊ तब्बल दोन तास करायचं तरी काय? असा विचार करत तिथेच गेट जवळ घुटमळत होतो. सुजान आणि माझ्या समोर त्या वेळी कमीत कमी पन्नासेक प्रश्न आ वासून उभे होते. पहिला प्रश्न, आपण कुठे आवरायचं. कारण बस मध्ये रात्र काढून आम्ही सरळ इथे आलो होतो गेट वर. दुसरा प्रश्न, आज रात्री कुठे राहायचं. पुढचा प्रश्न, भाड्यानं रूम कुठे शोधायची? असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही दोघे बऱ्याच वेळ तिथे उभे होतो. त्यावेळी मोबाईल नव्हते. एसटीडी बूथ होते. अवती भवती ते तरी मिळताहेत का ते पाहिलं. बूथ वरून घरी मुंबईला 'सुखरूप' पोचल्याचे फोन्स अपापल्या घरी केले. सुखरूप ह्या शब्दाचे अर्थ स्थल काला आणि परिस्थितीनुसार सापेक्षतेने बदलत जातात. आम्ही पोचलो होतो, सुखरूप की नाही ते पुढची परिस्थिती ठरवणार होती.

आम्ही दोघं ही बराच वेळ तिथेच जवळपास घुटमळतोय असं दिसल्यावर गेट वरच्या सिक्युरिटीनं गार्डानी आम्हाला दोघांना बोलावलं. नांव गांव वगैरे विचारलं. सिक्युरिटी आमच्या नशिबानं साताऱ्याचा निघाला. ‘सांगली सातारा पूर्वी एकच जिल्हा होता’ असं म्हणत आम्ही त्या सिक्युरिटी गार्डाला थोडी मदत करण्याची विनंती केली. कसं काय कुणास ठाऊक पण आम्ही केलेल्या विनंतिला त्यानं बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आणि शेवटी त्यानं सांगितलं की - “ कडे कडे नं वॉकवे वरून जा आणि एक वॉशरूम आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचं सगळं आवरा. आणि पटकन जा, आणि कुणी पाहायच्या आत पटकन गेट वर परत या !” असंही बजावून सांगितलं. मग आम्ही कडेकडेने फॅक्टरीच्या आत असलेल्या कॉमन वॉश रूम मध्ये जाऊन सगळं आवरलं. मला कधी स्वप्नातही वाटलंही नव्हतं की मुंबईत आल्यावर मला कधी फॅक्टरीमधील स्नानगृहात जाऊन अंघोळ बिंघोळ करावी लागेल. ज्या फॅक्टरी मध्ये माझं हे असं ऐतिहासिक 'अभ्यंगस्नान’ घडलं' त्या कंपनीचं नाव होतं 'महिंद्रा अँड महिंद्रा, ट्रॅक्टर डिव्हिजन' (टी.डी.) कांदिवली प्लँट. ह्या प्लॅन्ट मधल्या अभ्यंग स्नानात उटणं म्हणून इंडस्ट्रियल सोप होता आणि पणती म्हणून बाथरूमच्या उंच छतावर तरंगणारा इंडस्ट्रियल सोडियम व्हेपर लॅम्प होता. पण त्या मुंबईतल्या त्या पहिल्या वाहिल्या अंघोळी नंतर आलेलं जे ताजे तवाने पण होतं ते कोणत्याही दिवाळीतल्या पहाटे वासाच्या तेल लावून केलेल्या अभ्यंग स्नाना पेक्षा थेम्ब भर सुद्धा कमी नव्हतं.

त्यानंतर मग तो आमचा अक्खा दिवस जॉइनिंग च्या औपचारिकता पार पाडण्यात गेला आणि पाहता पाहता संध्याकाळ झाली. अंधार पडला तसा धीर खचत गेला कारण आमची रात्री राहण्याची काहीच सोय झाली नव्हती. कुठून तरी कॉलेज च्या सिनिअर्स चे कॉन्टॅक्टस मिळाले होते त्यांच्या बॅचलर्स अँकोमोडेशन मध्ये जाऊन राहण्याचा आमचा प्लॅन होता. पण माहिती सगळी अर्धवट होती. पण मग ती रात्र आम्ही सक्खे मित्र आणि त्याचे उपमित्र शोधत कशी बशी एका मित्राच्या रूम मध्ये कशीबशी उपऱ्या सारखी काढली. पुढची रात्र सुद्धा तशीच गेली. मग मात्र पहिल्या रविवारी आम्ही एका एजंटला हाताशी धरून एक "रूम" भाड्याने घेतली. त्या रूमचं डिपॉझिट भरता भरता बाबांनी दिलेल्या दहा हजाराच्या बंडलातले बरेचसे पैसे कापरासारखे उडून गेले. उरलेल्या पैश्यात रोजचा खर्च भागवायचा होता. एकोणिसचं जॉइनिंग. त्यामुळे एक तारखेपर्यंत म्हणजे पुढचे दहा अकरा दिवस पहिला पगार येणार नव्हता. आणि आला तरी तो पगार नसून स्टायपेंड होता. तोही एक त्रितीयांश मिळणार होता. दहाच दिवसांचा कारण महिना भरायचा होता. बिकट 'आर्थिक प्रश्न' हे फक्त पैशानेच सुटू शकतात. रोज काटकसर करत करत पहिल्या स्टायपेंड चा चेक हाती आला. साधारण दोन हजार रुपये होते. केंद्र सरकारचा इनकम टॅक्स नसला आमच्या त्या तुटपुंज्या उत्पन्नावर, तरी महाराष्ट्र शासनानं अडीचशे रुपये व्यवसाय कर म्हणजेच प्रोफेशनल टॅक्स न विसरता कापला होता. पूर्ण महिन्याचा स्टायपेंड सहा हजार तीनशे. त्यातले काही कंपनी देई आणि बरंचसं शासनाचं अनुदान होतं. इंडियन अप्रेन्टिस ऍक्ट १९६१ नुसार.

पंधरा तीन आठवड्याने सुहास आमच्या रूम मध्ये पार्टनर म्हणून जॉईन झाला. त्याला बरंचसं रेडी मेड आणि सेट मिळालं मी आणि सुजान आधी जॉईन केलं असल्यामुळं. दया त्याच्या मोठ्या भावाकडे गोरेगांवला राहायला होता. खरं तर सुहास हा आमचा वर्ग मित्र. पण मी आणि सुहास आम्ही कॉलेज मध्ये असताना तीन चार वर्ष कधी चुकून बोलणं तर सोडाच पण आम्ही हाय हॅलो सुद्धा केल्याचं आणि तोंड देखलेपणानं एकमेकांकडे पाहून कधी सहज हसल्याचंही मला आठवत नाही. त्याला कारण सुहास हा तसा मीत भाषी, आजकालच्या भाषेत इन्ट्रोव्हर्ट. पण सुहास जसा माझा रूम पार्टनर झाला आणि आमचा एकमेकांशी संपर्क वाढला तसतसा मला सुहास समजत गेला. तो त्यावेळी सुहास 'सुहास' नव्हता. कारण त्याला कुणीच सुहास अशी हाक मारत नसे. ( आम्ही त्याला त्याच्या पाचोरे ह्या आडनावाचा अपभ्रंश करून "पाच्या" अशी हाक मारत असू. गंमत अशी की पाचोरे मधला ‘च’ चमच्यातला. पण आम्ही त्याच्या आडनावाचा अपभ्रंश केला तेव्हा 'पाच्या'तला 'च' चहातला केला. अपभ्रंश करतानासुद्धा व्याकरणाचे नियम पाळले होते आम्ही. ) पण सुहास हा किती सखोल प्राणी आहे हे मला हळू हळू दिवसा गणिक समजत गेलं. कॉलेज मध्ये कधी नुसते उपचार म्हणून ही एकमेकांकडे पाहून हसलेलो ही नसलेलो आम्ही दोघे पुढे मात्र अत्यंत घनिष्ट मित्र बनलो. सुहास हे एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्वं. त्याला गणित आणि अभियांत्रिकेचे अनेक विषय अगदी चांगल्या रित्या 'समजलेले' होते. माझ्या सारखे अर्धवट नाही. उत्कृष्ट स्मरण शक्ती. मूळातच त्याचं शैक्षणिक विषयांचं ( academics ) आणि अवांतर असं दोन्हीही वाचन समृद्ध होतं. मुख्य म्हणजे त्याची स्वतःची अशी बऱ्याच विषयांवर वैशिष्ट्य पूर्ण अशी मतं होती. क्वचित प्रसंगी ती मतं टोकाची वाटंत पण ती मतं 'त्याची' होती, खूप वाचन करून बनवलेली. एक दिवस असाच लिओ टॉल्स्टॉयचं दीड दोन हजार पानांचं जाड जुड 'वॉर अँड पीस' रूम वर घेऊन आला वाचायला. तो आणि मी तासंतास कोणकोणत्या विषयांवर चर्चा करत असू. त्यात मग जेम्स वॉट ने शोधलेल्या वाफेच्या क्लिष्ट अश्या "एंट्रॉपी" विषयी चर्चा असे, किंवा मेस चा डबा उघडता उघडता आमटीच्या अजिबात खमंग नसलेल्या त्या बेचव आणि निरस वासाबरोबर जेवणात तोंडी लावायला मग गणितातले लाप्लास आणि फोरियर असंत. कधी इकॉनॉमिक्स तर कधी सिव्हिल वॉर विषयी. एकंदर त्याचा आवाका अत्यंत मोठा होता. मी आणि सुहास रूम पार्टनर म्हणून साधारण अडीच तीन वर्षं एकत्र राहिलो असू. पण माझ्या आयुष्यातले हे त्याचा रुम पार्टनर ह्या नात्याने नशिबी आलेले सहवासातले दिवस हे अतिशय विचार समृद्ध आणि बौद्धिक दृष्ट्या श्रीमंत होते.

पुढे जसं जसे दिवस सरू लागले तशी मात्र आमची आर्थिक घडी सुरळीत बसू लागली. सहा हजार तीनशे रुपयांत महिना भागवणं खरं म्हणजे एकट्या जीवाला फारसं अवघड नव्हतं. हजार रुपये महिन्याचे मंथली मेस चा डबा. रूम चं भाडं पस्तिशे होतं. तिघांत विभागून प्रत्येकी बाराशे. सोसायटीचा मेंटेनन्स आणि लाईट बिल वगैरे मिळून प्रत्येकी दोन अडीचशे. असे खर्च वजा जात महिन्याकाठी दोन अडीच हजार उरायचेच उलट. मग त्यातुन न परवडणारे वुडलँड चे शूज घे, आयुष्यभर शिवून शर्ट पॅन्ट घालायची सवय होती, तरी कुठेतरी अंधेरी वेस्ट ला जाऊन पार्क अवेन्यू किंवा पिटर इंग्लंड चे शर्ट घे ब्रँडेड. खरं आमच्या तीन पिढ्या आणि पाच पितरं मागं गेलं तर पीटर इंग्लंड चा शर्ट पगाराला आणि खिशाला न परवडणारा आणि तरीही 'घेऊन तरी पाहू एकदा काय असतं त्या शर्टात' असं म्हणत तो विकत घेणारा बहुदा मी पहिलाच. ह्या ब्रँडेड वस्तूंचं एक वाईट असतं. एकदा हौस किंवा लग्झरी म्हणून घेतल्या की माणूस त्या कंफर्ट ला चटावतो आणि त्यां हौसे मौजेच्या वस्तूंचं आयुष्यातल्या गरजांमध्ये कधी रूपांतर होतं हे स्वतःलाच समजत नाही कधी कधी.

सुजान एकवर्षं भर रूम वर थांबला. पण पुढे त्याच्या अमेरिकेच्या आंतरिक ओढी पोटी “भारतात आपल्या टॅलेंट ला पुढं काही भविष्य नाही, जी.आर.ई. करतो" असं म्हणत तो आमची रूम सोडून निघून गेला. आता रूममेट म्हणून ‘मी’ आणि ‘सुहास’ असे दोघेच उरलो. एक पार्टनर कमी झाला तसा पूर्वी तिघांत होणारा खर्च मग दोघांवर येऊ लागला. रूमचा आर्थिक भार कमी करण्यास आम्ही अधे मध्ये एक दोन रूम पार्टनर्स मिळताहेत का? ते पाहिलं. पण नवीन रूम मेट्स चे आणि आमचे सूर न जुळल्या मुळं आम्ही पुढं होईल तो खर्च दोघातच भागवण्याचा आणि उगीचंच नवनवीन प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला. मग पुढील तीन साडे तीन वर्षं मी आणि सुहास दोघेच रूम पार्टनर म्हणून राहिलो! नाही म्हणायला थोडा पगार ही वाढला होता, त्यामुळं तशी काही आर्थिक झळ ही बसत नव्हती पूर्वी सारखी.

सुहास, नंतर महिंद्रा सोडून मेकॅनिकल फील्ड ला कायमचा रामराम ठोकत सॉफ्टवेअर नावाच्या महानदीस जाऊन मिळाला. त्याला टी.सी.एस. मध्ये चांगल्या दुप्पट पगाराची नोकरी लागली. पण त्याचा एकंदर पिंड पाहता तो कुठेही सहज यशस्वी होणार ह्याची मला खात्री होती. तसंच झालं. सुहास टी.सी.एस. मध्ये मस्त सेट झाला. त्यावेळी आमच्या ऑटोमोटिव्हच्या क्षेत्रात तशी मंदी सुद्धा आली होती. मी मात्र इकडं भारत पाक फाळणी झाली त्यावेळी कशी काही पंजाबी कुटुंब " चाहे जान चली जाये पर अपना वतन नही छोडेंगे। " असं म्हणत तिकडचे हिंदू तिकडंच आणि इकडचे मुस्लिम इकडंच राहिले जीव पणाला लावून, तसांच मी सुद्धा “उपाशी मेलो तरी चालेल पण माझं 'मेकॅनिकल क्षेत्र' मी सोडणार नाही" अशी माझ्या ड्रॉईंग बोर्डाची शपथ घेत मी ऑइल आणि ग्रीस मध्ये माझे हात काळे करत राहिलो. आता ही मेकॅनिकल क्षेत्राबद्दल ची अस्मिता उरी बाळगण्या पोटी, माझ्या सारखी सुमार बुद्धी लाभलेल्या व्यक्तीस सॉफ्टवेअर मध्ये कुणी आश्रय देणार नव्हते हेही कदाचित कारण असावं, पण मुळातंच मी कधी ह्या नट बोल्टांच्या आणि ग्रीस आणि ऑइलच्या विश्वाशिवाय वेगळ्या विश्वाची कल्पनाचं कधी केली नव्हती कामाच्या ठिकाणी. त्रास जरूर होता पण रमूनही गेलो होतो त्या त्रासात. इकडं मी महिंद्रा मध्ये आणि सुहास टी.सी.एस. मध्ये चांगल्या पैकी स्थिर स्थावर झाल्यावर मग आम्ही हाती थोडे पैसे खेळू लागले तसे थोडी मौज मज्जा सुरु केली. मौज मज्जा म्हणजे मरिन ड्राइव्ह ला जाऊन गाड्यावर चीज सॅन्डविच खाणे. गेटवे ऑफ इंडिया ते चर्च गेट च्या रस्त्यावर दुतर्फा बसणाऱ्या पुस्तक विक्रेत्यांकडून नवीन ( पण पायरेटेड ) पुस्तकं घेऊन ती रूम वर आणून त्यांचा फडशा पाडणे. नंतर मग कधीतरी पुढे स्वस्तातली मेस बंद केली आणि थोडी पूर्वी न परवडणारी जरा महागडी मेस सुरु केली. पण काही दिवसांनी त्या मेसचाही कंटाळा येई. मग हॉटेलात जाऊन हाणून येणे. आम्ही एकदा असेच हुतात्मा चौकाजवळ असलेल्या एक्सेलसीयर थियेटर मध्ये जाऊन रसेल क्रो चा 'ब्युटीफुल माईंड पहिला' होता. अजिबात म्हणजे अजिबात समजला नाही तो सिनेमा त्या वेळी. पण काहीतरी भारी पाहून आल्याचा फसवा आनंद ! (नंतर मी कित्येक वर्षांनी परत तो पिक्चर यु ट्यूब वर फ्रेम टू फ्रेम पहिला, आणि मग मात्र तो सिनेमा थोडा फार समजला आणि प्रचंड आवडला, खऱ्या अर्थानं.)

असं करत साधारण अडीच तीन वर्षं सरली. सुगीचे दिवस असावेत तसे भराभर गेले ते दिवस.

एक दिवस संध्याकाळी सुहास रात्री साडेनऊ पावणे दहा वाजता रूम वर आला त्याच्या बी. के. सि. तल्या ऑफिस मधून. मी त्याची वाटंच पाहत होतो. तो आला की डबा उघडायचा आणि दोघांनी जेवायला बसायचं. आज दिवस भर त्याच्या आणि माझ्या कंपनीत काय काय मनासारखं आणि काय काय मनाविरुद्ध झालं ह्याच्या पापड लोणच्या सारख्या गोष्टी चघळत.

पण सुहासचा मूड आज वेगळा वाटला. आनंद होता चेहऱ्यावर आणि थोडाबहुत ताण सुद्धा.

" चाऱ्या, क्लाएंट इंटरव्यू झाला आज. 'मेरील लिंच' च्या प्रोजेक्ट वर सिलेक्शन झालं ऑनसाईट साठी ! "

मी डबा उघडत होतो, त्या डब्याची कडी उघडता उघडता तसाच थबकलो. गेल्या महिन्यातच बोलणं झालं होतं आमच्या दोघांच्यात. की सुहास ला ऑनसाईट अपॉर्च्युनिटी येतेय. पण सुहास चा अनुभव कमी पडत होता. त्यामुळे ऑनसाईट चे चान्सेस होते, नाही असं नाही पण 'कमी' होते. पण सुहासनं क्लाएंट इंटरव्यू मध्ये खूपच छान परफॉर्म केलं. त्यामुळं त्याचं अनुभव कमी असतानाही सिलेक्शन झालं.

सुहासला आनंद झाला तसा मलाही झाला. पण माझा आनंद मनापासून नव्हता. खोल कुठेतरी माझ्यात दडलेला स्वार्थी रूममेट डोकं वर काढत होता. आता सुहास दोन अडीच वर्षांसाठी ऑनसाईट जाणार होता. म्हणजे तो रूम सोडणार. मी आमच्या रूमची सुहास शिवाय कल्पनाच करू शकत नव्हतो. पण आता माझा नाईलाज होता आणि सुहासचाही. सुहास वरवर जरी अमेरिकेला जायचंय म्हणून खुश असला तरी आतून त्यालाही आमची रूम सोडून जाण्याचं दुःख असावंच कुठेतरी आत खोलवर. मुलीचं लग्न ठरल्यावर लेकीच्या बापाच्या मनी आनंद मिश्रीत दुःख अश्या कुठल्यातरी विचित्र भावनांचा कल्लोळ उठवा तसं काही तरी झालं. ‘एक ना एक दिवस आपली लेक तिचं हे, बापानं तिच्या साठी काडी काडी जमवून बांधलेलं घरटं कायमचं सोडत पंख फुटलेल्या पक्षा सारखं दूर निघून जाणार, हे माहित असूनही कुठेतरी खोलवर मनात धरून ठेवलेलं दुःख आणि भीती खरी होण्याचा दिवस उजाडल्यावर त्या अगतिक बापाची व्हावी’ तशीच काहीतरी विचित्र अवस्था झाली आमच्या दोघांची.

बघता बघता मग सुहासच्या प्रयाणाची आणि फ्लाईट ची तारीख ठरली. आमचा काउंट डाऊन सुरु झाला. मग आम्ही एक भली मोठी सुटकेस विकत आणली पाच हजार रुपयांना. कपड्यांबरोबरच तांदूळ, डाळ , छोटा कुकर , जमेल तेव्हडा शिधा , आणि खूप पुस्तकं ह्यांनी बॅग खचाखच भरली. जागा नाही म्हणून शेवटी बरीच पुस्तकं त्यानं रूमवरच ठेवली. माझ्या ताब्यात. त्यात ‘वॉर अँड पीस’ ही होतं.

त्या दिवशी सकाळी मग सुहासला परदेशी जाण्यापूर्वी भेटायला म्हणून त्याचे वडील गावाहून रूमवर आले. फ्लाईटच्या रात्री मग आम्ही एक टॅक्सी आणली बोलावून आणि तिच्या डिकीत बॅग कोंबली. बॅग चांगलीच जड झाली होती. कारण इतर वस्तूंपेक्षा बहुदा रूममधील रम्य पण तितक्याच जड आठवणींमुळे की काय कुणास ठाऊक सुहास च्या बॅगच वजन जास्त झालं असावं. मी आणि सुहासचे वडील त्याला सहार एअरपोर्ट वर सोडायला आलो. रात्रीची नऊ सव्वा नऊ ची वेळ. टॅक्सित कुणीच कुणाशी काही बोललो नाही. विमानतळ आले. मी पटकन जाऊन ट्रॉली आणली. सुहासने तोपर्यन्त टॅक्सिचं बिल दिलं. मी बॅग डिक्कीतून ट्रॉलीवर शिफ्ट केली. ट्रॉली ढकलत ढकलत, मी सुहास आणि त्याचे वडील तिघेही गेट पाशी गेलो. सुहासने मिनिटभर थांबून ‘सगळं सामान आणि पेपर्स आणलेत नं?’ ते नीट चाचपुन पाहिलं. दोन मिनिटं मग आम्ही तिघेही शांत पणे तसेच उभे राहिलो. मी सुहासच्या हातात ट्रॉली सुपूर्द केली. त्याला सहार विमानतळाच्या डिपार्चर गेटवर सी-ऑफ केलं. सुहास हातातला पासपोर्ट गेटच्या सिक्युरिटी गार्डला दाखवत गेटच्या आत गेला. मग त्यानं आत जाऊन हवेतच आमच्या कडे ‘निघतो’ असं खुणावत पाठ फिरवली काचेच्या पलीकडे. आम्ही दोघे इकडे बाहेर तो पाठमोरा दिसायचा बंद होईस्तोपर्यंत तिथंच उभे राहिलो. गर्दीत कुठंतरी मग काचेच्या पलीकडे सुहास आणि त्याचा चेक्सचा निळा पीटरइंग्लंड चा शर्ट दिसेनासा झाला. डोळ्यापुढं साठलेल्या धुक्यात. मी क्षणभर गहिवरल्या सारखा झालो. गळ्यात आवंढा आला.

तसाच मागे फिरलो. सोबत सुहासचे वडील संथ पावलांनी माझ्या मागे मागे येत होते. ते “दादरहून बस पकडून परत सांगलीला जातो” असं म्हणाले. मी त्यांना “रूम वर चला” असं म्हणालो. ते "नको, येतो परत कधीतरी मुंबईला आलो की " एव्हडेच बोलले. त्यांचेही डोळे पाणावले होते. आमच्या दोघांचे लालसर आणि ओलसर डोळे आम्ही एकमेकांच्या नजरांपासून लपवत अवघडल्या सारखे एकदुसऱ्याच्या पुढ्यात क्षण दोन क्षण तसेच उभे राहिलो अबोलपणे. सुहासच्या वडलांना दोन्ही हात छातीशी जोडून मी निरोपाचा नमस्कार केला. “येतो, काळजी घे” असं म्हणत सुहास चे वडील सुद्धा क्षणात दूर अंधारात निघून गेले. मी टॅक्सी करून रूम वर आलो. रात्रीचे दोन अडीच झाले असावेत. रूमचं कुलूप उघडलं. आत सगळा पसारा तसांच होता. मेस चे दोन डबे येऊन कोपऱ्यात आमची वाट पहात शिळे होऊन निपचितपणे पडले होते. रूम पूर्वीच्या सारखीच वस्तुंनी, पुस्तकांनी आणि सामानाने भरलेली होती पण तरीही खोल कुठेतरी तिचं रिकामपण जाणवत होतं.

मी एकाकी पडलो होतो. परत एकदा. चारेक वर्षांपूर्वी ड्रॉईंग बोर्ड विकला होता आणि माझ्या घराचा उंबरा ओलांडला तेंव्हा मी जितका एकाकी पडलो होतो अगदी परत तितकाच एकाकी !

चारुदत्त रामतीर्थकर.
२० एप्रिल २०१९, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
शीर्षक बदललंत ते योग्य केलंत. Happy

मस्तच,
मिरजेचं आणि कोल्हापूरचं, दोन्हीठिकाणचं रत्नाकर आठवलं.
तुमचं रत्नाकर बहुधा देवलसमोरचं दिसतंय.

>>>तुमचं रत्नाकर बहुधा देवलसमोरचं दिसतंय.<<< हो बरोबर देवल समोरचंच रत्नाकर.

सर्वांचे आभार लेख आवडल्याच्या प्रतिक्रियां बद्दल.

चाऱ्या लेका मस्त लिहिलाय लेख, माझ्या user name वरून आठवलं का?
कॉलेज च्या आठवणी जाग्या केल्यास..
तू म्हटलेलं ब्रेथलेस गाणं आठवलं gathering मधलं!! मस्त म्हटलं होतंस..

काय मज्जा आली होती.. आठवतंय का?

अरे वा: । जयदीप पटवर्धन ? माबो चे आभारच मानले पाहिजेत. तब्बल एकोणीस वर्षांनंतर संपर्क ! आठवतंय...ब्रीदलेस आणि तुझं "अश्विनी येना" सुद्धा..!

@सस्मित, होय मला आधीच शीर्षक उगीचंच जास्त बोजड वाटलं म्हणून साधं सोपं दिलं शीर्षक.

चारुदत्त, लेख मस्तच! सुहास माझापण मित्र..मीपण त्याच कंपनीत आहे.. त्याच व्यक्तीचित्रण बरोबर केले.. मितभाषी, हुशार आणि सरळमार्गी!

अर्रे वा: , जग जितकं वाटलं होतं त्याही पेक्षा कितीतरी जास्त छोटं निघालं की ! राजू७६ जी, सुहास भेटला की तुमची ओळख सांगेन नक्की.
लेख आवडल्याचं नमूद केल्या बद्दल धन्यवाद.

हर्पेन जी , चनस जी , @Shraddha जी, सस्मित जी , नाँक्स जी , ननी जी, अभ्या जी - तुम्हा सगळ्यांचे आभार लेख आवडल्याचे प्रतिक्रियांबद्दल..