ग्रामीण जीवन आणि माध्यम

Submitted by चिंतामण पाटील on 18 April, 2019 - 06:53

महाराष्ट्रातील ग्रामीण जनजीवन आणि प्रसार माध्यम
https://issuu.com/vyascreations/docs/chaitra_palvi_issue__l-res_

-चिंतामण पाटील
हिवाळ्यात दाणे टिपायला निघालेली, तारांवर बसलेली पक्षांची रांग आता दिसत नाही कारण, पिकांवर जहाल कीटकनाशकांचा मारा करून त्यांना आम्ही कधीच मारून टाकले आहे.
भल्या पहाटे ओढ्यात डुंबायला निघालेल्या गायी-म्हशीं आता दिसत नाहीत कारण, मोटारपंप ठेऊन आम्ही ओढा कधीचा कोरडा करून टाकला आहे.
पण अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही “मेरे रस्के कमल”...च्या खालोखाल; “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी..” हा हरिपाठ आजही गावोगावी गायला जातोय.
साधनांची रेलचेल गावांपर्यंत पोहोचल्याने गावे विकसित झाल्याचा आभास होतोय. पण प्रत्यक्ष चित्र काहीसे वेगळे आहे.
“जो मेरे गांव के खेतों मे भूख उगने लगी
मेरे किसानो ने शहर मे नौकरी कर ली!” (आरिफ शेख)
वरील कावितेच्या ओळीतील सत्यता महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात पावलोगनिक पटते. शेती हाच ग्रामीण जीवनाचा आत्मा असून हतबल झालेला शेतकरी पाहता आत्मा हरवलेली गावेच तेवढी उरली आहेत. ग्रामीण भागातील हे चित्र येथे मांडतांना भूमिका नकारात्मक वाटत असली तरी तेच सत्य आहे. गावे अशी हताश का दिसत आहेत? गावे भकास का दिसत आहेत? पाणीटंचाई, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव आणि शासनावर अवलंबून राहण्याची बळावलेली वृत्ती. ही आहेत ग्रामीण जीवनातील नैराश्याची कारणे.
डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी शिवारात निघालेल्या माय माऊल्या म्हणजे तीव्र पाणी टंचाईचे निदर्शक मानले जात असले तरी वास्तविक हे दृश्य त्या शिवारात जलसाठा असल्याचे दर्शविते. आता डोईवरच्या हंड्यांची जागा tankar ने घेतली आहे. कारण अलीकडे हंडाभर पाणी देखील शिवारात उरले नाही व गावाला आता दूर कोठून तरी tankarने पाणी आणून पुरवावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याचीच प्रचंड वानवा असताना शेती सिंचनाला पाणी मिळणार कोठून? पाणीटंचाई पासून कायमची मुक्तता यावरच आता गावाचे अस्तित्व अवलंबून आहे.
गावातून पाणी व तरुणाई हद्दपार:
गाव रोजगार पुरवू शकत नाही म्हणून तरुणांनी शहराचा रस्ता धरला का? तर बऱ्याच अंशी ते खरे आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवू शकत नाही म्हटल्यावर रोजगारासाठी शहर गाठणे भाग होतं. कुटुंबे विभक्त होत गेल्याने शेती तुकड्या तुकड्यात विभागली गेली शेतीच्या छोट्या तुकड्यावर गुजराण करणे अवघड होऊन बसले. जगभरात कुठेही जा मानवी वस्ती पाण्याच्या स्रोताभोवती वाढली. आज हेच स्रोत म्हणजेच नदीनाले कोरडे पडू लागले आहेत. पूर्वी दुष्काळप्रवण म्हणून गणलेल्या गावांपर्यंत पाण्याची कमतरता सीमित होती. आता ति राज्यभर विस्तारत चालली असुन गावे बकाल होण्यात त्याचे रुपांतर होत आहे. शेतीला पाणी, पाण्यामुळे पिक, पिकातून रोजगार हे चक्र आता खंडीत झाले आहे. भूमी फक्त अन्न्धान्न्य, फळे, भाज्या जन्माला घालीत नाही तर ती रोजगार पुरविते. गावातून आधी पाणी आटू लागले आणि पाहता पाहता रोजगारही. म्हणूनच आता गावातल्या तरुणाने रोजगारासाठी शहराची वाट धरली आहे.
गांवमे घुसकर तुम तो सब ही लुट गये
खेती लुटी, नदीयां लुटी, जंगल लुटे और
खडे हो गये महल खेत मे, मुंहके छीने कौर!
धरणाच्या पाण्यावर शहरांचा अधिकार वाढला:
धरणे १०० टक्के भरली तरी त्यातले ५० टक्क्यापेक्षा जास्त पाणी आता शहरे आणि गावांना पिण्यासाठी राखून ठेवले जाते. अलीकडील ५ वर्षात धरणे पूर्ण भरलीच नाही. त्यामुळे आहे ते पाणी पिण्या करीता राखून ठेवले गेल्याने शेतीला सिंचनासाठी मिळणे बंद झाले. उदाहरण गिरणा धरणाचेच घेता येईल. हे धरण कितीही भरले तरी धरण क्षमतेच्या ५४% पाणी पिण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे. २०१८ च्या पावसाळ्यात हे धरण ४८% भरल्याने सगळेच पाणी नदी काठावरील मोठी शहरे व गावांसाठी पिण्यासाठी सोडण्यात आले. काठावरील मुठभर गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो गावे आज पाण्यावाचून तळमळत आहेत. एकूण काय तर मोठ्या शहरांची तहान भागविण्यासाठी लहानमोठी गावे पाण्यासाठी वंचित राहात आहेत.
मुंबई,ठाणे,कल्याण ह्या महाकाय शहरांना लागणारे पाणी शेजारच्या नाशिक, नगर व पुणे जिल्ह्यातील धरणातून पुरविले जाते. ती गरज किती प्रचंड आहे याचे एक बोलके उदाहरण म्हणजे, इगतपुरी तालुक्यातील ७०% क्षेत्र हे धरणक्षेत्रात गेले आहे. हे सगळे पाणी ठाणे, मुंबई महानगरासाठी पुरविले जाते. कृषीयोग्य जमीन तर पाण्याआखाली गेलीच पण ज्या पाण्यातून त्या भागातील शेती बागायती झाले असती ते महानगरांची तहान भागवित आहे. याचा अर्थ शहरांना पाणी देऊ नये असा नसून. आपली व्यवस्था अशी आहे की ती शहरांची घेते पण ग्रामीण भागातही पाण्याची तेवढीच गरज असते हे विसरले जाते. शहरांची सुविधा बघताना ग्रामीण भागातील जनतेसाठी सावत्रपणाची वागणूक दिली जाते.
लाखो कोटीच्या पाणी योजना, पण पाणी नाही:
पाण्याबाबत शहरावर मेहेरबानी आणि गावाकडे दुर्लक्ष असे झालेय का? तर तसेही नाही. हजार-पंधराशे वस्तीच्याही गावासाठी ५० लाखापासून ते एक-दीड कोटी रुपयांपर्यंत पिण्याची पाणी योजना शासनाने पूर्ण केली आहे. योजना त्तर झाल्या पण पाण्याचे जिवंत स्रोत तर पाहिजेत ना? आहेत फक्त कोरड्याठाक विहिरी आणि निष्काळजीपणे केलेली तुटकी फुटकी पाईपलाईन. परिणामी आजही पाण्यावाचून गावे तहानलेलीच. चुकले कुठे तर गावोगावच्या पाणी योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण. याला प्रशासकीय यंत्रणा जशी जबाबदार आहे तसे गावपातळीवरचे नेतृत्व देखील जबाबदार आहे.
राज्यातील ९०% गावात आजही गावकरी गावातील विकास कामाच्या नियोजनात सहभागी होत नाहीत. ग्राम पंचायतीचे सरपंच आणि सदस्य जे करतील त्याला मुकाट्याने होकार देण्यात गावकरी धन्यता मानतात. परिणामी शासकीय योजना पोहोचूनही गावात औदासिन्य जाणवते. पाटोदा,बारीपाडा, हिवरेबाजार अशा स्वावलंबी गावांची उदाहरणे आहेत पण ती संख्या फारच अल्प आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव:
गावातला प्रत्येक माणूस आज शिक्षित आहे. अंगणवाडीपासून ते माध्यमिक विद्यालयापर्यंतची सोय गावात आज आहे. परंतु तेथे मिळते ते शिक्षण गुणवत्तापूर्ण नाही. येथून शिकलेला तरुण शहरात जाऊन कारखान्यात चतुर्थ श्रेणी मजूर बनतात. मुबई-पुण्यात जावून रिक्षा चालवितो किंवा तळमजल्यावरचे ओझे वरच्या मजल्यावर पोहोचवतो. आयटीआय,इंजिनियरिंग,संगनकीय आदी कौशल्य शिक्षणात ते प्रगती करू शकत नाहीत तिथे उच्चशिक्षणाची स्थिती तर फारच वाईट. ग्रामीण भागातून इंजिनियर झालेले तरुण आजही शहरात पाच-दहा हजारावर नोकरी करतांना दिसतात.
शिकून शेती करायला थांबणारे नगण्यच. कारण शेती म्हणजे ‘न परवडणारा व्यवसाय’ ह्यावर शिक्कामोर्तब झाल्याने आवड आणि क्षमता असूनही शेतीत थांबण्याचे धाडस आजचा तरुण करताना दिसत नाही. कारण फायद्याची शेती करूनही शेतकरी तरुणांचे विवाह होत नाहीत ही नवी समस्या निर्माण झाली आहे.
गावावर राजकारणाचा पगडा:
आज गावाची पहाट पूर्वीसारखी शेतावर होत नाही. गावातील चौकात अगर गावाबाहेरच्या टपरीभोवती घोळक्याने जमून लोक तासंतास गप्पा मारतात. ह्या गप्पा ना शेतीवरच्या असतात ना ग्रामविकासाच्या. राजकारण हाच त्यातला केंद्रबिंदू असतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ही चर्चा रंगते. ग्राम पंचायतीच्या निवडणुका म्हणजे वादाचे केंद्र. पदप्रतिष्ठेपायी गावात गटातटाचे रान माजून गावाची शांतता नष्ट होते. यानिमित्ताने भाऊबंदकीतले वाद चिघळतात. गावाची विकासकामे देखील राजकारणाच्या अवतीभोवती केंद्रित होतात. गावात जे होईल ते राजकीय नेतृत्वामुळेच ही भावना गावात रुजली असून लोकसहभाग नगण्य होत चालला आहे. आता विकासनिधी थेट गावाला येतो. त्यामुळे यानिधीवर डोळा ठेऊन लोक राजकारणात उतरू लागलेत. अर्थात सगळीच काही लूट चाललीय असे नाही. गावात पक्क्या गटारी झाल्या, घरोघरी नळ पोहोचले, अंतर्गत रस्ते कॉंक्रीटचे झाले, मोबाईल टॉवर उभे राहिले, इंटरनेट पोहोचले, शेतापर्यंत रस्ते पोहचले. म्हणून गाव सुखी झाले का? गावाच्या समस्या दूर झाल्या का?
गांव आता अधिकाधिक परावलंबी होत चाललय. प्रत्येक कुटुंबाला दारिद्र्य रेषेखालील यादीत यायचय. प्रत्येकाला रेशनचे २-३ रुपये किलोने धान्य हवंय. सगळ्या सोयी सबसिडीतून मिळाव्यात अशी अपेक्षा आहेत. जर काही करेल ते शासन ही भूमिका आता ग्रामीण भागाची झालीय.
......आणि प्रसिद्धी माध्यमे:
जवा दुष्काळ, दुष्काळ घिरट्या घाली!
तवा गावाला, गावाला कुणीना वाली!
कसं सुगीत, सुगीत घालतात गस्ता,
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता!! (इन्द्रजीत भालेराव)
प्रसिद्धी माध्यमातून ग्रामीण जीवन पूर्वीपेक्षा अधिक ठळकपणे मांडले जाऊ लागले आहे. दुष्काळ असो अगर गावाच्या समस्या आता माध्यमे हिरीरीने मांडू लागले आहेत. परंतु अद्यापही ग्रामीण भागाचे वास्तविक चित्र माध्यामातून येत नाही. दुष्काळाची माहिती तर रकानेच्या रकाने भरून दिली जाते पण, दुष्काळावर मात करणाऱ्या गावाचा वास्तव लढा पुढे येत नाही. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारण झाल्याचे तर छापले जाते. पण लोकसहभागातून गावाने केलेल्या कामाला फारसे स्थान मिळत नाही. लोकांनी केलेल्या कामाचे बारकावे मांडले जात नाहीत. आमिरखानच्या भोवती ग्लैमर आहे म्हणून जेवढे कौतुक वाटर कप स्पर्धेचे झाले तसे लोकांनी स्वप्रेरणेने केलेल्या कामाचे होत नाही.
ग्रामीण माणूस त्यांचे वास्तव सांगण्याचा प्रयत्न करतो पण ते ऐकून घेण्याची मानसिकता माध्यमांची नसते. किती पत्रकाराना दुधाचे ग्रामीण भागातले दर माहित आहेत? दुधाचे दर माहित असतील पण दूध देणाऱ्या गायी म्हशीला खायला लागणाऱ्या एका चाऱ्याच्या पेंडीला ७० रुपये लागतात हे माहीत आहे? किती जनांना हे माहित आहे की, जे दूध आपल्या घरापर्यंत ४०-५० रुपयात पोहोचते त्यासाठी शेतकरी पाणी टंचाईच्या या दिवसात विकतचे पाणी जनावराना पाजतो?
शहरातले सर्व दवाखाने ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांनी भरलेले असतात. बहुतांश रुग्ण अशुद्ध पाण्याची देणगी असतात. ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत हे अशुद्ध व घातक आजारांना निमंत्रण देणारे आहेत. जगाचा पोशिंदा शेतकरी आपल्या पिकांवर घातक रसायनांचा वापर करू लागला असून त्यामुळे कैंसर सारखे घातक आजार बळावत चालले आहेत. हे सगळे ग्रामीण जीवनातील बदलांचे परिणाम आहेत. रसायनांचा फवारणीसाठी आग्रह धरणाऱ्या यंत्रणेच्या विरुद्ध अद्याप माध्यमे उभी ठाकल्याचे दिसत नाही.
असो रस्ते, इंटरनेटमुळे गावाचे शहरीकरण झाल्याचा आभास आज होत असला तरी गावे उदास, आजारी आणि कर्जबाजारी होत चालली आहेत. ना धड शिक्षित ना धड कष्टाळू शेतकरी अशी मोबाईलमध्ये डोकं घालून गावाच्या वेशीवर भेटणारी तरुण पिढी असे भीतीदायक चित्र म्हणजे आजचे गाव, असे झाले आहे.
-चिन्तामन drought.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चिंतन आवडलं. आता पन्नास साठच्या घरातल्या आपल्या सारख्या लोकांना जूने दिवस खुणावत असतातच. काय करणार परिवर्तन हा जगाचा नियम आहे.
दुसरे असे की मी सोडून सर्व प्रामाणिक असावेत ही आपल्या समाजाची धारणा आहे. प्रामाणिक, पापभिरू माणसं मागं पडत पडत काळाआड गुडूप होतात. जीवनाचा बाजार झालाय म्हणून मोबाईल टॉवर गिर्हाइंकं शोधत खेडोपाडी पोहोचलाय. इतक्या नवनवीन गरजा तयार झाल्या की कोरडवाहू शेतकऱ्याची दमछाक झाली. तासभर लोकं रिक्षाची वाट पाहतील पण दोन तीन किलोमीटर चालत जाणार नाही. सायकलवाल्याकडे लोक गरीब दलिंदर म्हणून तूच्छ कटाक्ष टाकतात. केवळ जैविक गरजेपोटी कुवतीबाहेर पोरं जन्माला घालून म्हातारकोतारी माणसं शेवटी लाचार जगत मरणाची वाट बघत बसतात. प्रेम नि आपुलकी पुस्तकात उरलीय. भावाला जमीनीचा पैसा मिळाला तर बहिणी केस लावू लागल्यात.

राज्यातील ९०% गावात आजही गावकरी गावातील विकास कामाच्या नियोजनात सहभागी होत नाहीत. ग्राम पंचायतीचे सरपंच आणि सदस्य जे करतील त्याला मुकाट्याने होकार देण्यात गावकरी धन्यता मानतात. परिणामी शासकीय योजना पोहोचूनही गावात औदासिन्य जाणवते. >>>>>>

सगळीकडे हेच कारण आहे. लोक चर्चा करतात आणि निवांत पडतात. स्वतःचे बुड हवल्याशिवाय कुठलेही काम होणार नाही जे जेव्हा माणसाला कळेल तेव्हा त्याचे काहीतरी भले होईल.

साधना जी एकदा परदेशातील जपान की इतर कुठलेतरी भारतीय ग्रामीण समाज जीवनाचा अभ्यास करण्यासाठी काही समाजशास्रज्ञ आले होते. त्यांनी सकाळी प्रवास सुरू केला तर लागणाऱ्या प्रत्येक गावात चौका चौकात , पारावर, झाडाखाली रिकामटेकड्या लोकांचे घोळके दिसत होते, संध्याकाळ पर्यंत असेच अनेक निष्क्रिय लोकं बघून त्यांना शॉक बसला. बरोबरच्या आपल्या लोकांना विचारले तर त्यांना काय सांगावे असा प्रश्न पडला. मंडळी जमून अध्यात्मिक चर्चा करतात कारण मोक्ष मिळवणं हे सर्वोच्च कर्तव्य आमच्या धर्मात सांगितलंय असे उत्तर देऊन वेळ मारून नेली.

वाचलं.विचार प्रवर्तक.
आम्ही याबाबत काय काय मदत करू शकतो?पाणी जपून वापरणे, उन्हाळ्यात नळाला येणारं पाणी बघून गिल्ट बाळगणे, उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला मानवी शक्तीवर चालणारी स्थलांतरीत शेतकऱयांची गुर्हाळं बघून कळवळणे याशिवाय काही साउंड गोष्ट करू शकतो का?

@mi_anu - प्रतिसाद पटला.
नेहमी शहरात राहणार्यांना "इथे तुम्ही मस्त AC मध्ये बसलाय, बघा तिकडे खेड्यांची दुर्दशा" असं म्हणून गिल्ट फिलिंग देणाऱ्या सगळ्यांचा मला मनापासून राग येतो.
शेतीवर कीटकनाशके मारल्याने गळे काढणारे पर्यावरणप्रेमी, तेल्याने डाळिंबाची बाग उद्धवस्त केल्यावर रडणाऱ्या शेतकर्यांचे डोळे पुसायला येत नाहीत.
लेख टाईपण सोपं असतं, पण मोटेवर उभं राहून पाणी देणं तितकंच अवघड, सो जर पंपांनी शेतकर्यांचे कष्ट कमी होत असतील, तर आपल्या नेत्रसुखासाठी त्यांनी पुन्हा मोटेवर उभं राहण्याची गरज नाही.
शेतकऱ्यांच्या एकतरी मुलाने शेतीवर अवलंबून राहू नये. शेतीने मारलं तर तोच शहरात नोकरी करून घर पोसू शकेल.
गळे काढणारे लेख आजपर्यंत अनेक बघितलेत, पण काहीतरी ठोस उपाययोजना सुचवेल, असे फारच कमी...

अज्ञातवासी, माझा कंटेक्स्ट बहुतेक हा नाहीये.
मुळात प्रश्न हा पडतो की पेपर मध्ये भांडवल निघालं नाही म्हणून शेतकऱ्याने फ्लॉवर वर नांगर फिरवला वगैरे बातम्या वाचतो तेव्हा पोटात तुटतं.इथे कोपर्यावर 40 रु पाव ने फ्लॉवर घेताना, 500 ची नोट संपून घरी फक्त 2 दिवस 2 वेळा पुरतील इतकीच भाज्या कोशिंबीर येताना पाहून पोटात परत नव्याने तुटतं.प्रत्येक उन्हाळ्यात ऑफिस मध्ये लोकांना एक जास्त घाणसुद्धा न झालेला कप धुवायला 10 लिटर पाणी नासताना परत नव्याने जीव कळवळतो. आणि या सगळ्यात करता काहीच येत नाही.शेतकरी बाजार असं लीहिलेले टेम्पो पण कधीकधी अडते वालेच असतात.या सगळ्यात मदत कुठे करावी, कशी करावी, योग्य जागी पोहचेल का,आपण काही सूचना केल्यास 'भाकरी नाही तर केक खा' अश्या टाइप ची इग्नोरांट सूचना ठरेल का असे अनेक प्रश्न येतात.
शेवटी किमान आपल्याने होईल ते करावे, जनरल या इश्यू बाबत सेन्सिटिव्ह राहावे इतका निष्कर्ष काढून गप्प बसले जाते.

सर्वात महत्वाचे आहे ते पर्यावरणाची हानी थांबवणे.
पाण्याचे प्रदूषण सक्तीने रोकने (अगदी फाशी सारखी कडक शिक्षा सुधा कमी पडेल ) खूप गरजेचं आहे .
आज खेड्या ची जी अवस्था आहे तशीच अवस्था शहरांची होण्यास वेळ लागणार नाही .
त्या साठी पाण्याचे नियोजन हवे .शेतीला हमखास पाणीपुरवठा ची हमी हवी पण ठिबक सिंचन सुधा सक्तीने हवे .शहरात जागतिक मुल्यांक नुसार प्रती व्यक्ती पाणी हवे पण गैरवापर झाला तर शिक्षा पण हवी .

आज खेड्या ची जी अवस्था आहे तशीच अवस्था शहरांची होण्यास वेळ लागणार नाही .
त्या साठी पाण्याचे नियोजन हवे .शेतीला हमखास पाणीपुरवठा ची हमी हवी पण ठिबक सिंचन सुधा सक्तीने हवे .शहरात जागतिक मुल्यांक नुसार प्रती व्यक्ती पाणी हवे पण गैरवापर झाला तर शिक्षा पण हवी .
नवीन Submitted by Rajesh188 on 21 April, 2019 -
+१००००१

किमान सोसायटीज नी प्रत्येक फ्लॅट चे सिंक चे पाणी रिसायकल करून ग्रे युजेज ला(फ्लश, साबण काढून झाडाला वगैरे) वापरण्याची दणकट आणि सुरक्षित(नळीतून उंदीर बेडूक साप परत घरात येणार नाही यासाठी तोंडाला जाळ्या) व्यवस्था केली तरी अनेक हजार लिटर पाणी वाचेल.
आयटी ऑफिसेस मध्ये प्रदूषण टाळायला पुठ्ठ्याचे कप बंद करून स्वतःचे मग वापरायला लावतात.लोक ते मग 4 दिवस खरकटे वाळू देऊन मग अनेक लिटर पाणी वापरून धुतात.किमान ते पाणी बंद व्हावे.बंद करता येत नसेल तर झाडात जावे.
जी जनता माजोरडी आहे ती वेस्टेज चालू ठेवेल.
पण किमान जी जनता अजाणता इतके पाणी वाया घालवतेय तिला कळावे इतके तरी प्रबोधन व्हावे.
अनेक वर्षांपूर्वी मतदान सुट्टीचा वापर पिकनिक साठी करणारी,'सगळे चोर आहेत, मी मत देऊन काय होणार' म्हणणारी शहरी जनता आज टीव्ही, फेसबुक, व्हॉटसप वरच्या प्रचाराने मतदानाला जाते.आज काही पेशंट आजी आजोबा पण मतदानाला आले होते.हा बदल माध्यम प्रचारातून होऊ शकला.हाच बदल पाणीवापर, रियुज याबाबत भरपूर प्रमाणात प्रचार होऊन होणे गरजेचे आहे.
स्वच्छच असलेले,पन्नास वेळा सॅनिटायझर चोळलेले हात बेसिन खाली मोठा नळ सोडून धुतले जातात.
हे सर्व नियम, शिस्त, शिक्षा याने फक्त होणार नाहीये.ते आतून यावे लागणार आहे.आणि तसं यायला ते पॉझिटिव्ह प्रकारे पब्लिक च्या सर्व मीडिया मधून सतत डोक्यावर मारावे लागणार आहे.

खरं आहे पण ओरबाडणे हेच जिवंत पणाचे लक्षण आहे असा समज झालेल्या जनतेकडून काय अपेक्षा ठेवणार? यंत्र संस्कृती पर्यावरणाच्या मुळावर उठली आहे. बटन दाबले की शेकडो फूट खोलीवरचे, अंतरावरचे पाणी मिळतंय कुठलेही श्रम न करता उपभोग घेता येतो म्हणून उद्याचा विचार न करणारी जनता जागृत झाली तर काहीतरी भवितव्य आहे.

पाणी फाउंडेशन च्या कामांमध्ये उन्हातान्हात सीसीटी, तळी खोदणारी ग्रामीण जनता व तिला साथ देणारे शहरी जागृत युवा यांच्या कामावरून नक्कीच सकारात्मक बदल घडतोय हे सुखावणारे चित्र आहे.

पैसे आणि मालमत्ता पुढच्या पिढीला देवून
ती सुखी होणार नाही जगण्यासाठी अत्यंत
गरजेची शुद्ध हवा ,शुद्ध पाणी ,आणि उत्तम पर्यावरण गरजेचं असते .नंतर पैसा आणि मालमत्ता.
हे लोकांना समजले तरी खूप झाले