कोकणचा रानमेवा- 'करवंदे'

Submitted by 'सिद्धि' on 17 April, 2019 - 05:50

करवंदे (डोंगराची काळीमैना) KARANDA-

आमच्या गावी एक म्हण आहे, ‘पाडव्याला पाड आणि अखितीला गोड’. "गेल्याच आठवड्यात गावी जाऊन आले, रस्त्याच्या दुतर्फा करवंदाच्या डहाळी च्या डहाळी भरुन आलेल्या पाहील्या. अश्या या रान मेव्यासाठी कोकण प्रसिद्ध आहेच. सर्वसाधारण रानमेवा म्हणजे करवंदे, जांभळे, आंबा, फणस, आवळा, रायआवळे, तोरणं, आमगुळे, आळू ही आहेत. हा रानमेवा आरोग्यरक्षणासाठी सर्वानी आवर्जून खावा. खर्च न करता ही अतीशय उपयुक्त असे हे करवंद मुबलक प्रमानात उपलब्ध असते. अश्या या बहुगुणी फळा बद्द्ल थोडी माहीती".

करवंदाचे मूळ स्थान भारत असून, करवंद हिंदीमध्ये ‘खट्टा मीठा’ या नावाने प्रसिद्ध आहे, तर शास्त्रीय भाषेत उवाऊर्सी या नावाने ओळखले जाते. करवंद ही वनस्पती अपोसायनेसी या कुळातील आहे.
.
करवंदांचा _n.jpg
.
करवंदाचे औषधी गुणधर्म-
• रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल, तसेच
शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
• ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते, हृदयविकारामध्ये
करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते.
• सूर्याच्या प्रखर उष्णतेने जर शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत करून प्यावे.
• फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.
• आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल, तर करवंदाचे सरबत थोडय़ा-थोडय़ा अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.
• करवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या विकारांमध्ये करवंद सेवनाचा लाभ होतो.
.
करवंद.jpg
.
विविध माहीती स्त्रोताचा वापर करून करवंदचे केले जाणारे वेगवेगळे पदार्थ/ प्रकार/ प्रक्रिया मी ईथे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय, काही शंका असल्यास नक्की कळवा.

1) करवंद लोणचे- तीन प्रकारे हे लोणचे करता येते.

प्रकार 1
साहित्य : 100 ग्रॅम करवंद, 50 ग्रॅम हिरवी मिरची, 1/4 चमचा जिरं, 1 लहान चमचा बडिसोप पावडर, 1 लहान चमचा धने पूड, 1/4 चमचा हळद, 1 मोठा चमचा तेल, थोड मीठ.
कृती : करवंद व हिरव्या मिरच्यांना लांब लांब कापून घ्यावे. तेल गरम करून त्यात जिरं, सोप, हळद आणि धने पूड घालून त्यात करवंद व मिरच्या घालून 5 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यावे. हे लोणचे 10-15 दिवस खराब होत नाही.
.

करवंद लोणचे 2.jpg
.

प्रकार 2
साहित्य : हिरवी करवंद २ वाटया, मोहरी डाळ पाऊण वाटी, मेथी २-३ चमचे, हिंग १ छोटा चमचा, हळद १ मोठा चमचा, तिखट अर्धी वाटी, मीठ चवीप्रमाणे, तेल १ वाटी.
कृती : करवंद स्वच्छ धुऊन पुसून बिया काढून घ्या. मेथी, मोहरी डाळ थोडी भाजून त्याची पूड करून घ्या. त्यात तिखट मीठ घालून चांगले कालवून मसाल्यात घाला आणि कालवून घ्या. नंतर त्यात करवंद घालून कालवून बरणीत भरून ठेवा. तेल कमी वाटल्यास थोडे तेल गरम करून नंतर थंड करून त्यावर ओतून ठेवा.
.
करवंद लोणचे.jpg
.
प्रकार 3
पुर्ण वाढ झालेली व पिकण्याच्या पुर्व अवस्थेतील फळे वापरावीत. ती स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवावीत. त्यामुळे त्याचा चिक निघून जातो. धुवून घेतलेली करवंद जाळीदार ट्रेमध्ये अर्धातास ठेवून त्यातले पाणी निथळून द्यावे. लोणचे बनवण्यासाठीचे घटक खालीलप्रमाणे.
साहित्य : करवंद १ किलो, बारीक मीठ २५० ग्रॅम, मोहरी डाळ १५० ग्रॅम, हळद पावडर २५ ग्रॅम, हिंग पावडर २० ग्रॅम, लाल तिखट २५ ग्रॅम, काळी मिरी २० ग्रॅम, लवंग १५ ग्रॅम, दालचिनी १० ग्रॅम, लसून पाकळ्या ५० ग्रॅम, तेल २५० मि.ली.
कृती : प्रथम करवंद धुवून घ्यावीत आणि यंत्राच्या मदतीने त्याच्या फोडी कराव्यात. फोडींना मीठ व हळद लावून पातेल्यात त्या ४ - ६ तास ठेवाव्यात. यामुळे फोडीतील पाणी निचरून जाते. नंतर फोडी ४ - ६ तास पसरून ठेवून सुकवाव्यात. मसाला करताना साधारणपणे १ किलो फोडींसाठी १५० ग्रॅम बारीक मीठ, १२५ ग्रॅम मोहरी डाळ, ३० ग्रॅम मेथ्या, २० ग्रॅम हळद पावडर, १५ ग्रॅम हिंग पावडर, ३० ग्रॅम लाल तिखट, ३० ग्रॅम काळे मिरे आणि गरजेप्रमाणे मोहरीचे रिफाईड तेल टाकावे. प्रथम तेल गरम करून त्यात सर्व मसाले टाकून फोडणी कारवी आणि नंतर हे मिश्रण फोडींवर घालून मिसळावे. नंतर त्यात प्रति किलो ६०० मि.ग्रॅम. सोडीयम बेन्झोएट मिसळावे. गरम करून थंड केलेले निम्मे तेल लोणच्याच्या फोडीत मिसळावे व उरलेले तेल नंतर ओतावे. लोणचे सतत तेलात बडून राहिल्यावर ते व्यवस्थित मुरते, साधारणतः १५ ते २० दिवसांत लोणचे खाण्यास तयार होते.

2) करवंद चटणी- दोन प्रकारे चटणी करता येते.
प्रकार 1
साहित्य : करवंद हिरवी बिया वाढलेली १ वाटी, गुळ बारीक चिरलेला १ मोठा चमचा, मीठ चवीप्रमाणे, लाल मिरच्या ५ ते ७, सुके खोबरे – अर्धी वाटी, तेल १ मोठा चमचा, फोडणीचे साहित्य(मोहरी, हिंग,जीरे सर्व 1-1 टी स्पून) , कोथिंबीर पाव वाटी.
कृती : तेल आणि फोडणीचे साहित्य सोडून सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्या. तेल कढईत गरम करून फोडणी तयार करा आणि चटणीवर घाला. चटणी कालवून खायला दया.
टीप : ही चटणी ३-४ दिवस टिकते.
.
करवंद चटणी.jpg
.

प्रकार 2
कृती :पिकलेल्या करवंदाची चटणी करता येते. त्यासाठी करवंद स्वच्छ धुवावीत आणि त्यातल्या बिया वेगळ्या कराव्यात. त्यात चवीप्रमाणे मीठ, हिरव्या मिरच्या, साखर आणि थोडं ओलं खोबरं टाकून वाटावे. चविष्ट चटणी तयार होते.

3) करवंद फळांची भाजी-
कृती : प्रथम करवंद धुवून घ्यावीत,मोहरी,हिन्ग,करवंदचे तुकडे करून मोहरी, हिंग,जीरे सर्व 1-1 टी स्पून घेउन फोडणी करावी. चविपुरते मीठ आणि गुळ घ्या.

.
करवंद फळांची भाजी.jpg
.

4) करवंद सरबत/ रस - दोन प्रकारे हे सरबत करता येते.
प्रकार 1
साहित्य : दोन वाट्या करवंद, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार.
कृती : करवंदांचा चीक जाण्यासाठी गरम पाण्यात दहा मिनिटे बुडवून ठेवा. पाण्यातून काढून घ्या. दोन भाग करून बिया वेगळ्या करा. बिया वेगळा उर्वरीत करवंदाचा गर, साखर, मीठ आणि एक वाटी पाणी ज्युसर जारमधे एकत्र करा. मिक्सरला लावून नीट फिरवून घ्या. गाळणीने किंवा पातळ कापडाने गाळून घ्या. एक वाटी रसाला तीन वाट्या पाणी मिसळा. लागल्यास पाणी, साखर, मीठ वाढवा. सरबत तयार आहे. (कृती मि.पा.वरून)
.
करवंद  सरबत.jpg
.

प्रकार 2
कृती : प्रथमतः पुर्णपणे पक्व झालेली फळे घेऊन त्यातील खराब झालेली फळे काढून टाकावीत. चांगली फळे धुवून त्यातील पाणी निथळून घ्यावे. फळे स्टीलच्या पातेल्यात घेऊन स्वच्छ हाताने चांगली कुस्करून घ्यावीत. हे पातेले मंद गॅस शेगडीवर ठेवून ८ - १० मिनिटे गरम करावे. त्यानंतर पातेले मंद गॅस शेगडीवरून खाली उतरावे व थंड होऊ द्यावे. त्यानंतर स्क्रू टाईप एक्सट्रॅक्टर मशिनमध्ये घालून हा लगदा बारीक करावा. जेणे करून त्यातून रस निघेल. रस काढत असताना बिया चिरडणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. साधारणपणे फळांपासून ५५ ते ५६ टक्के रस मिळतो. रस पातळ फडक्यातून गाळून स्टीलच्या उभट भांड्यांमध्ये ५ ते ६ तास स्थिर ठेवावा. अशा प्रकारे स्थिर ठेवल्यामुळे रसातील साका भांड्याच्या तळाला एकत्र जमा होतो. यावेळी ते भांडे हळूवारपणे तिरके करून वरच्या भागातील निवळलेला रस सरबत तयार करण्यासाठी वापरावा.

5) करवंद मोरंबा-
साहित्य : -हिरवी करवंद 4 वाटया,४ कप साखर,५ ते ६ लवंगा.
कृती : मध्यम आकाराचे नॉनस्टीक पातेले घ्यावे. त्यात करवंदचे तुकडे (बिया काढून) आणि साखर एकत्र करून मध्यम आचेवर गरम करत ठेवावे.तुकडे, लवंगा आणि साखर उकळवावे, साखर वितळली कि गरजेपुरती कंसीस्टंसी येईस्तोवर आटवावे. खूप जास्तही आटवू नये कारण थंड झाल्यावर मोरंबा अजून घट्ट होतो.
तयार मोरंबा काचेच्या बरणीत भरून ठेवावा.
.
करवंद मोरंबा.JPG
.

6) करवंद जॅम-
जॅमसाठी सुद्धा रसच वापरतात. (रस कृती वरती सागितली आहे)
जॅम तयार करण्यासाठी करवंदाच्या रसामध्ये १ कि.ग्रॅ. साखर, सायट्रिक आम्ल २ ग्रॅम वारपावे (एका लिटरसाठी)
कृती : करवंदापासून उत्तम प्रतिचा जाम करता येतो. त्याला बाजारात चांगल्या प्रकारे मागणी असते. जॅम तयार करताना गर आंबट असल्यास १ किलो गरामध्ये एक किलो साखर आणि २ ग्रॅम आम्ल लागते. प्रथम करवंदाचा गर व साखर एकत्र करून शेगडीवर त्याचा ब्रिक्स ६८ अंश पर्यंत आटवावा. नंतर त्यात सायट्रिक आम्ल मिसळावे व ते मिश्रण निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावा. समजा जॅमची दीर्घकाळ साठवण करायची झाली तर जॅमवर वितळलेल्या मेणाचा पातळ थर देऊन झाकण घट्ट बसवावे.
.
करवंद जॅम.jpg
.

7) करवंद जेली
कृती : योग्य प्रकारे दक्षात घेतल्यास करवंदपासून उत्तम प्रतीची जेली तयार करता येऊ शकते. जेलीसाठी प्रामुख्याने अर्धवट पक्व झालेल्या फळांची निवड करावी. फळे निवडल्यावर ती स्वच्छ पाण्याने धुवावीत. त्यातले पाणी निथळावे आणि फळांचे वजन करून ती स्टीलच्या पातेल्यामध्ये घ्यावीत. फळांच्या वजनाएवढे पाणी मोजून टाकावे. प्रति किलो फळास २ ग्रॅम सायट्रिक आम्ल टाकून पातेले मंद शेगडीवर ठेवावे. शिजवत असताना लगदा तयार करावा. त्यासाठी स्टीलच्या पळीचा वापर करावा. शिजवत असताना लगदा पातेल्यास चिटकू नये किंवा करपू नये म्हणून ते अधूनमधून पळीने हलवत राहावे. मिश्रणाला उकळी आल्यानंतर ते २५ - ३० मिनिटे शिजवावे. पातेले शेगडीवरून उतरवल्यावर तो लगदा थंड झाल्यावर तो मलमलच्या कापडात थोडा थोडा टाकून हाताने दाबून त्यातला रस काढावा आणि त्यातला चोथा फेकून द्यावा. गाळून घेतलेला रस स्टीलच्या उभट भांड्यात भरून तो २४ तास एका ठिकाणी न हलवता ठेवावा. दुसऱ्या दिवशी उभट भांडे हळूवारपणे तिरपे करून निवळलेला रस दुसऱ्या भांड्यात काढावा. जेली करण्यासाठी रस १ लि., साखर १ कि.ग्रॅ. वापरावी. रसात पेक्टिन असल्यामुले त्याच गुठळी तयार होते. समाज रसात लहान लहान गुठळ्या झाल्या तर असे समजावे की त्यात पेक्टीनचे प्रमाण कमी आहे. मात्र जेली तयार होते.
.
करवंद जेली.jpg
.

8) करवंद वडी -
कृती : 2 वाटी पिकलेली करवंद धुवून घ्यावीत, बिया काढून टाका, 2 वाटी साखर,चिमुटभर वेलची पूड घालुन शिजवुन रस तयार करावा.एकजीव करून सर्व मिश्रणाला एका थाळीत जमण्यासाठी ठेऊन द्यावे.
चिकटु नये म्हणुन थाळीला थोडे तेल लावा.

* क्रुपया याची नोद घ्यावी.
- काही फोटो संग्रहीत तर काही नेट वरून घेतले आहेत, वाचकांना अधिकाधिक महिती मिळावी हा एकमेव हेतु आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिद्धी , जियो !! खूप चटकदार लेख आणी माहिती. लहानपणी खूप खाल्लीत. द्रोणात भरुन मिळायची आजही मिळतात.

अरे वा! मस्तच माहिती आहे. कच्ची करवंदं मीठ किंवा क्वचित तिखट-मीठ लावून, पिकलेली करवंदं नुसतीच आणि कोवळ्या करवंदांचं लोणचं एवढ्या तीनच प्रकारे करवंदं खाल्ली आहेत आत्तापर्यंत.

मला खूप आवडतात करवंदे, लहानपणी एक माणूस विकायला यायचा गात गात 'मैना ओ मैना डोंगराची मैना' असं Proud

मस्त.
खाताना कोंबडा की कोंबडी करून खायचो.लाल असेल तर कोंबडा,पांढरट असतील तर कोंबडी!

बर्‍याच रेसिप्या दिल्यात की! करवंदवडी खाल्ली आहे.चव फक्त साखरेची होती.

पहिला फोटो पण करवंदांचा वाटत नाही.. करवंदाची पाने टोकदार नसतात तर गोल असतात.. फोटोतली फळे ब्लॅक बेरीज आहेत.
दुसरा फोटो जांभळाचा आहे. करवंदांची जाळी असते (झुडुप)

मस्त !
कच्ची करवंदं मीठ किंवा क्वचित तिखट-मीठ लावून, पिकलेली करवंदं नुसतीच आणि कोवळ्या करवंदांचं लोणचं एवढ्या तीनच प्रकारे करवंदं खाल्ली आहेत आत्तापर्यंत>> मी पण ! Happy बाकी सरबत जेली जॅम फक्त दुकानात पाहिलं आहे ..
कच्ची करवंद द्रोणात भरभरून आणायचो आम्ही. मग आई लोणचं करायची तिखट/गोड आंबट मस्त लागतं ते ! सगळे हात ओठ त्याच्या चिकाच्या राबामुळे चिकट व्हायचे ..
करवंद (एकंदरीतच जांभळं , जांभ , आळू ) विकत घ्यायला लागतात हे शहरात गेल्यावर कळलं .. तेव्हा आश्चर्य वाटायचं कि करवंद काय विकत घ्यायची !!

मधला एक फोटो जांभळाचा टाकलाय ना ?

रश्मी, वावे, किल्ली,देवकी- प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

DJ. -फोटो जांभळाचा आहे...
anjali_kool-मधला एक फोटो जांभळाचा टाकलाय ना ?.....
दुसरा फोटो चुकुन अपलोड झाला होता, चेन्ज केला, "पहिला बरोबर होता वेगळी जात आहे अन थोड डेकोरेटीव होता म्हणुन वाटल असेल".
लवकरच जांभळाची माहिती टाकण्याची ईच्छा आहे. अर्थातच वेळ मिळेल तेव्हा.

विनिता.झक्कास- फोटो झक्कास आहे.

छान माहिती. लहानपणी गावी गेल्यावर नदीवर जाता-येता रस्त्याच्या कडेने असलेल्या करवंदाच्या जाळीवरील करवंदे तोडून कोंबडा का कोंबडी करून खात खात जायचे दिवस आठवले.

मस्त लेख. सगळेच फोटो चटकदार !
'मैना ओ मैना डोंगराची मैना'>>>
काळी मैना, काळी मैना
मैना आली मैना, डोंगरची मैना
ही आरोळी देताना यातली सगळी अक्षरं/शब्द वरच्या 'सा' मधे, फक्त ओळीतला शेवटच्या 'मैना" शब्दातला 'ना' हा खालच्या 'सा' मधे ! Wink

@देवकी , नरेश माने खाताना कोंबडा की कोंबडी करून खायचो.लाल असेल तर कोंबडा,पांढरट असतील तर कोंबडी!>> अगदी सेम आम्ही पण ! आणि करवंदाच्या पानाची पुंगळी करून त्याची पिपाणी वाजवायचो

यम्मी लेख
:तोंडातून लाळ गळणारी बाहुली:

मस्त! करवंद फार आवडतात. माय्बोलीवरच कोणीतरी (ट्रेकिंग च्या वेळी एका ठिकाणी मिळालेली ) करवंदांची रसभाजी (? बहुतेक) अशी एक रेसिपी टाकली होती.

करवंदांची खरी मजा पाऊस पडण्याच्या आधीच. जर पाऊस पडला तर पिकलेली करवंदे लगेच कीडु लागतात खराब होतात. चवित फरक पडतो.

anjali_kool, किट्टु२१- प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मनीमोहोर- मस्त फोटो आहे.

आहाहा मस्त मस्त. फोटोही अप्रतिम.

जाळीवरची हिरवी करवंद खात खात कोकणात चालतांना खूप मजा येते. करवंदाच्या बियापण मला खूप आवडतात. एकदम कच्ची आणि एकदम पिकलेली गोड करवंद खायला आवडतात.

पिकलेली करवंद खायच्या आधी कोंबडा का कोंबडी असं करत खायची, ती बालपणातली गंमत. तीच सवय अजून आहे.

कच्च्या करवंदाची चटणी करताना मी तिखट, मीठ, गुळ आणि थोडं आलं घालते. मस्त होते. आलं न घालता पण मस्त होते फक्त तिखट, मीठ, गुळाची. बियांसकट करते मी.

हेमाताई फोटो मस्त.