मोबाईल १६६शब्द कथा

Submitted by बोकलत on 17 April, 2019 - 03:00

सकाळची वेळ होती.सगळेच प्रवासी आतुरतेने गाडीची वाट पाहत उभे होते.गाडी स्टँडला लागली आणि प्रवाशांची आत चढण्यासाठी एकच झुंबड उडाली. मी पण कसाबसा आत चढलो आणि विंडो सीट पटकावली. माझ्या समोरच्या सीटवरील मुलगी अचानक उभी राहिली आणि कावरी बावरी होऊन इकडे तिकडे पहायला लागली. मला वाटलं पर्स वैगरे पडली असेल कुठे, पण नंतर समजलं मोबाईल हरवला. मोबाईल हरवला हे ऐकताच माझा हात नकळत पॅन्टच्या खिशावर गेला. मोबाईलचा स्पर्श जाणवताच मला हायसं वाटलं. मुलगी अर्थातच गोंधळून गेली होती. याच्या त्याच्या मोबाईलवरून कॉल केला पण स्विच्ड ऑफ दाखवत होता. आजू बाजूला चोरासारख्या दिसणाऱ्या दोन चार लोकांवर मी तुच्छतेचा कटाक्ष टाकला. मी त्या मुलीच्या जागी असतो तर नक्कीच त्यांची झडती घेतली असती. माझं मन नकळत या पीढीची आणि आमच्या पीढीची तुलना करत बसलं. याच तंद्रीत मला कधी झोप लागली कळलंच नाही. कंडक्टरने माझ्या स्टॉपचं नाव घेतल्यावर मी खडबडून जागा झालो आणि घाई घाईत बसमधून उतरलो. माझी पावलं आपसूकच समोरच्या मोबाईल दुकानाकडे वळली. सिम कार्ड काढून हार्ड रिसेट केलेला मोबाईल दुकानदारासमोर ठेवत विचारलं "भैया बेचना है, कितने मे लोगे"

Group content visibility: 
Use group defaults

माझा transparent buttons वाला काळा नोकिया असाच गेला होता
आई किती रागावली मला

Pages