Odd Man Out (भाग २५)

Submitted by nimita on 16 April, 2019 - 08:26

"मेमसाब, घर आ गया।" ड्रायव्हर च्या या वाक्यानी नम्रता तंद्रीतून भानावर आली. तिनी आवाजाच्या दिशेनी बघितलं- जीपचा ड्रायव्हर दार उघडून अदबीनी उभा होता. तिनी समोर बघितलं तर खरंच गाडी तिच्या घरासमोर येऊन थांबली होती. विचारांच्या नादात तिला कळलंच नव्हतं.लगबगीनी गाडीतून उतरून ड्रायव्हरच्या हातात एक फाईल देत ती म्हणाली," भैय्या, ये फॅमिली वेल्फेअर की फाईल adjutant साहबको दिजिये। मैं बाद में उनसे बात कर लूंगी।"

ड्रायव्हरला "थँक यू भैय्या।" म्हणत ती कुलूप उघडून घरात शिरली. सकाळी जायच्या आधी शिजवलेल्या पुरणाचा वास घरभर दरवळत होता. नम्रताच्या मनात आलं-' या वासामुळे तर संग्राम घरात शिरल्या शिरल्या त्याला कळेल की आज पुरणपोळीचा बेत आहे...मग काय मजा सरप्राईज ची!' तिनी भराभर सगळ्या खिडक्या उघडल्या, फॅन्स चालू केले, स्वैपाकघरातला exhaust fan सुरू केला. 'काहीही करून हा वास जायला हवा,' ती स्वतःलाच म्हणाली.

नम्रतानी घड्याळात पाहिलं. साडे बारा वाजून गेले होते.संग्राम घरी यायला अजून साधारण दीड एक तास तरी नक्कीच होता. आणि तेवढा वेळ पुरेसा होता; नम्रताला हायसं झालं. ती स्वैपाकघरात शिरणार इतक्यात आर्मी एक्सचेंज च्या फोनची रिंग वाजायला लागली.." ऑफिस मधून फोन? Adjutant चा तर नाही? त्यांना वेल्फेअर ची फाईल मिळाली की काय इतक्यात......यांना पण आत्ता घाईच्या वेळेतच सुचलं का फोन करायला ?' घाईत घाई आणि विंचू चावला गं बाई' अशी गत झालीये तुझी नम्रता...."स्वतःशीच बोलत नम्रता फोनपाशी पोचली.

"हॅलो.." पलीकडून संग्रामचा आवाज ऐकून ती गोंधळली.. 'फोनमधून समोरच्या व्यक्तीपर्यंत इथला वास पोचत नाही ते एक बरं आहे बाई !! नाही तर माझी सरप्राईजची सगळी मेहनत वाया गेली असती...' एकीकडे आपल्याच विचारांवर हसत नम्रता म्हणाली , "हं बोल , काय झालं ? आत्ता कसा काय फोन केलास?" तिचं हे वाक्य ऐकून संग्राम म्हणाला," वा! काय बायको मिळालीये मला ! माझ्या इतर मित्रांच्या बायका - फोन का नाही केला- म्हणून रुसून बसतात आणि मी इतक्या आठवणीनी फोन केला तर तू विचारतीयेस की फोन का केला! हाय रे मेरी किस्मत।" इतर वेळी संग्रामच्या या मेलोड्रामा मधे नम्रता पण सहभागी झाली असती, पण आज तिच्याकडे वेळ नव्हता..स्वैपाकघरातलं पुरणयंत्र तिला खुणावत होतं. पण संग्रामला संशय येऊ नये म्हणून ती म्हणाली,"अरे, तसं नाही रे, पण एरवी कधीच तू तुझ्या 'इतर मित्रांसारखा' मला ऑफिसमधून फोन करत नाहीस ना..म्हणून जरा आश्चर्य वाटलं मला. ते सगळं जाऊ दे..फोन का केलायस ते सांग.. एखादी फाईल विसरलायस का घरी?"

"पोचला बरं का तुमचा टोमणा योग्य जागी..," तिला मधेच थांबवत संग्राम म्हणाला," फाईल वगैरे नकोय..मला आज घरी यायला थोडा उशीर होईल..हेच सांगायला फोन केला होता." त्याचं शेवटचं वाक्य ऐकून नम्रताला कधी नव्हे तो आनंद झाला होता. पण तो आनंद आपल्या आवाजात न दाखवता ती म्हणाली ," ठीक आहे.पण शक्यतो लवकर यायचा प्रयत्न कर."

"चला, आज देवही अगदी माझ्या बाजूनी आहे..अब तो सरप्राईज होगा और वो भी पूरी स्टाईल के साथ।" मनोमन खुश होत नम्रता म्हणाली. "या मिळालेल्या एक्स्ट्रा टाईम चा सदुपयोग करून घेते.." असं म्हणत तिनी फ्रिजमधून लोण्याचं भांडं काढलं. संग्रामला पुरणपोळी बरोबर अगदी ताजं ताजं कढवलेलं तूप आवडतं हे नम्रताला माहित होतं. अर्थातच त्यानी स्वतः कधीच तसं बोलून नव्हतं दाखवलं, पण इतक्या वर्षांच्या सहवासानंतर आता त्याच्या सगळ्या आवडी निवडी तिला तोंडपाठ होत्या. एकीकडे स्वैपाक करता करता नम्रता संग्रामचाच विचार करत होती. राहून राहून तिला मागच्या दोन दिवसातलं त्याचं वागणं, बोलणं आठवत होतं. 'युनिटच्या मूव्ह बद्दल कळल्यापासून बहुतेक तोही थोडा इमोशनल झाला असावा,' तिच्या मनात आलं. कारण तिला जो संग्राम माहित होता तो बराच अबोल, आपल्या भावना आपल्याच मनात ठेवणारा होता. त्या पार्श्वभूमीवर आत्ताचं संग्रामचं वागणं, तिच्याबद्दल असलेल्या भावना जाहीर करायची त्याची पद्धत, त्याची ती चेष्टा मस्करी,त्याचं रोमँटिक होणं...हे सगळं सगळं नम्रतासाठी लाखमोलाचं होतं.. त्याच्यात झालेला हा बदल तिला मनापासून भावला होता. संग्रामचं हे बदललेलं रूप तिला अगदी हवंहवंसं वाटत होतं. त्याक्षणी तिनी युनिटच्या या मूव्ह बद्दल देवाचे आभार मानले...या कारणामुळे का होईना पण संग्रामच्या स्वभावाचा हा पैलू तिला अनुभवायला मिळत होता. This was a blessing in disguise for her.

एकीकडे संग्रामबद्दल विचार करत करत नम्रतानी स्वैपाकघरातली सगळी कामं उरकली. पुरण वाटून तयार होतं. संग्रामला आवडते म्हणून तिनी मुद्दाम त्यात जायफळाची पूड घातली होती. कणिक भिजवून, तिंबून तिनी ती तेलात बुडवून ठेवली. तिची आई नेहेमी असंच करायची. "कणिक तेलात भिजत राहिली की पोळ्या अगदी मऊसूत होतात," हे आईचं वाक्य नम्रताला नेहेमी आठवायचं. तोपर्यंत लोणी कढवून त्याचं तूपही तयार होतं. 'संग्रामला आवडतं तसंच..अगदी पहिल्या धारेचं...' नम्रताला अचानक तिच्या नणंदेची आठवण झाली....'पहिल्या धारेचं तूप ' हा वाक्प्रचार तिनीच शोधून काढला होता. ती नेहेमी गमतीनी संग्रामला चिडवत म्हणायची -" काही लोक कसे फक्त 'पहिल्या धारेचीच ' घेतात तसंच आहे तुझं पण...तूप खाईन तर पहिल्या धारेचंच!" तिच्या या चिडवण्याला संग्राम फक्त हसून उडवून लावायचा.आत्ता ते सगळं आठवून नम्रतालाही हसू आलं.तिनी पुन्हा एकदा स्वैपाकघरात चौफेर नजर फिरवली. बाकी स्वैपाक तर तिनी मीटिंग ला जायच्या आधीच करून ठेवला होता. त्यामुळे आता संग्राम आला की गरमगरम पुरणपोळी करून त्याच्या पानात वाढायची बाकी होती. स्वैपाकघरातला बाकी सगळा पसारा आवरून नम्रता बाहेर आली. नुकत्याच कढवलेल्या तुपाचा घमघमाट सगळीकडे पसरला होता. तिनी फॅन्सचा स्पीड वाढवला.

संग्रामला यायला अजून अवकाश होता. तोपर्यंत तिच्या लिस्ट मधल्या कामांप्रमाणे त्याचे स्वेटर्स, रजई वगैरे काढून ठेवावे असा विचार करून ती स्टोअररुम मधे गेली.तिथल्या कपाटात ठेवलेली बॉक्सेस ची लिस्ट असलेली डायरी घेऊन ती तिथल्याच एका बॉक्सवर विसावली. ती डायरी म्हणजे नम्रतासाठी खूप महत्वाचा दस्तावेज होती..अगदी एखाद्याच्या प्रॉपर्टी च्या पेपर्स सारखी.. किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्वाची म्हणा ना ! त्या छोट्याश्या डायरी मधे तिचा सगळा संसार सामावला होता.त्यांच्या प्रत्येक बॉक्समधल्या सामानाची तपशीलवार यादी होती त्या डायरीत. आता इतक्या वेळा स्वतःच्या हातांनी सगळं सामान त्या बॉक्सेस मधे पॅक आणि अनपॅक केल्यामुळे तिला बरंच काही तोंडपाठ झालं होतं...म्हणजे एक नंबरच्या बॉक्स मधे working किचन, दोन नंबरमधे मुलींची खेळणी आणि गोष्टींची पुस्तकं , तीन नंबरच्या बॉक्स मधे सगळी क्रॉकरी ... वगैरे वगैरे. पण त्या सगळ्या बॉक्सेस मधली तिच्या जीवाभावाची अशी एक बॉक्स होती..'बॉक्स नंबर एकवीस'....ती बॉक्स आणि तिच्यातलं सामान म्हणजे नम्रताची लाईफलाईन च होती जणू! आणि म्हणूनच तिनी त्या बॉक्सचा नंबर एकवीस ठरवला होता..नम्रताचा लकी नंबर... त्या साध्यासुध्या दिसणाऱ्या लाकडी बॉक्समधे संग्रामनी आत्तापर्यंत नम्रताला लिहिलेली सगळी पत्रं, त्यानी पाठवलेली कार्ड्स, त्यांचे सगळ्यांचे फोटो अल्बम्स तिनी अगदी जपून ठेवले होते. त्याशिवाय मुलींनी तिच्या आणि संग्रामच्या वाढदिवसानिमित्त बनवलेली ग्रीटिंग कार्ड्स, त्यांची दोघींची शाळेची रिपोर्ट कार्ड्स, दोघीनी त्यांना बांधलेले फ्रेंडशिप बँड्स ....अशा एक ना अनेक कितीतरी आठवणी जपल्या होत्या तिनी त्या बॉक्स मधे. संग्रामला सोडून एकटं राहताना ती बॉक्सच नम्रताची संगिनी असायची. कधीकधी जेव्हा संग्रामची आठवण अनावर व्हायची तेव्हा तास न् तास नम्रता त्या बॉक्स मधल्या त्याच्या आठवणींत रमून जायची. त्याची पत्रं पुन्हा पुन्हा वाचताना तिला त्याचा आवाज ऐकू यायचा.त्याचे फोटो बघताना, त्यांच्यावरून हात फिरवताना ती संग्रामचा स्पर्श अनुभवायची. त्या कातर वेळी तिची ती बॉक्सच नम्रताची मैत्रीण बनायची, तिला पुन्हा नवी उमेद द्यायची.

आत्तादेखील तिच्याही नकळत नम्रतानी ती एकवीस नंबरची बॉक्स उघडली. आतल्या वस्तूंवर एक नजर टाकली आणि आपल्या त्या मैत्रिणीला म्हणाली," तयार रहा बरं का गं! आता थोड्याच दिवसांत तुझी गरज भासणार आहे मला..."

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast

निमिता,
मला एक कबुली द्यायची आहे तुझ्याकडे
पुर्वी मला वाटायचं की तुझ्या या लेखांमद्धे काहीच घडत नाहिये...सगळं रोजची डायरी लिहिल्या सारखं लेखन..."खुपच बोअर आहे हे" असं पण मी म्हणुन टाकलं होतं मनातल्या मनात.म्हणजे नवीन भाग आला की आवर्जुन उघडायचे मी पण नुसतीच नजर फिरवुन संपवुन टाकायचे.आणि नाही आवडत तर कशाला प्रतिसाद द्यायचा म्हणून कधी काही लिहिलं पण नाही तुझ्या लेखावर. या बद्दल मनापासुन सॉरी. I really mean it.

पण गेले काही दिवस मला तुझे हे लेखन वाचायला मज्जा येते आहे.
खुप निर्मळ लिखाण, काही हेवे दावे नाहीत, काही सनसनाटी ट्विस्ट न टर्नस नाहीत पण तरी काहीतरी गोड आहे यात. मला आवडायला लागलय हे लिखाण. रोज लिहिती राहा Happy

Pratekk lekhala partisad nasel hi pan fakta tumchya ya likhanachi mi khup chahati aahe, mabover roz check karte ki phudcha bhag ala ki nahi to. khup sunder lihita khup sunder

स्मिता श्रीपाद, तुमच्या या प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. आधी जे तुम्हाला आवडत नव्हतं तेच माझं लिखाण तुम्ही आता आवडीने वाचता ही मला आत्तापर्यंत मिळालेली सर्वात मोठी पोचपावती आहे.. माझ्या ब्लॉग ची लिंक देते आहे. तिथे तुम्हाला माझं आत्तापर्यंतचं सगळं लिखाण सापडेल. वाचून प्रतिक्रिया कळवा नक्की. वाट बघते आहे. https://priyadivekarjoshi.wordpress.com/

> या लेखांमद्धे काहीच घडत नाहिये...सगळं रोजची डायरी लिहिल्या सारखं लेखन..."खुपच बोअर आहे हे" > +१. मी सुरवातीचे एकदोन भाग वाचले त्यानंतर आलेले लेख ओझरतेदेखील वाचत नाही फक्त प्रतिसाद वाचते.

खुप निर्मळ लिखाण, काही हेवे दावे नाहीत, काही सनसनाटी ट्विस्ट न टर्नस नाहीत पण तरी काहीतरी गोड आहे यात.>>>
खरंच खूप छान लिहीत आहात

अँमी, मला तुमचा हा स्पष्टवक्तेपणा खूप आवडतो.. आवडलं तर भरभरून कौतुक आणि नाही आवडलं तर तेही अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं. अशी माणसं मला नेहेमीच पटतात. अगदी पारदर्शक असतात. तुम्हाला माझी ही कथा आवडली नाही हे कळलं. पण एक गोष्ट लक्षात नाही आली.. जर तुम्ही माझे लेख ओझरते देखील वाचत नाही तर मग त्यावर आलेल्या प्रतिक्रिया का बरं वाचाव्याशा वाटतात ?

कडू गोड आठवणी असतील किंवा वर्तमान काळात घडत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, नवरा सीमेवर जात असताना त्याच्या पत्नी ची धडपड, अगदी हळुवार पणे सांगत आहात. छान वाटतं तेही वाचायला.
रहस्यकथा किंवा भूतकथा प्रमाणे पूढे काय होणार याची धडधड वाटत नाही.

> या लेखांमद्धे काहीच घडत नाहिये...सगळं रोजची डायरी लिहिल्या सारखं लेखन..."खुपच बोअर आहे हे" > +१. मी सुरवातीचे एकदोन भाग वाचले त्यानंतर आलेले लेख ओझरतेदेखील वाचत नाही फक्त प्रतिसाद वाचते.>>>>>>>> मी हे लिहिता लिहिता थांबले कितीवेळा Happy
मी सुद्धा वाचायचे सोडलेत हे लेख. कथा तिथेच घुटमळते असं वाटतं.

>>>>>> लेखांमद्धे काहीच घडत नाहिये...सगळं रोजची डायरी >>>>
मला वाटतं की ह्या लिखाणाचा हाच हेतू आहे... केवळ सैनिकच नव्हे तर सैनिकपत्नी सुद्धा सर्वसामान्यांपेक्षा वेगळं आयुष्य जगते. त्या आयुष्याची ही ओळख आहे... सैनिकी आयुष्य अंगवळणी पडल्यावर या सैनिकपत्नींना सैन्याबाहेरील आयुष्य थोडं परकं वाटत असावं म्हणून "odd man out" हे शीर्षक. खूप घडामोडी असणारं - रहस्यमय लिखाण लेखिकेला अपेक्षित नसणार असा माझा कयास आहे

माझ्यामते, सैन्यगाथा हा लेखिकेचा व्यक्तिगत प्रवास आहे आणि odd man out ही तिच्या या प्रवासात भेटलेल्या अनेकींची कथा आहे

स्नेहमयी, तुम्ही अगदी माझ्या मनातलं लिहिलं आहेत. माझ्या दोन्ही लेखमालिका या वास्तविक जगातल्या घडामोडींवर आधारित आहेत. जर मनात आणलं तर मीही यात imaginary प्रसंग घालून सस्पेन्स, drama, twists आणि turns ऍड करू शकते... पण मला इथे tv सिरीयल नाही लिहायचं. आपलं लेखन जास्तीत जास्त लोकांच्या पसंतीला उतरावं असं इतरांप्रमाणेच मलाही वाटतं, पण त्यासाठी मी माझ्या मनाविरुद्ध मला पटत नसलेलं लिखाण नाही करू शकत.. I don't want to compromise on the qualitty of the content. तुम्ही म्हणालात तशी ही लेख मालिका माझ्या आणि माझ्यासारख्याच इतर अनेक सॅनिकपत्नींच्या अनुभवांना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आहे.
त्यामागचा हा हेतू ज्यांना समजला त्यांना माझं लिखाण समजेल, हे नक्की! माझं लिखाण तुमच्यापर्यंत पोचलं हे वाचून बरं वाटलं. तुम्हांला मनापासून धन्यवाद Happy

nimita,

धन्यवाद Happy आणि
तुम्ही तुमच्या लेखावरील ऋण प्रतिसादाना कधीच विरोध करत नाही, त्यांच्यामुळे स्वतःचे लेखन, शैली बदलत नाही, आपल्याला हवे ते लिहित राहता हे फार आवडते. तुमच्या या स्वतःशी प्रामाणिक राहण्याबद्दल आदर आहे _/\_

मी हे लेख वाचत नाही पण प्रतिसाद वाचते कारण कथा आणि ललित विभागातले सगळेच लेख ओपन करून, ट्रॅकर मधे काहीही निळे, लिंक असलेले न ठेवायचा प्रयत्न मी करत असते. ओसीडीग्रस्तपणा असेल :D.

एनिवे लिहित रहा. तुमच्या लेखनाचे चाहते आहेतच.

गेले २ दिवसात सगळे भाग वाचून काढले.
वर कुणीतरी लिहिल्याप्रमाणे कथा तिथेच घुटमळते आहे हे खरे आहे. पण त्यामुळे मला तरी काही फरक नाही पडला, सहज साधे सोपे लेखन आवडलेच अगदी.
आमच्या एका ताईला असेच एकहाती किल्ला लढवताना पाहतोय. ती ही सध्या रक्षक चौकातील मिलिटरी एरियात आहे.

बादवे, एका सी. ओ. च्या अंडर किती जे. सी. ओ. असतात?

MI PAN SAHSA KONALA PRATISAD DET NAHI PAN AAJ RAHAVAL NAHI, CHHAN AAHE KATHA TARAL...MI 2 DIVSAT SAGLE BHAG VACHUN KADHLE AANI BHAG 26 CHYA PRATIKSHET AAHE! MALA GUNTAYLA ZALAY KATHET AANI LIKHAN AAWADLAYHI, TYAHI PEKSHA JAST TU NAKARATMAK PRATISAD VACHUN TUZI SHAILI BADALALI NAHIS HE JAST BHAVALA...ASHICH KAYAM LIHITI RAHA!

शिल्पा,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. 26 वा भाग पण पोस्ट केला आहे. वाचून कसा वाटला ते कळवा.