बाबासाहेब आंबेडकरांचे गौरव गीत

Submitted by Asu on 14 April, 2019 - 00:03

महामानवास विनम्र अभिवादन -

बाबासाहेब आंबेडकरांचे गौरव गीत

गौरवगीत तुझे गाण्या दगडास बोल फुटावा
भारताच्या थोर सुपुत्रा प्रणाम आमुचा घ्यावा ||ध्रु||

भाग्य आमचे जन्म घेतला तू इथे भिमराया
उद्धारण्या समाजबांधवा झिजविलीस काया
वडील रामजी, आई भीमाई, पत्नी रमाबाई
संसार त्याग केलास तू, पतित समाजापायी ||१||

चिखलाच्या दलदलीत फुलले कमळ डौलदार
ज्ञानसुगंध पसरुनि तू केलास जगताचा उद्धार
दीनदुबळ्या पददलितांना दिले जगण्याचे भान
कोटी कोटी प्रणाम तुजला गावू किती गुणगान ||२||

भारतरत्न तू, बोधिसत्व तू, महिलांचा तारणहार
विधीतज्ञ तू, प्रज्ञावंत तू, घटनेचा तू शिल्पकार
ज्ञानपिपासू, प्रकांड पंडित, तू प्रथम न्यायमंत्री
तुझ्या गुणांची, तव कार्याची देऊ किती जंत्री ‌ ||३||

आयुष्यभर मानवतेचा वाहिलास किती भार
दीप लाविला बौद्ध धर्माचा, दूर केला अंधार
दया, क्षमा, शांती, अहिंसक क्रांतीचा तू सरदार
धम्म परिवर्तन करून झाला बुद्धाचा अवतार ||४||

महामानवा स्मरतो तुजला पडतो आम्ही पाया
आधार तुझाच आजही देवा आयुष्य हे जगाया
तुला विसरता जन्म आमचा जाईल बघ वाया
तव कृपेची सदा असू दे, आम्हावर शीतल छाया ||५||

गौरवगाथा तुझी गातो, टेकवितो चरणी माथा
तुझ्यासम कुणी ना दुसरा, तू अनाथांच्या नाथा
उपकार झाले आम्हांवर भारी, तूच आम्हां तारी
माय बाप तूच आमचा, बाबा तूच दुःख निवारी ||६||

अभिमान आम्हां महामानवा, मानवतेचा पुजारी
शिकवण तुझी अंगी बाणावी, फुलावी घरीदारी
पूजा ना तुझी होवो, केवळ स्थापून तुझा पुतळा
माणसाला माणुसकीचा, असू दे मनी कळवळा ||७||

- प्रा. अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

<< पूजा ना तुझी होवो, केवळ स्थापून तुझा पुतळा
माणसाला माणुसकीचा, असू दे मनी कळवळा >>

---- गैरव गीत आवडले, छान.

महामानवाला सलाम. त्यांची बीबीसीने घेतलेली मुलाखत हल्लीच युट्युब वर पाहिली आणि त्यांच्या प्रत्येक वाक्यातील द्रष्टेपणा जाणवला.

दलित समाजातील तरुणांनी घाणेरड्या जातीय राजकारणात आणि भूतकाळातील सामाजिक घटनांचा बदला घेण्याच्या ईर्ष्येत गुंतून पडण्यापेक्षा स्वतःच्या वैयक्तिक आणि मग समाजातील इतरांच्या उन्नतीकडे लक्ष दिले तर ती बाबासाहेबांना उचित श्रद्धांजली असेल असे वाटते.

अगदी खरे आहे. या महामानवाचे पुतळे उभारून निव्वळ व्यक्तीपूजा करण्यापेक्षा त्यांचा आदर्श पुढे ठेवून त्यांची शिकवण आचरणात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- असु

छान!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी मनात नितांत आदर आहे. त्यांची विद्वत्ता, त्यांचे ग्रंथप्रेम, त्यांच्यासारखा धोरणीपणा हे सर्व मला थक्क करणारे वाटते ते देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर हा विचार मनात आल्यावाचून राहवत नाही.

मात्र हिंदू कोड बिलाला एक न्याय आणि मुस्लीमांसाठी शरीयत ही एक खंत आहे. बाबासाहेबांनी असे न्याय का लावले असावेत ? आज हिंदूंमधे नको त्या सुधारणा अवेळीच केल्याने ज्या समस्या उद्भवल्या आहेत त्याबाबत विचार केला गेला होता का ? आधी सुधारणा मग कायदे असे का नाही केले गेले ? मुस्लिमांसाठीच हा विचार का ?

बाबासाहेबांचे पुतळे काढायलाच हवेत. म्हणजे भारतात एकही पुतळा, मूर्ती शिल्लक राहणार नाही. तसेच त्यामुळे जातीयता नष्ट होईल, सलोखा वाढेल, दलितांवरचे अत्याचार बंद होतील, दलितेतरांकडून दलितांच्या गरीबी हटाओचा कार्यक्रम सुरू होईल. भूमिहीनांना जमिनी मिळतील आणि काय वाट्टेल ते होईल.

त्यासाठी सर्वात आधी पुतळ्यांची सवय नसलेल्या या देशातले बाबासाहेबांचे पुतळे काढणे ही काळाची गरज आहे.

कुठलिही अतिशयोक्ती न करता सार्थ शब्द आणि उपमांचा वापर करुन लिहिलेले अप्रतिम गीत.
सुंदर, खरोखर सुंदर.