ग्रंथपेटी

Submitted by एडी on 13 April, 2019 - 10:36

मित्रहो,

पुस्तक प्रेमातून एक कीडा डोक्यात वळवळत आहे, म्हटलं आपल्या माणसात पहिल्यांदा सांगावा न जाणो ही कल्पना कुठपर्यंत जाईल.

सध्या सर्वजण (लहान, थोर, मध्यमवयीन) कुठल्या ना कुठल्या कारणाने हरतऱ्हेच्या स्क्रिन समोर आपला दिवस घालवतात आणि बघत/वाचत रहातात. यामुळे स्क्रिन पलीकडच्या साहित्याला (कंटेंट)अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे. साहित्य मालक आपल्याला पाहिजे ते आपल्या नजरेस आणून डोक्यात भरत रहातो. कधी कधी आपण आपल्या आवडत्या कधी काळी वाचायचं ठरवलेल्या गोष्टी / पुस्तकं सुद्धा वाचत नाही. डोळ्यांचे दुष्परिणाम आहेत ते वेगळेच.

या सगळ्या धबडग्यात खूप मोठा वारसा हरवत चाललेला आहे तो म्हणजे वाचनसंस्कृती. आपल्या पूर्वजांपासून ते अगदी नवलेखकापर्यंत अत्यंत सकस लिखाण पुस्तकरूपात अगदी प्रत्येक घरात पडून आहे. चला त्यावरची धूळ झटकून एक सामाजिक कार्य करूया. ते पण अगदी आवाक्यातल.

अगदी साधी गोष्ट आहे आपण आपल्या घरातली वाचून झालेली पुस्तक एका ब्यागेत/पिशवीत जमा करायची. समजा माझ्या सोसायटीत 20 फ्लॅट आहेत. प्रत्येकी एक पुस्तक जरी जमा झालं तरी 20 पुस्तकांची छोटेखानी लायब्ररी तयार होईल. आता आपण हिला ग्रंथपेटी म्हणू. तुमच्या इतर सोसायटीमधल्या मित्रांना ही कल्पना सांगून आपण अशीच ग्रंथपेटी तयार करायला सांगायची.

समजा आपल्या ग्रंथपेटीतील सगळी पुस्तकं वाचून झाली की ती पेटी मित्राच्या सोसायटीच्या ग्रंथपेटी बरोबर अदलाबदल करायची.

वाचणारी माणसं आणि त्यांचा वाचनवेग यावर बरीच पुस्तकं फुकट वाचून होऊ शकतात.

काही ठळक फायदे समोर आलेत

1) फुकट नवनवीन पुस्तक वाचायला मिळतील
2) स्क्रिन समोरचा वेळ कमी होईल
3) नवीन पिढीला वाचनसंस्कृती ची ओळख होईल
4) जाणकार पिढीचे जुने छंद जोपासले जातील
5) सकस साहित्य वाचल्याने आपोआप व्यक्तिमत्व विकास होईल

ही यादी वाढत राहील यात शंका नाहीच. चला तर मग आपल्याच खेळाचे आपण नियम बनवून सुरू करूया ग्रंथदिंडीचा प्रवास!

टीप : सूचना आणि सल्ल्यांचे स्वागत

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगली कल्पना आहे. असा उपक्रम बहुतेक कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे डोंबिवली येथे चालू आहे. ग्रंथपेटीमधून मोफत हवं ते पुस्तक घेऊन जाऊ शकतो ठराविक मुदतीसाठी