Odd Man Out (भाग १९)

Submitted by nimita on 10 April, 2019 - 08:58

नम्रताच्या डायरी मधली लिस्ट वाढतच चालली होती....अगदी मारुतीच्या शेपटीसारखी....काय काय नव्हतं त्यात !!संग्रामच्या बरोबर पॅक करून देता येतील असे त्याच्या आवडीचे फराळाचे जिन्नस ..... फॅमिली फोटो अल्बम्स, त्याला आवडणाऱ्या जुन्या गाण्यांच्या cd चं कलेक्शन !

त्याला बरोबर घेऊन जायला लागणारे युनिफॉर्म्स आणि इतर कपडे बॉक्सेस मधून काढून नीट धुवून प्रेस करून तयार ठेवायला हवे होते . नम्रताच्या पेनबरोबरच तिचे विचारही धावत होते,'तिथे चांगलीच थंडी असणार - तेव्हा त्यादृष्टीनी पण तयारी हवी...त्याचे वुलन्स , रजई वगैरे लवकरच ड्राय क्लीन करायला द्यायला हवं, म्हणजे वेळेत मिळेल...'

अचानक नम्रताच्या लक्षात आलं की तिची अवस्था आता 'रात्र थोडी आणि सोंगं फार' अशी झाली आहे. पुढच्या साधारण महिन्याभरात संग्राम नव्या जागी जायला निघणार होता. पण म्हणायला जरी एक महिना असला तरी ते दिवस बघता बघता निघून जाणार याची तिला कल्पना होती. पाच वर्षांपूर्वी नेमकं हेच झालं होतं.संग्राम 'जाणार जाणार' म्हणता म्हणता एक दिवस अचानक तो जायची वेळ येऊन ठेपली. आणि तो गेल्यावर मग नंतरचे कितीतरी दिवस नम्रताला रुखरुख लागून राहिली होती...किती काही करायचं ठरवलं होतं तो जायच्या आधी...त्यावेळी पण अशीच एक लिस्ट बनवली होती..पण त्यातल्या बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्या होत्या. यावेळी पुन्हा ती चूक होऊ नये म्हणून नम्रतानी ठरवलं...उद्यापासूनच तयारीला लागायचं, म्हणजे ऐनवेळी धावपळ नाही होणार.

तिची ही विचारांची मॅरेथॉन चालूच होती तेवढयात बाहेर रस्त्यावर गाडीचा हॉर्न वाजला आणि काही क्षणांतच दारापाशी मुलींच्या बडबडण्याचे आवाज आणि त्यापाठोपाठ दारावरची बेल वाजली. "आल्या बाई एकदाच्या साळकाया माळकाया !" दार उघडायला जाता जाता नम्रता म्हणाली. तिनी दार उघडल्याबरोबर तीन वादळं धावत घरात घुसली.. नंदिनी आणि अनुजा बरोबर अंगदही आला होता. इतका वेळ शांत असलेलं तिचं घर मुलांच्या हसण्या खिदळण्यानी आणि चिवचिवाटानी भरून गेलं. मुलांच्या पाठोपाठ मनप्रीत आणि तिचा नवरा - मेजर कुलदीप- पण आत आले. एकीकडे मनप्रीत मुलांना गप्प करायचा प्रयत्न करत होती.." अंगद, चूप हो जाओ। अंकल काम कर रहे होंगे, डिस्टर्ब मत करो।" पण तिचं बोलणं ऐकायला मुलं जागेवर होतीच कुठे? जशी पळत घरात घुसली तशीच सरळ मुलींच्या खोलीत गेली.

"Good evening Mam. सर हैं घरपे?" नम्रताला हसून विश करत मेजर कुलदीप म्हणाले. "Good evening, प्लीज बैठिये ना।मैं बुलाती हूँ उन्हें।"त्यांना दोघांना बसायला सांगून नम्रता स्टडी रूमच्या दिशेनी वळली, तेवढ्यात संग्रामच बाहेर आला.मुलांचा आवाज ऐकला असावा त्यानी. त्याला येताना बघून मेजर कुलदीप उभे राहिले.. सुरुवातीचं 'हाय, हॅलो' झाल्यावर नम्रता म्हणाली,"चलिये, बाहर लॉन में बैठते हैं।" बाहेर अधून मधून छान गार वाऱ्याची झुळुक येत होती. अगदी प्रसन्न वाटत होतं. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर संग्रामनी मनप्रीत ला विचारलं," मॅम, आपने क्या सोचा है? युनिट की मूव्ह के बाद आप और अंगद कहाँ रहेंगे ? घर जाएंगे या...." त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच ती म्हणाली," ना बाबा ना....घर तो नहीं जाएंगे। SFA में ही रहेंगे। वोही बेस्ट ऑप्शन है।"

तिचं बोलणं ऐकून संग्रामनी पटकन नम्रताकडे बघितलं..ती त्याच्याकडेच बघत होती..काही न बोलता ती फक्त हसली ..जणू काही मनप्रीतनी तिच्या विचारांना दुजोराच दिला होता.

थोड्या वेळानी नेहेमीप्रमाणे संग्राम आणि कुलदीपच्या ऑफिसच्या गप्पा सुरु झाल्या; त्यामुळे त्यांना दोघांना तिथेच सोडून नम्रता आणि मनप्रीत कॉफी करायला म्हणून आत गेल्या.ओट्यावरचा डिनर चा टिफिन कॅरियर अजूनही तसाच आहे हे बघून मनप्रीतनी विचारलं," ओह, अभी तक आप लोगोंने खाना नहीं खाया ?" त्यावरून मग दोघींची 'नवरा आणि त्याचं न संपणारं काम' या विषयावर पुन्हा एकदा सखोल चर्चा झाली. बोलता बोलता नम्रतानी मनप्रीतला घरी राहायला न जाण्याचं कारण विचारलं. त्यावर ती म्हणाली," दो साल पहले जब कुलदीप व्हॅली में थे तब मैं घर ही गयी थी। शुरु शुरु में तो सब कुछ ठीक ही था। लेकिन फिर धीरे धीरे......" तिचे अनुभव ऐकताना नम्रताला थोड्याफार फरकानी स्वतःचीच गोष्ट ऐकतोय असं वाटत होतं. 'म्हणजे संग्राम म्हणतो तसे हे फक्त माझ्या मनाचे खेळ नाहीयेत...ही वस्तुस्थिती आहे...माझ्यासारखी अजून बरीच उदाहरणं आहेत 'odd man out' ची ! नम्रता एकीकडे विचार करत होती.

तेवढ्यात अनुजा आईला शोधत शोधत स्वैपाकघरात येऊन पोचली. तिच्या मागोमाग अंगद पण होताच. तिनी नम्रताला विचारलं,"ममा, अंगद आज रात को हमारे घर पे रुक सकता है?"

इतर वेळी जेव्हा ते चौघंच असायचे तेव्हा नम्रता आणि संग्राम मुलींशी शक्यतो मराठीतूनच बोलायचे. आर्मी च्या cosmopolitan वातावरणात राहिल्यामुळे आणि त्यांच्या शाळेत मराठी हा विषय नसल्यामुळे त्या दोघींचा मराठीशी फारसा संबंध यायचा नाही. अशा परिस्थितीत 'मुलींना आपली मातृभाषा यायला हवी'- हाच एकमेव उद्देश होता दोघांचा. पण घराबाहेर मात्र मराठीचा वापर ते कटाक्षानी टाळायचे...खास करून जेव्हा आजूबाजूला अमराठी लोक असायचे तेव्हा !! हा 'योग्य ठिकाणी योग्य भाषेचा वापर' आता मुलींच्याही लक्षात आला होता.

अनुजाचा प्रश्न ऐकून नम्रता काही बोलणार इतक्यात मनप्रीतच म्हणाली," लेकिन कल तो स्कूल है ना ? इसलिये आज़ तो नहीं रुक सकते। फिर कभी ...ठीक है ना ?" तिच्या या युक्तिवादावर मुलांकडे काहीच प्रत्युत्तर नसल्यामुळे दोघंही एवढंसं तोंड करून परत गेले.

थोड्या वेळानंतर - 'सकाळी शाळा आहे आणि त्यासाठी लवकर उठायचंय'- हे कारण सांगून मनप्रीतनी अंगदला मुलींच्या खोलीतून अक्षरशः ओढून बाहेर काढलं आणि ते तिघंही त्यांच्या घरी गेले.

दिवसभराच्या दंगामस्तीमुळे मुली अगदी थकून गेल्या होत्या. "संग्राम, तू प्लीज जरा बघ ना मुली झोपल्या का नाही ते...तोपर्यंत मी जेवण गरम करते," टिफिन कॅरियर उघडत नम्रता म्हणाली. तिची जेवणाची तयारी होईपर्यंत संग्रामही आलाच. "अगं, इतक्या दमल्या होत्या दोघी..दोन मिनिटांत झोपल्या सुद्धा." त्यावर नम्रता काही बोलणार इतक्यात तिच्या ओठांवर आपलं बोट ठेवून तिला गप्प करत तो म्हणाला "त्यामुळे आता आजची ही रात्र फक्त आपल्या दोघांची आहे...And I am going to make it extra special... Just wait and watch " नम्रताला लिव्हिंग रूम मधे सोफ्यावर बसवून संग्राम स्वैपाकघरात गेला. नम्रता काही न बोलता भारावल्यासारखी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. त्या क्षणी तिच्या मनात एकच विचार येत होता..' I am so lucky ..मला संग्रामसारखा नवरा मिळाला...' तिला मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एका गाण्याचे स्वर ऐकू येऊ लागले..

' प्रेमा, काय देऊ तुला ...

भाग्य दिले तू मला ..'

ती किती वेळ तशीच बसून होती तिलाही नाही कळलं. पण जेव्हा संग्रामनी तिच्या हाताला धरून तिला डायनिंग रूममधे नेलं तेव्हा समोरचं दृश्य बघून ती जणूकाही मंत्रमुग्ध झाली..

टेबल वर त्यांच्या दोघांच्या जेवणाची सगळी तयारी तर होतीच, पण त्यांच्या या डिनरला स्पेशल बनवण्यासाठी संग्रामनी त्याच्याकडून पूर्ण प्रयत्न केला होता. डायनिंग रूममधे ठिकठिकाणी कँडल्स तेवत होत्या, टेबलवर मधोमध नम्रताच्या खास आवडीची, jasmine fragrance ची कँडल सगळं वातावरण सुगंधित करत होती. Background मधे रफीच्या सुरांची मैफील सजली होती. "आवडलं का राणीसाहेबांना?" संग्रामच्या या प्रश्नानी ती भानावर आली. तिनी मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. तिला खुश करण्यासाठीची त्याची ही धडपड बघून तिचा ऊर त्याच्यावरच्या प्रेमानी, त्याच्याबद्दल वाटणाऱ्या अभिमानानी भरून आला होता. तिच्या तोंडून शब्द फुटेनात. मानेनीच होकार देत ती त्याला बिलगली. तिला खुर्चीवर बसवत तो म्हणाला," थांब, अजून पण काहीतरी आहे.." आणि पुढच्याच क्षणी तिच्या हातांत एक फुलांचा bouquet होता. त्यांच्याच बागेतली वेगवेगळी फुलं होती त्यात...लिली, गुलाब, डेलिया ... "ही फुलं कधी काढून आणलीस तू?" तिनी डोळे विस्फारत संग्रामला विचारलं. "मगाशी तू कॉफी करायला आत आली होतीस ना तेव्हा !" संग्रामचं उत्तर ऐकून नम्रता अजूनच गोंधळली," अरे, पण तेव्हा मेजर कुलदीप पण होते ना बाहेर...म्हणजे तू त्यांच्या समोरच ..."

"हॅ, काहीतरी काय! तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता तेवढ्यात मी काढून घेतली ही फुलं.. त्याच्या नकळत आणि ते सगळे गेल्यावर तू दार बंद करायला गेलीस ना, तेव्हा आत आणून ठेवली. कसं वाटलं सरप्राईज?"

"खूप छान! Thank you so much. खरंच आजची ही रात्र जन्मभर लक्षात राहील माझ्या! तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंस, thank you Sangram," त्याचे हात हातांत घेऊन त्यांवर आपले ओठ टेकवत नम्रता म्हणाली. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या हातांवरून खाली ओघळले.

तिचे अश्रू पुसून, तिला आपल्या मिठीत घेत तो म्हणाला," ये तो सिर्फ शुरूवात है। आगे आगे देखिये होता है क्या !!" त्याच्या या वाक्याचा रोख कुठे आहे हे न समजण्या इतकीही भोळी नव्हती नम्रता ! एक हलकासा सुस्कारा सोडत ती संग्रामच्या मिठीत विरघळली.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users