तु जिवाला गुंतवावे

Submitted by Sindrella on 9 April, 2019 - 05:12

गालावरच्या खळीने तुज पाहताचं खुलावे
वेणीमधल्या कळीनेही प्रेमगंधाने फुलावे
मनाच्या पाखराने हरपून भान विहरावे
विसरावे मी सार्या जगा असे तु जिवाला गुंतवावे |
सोहळा भलेही असो निराळा
रस्ते आपुले एक व्हावे
हात घेऊनी हातामधे
चांदण्यांखाली चालावे
चालता चालता वाटेवरी जग हे संपुन जावे
विसरावे मी सार्या जगा असे तु जिवाला गुंतवावे |
ह्रुदयाची स्पंदने तुझ्या
ती लय माझ्या श्वासांची
काट्यांची वाट तुझी
मजसाठी मोरपीसांची
एका एका प्रेमपीसाने गीत आपुले लिहावे
विसरावे मी सार्या जगा असे तु जिवाला गुंतवावे |
आयुष्याच्या चित्रामध्ये
मी रंग तुझेच भरावे
तुझ्याविना अस्तित्व माझे
क्षणभर ना उरावे
अखेरच्या झोपेतही माझ्या मी स्वप्न तुझेच पहावे
विसरावे मी सार्या जगा असे तु जिवाला गुंतवावे |

Group content visibility: 
Public - accessible to all site users