बळ पंखांचे

Submitted by दत्तात्रय साळुंके on 8 April, 2019 - 06:41

बळ पंखांचे

मला जर स्वातंत्र्य असते
जन्मा आधी
जात, धर्म, प्रदेश निवडीचे तर...
.
.
.
.
मी दे म्हणालो असतो
पाखराचा जन्म
असीम आकाश असते माझेच
कुठल्याही झाडावर बांधलं असतं घर
कुठल्याही रानात टिपला असता दाणा
कुठल्याही नदी, बारव, ओहळाचं पाणी
कशाला असता साठवणुकीचा सोस
पंखात बळ आल्यावर पिल्लांनी शोधले असते
त्यांचे आकाश,
हिवाळ्यात आलो असतो सैबेरियातून
भरतपूरला किंवा नांदूर मधमेश्वरला
कुठल्याही पारपत्राविना
स्वत:च्या पंखातल्या बळावर...
शिकलो असतो खुल्या आकाशाचा नियम
माणसाच्या वसाहतीचे नियम किती क्लिष्ट
सरत नाहीत आयुष्य सरलं तरी...
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !
माणसाच्या वसाहतीचे नियम किती क्लिष्ट। >>>+ ११

फार सुरेख!

माणसाच्या वसाहतीचे नियम किती क्लिष्ट
सरत नाहीत आयुष्य सरलं तरी...>>>मस्तच!

हिवाळ्यात आलो असतो सैबेरियातून
भरतपूरला किंवा नांदूर मधमेश्वरला
कुठल्याही पारपत्राविना
स्वत:च्या पंखातल्या बळावर...>>खूप छान!
हो ना ! खरंच वाटत असं .. अर्थात त्यांनाही असतात खूप कष्ट .. शेवटी जावे त्याच्या वंशा ...

मी दे म्हणालो असतो
पाखराचा जन्म
असीम आकाश असते माझेच >>मस्त लिहिलय!