Odd Man Out (भाग २३)

Submitted by nimita on 8 April, 2019 - 05:51

पुढचे काही दिवस नम्रतासाठी जणू सप्तरंग लेवूनच आले होते. संग्रामला भेटायच्या नुसत्या कल्पनेनीच ती मोहरून जायची. प्रत्येक वेळी तिला त्याच्या स्वभावातला एक नवा पैलू दिसायचा. एक दिवस संग्राम तिला म्हणाला,"नम्रता, मला वाटतंय की आता आपण आपल्या दोघांच्या घरच्यांना आपल्या या नात्याबद्दल सांगून टाकावं. हे असं रोज थोड्या वेळाकरता भेटणं आणि मग दुसऱ्या दिवसाच्या भेटीची वाट बघत बसणं - मला नाही चैन पडत आता तुझ्याशिवाय! आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे- पुढच्या काही महिन्यांत माझी पोस्टींग होईल आणि मग मला इथून जावं लागेल. त्यामुळे त्याच्या आधीच आपलं लग्न झालं की मग तू पण माझ्याबरोबर नव्या जागी येऊ शकशील."

त्याचं हे बोलणं ऐकून नम्रता त्याला चिडवत म्हणाली," किती अरसिक आहेस रे तू संग्राम!! आपल्या गर्लफ्रेंडला असं प्रपोज करतात का ? छान एखाद्या रोमँटिक जागी, रोमँटिक स्टाईल मधे विचारायचं असतं लग्नाबद्दल!"

आधीचा संग्राम असता तर त्याला नम्रताचं हे बोलणं खरंच वाटलं असतं. पण आता इतक्या दिवसांच्या सहवासामुळे तो नम्रताला ओळखायला लागला होता..तिचा खोडकर स्वभाव, तिचे शाब्दिक खेळ आता त्याला समजायला लागले होते. त्यामुळे तिचा हात धरून तिला हळूच आपल्याकडे ओढत तो म्हणाला,"अजून रोमान्स सुरूच कुठे केलाय मॅडम? एकदा लग्न होऊ दे, मग कळेल तुला - खरा रोमान्स काय असतो ते!" संग्रामचा हा गुगली नम्रतानी अजिबात expect नव्हता केला....आणि तोही असा भर रस्त्यात...सगळ्यांसमोर ....त्याची ही धिटाई बघून आणि त्याहीपेक्षा जास्त त्याचं बोलणं ऐकून नम्रता लाजून चूर झाली. कसाबसा त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेत तिनी आजूबाजूला पाहिलं..'कोणी बघितलं तर नाही ना..' तिचं ते मोहक लाजरं रूप आपल्या डोळ्यात साठवून घेत संग्राम म्हणाला," हाय्, मार डाला ...आता आजच बोलतो माझ्या घरच्यांशी. कधी एकदा लग्न करून तुला बरोबर घेऊन जातोय असं झालंय मला. तू पण बोलशील ना तुझ्या घरी - का मी येऊ रीतसर तुला मागणी घालायला?"

खरं म्हणजे नम्रताची अवस्था पण काही वेगळी नव्हती. तिलाही आता संग्रामपासून लांब राहाणं अवघड जात होतं. तिनी खालमानेनीच त्याला 'हो ' म्हटलं. त्यावर संग्रामनी तिला अजून चिडवत विचारलं," कांदेपोहे करता येतात ना तुला? मग आता लाग तयारीला.. लवकरच येतो माझ्या आई बाबांना घेऊन तुझ्या घरी." त्या दिवसानंतर त्यांचं लग्न होईपर्यंतचे दोन महिने अक्षरशः पंख लावूनच उडून गेले होते. संग्रामच्या अंदाजाप्रमाणे लग्नानंतर काही दिवसांतच त्याची पोस्टींग आली आणि त्या दोघांनी पुण्याला रामराम ठोकून नव्या गावी आपल्या नव्या संसाराची सुरुवात केली. संग्रामची पत्नी म्हणवून घेताना नम्रताचा ऊर अभिमानानी भरून यायचा. संग्राम फारसं बोलून नाही दाखवायचा पण नम्रताशिवाय त्याचं पानही नाही हलायचं.त्याच्यासाठी नम्रता म्हणजे त्याची 'friend, philosopher आणि guide होती. बघता बघता बारा वर्षं झाली होती त्यांच्या लग्नाला.नंदिनी आणि अनुजानी तर त्यांच्या प्रेमाच्या नात्याला पूर्णत्वाच्या शिखरावर नेऊन ठेवलं होतं.

संग्रामला पहिल्यांदा बघितल्यापासून ते आजपर्यंतचा गेल्या बारा वर्षांचा काळ नम्रताच्या डोळ्यांसमोरून सरकत गेला..शरीरानी जरी ती आत्ता त्यांच्या बेडरूममधे संग्रामशेजारी बसली असली तरी तिचं मन मात्र त्यांच्या सहजीवनाचा प्रवास करून आलं होतं. त्या पहाटेच्या शांत वेळी शेजारी झोपलेल्या संग्रामकडे बघत असताना गतस्मृतींना उजाळा देत ती किती वेळ तशीच बसून होती, तिचं तिलाही नाही कळलं.

"अशी जर एकटक माझ्याकडे बघत बसलीस तर दृष्ट लागेल हं मला..." संग्रामच्या या मिस्किल वाक्यानी नम्रता तिच्या समधीतून बाहेर आली. तिनी चमकून शेजारी बघितलं- संग्राम तिच्याकडेच बघत होता. आपली चोरी पकडली गेलीये हे तिच्या लक्षात आलं, कॉटवरून खाली उतरत ती म्हणाली," ए, आपल्या माणसांची कधी दृष्ट नाही लागत काही ! आणि माझा नवरा आहे- मी त्याला बघीन नाहीतर अजून काही करीन- तुला काय प्रॉब्लेम आहे ?" तिचा हात धरून तिला आपल्याकडे ओढत संग्राम म्हणाला," तू केव्हापासून नुसतीच बघतीयेस - करत काहीच नाहीयेस- हाच तर प्रॉब्लेम आहे !" त्याच्या बोलण्यामागचा अर्थ त्याच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता नम्रताला.पण त्याला दूर ढकलत ती म्हणाली," आयडिया खूप tempting आहे..पण timing थोडं चुकतंय तुझं!! तुला P.T. साठी जायचंय आणि मला स्वैपाकघरात...त्यामुळे आता उठा आणि वास्तवात या!" त्यावर 'हाय्, ये बेदर्द ज़माना .." असं काहीतरी म्हणत संग्राम उठला आणि नम्रताही हसत हसत स्वैपाकघरात गेली.

तिच्या त्या दिवसाच्या कामांच्या लिस्ट मधे दोन महत्वाची कामं होती- सकाळी AWWA ची मीटिंग होती आणि आज तिनी संग्रामसाठी पुरणपोळ्या करायचं ठरवलं होतं. मनात सगळ्या कामांची प्लॅंनिंग करत ती मुलींना उठवायला गेली. मुलींसाठी ब्रेकफास्ट, त्यांचे दोघींचे डबे आणि त्यात भर म्हणून AWWA ची मीटिंग आणि पुरणपोळीचा घाट...नम्रताची थोडी धावपळच होणार होती आज. एरवी दर रविवारी ती पुढच्या आठवड्याच्या स्वैपाकाच्या हिशोबानी बरीचशी पूर्वतयारी करून ठेवायची...भाज्या कापून ठेवणं, उसळींकरता कडधान्यं भिजवून त्यांना मोड आणून तयार ठेवणं, इडली दोस्यासाठी बॅटर बनवून ठेवणं, मुलींकरता केक्स, स्नॅक्स बनवून ठेवणं वगैरे वगैरे...पण मागच्या दोन दिवसांत झालेल्या घडामोडींमुळे तिची सगळी प्लॅंनिंग गडबडली होती. काही वेळानी दोघी मुली ब्रेकफास्ट करून त्यांचे डबे घेऊन शाळेत गेल्या आणि नम्रताला थोडी उसंत मिळाली. "चला, दिवसाच्या नाटकातला पहिला अंक संपला," दोन मिनिटांसाठी सोफ्यावर बसत नम्रता म्हणाली.तेवढ्यात संग्राम P.T. हून परत आला. "उठा मॅडम, आता नवरोबा चा नंबर,"असं म्हणत ती स्वैपाकघरात शिरली.

'जोपर्यंत संग्राम ऑफिसला जात नाही तोपर्यंत पुरणपोळीची तयारी कशी करणार? त्याला सरप्राईज द्यायचंय ना!'एकीकडे बाकी कामं हातावेगळी करता करता तिच्या डोक्यात विचारचक्र चालू होती..
'छे! हे असं लपून छपून कामं करणं किती अवघड असतं ! पण नवऱ्याच्या चेहेऱ्यावर अचानक फुलणारा आनंद बघायचा असेल तर हे सगळे द्राविडी प्राणायाम करावेच लागतील नम्रताताई तुम्हाला..' नम्रतानी स्वतःलाच समजावलं. कधी एकदा संग्राम ऑफिसला जातो असं झालं होतं तिला.कधी नव्हे ती आज पहिल्यांदा ती संग्रामच्या घरातून बाहेर पडण्याची वाट बघत होती.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

का हो लगेच वास्तवात आणलं नम्रताला... थोडी अजून फुलवता आली असती.... पण आवडली कदाचीत पुढेमागे अजून येइल.
बाकी तुम्ही लिहिता खूप छान...

खूप छान लिहिताय तुम्ही...
एक भाग एकदाच वाचून मन भरत नाही ..
एक भाग मी दोन दोनदा तरी वाचते ... सहज उलगडत जाणारी कथा वाचताना खूप मस्त वाटतं...
पुढे भाग लवकर लवकर पोस्ट करत जा ...

खूप छान लिहिताय तुम्ही...
एक भाग एकदाच वाचून मन भरत नाही ..
एक भाग मी दोन दोनदा तरी वाचते ... सहज उलगडत जाणारी कथा वाचताना खूप मस्त वाटतं...
पुढे भाग लवकर लवकर पोस्ट करत जा ...