माझी सैन्यगाथा (भाग २)

Submitted by nimita on 4 April, 2019 - 21:10

आम्ही दिब्रूगढ पर्यंत विमानानी गेलो पण तिथून पुढे मात्र आम्हाला by road च जायला लागणार होतं. दिब्रूगढ एअरपोर्ट वर आमच्यासाठी आर्मी ची जीप आली होती. त्या वेळी पहिल्यांदा त्या जीप मध्ये बसताना मला जो आनंद, जे समाधान वाटत होतं, ते शब्दातीत आहे!

एकदम मला माझ्या भावा बरोबर चा माझा संवाद आठवला. क्षणभर वाटलं, आत्ता जर तो इथे असता तर या जीप ची शान बघून त्यालाही आनंद झाला असता. मी आणि नितीन गाडीत बसल्या नंतर ड्राइवर नी नितीन ला एक कडक salute केला आणि त्याची परवानगी घेऊन मग तो गाडीत येऊन बसला आणि त्यानी गाडी स्टार्ट केली. माझ्या साठी हा अनुभव नवीन च होता. पण ‘माझ्या नवऱ्याला लोक असा सॅल्युट करतात’ या नुसत्या विचारानेच माझा ऊर अभिमानानी भरून आला! मी मनातल्या मनात म्हणाले,” मॅडम, आता या सगळ्याची सवय करून घ्या.” पण खरं सांगू का… इतकी वर्षं झाली तरी अजून ही जेव्हा जेव्हा कोणी नितीन ला सॅल्युट करतात ना तेव्हा प्रत्येक वेळी मला त्याचा अभिमान वाटतो… अगदी पहिल्यांदा वाटला होता ना तस्साच !

असो, आता परत भूतकाळात जाऊया.. दिब्रूगढ हुन आम्ही ‘रुपाई’ नावाच्या जागी जायला निघालो तो प्रवास साधारण दोन तासांचा होता ..पण मला मात्र तो रस्ता संपूच नये असं वाटत होतं…रस्त्याच्या दुतर्फा डवरलेली उंच उंच झाडं एका सरळ रेषेत उभी पाहून जणू काही आम्हाला सलामी देत होती! आणि जरा त्यांच्या पल्याड पाहिलं तर दूर दूर पर्यंत हिरवेगार चहाचे मळे , आणि त्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या तिथल्या स्थानिक स्त्रिया ..मला तर कळत च नव्हतं की डाव्या बाजूचा view जास्त चांगला आहे का उजव्या बाजूचा ! पण आलटून पालटून दोन्हीकडे बघताना माझी मान मात्र अवघडली. मी नितीन ला म्हणाले,” किती छान आहे ना.. हिरव्या रंगाचा इतक्या छटा एकत्र बघायला मिळतायत!” तो फक्त हसला आणि म्हणाला,” हे तर काहीच नाहीये, लोहितपुर ला पोचल्यावर मग बघ.” त्याच्या त्या वाक्यानी माझी लोहितपुर बद्दल ची उत्सुकता अजूनच वाढली .

थोड्याच वेळात आम्ही रुपाई ला पोचलो. तिथे आर्मी चा transit camp होता. त्या रात्री रुपाई मध्ये राहून मग दुसऱ्या दिवशी आम्हाला लोहितपुर साठी कूच करायचे होते. दुपारी थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी आम्ही जवळच्या डुमडूमा नावाच्या एका छोट्याश्या गावातल्या मार्केट मधे गेलो- गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करायला! खरं म्हणजे बऱ्याचश्या वस्तू आम्ही आधीच खरेदी केल्या होत्या, पण विमान प्रवासात सामानावर वजनाचं बंधन असल्यामुळे काही वस्तू नव्हता आणल्या बरोबर. आणि त्या यादीत सगळ्यात वर नाव होतं… वातीचा स्टोव्ह…. हो, कारण इतकी वर्षं नितीन bachelor accomodation मध्ये राहात असल्यामुळे त्याच्याकडे कूकिंग गॅस चं कनेचशन नव्हतं. त्यामुळे आम्हांला नवीन कनेक्शन मिळेपर्यंत मला स्टोव्ह वरच स्वैपाक करावा लागणार होता.

आम्ही डुमडुमा ला पोचेपर्यंत बऱ्यापैकी अंधार झाला होता. ड्रायव्हरनी एके ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि म्हणाला,” मार्केट आ गया साब।” खाली उतरून मी आजूबाजूला पाहिलं- रस्त्याच्या दुतर्फा दुकानदार आपली छोटी छोटी so called ‘दुकानं’ लावून बसले होते….. हो, ‘बसले’ होते-रस्त्याच्या कडेला जमिनीवर सगळं सामान मांडून ! आणि प्रत्येक दुकानात एक केरोसिन चा दिवा ! त्या गावात तेव्हा वीज पुरवठा होत नसल्यामुळे गावात प्रत्येक ठिकाणी असे homemade कंदील दिसत होते.

प्रत्येक दुकानाची आपली एक speciality होती; कपडे, भांडी, भाज्या, फळं, किराणा सामान, वेगवेगळी अवजारे, सजावटीच्या वस्तू…… मला एकदम पुण्याची तुळशीबाग आठवली.. पण एक मोठ्ठा फरक ही जाणवला… या मार्केट मध्ये अज्जिबात गर्दी नव्हती आणि दुकानदारांकडे खूप वेळ आणि patience होता. थोडं शोधल्यावर एक दुकानात मला दोन तीन स्टोव्ह दिसले, पण ते सगळे पंप वाले होते आणि मला वातीचा स्टोव्ह हवा होता… कारण फक्त एकच…वातीचा स्टोव्ह कसा वापरतात हे मला माहीत होतं ; माझ्या आईकडे एक वातीचा स्टोव्ह होता- ‘ नूतन स्टोव्ह’ ! तसा तो स्टोव्ह mostly लॉफ्ट वरच असायचा; पण दिवाळीच्या आधी आई तो खाली उतरवायची. त्याच्यातल्या जुन्या वाती बदलून नवीन पांढऱ्या शुभ्र वाती घालायचं काम आम्हां तिघी बहिणींपैकी एखादीच्या वाट्याला यायचं! मग दुपारी सगळं घर निवांत असताना आई त्या स्टोव्ह वर कढई चढवायची….. आणि थोड्याच वेळातं घर भर दिवाळीच्या फराळाचा खमंग घमघमाट पसरायचा - कधी चिवडा,चकल्या तर कधी लाडू, करंज्या!

त्यामुळे मला पंप पेक्षा ‘वातीचा स्टोव्ह नेहेमीच जवळचा वाटायचा.

आणि म्हणूनच त्या संध्याकाळी डुमडूमा मार्केट मधे माझी नजर त्या खास स्टोव्ह च्या शोधात होती …. आणि शेवटी एकदाचा एका दुकानात मला तो दिसला. तिथे जाऊन बघते तर काय !!! नूतन स्टोव्ह !! मला म्हणजे अगदी ‘ कब के बिछडे हुए हम आज कहाँ आ के मिले” असं वाटत होतं.

अश्या रीतीने माझ्या संसारातली पहिली चूल मला त्या छोट्याश्या मार्केट मधे मिळाली!

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं होतं कारण खूप लांबचा पल्ला गाठायचा होता. रात्री जेवण झाल्यावर तिथल्या Mess staff पैकी एकानी विचारलं,” मेमसाब, सुबह चाय कितने बजे लाउँ ?” मी मागे वळून पाहिलं की ‘हा नक्की कोणाला विचारतोय?” कारण तिथे माझ्या शिवाय दुसरं कोणीच नव्हतं ! आणि मग एकदम लक्षात आलं ‘ अरेच्या, मेमसाब म्हणजे मी च की!’ ’ आणि त्या क्षणी मला माझ्या नव्या status ची जाणीव झाली …. आता मी फक्त Mrs Priya Joshi नव्हते ….माझी अजूनही एक ओळख होती- I was ‘wife of Capt Nitin Joshi’ ! I was now a member of the large but close-knit army family’. पण या privilege बरोबरच तेवढीच जबाबदारी पण आली होती. यापुढचं आयुष्य जितकं exciting होतं तितकंच ते आव्हानात्मक ही होतं.. and I was ready for it.

रात्री बराच वेळ मला झोप च येत नव्हती. तिचा तरी काय दोष म्हणा !! मी माझ्या पुढच्या आयुष्याची स्वप्नं बघत होते ना आणि तेही शब्दशः उघड्या डोळ्यांनी! मधेच अचानक माझं लक्ष खिडकीबाहेर गेलं आणि माझी नजर तिथेच खिळून राहिली. बाहेर मिट्ट काळोख होता आणि त्या काळ्या पडद्यावर लक्ष लक्ष प्रकाशबिंदू

लखलखत होते. जणू काही एखाद्या काळ्या चंद्रकलेच्या पदरावर कोणीतरी कुंदन जडवले होते.. माझ्याही नकळत मी नितीनला उठवलं आणि त्याला ते दृश्य दाखवलं. त्यानी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि मग माझ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहेऱ्यावर एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह होतं. मी त्याला म्हणाले, “ अरे बघ ना! कसलं मस्त दिसतंय!” त्यावर तो शांतपणे म्हणाला,”अगं, काजवे आहेत ते. त्यात काय एवढं?” मी म्हणाले,” पण एवढे काजवे एका ठिकाणी मी आत्ता पहिल्यांदाच बघतीये.” त्यावर त्यानी परत तेच उत्तर दिलं, “हे काहीच नाही... “ आणि तो पुन्हा झोपेच्या आधीन झाला. पण माझी मात्र झोप पूर्णपणे उडाली होती.. समोरचं दृश्य मी डोळ्यांत साठवून ठेवत राहिले.

दुसऱ्या दिवशी आम्ही बरोब्बर ठरलेल्या वेळी जीप मध्ये बसलो आणि लोहितपुर च्या दिशेनी कूच केलं.
क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users