मंद लागला हसावयाला

Submitted by निशिकांत on 4 April, 2019 - 01:52

आठवणींची झुळूक येता
ह्ळू लागला उमलायाला
वळचणीतला जुना चेहरा
मंद लागला हसावयाला

वर्तमान तर नगण्य आहे
भूतकाळ मिणमिणते झुंबर
लुकलुकते आयुष्य जरासे
काळेकुट्ट जरी का अंबर
धूळ झटकुनी, इतिहासाचे
पान लागलो चाळायाला
वळचणीतला जुना चेहरा
मंद लागला हसावयाला

अंगणातल्या जुन्यापुराण्या
झाडांच्या पानांची सळसळ
जाते घेउन मागे मागे
दिसू लागतो हृदयाचा तळ
कपारीत ज्या राहिलीस तू
पुन्हा लागली स्त्रवावयाला
वळचणीतला जुना चेहरा
मंद लागला हसावयाला

क्षणेक चमकुन वीज दिसावी
आली गेली तशी आठवण
गालावरच्या सुरकुत्यावरी
ओघळलेली भाव साठवण
तुझी चिरंजिव जखम केवढी!
पुन्हा लागली वहावयाला
वळचणीतला जुना चेहरा
मंद लागला हसावयाला

चिमटीमधुनी निसटुन जातो
"आज" कधी हे समजत नाही
"उद्या" अनिश्चित, "काल"च देतो
अमुल्य क्षण जगल्याची ग्वाही
जमले नाही म्हणून तुझिया
आठवणींना विसरायाला
वळचणीतला जुना चेहरा
मंद लागला हसावयाला

खडतर रस्ता, खाचा, खळगे
पडतो, उठतो अन् सावरतो
परावलंबी कधीच नव्हतो
आत्मबलाने मी वावरतो
मीच खोदली कबर आपुली
मृत्त्यू नंतर पुरावयाला
वळचणीतला जुना चेहरा
मंद लागला हसावयाला

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users