Odd Man Out (भाग १८)

Submitted by nimita on 3 April, 2019 - 22:46

"अशी अंधारात का बसलीयेस?" संग्रामच्या या प्रश्नानी नम्रता एकदम भानावर आली. तिनी आजूबाजूला पाहिलं. खरंच अंधार पडायला लागला होता. संग्रामनी खोलीतला दिवा लावला आणि सगळ्या खिडक्यांचे पडदे बंद केले. "मुलींना घ्यायला जायचंय ना अंगदच्या घरी?" सोफ्यावर तिच्या शेजारी बसत त्यानी विचारलं. "मनप्रीत म्हणाली आहे की ते दोघं येतील मुलींना सोडायला.आपल्यासारखाच त्यांच्या घरी पण गेलाय ना फाईल्सचा गठ्ठा ! त्यामुळे आपल्याला डिनरचं जमणार नाही हे गृहीत धरून तिनी आधीच पॅक करून ठेवलं होतं आपलं जेवण." अचानक काहीतरी आठवल्यासारखं तिनी विचारलं,"तुझं काम संपलं इतक्यात?" "नाही गं! इतक्यात कुठलं होतंय !!अख्खी युनिट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायची म्हणजे केवढी तयारी लागते त्याच्यासाठी. आणि तुला तर माहितीच आहे की युनिटमधे ऑफिसर्स ची संख्या किती कमी आहे. एका युनिट मधे जेवढे ऑफिसर्स असायला पाहिजेत त्याच्या अर्ध्याहूनही कमी असतात आजकाल.त्यामुळे सगळ्यांवरच कामाचं लोड वाढलंय." संग्राम म्हणाला.

नम्रता उठली आणि संग्रामच्या सोफ्यामागे जाऊन उभी राहिली . एकीकडे त्याच्या थकलेल्या खांद्याना हलक्या हातानी चेपून देत ती म्हणाली,"हं, मधे एकदा मी एक रिपोर्ट वाचला होता याबद्दल...त्यात बरीच कारणं सांगितली होती त्यांनी ..कॉर्पोरेट सेक्टर मधल्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या, armed forces ची अवघड असणारी सिलेक्शन प्रोसेस,त्यानंतरचं टफ ट्रेनिंग, सामान्य लोकांमधली जगरूकतेची उणीव वगैरे वगैरे ! आपल्या देशाचं दुर्देव काय आहे माहितीये... प्रत्येकाला वाटतं की 'शिवाजी जन्माला यावा...पण आपल्या नाही तर शेजारच्यांच्या घरात'!! जाऊ दे, या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करून काहीच निष्पन्न नाही होणार...उगीच आपल्याला मात्र मनस्ताप !!!"

"चहा घेतोस थोडा? फ्रेश वाटेल जरा," विषय बदलत स्वैपाकघरात जात नम्रतानी विचारलं.

संग्रामचा होकार गृहीत धरत तिनी एकीकडे चहाचं आधण ठेवलं आणि ती देवापुढे दिवा लावायला गेली. थोड्याच वेळात सगळं घर धुपाच्या मंद सुगंधानी दरवळून गेलं.

दोघांचे चहाचे कप्स ट्रे मधे ठेवून नम्रता वळली तर संग्राम दारातच उभा होता- एकटक तिच्याकडे बघत- आपल्याच विचारांत असल्यासारखा.. दोघांची नजरानजर होताच तो पुढे झाला, नम्रताच्या हातातला ट्रे ओट्यावर ठेवत तिला जवळ घेत म्हणाला," दुपारी मी तुला जे काही बोललो त्याबद्दल पुन्हा एकदा सॉरी. यापुढे पुन्हा कधी अशी चूक होणार नाही याची काळजी घेईन मी..नक्की." "अरे, मी तर केव्हाच विसरले ते सगळं," त्याच्या मिठीत विसावत नम्रता म्हणाली," आणि आता तुसुद्धा ते सगळं काढून टाक बघू डोक्यातून. आता हे पुढचे काही दिवस आपण फक्त चांगल्या आठवणी क्रिएट करण्यात घालवायचे. भांडणं, रुसवे-फुगवे,गैरसमज गुंडाळून ठेवायचे आता लॉफ्टवर...काय? पटतंय ना बायकोचं म्हणणं?"

तिचा चेहेरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरत संग्राम म्हणाला," नवऱ्याचा मूड कसा ठीक करायचा हे या बायकोला चांगलंच जमतं बरं का! और इसी लिये तो हम कहते हैं... बीवी हो तो ऐसी..."हे म्हणताना त्याच्या डोळ्यांतला तो मिस्किल भाव बघून नम्रताला त्याच्या इराद्यांची कल्पना आली. हसत हसत त्याला दूर ढकलत ती म्हणाली," सगळं कौतुक आत्ताच करणार का? नंतर साठी ठेव की थोडं राखून.." "नंतर ?? म्हणजे कधी ???" तिच्या प्रश्नाचा रोख लक्षात न आल्यामुळे संग्रामनी विचारलं.त्याच्या हातात चहाचा कप देत ती पुढे म्हणाली,"मगाशी केलेला तह विसरलास वाटतं इतक्यात!"

तिच्या वाक्याचा अर्थ संग्रामच्या लक्षात येईपर्यंत नम्रता तिथून पसार झाली होती. 'कधी कधी ही असले गुगली टाकते ना...मी एकदम क्लीन बोल्डच होतो....' संग्राम मनातल्या मनात म्हणाला,' म्हणूनच मी हिच्या प्रेमात पडलो." स्वतःशीच हसत संग्राम पुन्हा स्टडी रूमच्या दिशेनी जायला निघाला. नम्रता फोनवर कोणाशी तरी बोलत होती. बोलता बोलता तिच्या तोंडून 'AWWA' हा शब्द ऐकल्यावर त्याच्या काय ते लक्षात आलं आणि तो परत त्याच्या फाईल्समधे गढून गेला.

मिसेस घोषनी सांगितल्याप्रमाणे नम्रता दुसऱ्या दिवशीच्या मीटिंग बद्दल ठरवत होती.

AWWA म्हणजे Army Wives Welfare Association ! As the name suggests, ही संस्था आर्मी मधल्या सैनिकांच्या बायका आणि त्यांच्या मुलांकरता काम करते. अगदी युनिट लेव्हल पासून ते वरिष्ठ लेव्हल पर्यंत ही संस्था काम करते.. प्रत्येक युनिट मधल्या ऑफिसर्स च्या बायका वेळोवेळी त्यांच्या युनिटमधल्या जवानांच्या बायकांना ,त्यांच्या मुलांना भेटतात..त्यांच्याशी संवाद साधतात..त्यांच्या अडचणी, त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना त्या दृष्टीनी मार्गदर्शन करतात. जवानांच्या बायकांसाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे वेगवेगळे व्होकेशनल कोर्सेस ऑर्गनाईझ करतात..अगदी ब्युटी पार्लरच्या कोर्स पासून कॉम्पुटर ट्रेनिंग पर्यंत ... दर महिन्याला होणाऱ्या फॅमिली वेल्फेअर मीटिंग मधे त्या बायकांना विविध विषयांची माहिती दिली जाते..म्हणजे अगदी मुलांच्या immunization शेड्युल पासून ते वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट स्कीम्स पर्यंत..जेव्हा जशी गरज असेल त्याप्रमाणे वेळोवेळी ही सगळी माहिती त्यांना दिली जाते. या सगळ्या बरोबरच जवानांच्या बायका आणि मुलांकरता वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम , वेगवेगळ्या स्पर्धा पण घेतल्या जातात..आणि ही सगळी धुरा सांभाळायचं काम करतात ऑफिसर्सच्या बायका..!

या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून एक खूप महत्त्वाची गोष्ट साध्य होते- आणि ती म्हणजे- युनिट मधल्या जवानांच्या बायकांच्या मनात एक विश्वास निर्माण होतो...'आपली काळजी घ्यायला, अडी अडचणीत आपल्याला मदत करायला कोणीतरी आहे' ...आणि हाच विश्वास युनिट मधल्या सगळ्या सदस्यांना एकत्र बांधून ठेवतो... देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे परिवार एकत्र होऊन एक मोठा संयुक्त परिवार बनतात - अगदी त्यांच्याही नकळत !!!

मिसेस घोष नी ही AWWA ची मीटिंग का बोलावली असेल याची कल्पना होती नम्रताला. आता लवकरच युनिट फील्ड मधे जाणार होती.त्या दृष्टीनी जवानांच्या बायकांना मार्गदर्शन करायला, त्यांच्या काही समस्या असल्या तर त्या माहित करून घ्यायला उद्याची मीटिंग होणार होती.

त्या संदर्भात संबंधित ऑफिसर आणि JCO (Junior Commissioned Officer) शी फोनवर बोलून नम्रतानी मीटिंग बद्दलची सगळी व्यवस्था केली. मिसेस घोष ना फोन करून सगळी डिटेल्स सांगितली आणि ती परत एकदा डायरी आणि पेन घेऊन तिची कामांची लिस्ट करायला बसली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users