Odd Man Out (भाग १६)

Submitted by nimita on 20 March, 2019 - 21:45

म्हटल्याप्रमाणे साधारण अर्ध्या पाऊण तासात नम्रता परत आली.खरं म्हणजे आधीच्या प्लॅनप्रमाणे संग्राम आणि नम्रता संध्याकाळी थोडे उशिरा पार्टीला जाणार होते आणि येताना मुलींना घेऊन येणार होते.पण ऑफिसमधून संग्रामसाठी आलेला फाईल्सचा डोंगर बघून नम्रतानीच तो प्लॅन कॅन्सल केला होता. मनप्रीत ला पण परिस्थितीची पूर्ण कल्पना होती कारण तिच्या घरी पण तेच दृश्य होतं ;म्हणून तिनी आधीच नम्रता आणि संग्रामसाठी डिनर पॅक करून ठेवला होता. मनप्रीत म्हणाली,"पार्टी के बाद हम नंदिनी और अनुजा को छोडने आएंगे। उस बहाने आपके हाथकी बनी हुई कॉफी भी पी लेंगे।" थोडा वेळ - 'नवरा आणि त्याचं न संपणारं काम'- या त्यांच्या फेव्हरिट विषयावर गॉसिप करून झाल्यावर नम्रता घरी यायला निघाली. ती दाराचं कुलूप काढत असताना मागून तिला कोणीतरी हाक मारली. आवाज तिच्या ओळखीचा होता. तिनी हसत हसत मागे बघितलं आणि म्हणाली," Good evening Mrs Ghosh." मागे रस्त्याच्या कडेला त्यांच्या युनिटच्या CO ची - कर्नल घोष ची बायको उभी होती. मिसेस घोष स्वभावानी खूपच मनमिळाऊ होत्या, आणि कायम हसतमुख !

बंगाली मिठाईचा गोडवा अगदी पूर्णपणे उतरला होता त्यांच्या वागण्या बोलण्यात.. त्यांच्याकडून खूप काही शिकली होती नम्रता...आणि तेही नुसतं त्यांना ऑब्झर्व करून करूनच ..या बाबतीत ती आणि एकलव्य एकाच शाळेचे (?) विद्यार्थी होते.

"Evening walk पे निकली हैं आप ? प्लीज, अंदर आइये ना।" नम्रता त्यांच्याजवळ जात त्यांना म्हणाली." बढियासी अद्रकवाली चाय पीते हैं गार्डन में बैठके।"

त्यावर त्यांच्या नेहेमीच्या स्टाईलमधे गोड हसत त्या म्हणाल्या,"आज रहने दो, फिर कभी आऊँगी। बस तुमसे एक जरुरी काम था। मैं सोच रही हूँ की कल सुबह दस बजे AWWA की मीटिंग रखते हैं। तुम उस हिसाब से सारी तैय्यारी कर लेना। मैं रात को तुम्हे फोन करनेही वाली थी.."

नम्रतानी त्यांना परत एकदा घरात यायचा आग्रह केला , त्यावर त्या म्हणाल्या,"आता थोडे दिवस नवऱ्याबरोबर वेळ घालव... एकदा का युनिट इथून गेली की मग आपणच आहोत एकमेकींना सोबत द्यायला.. तेव्हा पाज हवा तेवढा चहा!"

त्यांच्या या अशा स्वभावामुळेच तर नम्रताला त्या आवडायच्या. त्यांचं वागणं बोलणं अगदी एका सिनियर लेडीला साजेसं होतं. आपला नवरा युनिट चा कमांडिंग ऑफिसर आहे याचा वृथा अहंकार त्यांच्या वागण्यातून कधीच दिसला नाही. याउलट CO ची बायको म्हणून त्यांची जी जबाबदारी आणि कर्तव्यं होती ती सगळी त्या अगदी योग्य रित्या पार पाडायच्या.

दुसऱ्या दिवसाच्या मीटिंग बद्दल तिला परत एकदा आठवण करून देत त्या जायला वळल्या. नम्रताही कुलुप उघडून घरात आली. मनप्रीतनी पॅक करून दिलेला डिनर स्वैपाकघरात ओट्यावर ठेवत तिनी एकीकडे चहाचं आधण ठेवलं.

संग्रामला आज आपल्याबरोबर बसून चहा प्यायला वेळ नसणार हे माहित असल्यामुळे तिचा कप डायनिंग टेबलवर ठेवत ती फक्त त्याचा कप घेऊन स्टडी रूमपाशी गेली. बंद दारावर एकदोनदा नॉक करून ती दार ढकलून आत गेली. अचानक झालेल्या या आवाजानी संग्रामनी एकदम मागे वळून पाहिलं. दारात नम्रताला बघून त्यानी तिला विचारलं,"हे काय ? मनप्रीतकडे जाणार होतीस ना ? गेली नाहीस अजून ??"

"वाह ! याला म्हणतात जीव ओतून काम करणं !!!" संग्रामला चिडवत नम्रता म्हणाली,"मी बाहेरून कुलूप लावून गेले होते म्हणून बरं.. नाहीतर माझ्या मागे कोणीतरी सगळं घर लुटून नेलं असतं तरी तुला कळलं नसतं. अर्धा तास तरी झाला असेल मी परत येऊन.. "

नम्रतानी मारलेला टोमणा ऐकून संग्राम थोडा ओशाळला.. खरोखरच कामाच्या नादात त्याला कळलंच नव्हतं ती कधी गेली आणि कधी परत आली ते. खुर्चीवरून उठून तिच्या हातातून चहाचा कप घेत तो म्हणाला," अगं, दार बंद होतं ना स्टडी रूमचं ; म्हणून मला ऐकू नाही आलं. आणि राहता राहिला घर लुटण्याचा प्रश्न...तर for your kind information..हे कॅन्टोन्मेंट आहे मॅडम.. इथे सगळे फौजी राहतात. और इतिहास गवाह है...आजतक किसी फौजी ने किसीको नहीं लूटा। तेव्हा त्या बाबतीत तू निश्चिन्त रहा. आणि समजा जरी तू म्हणातीयेस तसा एखादा चोर आलाच तरी त्याला काय मिळणार आपल्या घरात ? आपल्यासाठी सगळ्यात मौल्यवान वस्तू म्हणजे माझे युनिफॉर्म्स आणि माझी मेडल्स , हो ना?" त्याच्या या वाक्यावर उत्तरादाखल नम्रतानी पण हमी भरली..थोडं थांबून उपहासानी हसत संग्राम म्हणाला," आणि आपल्या या मेडल्समधे आपण सोडून बाकी कोणालाही कसलाही इंटरेस्ट नाहीये गं..."

त्यानी अगदी सहजपणे म्हटलं असलं तरी खरी वस्तुस्थिती हीच आहे, हे नम्रतालाही माहीत होतं.पण हे म्हणताना संग्रामच्या चेहेऱ्यावर दिसलेली ती वेदना बघून नम्रताचा जीव कासावीस झाला. त्याच्या गळ्यात आपले हात माळत ती लाडीकपणे म्हणाली," बाकीच्या लोकांचं मला नाही बाई माहीत...पण माझ्या नवऱ्याला मिळालेली मेडल्स माझ्यासाठी मात्र सगळ्यात मौल्यवान आहेत बरं का! अगदी माझ्या दागिन्यांपेक्षा सुद्धा. त्या प्रत्येक मेडल मधून त्याच्या हृदयातलं देशप्रेम दिसतं मला."

तिला हळूच आपल्याजवळ खेचत संग्राम म्हणाला,"हं, पण या हृदयात फक्त देशच नाहीये ...अजूनही कोणीतरी आहे... बघायचंय ?"

त्याच्या या धिटाईला लटका विरोध करत, त्याच्या हातांच्या विळख्यातून सुटण्याचा प्रयत्न करत नम्रता म्हणाली,"आवडलं असतं बघायला, पण काय करणार...हा चहाचा कप आहे ना मधे. आणि त्यात तुमच्या त्या 'कोणीतरी' नी प्रेमानी बनवलेला चहा पण आहे...जो आता गार होतोय; तेव्हा आधी तो कप जवळ करा...आणि सध्या तरी या टेबलवरच्या फाईल्स कडे बघा. आपलं बघणं- दाखवणं नंतर करू ..कशी वाटली आयडिया?"

"हं, not bad," एक मोठा सुस्कारा सोडत संग्राम म्हणाला,"फक्त नंतर ऐनवेळी दुसरं काही कारण नको आणू मधे . ही अट मंजूर असेल तरच आत्ता तह करण्यात येईल."

"Yes sir. मंजूर है।" म्हणत मिश्किलपणे हसत नम्रता खोलीच्या बाहेर गेली आणि तिनी दार बंद करून घेतलं
क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users