घट्ट ओवतो असंख्य नाती ---

Submitted by निशिकांत on 18 March, 2019 - 00:55

( मनस्पर्शी साहित्य मंच या समूहातर्फे आयोजीत "आम्ही भारतीय" या विषयावरील काव्यस्पर्धेत माझ्या कवितेला "मनस्पर्शी तारांकित" हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचा मला खूप खूप आनंद आहे. ही कविता लिहिताना मी मनात ठरवले होते की तिरंगा, देशाचे वैभव असे जुने मापदंड न घेता कविता लिहायची. भारतमातेबद्दल असीम प्रेम तर आहेच, पण ते जरा वेगळ्या कल्पनांतून व्यक्त करायचे. हे धाडस करीत रचना लिहायला सुरुवात केली आणि एकटाकी लिहून पण झाली. सदर कविता प्रस्तूत करतोय. )

असोत अमुचे धर्म वेगळे
त्यात पुन्हा जाती उप-जाती
भारतीय असल्याचा धागा
घट्ट ओवतो असंख्य नाती

राम कालचा खेड्यामधला
दिवा अंगणी लावायाचा
उजळायाचे रहीमचे घर
शेजारी जो रहावयाचा
अशी दिवाळी दोघांचीही
तेवत होत्या दिव्यात वाती
भारतीय असल्याचा धागा
घट्ट ओवतो असंख्य नाती

सीमेवरती शहीद होतो
धर्म जात का असते त्याला?
भारतीय तो सर्वार्थाने
सलाम करतो देश जयाला
मातृभूमीच्या कुशीत घेते
गौरवगाथा चिरविश्रांती
भारतीय असल्याचा धागा
घट्ट ओवतो असंख्य नाती

जरी संस्कृती जुनी आमुची
ध्यास नेहमी नव्या नव्यांचा
क्षेपण अस्त्रे तयार केली
वापर लिलया संगणकांचा
पादाक्रांत कराया शिखरे
उर्मी उसळे प्रांतोप्रांती
भारतीय असल्याचा धागा
घट्ट ओवतो असंख्य नाती

मुलांसोबती मीही गेलो
अमेरिकेला रहावयाला
खूप सुबत्ता असून तेथे
कुणीच नव्हते बोलायाला
आठवून भारतीय दरवळ
ओघळायचा मी एकांती
भारतीय असल्याचा धागा
घट्ट ओवतो असंख्य नाती

भूतकाळ अन् भविष्य माझे
असे सांधले भारतासवे!
भारतीय होण्या अभिमानी
दुसते कारण कोणते हवे?
जन्मोजन्मी टिळा लावण्या
वापरीन मी इथली माती
भारतीय असल्याचा धागा
घट्ट ओवतो असंख्य नाती

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users